अण्णा, उदेक आणि आपण GOOD ARTICLE IN MAHA TIMES
पराकोटीचा अन्याय, हतबल करणारी व्यवस्था आणि सामान्य माणसाच्या जगण्यावर चहूबाजूंनी होणारे हिंस्त्र हल्ले अशी भीषण स्थिती असतानाही लक्षावधी भारतीय शांततापूर्ण आंदोलनात रस्त्यावर येत आहेत. कुठेही हिंसा घडत नाहीे. या आंदोलनाला पाण्यात पाहणाऱ्यांनी डोळे उघडून जरा जगाकडे पाहावे. .. अण्णा हजारे यांना केंदस्थानी ठेवून देशभर जे आंदोलन सुरू आहे, त्याविषयी अनेक तक्रारी किंवा कुरकूर ऐकू येते. त्यातली एक म्हणजे, काँग्रेसच्या विरोधातला अतिधनाढ्य उद्योगपती हे घडवतो आहे. दुसरी काँग्रेसच्या बोलभांड प्रवक्त्यांनीच केली. ती म्हणजे, या आंदोलनाच्या पाठीशी अमेरिका असू शकते. तिसरी तक्रार म्हणजे, यात सहभागी झालेले एनजीओवाले तुफान पैसेवाले आहेत. त्यांनी नोकरदार पोरांना 'या कामाला' लावले. चौथा आक्षेप आंदोलनासाठी मेल, फेसबुक, एसेमेस इत्यादी संवादसाधने वापरण्यावर आहे. ही 'र्व्हच्युअल रिअॅलिटी' वास्तवापासून दूर असल्याचा तर्क त्यामागे आहे. पाचवी कुचाळकी अण्णा 'भंपक' असल्याची. अण्णांना समस्यांची गुंतागुंत समजत नाही, असा बौद्धिक अहंकार त्यामागे आहे. सहावा आक्षेप सुशिक्षित, सुसंस्कृत नागरिकांनी हातात मेणबत्ती घेऊन येण्याला आहे. टीकाकारांना हे निव्वळ पोषाखी वाटते. सहावा आरोप या साऱ्यामागे संघ परिवार असल्याचा आहे. ही यादी वाढवता येईल. हे सर्व आरोप म्हणजे टीकाकारांना भारत नावाच्या अतिप्रचंड व गुंतागुंतीच्या वास्तवाचे आकलन किती तोकडे आहे, याचा पुरावा आहे. देशातल्या कोणत्याही घटिताकडे ताज्या, निर्मळ पण चिकित्सक दृष्टीने न पाहता निव्वळ पठडीबाज, पूर्वग्रहदूषित आणि शंकेखोर वृत्तीने पाहण्याची खोड स्वयंमन्य बुद्धिजीवींना लागली आहे, तिचे हे आक्षेप म्हणजे द्योतक आहेत.
याचा अर्थ, आंदोलनात कमतरता नाहीत, असे नाही. पण समाजाला नवी नजर देऊ इच्छिणाऱ्यांनी काळाचा शेकडो वर्षांचा विशाल पट नजरेसमोर ठेवून, भारतीय इतिहासाचा प्रदीर्घ प्रवास मनात साठवून आणि या प्राचीन पण नवजात राष्ट्राच्या दूरवरच्या भविष्याचा वेध घेत सामाजिक उलाढालींचे मोजमापन करायचे असते. ते न करता एखाद्या वर्गाला ठोकून काढायला फार श्रम पडत नाहीत. त्यासाठी जुनी आकलने घासून-तपासून पाहावी लागत नाहीत. 'अण्णा हजारे' हे प्रतीक बनलेले आंदोलन अखेर राष्ट्राच्या हिताचे आहे की अहिताचे? घटनाकारांनी ज्या समतेवर आधारित भारताचे स्वप्न पाहिले त्याच्याशी हे आंदोलन एकुणात दोह करते आहे का, असे प्रश्न करायला हवेत. त्याचे प्रामाणिक उत्तर शोधले की, नजर साफ होऊ शकेल. देशभर असंख्य गावा-शहरांमध्ये रस्त्यावर उतरलेले लक्षावधी तरुण आज या प्रश्नाचे उत्तर कृतीनेच देत आहेत.
