Total Pageviews

Friday, 19 August 2011

CBI LET LOOSE ON JAGMOHAN REDDY

कॉंग्रेस आंध्रात शिल्लक राहणार नाही हे चित्र असल्यानेच सीबीआयचा वापर करून जगनमोहन यांच्या मागे ससेमिरा लावण्याचे उद्योग कॉंग्रेसने सुरू केले.

जगनमोहन आणि सीबीआय
ज्याच्या हाती ससा तो पारधी अशी एक म्हण आहे, पण देशाच्या राजकारणात ज्याच्या हाती ‘सी.बी.आय.’ तोच पारधी अशी एकंदरीत परिस्थिती आहे. सी.बी.आय. म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा उल्लेख ‘कॉंग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ असाही चेष्टेने केला जातो. कॉंग्रेसची सत्ता असली की, कॉंग्रेसने ‘छू’ करताच ही सीबीआय कुणाच्याही अंगावर उडी घ्यायला तयार असते. खास करून कॉंग्रेसला अडचणीत आणणारे व त्रासदायक वाटणारे लोक सीबीआयच्या हिटलिस्टवर असतात व त्याचे नवे ज्वलंत उदाहरण म्हणजे वाय. एस. जगनमोहन रेड्डी. सी.बी.आय.ला अचानक साक्षात्कार झाला की जगनमोहन रेड्डी यांच्याकडे प्रचंड आणि बेहिशेबी संपत्ती आहे. हैदराबाद येथे जगनमोहन ज्या राजवाडारूपी घरात राहतात त्या जागेची व्याप्ती दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मावतील इतकी आहे व या घररूपी राजवाड्यात 75 खोल्या असल्याची माहिती सी.बी.आय.च्या पथकाने दिली आहे. या घराची किंमत अंदाजे 400 कोटी रुपये असून हे घर बंजारा हिल परिसरातील 32 एकरांवर पसरले आहे. हैदराबादमधील बंजारा हिल म्हणजे मुंबईतील मलबार हिल परिसर असे म्हटले तर आपणास या घराच्या वैभवाची कल्पना येऊ शकते. सीबीआयची पथके जगनमोहन यांच्या फक्त हैदराबादच्या घरापर्यंत गेली असे नाही, तर देशभरातील सर्व इस्टेटी, कार्यालयावर एकाच वेळी छापे पडले आहेत. जगनमोहन यांच्या बेहिशेबी संपत्तीचा छडा लावून काळे धन जगासमोर आणण्याचा विडा सीबीआयने उचलला त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच; पण सीबीआयची ही कर्तव्यदक्षता व कार्यक्षमता अशी अचानक का बरे उफाळून आली हेसुद्धा रहस्यच म्हणायला हवे. जगनमोहन यांच्या संपत्तीबाबत सीबीआयला जी शंका आली असेल ती योग्यच आहे, पण जगनमोहन यांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून सोनिया गांधी व युवराज राहुल गांधी यांना आव्हान दिल्यावरच ही संपत्ती
सीबीआयच्या डोळ्यांत खुपू लागली
व जगनमोहन यांच्या घरावर धाडी वगैरे पडल्या. जगनमोहन यांचे पिताश्री वाय.एस.आर. रेड्डी हे आंध्रचे लोकप्रिय कॉंग्रेस पुढारी व मुख्यमंत्री होते. नाव रेड्डी असले तरी ते धर्मांतरित ख्रिश्‍चन होते. त्यामुळे सोनियांचा त्यांच्यावर विशेष लोभ होता. वाय. एस. आर. यांनी आंध्रात कॉंग्रेस पक्षाला सत्तेचे दिवस दाखवले व त्यांनी स्वत:च्या कामाने व लोकप्रियतेने आंध्रात झंझावात निर्माण केला. वाय. एस. आर. व त्यांचे कुटुंब तेव्हाही अति धनाढ्यातच गणले जात होते व त्यांच्या श्रीमंतीच्या तसेच थैलीशाहीच्या कथा-दंतकथा तेव्हाही पसरल्या होत्या. आंध्रातील कॉंग्रेस पक्षासाठी वाय. एस. आर. यांचा खजिना सदैव उघडा होता. या सत्ता आणि संपत्तीचा आस्वाद तेव्हा घेताना कॉंग्रेसला काहीच वाटले नाही व सी.बी.आय.