Total Pageviews

Tuesday 23 August 2011

WHOLE COUNTRY ANGRY WITH CORRUPTION

अग्रलेख


स्रोत: तरुण भारत      तारीख: 8/23/2011 1:13:10 PM



जाहीर माफी मागा
केंद्रातील संपुआच्या सरकारला हलवून सोडणारे ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे हे आपादमस्तक भ्रष्ट आहेत आणि ते लष्करातून पळून आलेले सैनिक आहेत, असा बेछूट आरोप करणारे कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी व त्यांना पाठीशी घालणार्‍या त्यांच्या कॉंग्रेसने देशातील जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे. कारण, अण्णा हजारे हे लष्करातून पळून गेलेले नाहीत, जेवढा बॉण्ड होता तेवढी नोकरी त्यांनी पूर्ण केली आणि सन्मानाने ते लष्करातून निवृत्त झाले आहेत, ही बाब लष्करानेच स्पष्ट केली आहे. अग्रवाल नावाचे आरटीआय कार्यकर्ते आहेत. त्यांनी माहितीच्या अधिकारात अण्णांबाबतची माहिती लष्कराकडे मागितली होती. लष्कराने जी माहिती अग्रवाल यांना दिली, त्यात अण्णा सन्मानाने निवृत्त झाल्याचे स्पष्ट केले. लष्कराचे हे स्पष्टीकरण म्हणजे कॉंग्रेसचे वाचाळ प्रवक्ते मनीष तिवारी यांना सणसणीत चपराकच होय. अण्णांचे उपोषण १६ ऑगस्टला प्रारंभ झाले. त्याच्या दोन दिवस आधी पत्रकार परिषद घेऊन मनीष तिवारी यांनी अण्णांवर बेलगाम आरोप केले. पत्रकार परिषदेतील त्यांची भाषा अतिशय शिवराळ आणि उर्मटपणाची होती. एखाद्यावर आरोप करताना, विशेषत: अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकावर आरोप करताना तिवारी यांनी मर्यादेचे पालन करायला हवे होते. पण, सत्तेच्या उन्मादात भान हरपलेल्या तिवारींनी आणि कॉंग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. अण्णांच्या ताकदीचा अंदाज बांधता न आल्याने तिवारी, त्यांची कॉंग्रेस आणि या कॉंग्रेसच्या नेतृत्वातील त्यांचे संपुआ सरकार आपल्याच मस्तीत वागले आणि अण्णांची ताकद दिसताच झुकले, पूर्णपणे पराभूत झाले. ज्या अण्णांवर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, देशातील जनता याच सरकारविरुद्ध अण्णांच्या बाजूने उभी राहिली. हे लक्षात येताच उर्मटपणा करणारे तिवारी, कपिल सिब्बल, अंबिका सोनी, राशिद अल्वी, पी. चिदम्बरम् हे सगळे नेते व मंत्री आता टीव्हीच्या पडद्यावरून गायब झाले आहेत. तिवारी तर दिसतच नाहीत. झालेली चूक मान्य करण्याचे औदार्य मनीष तिवारी व कॉंग्रेसने दाखविले पाहिजे आणि झाल्या प्रकाराबद्दल देशातील जनतेची, अण्णांची माफी मागितली पाहिजे. अन्यथा, पुढल्या काळात जनता तिवारींना व त्यांच्यासारख्या आगाऊ नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
संपूर्ण देश सरकारवर नाराज
सध्या संपूर्ण देश केंद्रातल्या संपुआ सरकारवर नाराज आहे. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा पुकारला. हा लढा सरकार पाडण्यासाठी वा कुण्या एका नेत्याविरुद्ध व पक्षाविरुद्धही नाही, असे अण्णा हजारे व त्यांच्या टीमने आधीच स्पष्ट केले होते. तरीही, हा लढा आपल्याविरुद्ध असल्याचे समजून कॉंग्रेसने अण्णांवर व्यक्तिगत हल्ले चढविले. अण्णांना नामोहरम करण्याची एकही संधी कॉंग्रेस व त्यांच्या वाचाळ नेत्यांनी सोडली नाही. झाले काय? ज्या भ्रष्टाचाराला सामान्य जनता कंटाळली आहे, ती जनता अण्णांच्या पाठीशी उभी राहिली. आज काय चित्र पाहायला मिळते? अण्णा हजारे रामलीला मैदानावर उपोषण करताहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मैदानाच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक त्यांना पाठिंबा म्हणून तिथे जमले आहेत. ही ताकद अण्णांमागे उभी राहण्याचे कारण काय? भ्रष्टाचाराची चीड. का उभी झाली ही ताकद अण्णांच्या मागे? सरकारच्या हेकेखोरपणामुळे. का केला सरकारने हेकेखोरपणा? सत्तेच्या उन्मादामुळे आणि जनमानसाची नाडी ओळखता न येणार्‍या नेत्यांच्या वाचाळपणामुळे. का करतात हे नेते वाचाळपणा? कॉंग्रेस श्रेष्ठींच्या संरक्षण कवचामुळे. हा उद्योग कॉंग्रेसला फार महागात पडणार आहे. संसदेचे सार्वभौमत्व कुणीही अमान्य करीत नाही. पण, जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा समावेश म्हणजे संसद आहे, याचा सोईस्कर विसर पडलेली मंडळीच, अण्णा संसदेचा अपमान करीत असल्याचा आरोप करीत आहेत. संसद सर्वोच्च आहेच, संसदेला निवडून देणारी जनताही सार्वभौम आहे, हे विसरून चालणार नाही. जनमताचा आदर करणे हे संसदेत जनतेचे प्रतिनिधित्व करणार्‍या लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य ठरते.
