Total Pageviews

Tuesday, 16 August 2011

SUPPORT ANNA AGAINST CORRUPTION

भ्रष्टाचाराचे अराजक राजन खान
भयंकर विदारक चित्र आहे या देशाचं. आपण सगळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वतःच्याच मुळांशी अनैतिक, भ्रष्ट वर्तणुकीचं विष पेरत चाललो आहोत. अनेकांना भ्रष्टाचाराची वरपांगी रसाळ, गोमटी फळं मिळत आहेत; पण ही फळं अल्पजीवी आणि आत्मघातकी आहेत. भविष्यात भ्रष्टाचाराचं अराजक आपल्या असंख्य विखारी जिव्हांनी नव्या पिढीचा घास घेणार हे स्पष्ट दिसत असताना आपण आणखी किती दिवस डोळ्यांवर कातडं ओढून गप्प बसणार आहोत? आपल्या घरातील घाण साफ करायची तर झाडूही आपणच हाती घ्यायला हवा.
भारतीय लोकांची एक गोष्ट अतिशय महान आहे. ते देशाला "आई' समजतात; पण एकदा एखाद्या गोष्टीला आई म्हटलं की, त्या आईवर मनापासून प्रेम करायचं असतं, पूर्ण श्रद्धा ठेवायची असते, प्रामाणिक आस्था बाळगायची असते, याचं भान आणि ज्ञान मात्र भारतीय लोकांना नाही. देशाला "आई' म्हटल्यावर, तिच्यावर श्रद्धा ठेवायची. म्हणजे प्रत्येक लेकरानं आपल्या आईचे सगळे नियम, सगळे कायदे मन:पूर्वक आणि काटेकोर पाळायचे. आपली प्रत्येक वर्तणूक निर्मळ, स्वच्छ, आदर्श आणि पारदर्शी ठेवायची असते, थोडीशीही प्रतारणा, बेइमानी, कणभराचंही बदकर्म करायचं नसतं; पण आपल्या आसपास पाहिलं तर स्पष्ट दिसतं की, मी आयुष्यात एकदाही भ्रष्टाचार केला नाही, मी आयुष्यात एकदाही देशाचा एकही कायदा-नियम मोडला नाही. मी आयुष्यात एकदाही क्षुल्लकसाठी सामाजिक गुन्हा केला नाही, असं छातीठोकपणे म्हणू शकणारे लोक या देशात आता जवळजवळ नाहीतच. त्या अर्थानं या देशातले जवळजवळ सर्वच लोक आपल्या देश नावाच्या आईशी गद्दारी करणारे आहेत. भयंकर विदारक चित्र आहे या देशाचं. भ्रष्टाचार आणि कुकर्म यांनी इथला जवळजवळ प्रत्येक जण व्याप्त आणि लिप्त आहे. नियमबाह्य वर्तणुकी आणि भ्रष्टाचाराने संपूर्ण देशच सडलेला आहे. माणसाच्या रोजच्या जगण्यात कणाकणावर भ्रष्टाचारानं कब्जा घेतला आहे. अगदी भ्रष्टाचार मोडायला निघालेल्या चळवळीसुद्धा नंतर भ्रष्ट होतात.
सज्जनपणाचं, नैतिकतेचं ढोंग
आज मुबलक भ्रष्टाचार चालू असूनही जोडीला, दुसऱ्या बाजूला सज्जनता, नैतिकता यांचं ढोंगही चालू आहे. मला वाटतं, भविष्यात सज्जनपणाचं, नैतिकपणाचं ढोंगसुद्धा उरणार नाही. लोकांना या ढोंगांचा कंटाळा येईल आणि लोक निडरपणे, उघडपणे, निर्लज्जपणे, निगरगट्टपणे भ्रष्टाचार करू लागतील. या भ्रष्टाचाराच्या अराजकात पुढच्या पिढ्यांचं काय होणार, हाही प्रश्‍न आहे. आमच्या मागच्या पिढीचा भ्रष्टाचार कच्चा होता असं म्हटलं, तर आमच्या पिढीचा भ्रष्टाचार पक्का झालाय, असं म्हणायला हरकत नाही. पुढची पिढी यात निश्‍चितच विकसित होईल आणि भ्रष्टाचाराची ध्वजा आणखी उंच नेईल, हे निर्विवाद. पुढच्या पिढीत भ्रष्टाचाराचा अतिरेकच होईल.