लाही त्यांच्या घरांवर आणि उद्योगांवर धाडी वगैरे घालाव्यात असे वाटले नाही. मग आताच असे काय झाले? फक्त वाय. एस. आर. आज हयात नाहीत; मात्र त्यांची घरे, राजवाडे, उद्योग तेच आहेत. फरक इतकाच की, त्यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांनी आंध्रात कॉंग्रेसला गाडण्याचा विडा उचलला आहे. कॉंग्रेसचा त्याग करून त्यांनी स्वतंत्र ‘वाय. एस. आर. कॉंग्रेस’ पक्ष स्थापन केला. कॉंग्रेसमधून मिळालेल्या खासदारकीचा त्याग करून त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली व कॉंग्रेसचे डिपॉझिट घालवून प्रचंड मताधिक्क्याने ते जिंकले. कॉंग्रेसचे बहुसंख्य आमदार व खासदार आज जगनमोहन यांच्याबरोबर आहेत. जगनमोहन यांनी आंध्रात कॉंग्रेसविरोधात रण माजवले आहे. एका बाजूला तेलंगणाचे आंदोलन व दुसर्‍या बाजूला पोरसवदा जगनमोहनने निर्माण केलेले आव्हान. कॉंग्रेस यापुढे आंध्रात शिल्लक राहणार नाही हे चित्र असल्यानेच सीबीआयचा वापर करून जगनमोहन यांच्या मागे ससेमिरा लावण्याचे उद्योग कॉंग्रेसने सुरू केले. जगनमोहन यांना आम्ही काळे की गोरे ते अद्याप पाहिलेले नाही. जगनमोहन आमचा कोणीही लागत नाही, पण आपल्या देशात ‘स्वतंत्र’, नि:पक्षपाती वगैरे ढोल वाजविणार्‍या सीबीआयसारख्या संस्थांचा जो
राजकीय वापर
सुरू आहे तो चिंताजनक आहे. अगदी स्पेक्ट्रम घोटाळे असतील नाहीतर कॉमनवेल्थचा तपास, सर्वत्र सीबीआयनामक ‘कॉंग्रेसचे कार्यकर्ते’ आहेतच. कॉंग्रेसच्या लोकांना जसे हवे तसेच ते वागत असतात व कामगिरी पार पाडत असतात. राजकीय विरोधकांना गुंतवून ठेवण्यासाठीच सीबीआयसारख्या संस्थांचा वापर होत असतो व ते धक्कादायक आहे. याच सीबीआयने बोफोर्स प्रकरणाचा मुख्य आरोपी व लाभार्थी क्वात्रोचीला कसे सोडले हेसुद्धा गौडबंगालच आहे. अगदी महाराष्ट्रातील अनेक प्रकरणांत सीबीआयने केलेल्या तपासाचे नक्की काय झाले? सध्या ‘आदर्श’ प्रकरणात सीबीआयने लंगडी घातली आहे, पण हाती काय लागणार? मालवणातील पोटनिवडणुकीत शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता रमेश गोवेकर हा अचानक बेपत्ता झाला. तो अद्यापि सापडला नाही. त्याचा तपास सीबीआय करीत होते, पण गरीबांच्या बाबतीत सीबीआयने कधीच पुढाकार घेऊन कारवाया केल्या नाहीत. रमेश गोवेकर प्रकरणात मालवण-कणकवली-मुंबईतील बड्या वजनदार कॉंग्रेस पुढार्‍याचा हात असल्याचा आरोप खुद्द गोवेकराच्या आईने केला; पण सीबीआयची पथके त्या नेत्याच्या घरात घुसलीत व त्यांनी सत्य खणून काढले असे झाले नाही. गोवेकर प्रकरणाची फाईल बंद करून सीबीआय शांत बसले आहे. कारण शेवटी कॉंग्रेस पक्षाचा जो हुकूम असेल तसेच घडणार. प्रश्‍न फक्त तपासाचा किंवा सत्य शोधण्याचा नसून केंद्रीय तपास यंत्रणेच्या विश्‍वासार्हतेचा आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या निमित्ताने हे सर्व सांगण्याची वेळ आली. कॉंग्रेसचा जो शत्रू तोच सीबीआयचा शत्रू कसा असू शकतो? मात्र असे वारंवार होत आले आहे आणि हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. उद्या जगनमोहन यांनी त्यांची कॉंग्रेस गुंडाळून पुन्हा कॉंग्रेससाठी त्यांच्या राजवाड्याचे दरवाजे उघडले तर हीच सीबीआय आपला तपास गुंडाळून जगनमोहनला सलाम मारण्यासाठी राजवाड्याच्या दारात उभी राहील. अण्णा हजारे व त्यांच्या मंडळास लोकांचा जो पाठिंबा दिसत आहे त्यामागची कारणे नेमकी हीच आहेत

No comments:

Post a Comment