रामलीला मैदानावर उपोषणावर बसलेल्या अण्णांच्या पाठीशी संपूर्ण देश आहे. सरकारविरुद्ध जनतेत एवढा असंतोष आहे की, सरकारविरुद्ध बोलणार्‍याला लोक डोक्यावर घेताहेत. सरकारविरुद्धचे बोल जनतेला आवडत आहेत. ही जनतेची नाडी ओळखून सरकार वागले असते, तर सरकारवर आज नामुष्कीची वेळ आली नसती. पावलापावलावर सरकारला विरोध होत आहे. प्रत्येक मुद्यावर सरकार कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. त्याचा फायदा टीम अण्णाला होत आहे. प्रत्येक सूर्योदयाला अण्णांची ताकद आणि त्यांच्या आंदोलनाचे बळ वाढलेले दिसत आहे. आंदोलन एवढे भडकले आहे की, प्रत्येक चांगला माणूस सरकारला शिव्यांची लाखोली वाहतो आहे. प्रत्येकाने सरकारला शिव्याच घालाव्या अशा पद्धतीने आंदोलनही भडकविले जात आहे. आज परिस्थिती अशी आहे की, वातावरण कॉंग्रेसविरुद्ध आहे. सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली तर कॉंग्रेसचा पत्ता साफ झाल्याशिवाय राहणार नाही, एवढा जबरदस्त जनआक्रोश आहे. सरकारने जनतेचा विश्‍वास गमावल्यामुळेच हा आक्रोश निर्माण झाला आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी, पंतप्रधानांच्या राजीनाम्याची केलेली मागणी योग्य ठरते.
बसेस, रेल्वे, सार्वजनिक ठिकाणे एवढेच काय, तर रस्त्यावर होणारी मुलींची व महिलांची छेडखानी, त्यांच्यावर होणारे बलात्कार, हुंड्यासाठी घेतले जाणारे बळी याला जनता कंटाळली आहे. जागोजागी असलेला भ्रष्टाचार, लूटपाट, गुंडागर्दी, खंडणी वसुली, भेसळ, जुगार, सट्टा अशा प्रकारांना पोलिसांचे अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याने जनतेचा व्यवस्थेवरील विश्‍वास उडाला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे अण्णा हजारे यांचे आंदोलन होय. अण्णांनी जरी भ्रष्टाचार निर्मूलनाच्या उद्देशाने हे आंदोलन उभारले असले, तरी जनतेला सर्वच प्रकारच्या जाचातून मुक्ती हवी आहे. अण्णांचे आंदोलन त्यांचे आशास्थान झाले आहे. जनतेनेही एका गोष्टीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण स्वत: प्रामाणिक आहोत का, आपण जे उत्पन्न घरी आणतो ते योग्य मार्गाने कमावलेले आहे का, याचा विचार जनतेनेही करावा.
भ्रष्टाचार हा रात्रीतून संपणारा विषय नक्कीच नाही. याची जाणीव आंदोलन करणार्‍या अण्णा टीमलाही आहे आणि अण्णांना पाठिंबा देणार्‍या जनतेलाही. सरकारनेही आता जनतेचा अन्त न पाहता वेगाने पावले उचलली पाहिजेत. श्री श्री रविशंकर, भय्यूजी महाराज, उमेशचंद्र सारंगी यांच्यासारखा दुवा वापरून सरकारने अण्णांशी संपर्क साधत चर्चा करण्याचा प्रयत्न चालविला आहे, ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. असे असले तरी, असा संपर्क करताना अण्णांच्या टीममध्ये फूट पाडून आंदोलनातील हवा काढून घेण्याचीही सरकारची चाल असू शकते, असा आरोपही एका गोटातून केला जात आहे. असे असेल तर ते सरकार व देशासाठी आणखी घातक ठरेल, याची जाण सत्ताधार्‍यांनी ठेवली पाहिजे. सरकारने स्वत:चे लोकपाल विधेयक संसदेत मांडलेच आहे. आता अण्णा व त्यांच्या टीमने तयार केलेलेही मांडून पाहावे. संसदेत लोकांनी निवडून पाठवलेले लोकप्रतिनिधी जो काय कौल देतील तो कुणी अमान्य करण्याचे कारण नाही. पण, अण्णांचे विधेयक मांडणारच नाही, अशी ताठर भूमिका सरकारने घेऊ नये. जनमताचा जबरदस्त रेटा लक्षात घेऊन सरकारकडून पुढची पावलं उचलली जाण्याची अपेक्षा आहे

No comments:

Post a Comment