जगायला लागतं तरी काय?माणसाला जन्मापासून मरेपर्यंत श्‍वासासाठी हवा, पोटासाठी अन्न आणि पाणी आणि ऊन- वारा- पाऊस लागू नये म्हणून निवारा. पण माणसांनी आता जगण्यात अवांतर गरजांची रेलचेल करून टाकली आहे. एका अर्थानं माणसाला मूलभूत जगण्याचा विसरच पडला आहे आणि जगण्याच्या अतिरिक्त, अवांतर गरजा हेच त्याचं मुख्य जगणं होऊन बसलं आहे, आणि अवांतर, अतिरिक्त गरजांना तर सीमाच नाही. आज भारतातल्या प्रत्येक माणसाचा या अतिरिक्त आणि अवांतर गरजांसाठी आयुष्याशी झगडा चालू आहे आणि हा झगडा निपटायचा तर त्याला अतिरिक्त आणि अवांतर पैशांची नितांत गरज आहे आणि असा पैसा येण्याचा एकमेव मार्ग आहे भ्रष्टाचार. तोही असीम आणि अनंत आहे.
भ्रष्टाचाराला सगळेच वैतागलेले...याला काही इलाज आहे का? इलाज सांगण्याआधी एक गोष्ट मात्र इथं आवर्जून नमूद करायची आहे. देशात सर्वत्र भ्रष्ट लोकांचा सुळसुळाट झाला असला न्‌ त्यांचीच सर्वत्र निव्वळ बुजबुज असली तरी आश्‍चर्यकारकपणे आज इथला प्रत्येक जणच भ्रष्टाचाराला वैतागलेला आहे. विचित्र चित्र असं आहे की, भ्रष्टाचाराचा हा आजचा सर्वोच्च अतिरेक कुणालाच नको आहे. (म्हणून तर अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतो आहे.) सर्वांनाच भ्रष्टाचारापासून मुक्तता हवी आहे. ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. असं म्हटलं जातं की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा बदलाला किंवा क्रांतीला जन्म देतो. मलाही वाटतं, भारतातल्या भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला, तर त्यातनं क्रांती व्हावी. आपला देश पूर्णपणे निर्मळ, शांत, सुखी जगावा; पण भांडवली व्यवस्थेची मजबूत पकड जोवर आपल्या देशावर आहे, तोवर ती इथं क्रांती होऊ देईल याची शक्‍यता कमी आहे.
देशाला हवेत टणक देशप्रेमी!याला एकच इलाज आहे. पण तो जरा भाबडा आहे. या देशातला प्रत्येक माणूस जिद्दीनं आणि प्रामाणिकपणे पराकोटीचा देशप्रेमी झाला पाहिजे. प्रत्येक माणूस देशावर नितांत आणि जिवापाड प्रेम करणारा झाला पाहिजे. भारत क्रिकेटमध्ये जिंकला की फटाके वाजवणं आणि घरात बसून कसाबला फाशी द्यायला पाहिजे म्हणणं म्हणजे देशप्रेम नव्हे. फटाके वाजवून झाले आणि शिव्या देऊन झाल्या की, हीच माणसं फालतू सुखासाठी सुखेनैव भ्रष्टाचार करायला मोकळी होतात. ठाम, पक्के, खरे आणि टणक देशप्रेमी लोक जोवर या देशात जन्मत नाहीत, आणि सगळ्या देशातले लोक जोवर तसे होत नाहीत, तोवर या देशातला भ्रष्टाचार अजिबात संपणार नाही.
अभिमानास्पद काहीच नाही
भारतीय संस्कृती जगात सर्वांत महान आहे. मात्र, आज जगासमोर अभिमानानं असं या देशात काय चालू आहे? प्रत्येक बाबतीत इथं गलिच्छ अनागोंदी आहे. जातीयता, धर्मांधता, कर्मकांडांचा अतिरेक, देव-धर्म असूनही व्यक्तिगत आणि सार्वजनिक पापांचा अतिरेक, जगानं शोधलेल्या विज्ञानाचा मुबलक वापर तर करायचा; पण स्वत: मात्र विज्ञानवादी व्हायचं नाही, ही सर्व काही महान संस्कृतीची लक्षणं नाहीत. इथला एकही माणूस दुसऱ्याला पैसे चारण्याची एकही संधी सोडत नाही. इथला एकही माणूस पैसे खाण्याची एकही संधी सोडत नाही. इथं सरकारी नोकर आणि राजकारणी हे समाजाचे सेवक आहेत असं म्हटलं जातं; पण प्रत्यक्षात समाजाला त्यांच्यासमोर लाचारीनं हांजीहांजीनं वागावं लागतं. इथल्या सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, राज्य आणि केंद्रीय विधिमंडळ ही भ्रष्टाचारांची आगरं झालेली आहेत आणि पक्ष सत्तेत, विरोधात कुठंही असो, सगळे लोक आर्थिक मलई एकमेकांत वाटून खातात. राजकीय पक्ष आता भ्रष्टाचारानं जमवलेल्या पैशांशिवाय चालत नाहीत आणि त्यांना आता सत्तेवर यायचं असतं ते जास्तीत जास्त पैसा खाता येईल यासाठी. पोलिस, कायदा आणि न्यायपालिकांचा अवतार तर आता भ्रष्टाचारानं लिबलिबीत झाला आहे.

