Total Pageviews

Tuesday 23 August 2011

GREEDY INDIAN CRICKETERS LOSE BECAUSE OF MONEY

पैशाची अति हावच नाशाला कारण!सुहास फडके Tuesday August 23, 2011 पैशाची अति हाव धरली, फक्त पैशाचा विचार केला की काय अवस्था होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे, भारतीय संघाचे इंग्लिश गोलंदाज आणि फलंदाजांनी केलेले मातेरे.या दौ-यात भारताला एकही कसाटी जिंकता आली नाही. चारही कसोटी सामन्यांतील पराभव इतका दारूण होता की, क्रिकेटच्या छोट्या जगतातील पहिल्या क्रमांकाचा संघ तो हाच काय असा प्रश्न सर्वांना पडला. सर्वसाधारणपणे, संघ परदेशातील हवामानात रूळला की त्याचा खेळ सुधारतो. येथे आधीच्या कसोटीतील पराभव परवडला असे म्हणायची पाळी आपल्यावर आली.चारही सामन्यांत राहुल द्रविड खेळला नसता तर प्रत्येक सामना बहुधा तीन दिवसांतच संपला असता. चार कसोटीत तीन शतके ही त्याची कामगिरी हेवा वाटावा अशी तर होतीच, परंतु इतर फलंदाजांना लाजवणारीही होती. गेली पंधरा वर्षे हा माणूस, कोणत्याही बिकट परिस्थितीशी झुंजायला तयार असतो. तो डावाची सुरूवात करतो, चोख यष्टिरक्षण करतो, नीट क्षेत्ररक्षण करतो. चौथ्या कसोटीत तर इंग्लंडने भारतीय गोलंदाजीची पिसे काढल्यामुळे तब्बल दोन दिवस तो मैदानात क्षेत्ररक्षण करत होता. लगेच पॅड बांधून तो डावाची सुरुवात करायला उतरला. इतर सारे क्रीझमध्ये हजेरी लावत असताना याने शतक ठोकले म्हणून सामना पाचव्या दिवसापर्यंत गेला.थोड्याफार प्रमाणात लक्ष्मणने प्रतिकार केला. या शैलीदार फलंदाजाकडून याहून अधिक अपेक्षा होत्या. निराशा केली ती, सचिन तेंडुलकरने. शंभराव्या शतकाच्या दारात उभ्या असलेल्या सचिनने शेवटच्या कसोटीत सामना वाचवण्याचा कसून प्रयत्न केला इतकेच त्याचे यश होते.सेहवाग शेवटच्या दोन कसोटीत आला तोच मुळी दुखरा खांदा घेऊन. असे असताना त्याला इंग्लंडमध्ये पाठवले का असा प्रश्न पडला. झहीर खान पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच तंबूत बसला तो शेवटच्या कसोटीपर्यंत. कारण त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला.अशा खेळाडूंना निवड समितीने का घेतले याचीच चौकशी होण्याची गरज आहे. श्रीकांत अध्यक्ष असलेल्या समितीने, अभिनव मुकुंदला वेस्ट इंडिज दौ-यावर पाठवले याचे एक कारण दिले जाते, ते म्हणजे रणजीमध्ये त्याने खो-याने धावा केल्या. भारतातील स्पर्धेत अशी कामगिरी करणारे आंतराराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांपुढे टिकाव धरू शकत नाहीत हे वारंवार दिसून आले आहे. तरीही निवड समितीने त्याला घेतले ते बहुधा तो दक्षिणेचा म्हणून. अभिनवपेक्षा कसोटीत कितीतरी सरस कामगिरी केलेला वासिम जाफर इंग्लंडमध्ये असूनही श्रीकांतला त्याचा सोयिस्कर विसर पडला. कारण जाफर मुंबईचा पडला ना!