लोकपाल विधेयकातील तांत्रिक तरतुदी तसेच कलमे यांच्याशी सामान्य माणसाला फारसे देणे-घेणे नाही, हे टीकाकारांना का समजत नाही? केंद सरकारला तर ते लक्षातच घ्यायचे नाहीये. हे आंदोलन लोकशाहीच्या ढाच्याशी प्रतारणा करते आहे, अशी टीका करणारे साकल्याने विचारच करत नाहीत. संसद व तिचे अधिकार आणीबाणीत कसे गुंडाळून ठेवले होते, याचा त्यांना विसर पडला का? तसे आंदोलकांनी काय केले आहे? संसद हेच लोकशाहीचे सवोर्च्च प्रतीक आहे; असा दावा करणाऱ्यांना तिचा आत्माच समजलेला नाही. एकतर घटनाकारांनी संसदेला निरंकुश सत्ता दिलेली नाही. दुसरे, लोकशाहीचा 'जगन्नाथाचा रथ' घटनाकारांनी आखलेल्या लक्ष्यांकडे न्यायचा, तर लोकभावना काय आहे? याची प्रामाणिक दखल घ्यायलाच हवी. त्यामुळेच घटनापंडित फली नरीमन यांनी 'आपली राज्यघटना 'वुई द पीपल' या शब्दांनी सुरू होते' याची आठवण करून दिली. 'वादे वादे जायते तत्त्वबोध:' हे केवळ संसदेसाठी लागू नाही. लोकभावना आणि लोकक्षोभ सामावून-समजावून घेण्यात संसद कमी पडते तेव्हा संसदबाह्य हत्यारे-साधने वापरावीच लागतात. तसे नसते तर गांधींना केवळ ब्रिटिश पार्लमेंटच्या शहाणपणावरच विसंबावे लागले असते. अण्णा हे गांधी आणि त्यांचे साथीदार हे 'स्वातंत्र्यसेनानी' नसले तरी ते गांधींच्या वाटेवर चालत आहेत. आणि ते शेवटी देशाच्या हिताचे आहे.
पराकोटीचा अन्याय, हतबल करणारी व्यवस्था आणि सामान्य माणसाच्या जगण्यावर चहूबाजूंनी होणारे हिंस्त्र हल्ले अशी भीषण स्थिती असतानाही लक्षावधी भारतीय शांततापूर्ण आंदोलनात रस्त्यावर येत आहेत. कुठेही हिंसा घडत नाहीे. या आंदोलनाला पाण्यात पाहणाऱ्यांनी डोळे उघडून जरा जगाकडे पाहावे. गेल्या दोनतीन वर्षांत जगातली किती सरकारे हिंसेने उलथली, किती देशांचे तुकडे पडले हे जाणून घ्यावे. असे भारतात होणार नाही. (तसे झालेच तर कुठली संसद आणि कसली न्यायालये?) या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याने चार दशके क्रांतीची निव्वळ स्वप्नेच पाहणारे नक्षलवादीही चक्रावून गेलेत. इथला सामान्य माणूस हाच लोकशाहीचा सर्वांत मोठा तारणहार, राखणदार आहे. त्याच्यापुढे संसदेच्या अधिकारांचे तांत्रिक बागुलबुवे नाचवणारे नव्हेत. उलट ते लोकशाहीच्या बहुमुखी अस्तित्वाला धक्का लावत आहेत.
नक्षलवाद्यांना आंदोलनाच्या यशाचे आश्चर्य वाटते; याचे कारण त्यांना 'भारतीय समूहमन' कधी समजले नाही. तीच गत आज सरकार व स्वयंघोषित विचारवंतांची होते आहे. भारतीय माणूस विभूतिपूजक तर आहे पण तो बहुश: 'मना'ने विचार करतो. त्यात तर्कापेक्षाही भावनांना महत्त्व असते. या ओढाताणीत कधी दंभही जन्माला येतो. गांधींना हे अचूक कळल्यानेच त्यांनी 'हिपॉक्रसी इज ए होमेज पेड बाय व्हाइस टू र्व्हच्यू' असे म्हटले! आज आंदोलनात सगळे धुतल्या तांदळासारखे नाहीत. पण अशांना त्यांचा दंभ व अपराधगंड तिथे घेऊन येतो. गांधींसारखा दष्टा नेता समाज वा स्थितीविषयी निव्वळ बोटे न मोडता सामान्यांचे चांगुलपण व त्यांच्यात दडलेला सत्याचा आग्रह जागवतो. हे 'आंदोलन या अर्थाने गांधींच्या मार्गावरचे पाऊल आहे. प्रत्येक आंदोलकाने प्रामाणिकपणे अंतरंगात डोकावून पाहणे व त्यानुसार कृती करणे, हा पुढचा टप्पा.
या आंदोलनाने उद्या हे करण्याची प्रेरणा दिली तर पुढच्या पिढ्यांना त्याचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल!
No comments:
Post a Comment