...
फक्त भ्रष्टाचाराचं नागरिकशास्त्र
भारतीय लोकांना सरकारी नोकऱ्या किंवा राजकारणात जायची जबरदस्त ओढ असते, तिथं पैसा खाण्याची अधिकृत सोय होईल म्हणून जायचं असतं, हे नागडं सत्य आहे. प्रत्येक भारतीय माणसाला वाटतं, आपल्या एकट्याला सगळ्या सवलती मिळाव्यात. इथले पोलिस आणि न्यायालयीन लोकही कायदे पाळताना दिसत नाहीत. एक खरं, या देशाला फक्त भ्रष्टाचाराचं नागरिकशास्त्र आहे. निर्मळ, सच्छिल माणसांची आणि देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांची इथं परिपूर्ण वानवा आहे. मग कशात या देशाची संस्कृती महान?
पुढाऱ्यांच्या नावाने गळे कशासाठी?राजकारणी समाजाच्या पोटीच जन्म घेतात. समाजच भ्रष्टाचाराच्या घाणीनं बरबटलेला असेल तर त्याच्या पोटी सज्जन पुढारी कसे जन्म घेणार? लोकशाहीनं अशा पुढाऱ्यांच्या नांग्या ठेचण्याचा अधिकार तुम्हाला दिला होता, तो काय तुमचा स्वर्गस्थ पिता येऊन वापरणार होता? तुम्ही मतदानाच्या दिवशी सुटी साजरी करत घरातच बसणार, तुम्ही मतदानाला गेला तरी नोटा घेऊन मतदान करणार. हा समाजाचं काय भलं करणार ते पाहणार नाही, उमेदवार निवडून आल्यावर तुम्ही त्याच्याकडे स्वत:ची बेकायदेशीर कामं करून घ्यायला जाणार, उमेदवाराला वशिल्यासाठी वापरायची वस्तू करणार, हा सगळा भ्रष्टाचारच नाही का? मग नुसतं पुढाऱ्यांच्या न्‌ राजकारण्यांच्या नावानं गळे काढण्यात काय अर्थ आहे?
नैतिक-अनैतिक ओळखा...विचारवंत म्हणतात- लोकशाही अजून आपल्या लोकांना उमजलीच नाही. मला वाटतं, या विचारवंतांना लोक उमजले नाहीत. लोकांना लोकशाही उमजत नाही, पण लोकशाहीचे गैरफायदे घेणं हे बरं उमजतं? लोक अडाणी असतात, असं विचारवंत म्हणतात. मला वाटतं, आता या लोकांच्या अडाणी असण्याची, सामान्य असण्याची किळस केली पाहिजे. यांना शतकानु शतकं सामान्य कुणी राहायला सांगितलंय? असामान्य होण्यापासून कुणी रोखलंय? असामान्य होणं म्हणजे ज्ञानी होणं आणि ज्ञानी होण्यासाठी शाळेतच जावं लागतं असं काही नाही. सामाजिक ज्ञान तर समाजातच मिळतं आणि त्यातलं बरं-वाईट ठरवता येणं हे प्रत्येकाच्या मेंदूत घडतं. नैतिक काय, अनैतिक काय हे तर समाजात शिकवलं जातं. त्यातलं नैतिक असलेलं सगळं आपण पाळावं याचं भान सामान्य माणसाला का नसावं?