आपली फलंदाजी कोसळली आणि गोलंदाजांनी दिवे लावले. हरभजन असा किंवा श्रीशांत, ईशांत शर्मा असो किंवा प्रविण कुमार. सगळेच सुमार कामगिरी करत होते. यात भर पडली ती, शेवटच्या कसोटीत प्रविणकुमार आजारी पडला म्हणून भारतातून रुद्रप्रताप सिंहला नेले. सामन्याच्या दोन दिवस आधी पोहोचेलेल्या त्याच्याकडून लक्षणीय कामगिरीची अपेक्षा ठेवायची हे अतिच झाले. जे इतरांना तीन कसोटीत जमले नाही ते त्याने दोन दिवसांत करून दाखवावे अशी अपेक्षा श्रीकांत आणि त्याचे निवड समितीचे सहकारी कसे काय करू शकतात?ज्या संघाने जेमतेम चार महिन्यांपूर्वी वनडे वर्ल्ड कप जिंकला तोच संघ इंग्लंडमध्ये साफ आडवा झाला. याचे एक प्रमुख कारण म्हणजे हे खेळाडू आणि भारतीय नियामक मंडळ यांना पैशाचे व्यसन लागले.काळजीपूर्वक बघितले तर दिसते की, वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाचव्या दिवशी आयपीएल सुरू झाली. भारतीय संघातले सर्व खेळाडू, पैशासाठी पुढला दीड महिना भारतातील उष्ण हवामानात, एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पळत होते आणि खेळत होते. यामध्ये मंडळ आणि खेळाडू यांना भरभक्कम रक्कम मिळत असल्यामुळे खेळाडूंची प्रकृती, त्यांना ही धावपळ झेपते आहे की नाही, नंतर लगेच वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचा दौरा आहे वगैरे बाबी गौण ठरल्या. तरीही इंग्लंड दौ-यात खेळलेले, ढोणी, सचिन असे अव्वल वेस्ट इंडिज दौऱ्यात नव्हते. त्यांना आराम मिळाला होता.तरीही भारतीय संघाची अवस्था बिकट झाली, कारण सततच्या क्रिकेटपायी त्यांचा फिटनेस कमी झाला होता.आयपीएलमधील पैशाला महत्त्व दिल्यामुळे भारतीय खेळाडूंना देशाचे प्रतिनिधीत्व करण्यातून मिळणारी रक्कम कमी वाटू लागली असावी. या सगळया मामल्यात श्रीकांत आणि निवड समितीने राखीव खेळाडूंची फळीच उभारली नाही. संघातील एखादा खेळाडू आजारी पडला, उपलब्ध नसेल तर त्याच ताकदीचा खेळाडू आपल्याकडे नाही. कारण आपण तशी योजनाच आखली नाही. ठराविक खेळाडू सर्व -हेच्या स्पर्धांत खेळतात.आयपीएल सुरू करताना, -याच उगवत्या खेळाडूंना संधी मिळेल आणि त्यातून भारतीय संघाचा फायदा होईल असा युक्तीवाद केला गेला. प्रत्यक्षात किती युवा खेळाडू या स्पर्धेतून मिळाले? एकही नाही. या स्पर्धेत एका मोसमात चमकलेले खेळाडू दुस-या वर्षी दिसत नाही अशी स्थिती असताना ते भारतीय संघात काय स्थान मिळवणार!मंडळाने आता विचार करायला हवा की पैशाचा हव्यास बाळगून खेळाडूंना घाण्याला जुंपायचे की त्यांनी देशाचा तिरंगा फडकत ठेवावा अशी अपेक्षा बाळगायची. आणि मुख्य म्हणजे खेळाडूंनीही, मिळत असलेल्या पैशात समाधान मानायचे की पैशापायी आरोग्य धोक्यात घालायचे याचा विचार करायला हवा.भारतीय संघातील सर्व प्रमुख खेळाडू हे कोट्यधीश आहेत. आपली भूक किती हे त्यांनी एकदा नक्की ठरवावे. नाहीतर भारतीय संघाचे तीनतेरा वाजायला वेळ लागणार नाही. कदाचित इंग्लंड दौरा याची सुरुवात असू शकेल!

No comments:

Post a Comment