ANNA HAZARES CRUSADE AGAINST CORRUPTION PRODUCES RESULTS
गेले तीन दिवस देशातील भ्रष्टाचार संपवण्याची शपथ घेणारे हजारो तरुण रस्त्यावर येत आहेत. साऱ्या देशात हे लोण पसरले असून, आता प्रत्येकाला या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात आपणही सहभागी व्हायला हवे, याची निदान जाणीव तरी होऊ लागलेली दिसते. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामुळे तर ही जाणीव अधिकच स्पष्टपणे दिसते आहे. रिक्षा प्रवाशांना मीटरप्रमाणे भाडे न आकारता, त्यांची लुबाडणूक करणारा रिक्षावालाही सध्या एकदम शहाण्यासारखा वागू लागल्याचा अजब अनुभव काही नागरिकांना येत आहे आणि पोलीस खातेही अनपेक्षितपणे सौजन्य सप्ताहाप्रमाणे वागू लागल्याचे जाणवते आहे. अण्णा हजारे यांच्या या आंदोलनातील कळीचा शब्द ‘जनलोकपाल’ हा नसून भ्रष्टाचार असा झाला आहे. या शब्दाचा व्यावहारिक अर्थ या देशातील प्रत्येकाला कळून चुकल्यामुळे तो अतिशय पोटतिडकीने आणि संतापाने या आंदोलनात आपलेही योगदान देतो आहे. सामान्यत: सरकारी कार्यालये आणि तेथील कर्मचारी-अधिकारी या भ्रष्टाचारात बरबटलेले असतात, असा समज असतो. निदान या राजपत्रित अधिकारी संघटनेच्या कार्यसंस्कृती अभियानामुळे तो खरा वाटावा, असे चित्र आहे. कर्मचाऱ्यांनी आपली स्थावर मालमत्ता आणि मौल्यवान वस्तूंची यादी घराच्या दर्शनी भिंतीवर लावावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या सगळय़ांच्याच मनात येणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे कदाचित त्यामुळे मिळूही शकतील. आपल्याएवढाच पगार असणाऱ्या या सरकारी कर्मचाऱ्याच्या घरात आपल्यापेक्षा अधिक साधनसंपत्ती कशी, या प्रश्नाने बेजार झालेल्या अनेक शेजाऱ्यांना यामुळे अंशत: समाधान मिळण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती राजकारणात आली रे आली की, तिच्या हाती दोन मोबाइल कसे येतात? दिवसाला दोन वेळा ड्रायक्लीन केलेले कपडे कसे बदलता येतात, असे प्रश्न आपल्याला पडतात. या लोकांच्या घरातील दुधाचे बिल, वाण्याचे बिल कोण भरते किंवा त्यासाठीचे पैसे या लोकांकडून कुठून येतात, असल्या प्रश्नांना आजवर उत्तरे नसायची. मिनी केजीपासून ते मेडिकल-इंजिनीअरिंगच्या प्रवेशापर्यंत आणि रिक्षापासून ते दाखला देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यापर्यंत प्रत्येक बाबतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ड्रॉवर्सची उघडझाप सतत होत असते. या ड्रॉवर्समध्ये जमा होणारी राशी हाच भ्रष्टाचार असतो, हे आता भारतीय समाज जवळजवळ विसरला आहे. जे काम करण्याचे वेतन मिळते, तेच काम करण्यासाठी वरकड कमाई करणाऱ्या या सगळय़ा बाबूंना ‘पैसे घ्या, पण निदान काम तरी करा’, असा सल्ला सामान्य माणूस देत असतो. अधिकारी संघटनेने दिलेल्या सूचना यामुळेच महत्त्वाच्या आहेत. भ्रष्टाचाराची कीड संपवण्यासाठी केवळ आंदोलनाला पाठिंबा देऊन उपयोग नाही, तर त्यासाठी अनुरूप कृतीचीही जोड द्यायला हवी, असाच या संघटनेचा हेतू असेल, असे आपण मान्य करायला हवे. पैसे देऊन कंटाळलेल्या आणि पिचलेल्या सामान्यांना आता सरकारी कार्यालयांमध्ये आणि कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या घरांमध्ये या आंदोलनाचा दृश्य परिणाम दिसू शकेल, अशी आशा आता बाळगायला हरकत नाही. या धोरणाचे अभिनंदन करताना अशी लाच देणाऱ्या प्रत्येकाने स्वत:ला प्रश्न विचारण्याची खरे तर गरज आहे. मी पैसे घेणार नाही आणि मी पैसे देणारही नाही, अशी शपथ घेणाऱ्या लाखो तरुणांची आज खरी गरज आहे. हजारे यांच्या आंदोलनाला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादाचा अर्थ हाच आहे की, या स्वातंत्र्योत्तर संस्कृतीला कंटाळलेल्या प्रत्येकाला आता वातावरणात स्वच्छता हवी आहे. अधिकाऱ्यांचा हा कित्ता समाजातील अन्य सर्वच घटकांनी गिरवला, तर अधिक योग्य ठरेल
No comments:
Post a Comment