भ्रष्टाचाराचे मूळ चंगळवाद जगाचं प्रचंड आधुनिकीकरण आणि त्या नावाखाली सुरू असलेलं बाजारीकरण, व्यापारीकरण आणि त्यातून फोफावलेला प्रचंड चंगळवाद भ्रष्टाचाराचं कारण आहे. गेल्या वीस-तीस वर्षांत देशाला आधुनिक करण्याची घाई उडवून देण्यात आली आणि त्यांचं माहात्म्य वाढवण्याची कृत्रिम लाट आणण्यात आली. स्पर्धेत धावला नाहीत, तर मराल असं भय दाखविण्यात आलं. लोक त्याला घाबरले आणि आपल्यात ताकद आहे की नाही याचा विचार करता धावू लागले. त्या धावण्यात काहीही करून जिंकायचंच अशी वृत्ती उपजली आणि या "काहीही करण्यात' भ्रष्टाचारसुद्धा सामील झाला. सरकार फक्त कंत्राटं देणार, जनता आणि भांडवलदारांमध्ये मध्यस्थ राहणार, भांडवलदारांना चाप लावण्याचं ढोंग करणार आणि त्यांनी आमिष दाखवताच जनतेची फसवणूक करणार, असं नवं धोरण सुरू झालं आणि आपल्याला आता सरकार वाली नाही, अशी भावना लोकांत उपजली. त्यातून एक अराजकी वृत्ती सर्वांच्याच मनात तयार झाली. खूप लोकांना असं वाटतं की भ्रष्टाचाराची प्रवृत्ती संपली पाहिजे ती दुसऱ्यांची, माझी नव्हे. मला मात्र वेळ येताच भ्रष्टाचार करण्याची सोय, सवलत असली पाहिजे. मला अनैतिक वागण्याची (वाटल्यास मी गुपचूप तसं वागीन, पण) मुभा असलीच पाहिजे. या असल्या आपमतलबी प्रवृत्तीमुळंही इथला भ्रष्टाचार निकाली निघत नाही.
यावर उपाय काय? ) खुली भ्रष्ट व्यवस्था खुली भ्रष्ट व्यवस्था या देशात अधिकृतपणे सुरू झाली पाहिजे. भ्रष्टाचार खुला करण्यानं जुन्या ज्या कायद्याच्या, पैसे खाण्याच्या-खाऊ घालण्याच्या व्यवस्था धडाधडा कोसळतील आणि नव्याच भन्नाट व्यवस्था जन्माला येतील. कदाचित लोक कायदेसुद्धा पाळायला लागतील. ) प्रत्येक देव आणि धर्म मानणाऱ्या माणसानं आपली खरंच देवावर श्रद्धा असेल तर भ्रष्टाचार, अनाचार आणि गुन्हे करणारा आपला जो मेंदू आहे तो पूर्ण स्वच्छ करून, देवाधर्माला स्मरून शपथ घेणं की, "मी भ्रष्टाचार किंवा कोणताही गुन्हा करणार नाही. केला तर मी पापी आहे, मी नरकात जाईन.' (पण या इलाजाचा उपयोग होईल असं वाटत नाही.)) देशात सर्व धर्माची जेवढी धर्मस्थळं आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी देणगी द्यायला आलेल्या प्रत्येकाला तिथल्या धर्मगुरूंनी आणि कायद्याच्या रक्षकांनी एक प्रश्‍न आवर्जून विचारला पाहिजे, हा देणगीचा माल त्यानं कुठल्या कमाईतनं आणला? पापाच्या की पुण्याच्या? आणि स्पष्ट सांगितलं पाहिजे की, इथं फक्त पुण्य कामाचाच पैसा स्वीकारला जाईल. ) भारतातल्या प्रत्येक गावात ज्यांना भ्रष्टाचार होऊ नये असं वाटतं, अशा लोकांनी आपल्या टोळ्या तयार केल्या पाहिजेत. या टोळीतर्फे जिथं जिथं भ्रष्टाचार होतो, अशा जागांवर ठळक आणि मोठे फलक लावले पाहिजेत. कुणी या टोळीकडं तक्रार केली तर या टोळीनं प्रत्यक्ष जाऊन त्या पैसे मागणाराला जाब विचारला पाहिजे. गावोगावच्या अशा टोळ्यांमध्ये समन्वय असला पाहिजे आणि या टोळ्यांनी भ्रष्टाचाराचा मोह टाळला पाहिजे.) राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराला आणि अनाचाराला वेसण घालायचा, एक इलाज आहे. निवडून येण्याच्या कुठल्याही एका पदावर एक माणूस आयुष्यात फक्त दोनदाच बसू शकेल, असा कायदा करणे. एक माणूस ग्रामपंचायतीत निवडून गेला तर त्याला तिथं निवडून जाण्याची दोनदाच संधी. तिसऱ्या वेळी त्यानं निवडणूक लढवायला बंदी. त्यापुढं त्याला निवडणूक लढवायची असेल तर त्यानं पंचायत समितीपासून संसदेपर्यंतची कोणतीही निवडणूक लढवावी. तसा कायदा झाला तर भ्रष्टाचाराची वंशपरंपरा खुंटेल. असे इलाजही खूप सारे सुचवता येतील. प्रश्‍न आहे तो त्यांची प्रामाणिक अंमलबजावणी कोण करणार हा

No comments:

Post a Comment