इमाम बुखारींचा ‘बौद्धिक’ भ्रष्टाचार
अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे देश ढवळून निघालेला असताना दिल्लीत जामा मशिदीचे इमाम सैयद अहमद बुखारी यांनी या आंदोलनापासून मु्स्लिमांना लांब राहण्याचा सल्ला दिला. अण्णांचे आंदोलन हे ‘संशयास्पद’ असून ‘वंदे मातरम’च्या घोषणेला त्यांचा आक्षेप होता. विशेष म्हणजे बुखारी हे आवाहन करत असतानाच, दिल्लीत त्यांच्या घरापासून दोनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या इंडिया गेटवर अण्णांचं समर्थन करण्यासाठी आलेले अनेक मुस्लिम तरुण ‘वंदे मातरम’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणा देत होते. रमजानचा महिना सुरु असल्याने ‘मै अन्ना हूं’च्या टोप्या घातलेल्या या तरुणांनी इंडिया गेटवर इफ्तारही केला.
दिल्लीतल्या जामा मशिदीच्या इमामपदावर आपला मालकी हक्क सांगत मुस्लिम समाजाला नेहमी उफराटे सल्ले देण्यात सैयद अहमद यांचे वडील इमाम बुखारी यांची हयात गेली. ते गेल्यानंतर त्यांचा मुलगा ही ‘परंपरा’ पुढे सुरु ठेवतोय.
अण्णांचं जनलोकपाल बिलासाठीचं आंदोलन हे मुळात भ्रष्टाचार संपवण्यासाठीचं आंदोलन आहे. सध्या भ्रष्टाचारानं देशातल्या सर्वांचचं जगणं असह्य केलेलं आहे. भ्रष्टाचारामुळे पिचल्या गेलेल्या लोकांच्या भावनाच इतक्या तीव्र आहेत की या आंदोलनात मध्यमवर्ग, गरीब वर्ग, समाजातल्या सर्व वर्गातले नागरिक आपसूकच ओढले जात आहेत. अण्णांच्या हाकेला ओ देत जनलोकपालच्या मागणीसाठी मुस्लिम समाजसुद्धा या चळवळीत उतरला. भ्रष्टाचार संपलाच पाहिजे. यातच आपल्या भावी पिढीचं भलं आहे, याची जाणीव इतराप्रमाणे सर्वसामान्य मुस्लिमांना असली तरी जामा मशिदीच्या इमामला मात्र ती नाही.
अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने अनेक मिथकं गळून पडली. लोक, जात, धर्म, वर्गाच्या भिंती तोडून अण्णांच्या समर्थनार्थ एकत्र आले. परिणामी, सतत कोणत्या ना कोणत्या राजकारण्याच्या हातचे बाहुले म्हणून वावरणा-या इमाम बुखारींसारख्या धर्माच्या ठेकेदाराचा अशावेळी इगो न दुखावला गेला तरच नवल. स्वतः मुस्लिमांचे स्वयंघोषित प्रवक्ते असल्यासारखे इमाम बुखारी मुस्लिमांना नेहमी काही ना काही आवाहन करत असतात. तूर्तास तरी मुस्लिम समाजाने बुखारीच्या चिथावणीकडे दुर्लक्ष करून रामलीला मैदानात अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधातल्या जिहादमध्ये सामिल होण्याचं ठरवलेलं दिसतं
No comments:
Post a Comment