Total Pageviews

Showing posts with label DISASTORMANAGEMENT. Show all posts
Showing posts with label DISASTORMANAGEMENT. Show all posts

Sunday, 26 January 2020

ऑस्ट्रेलियातील आगडोंब स्रोत: विवेक मराठी-डॉ. बाळ फोंडके**


ऑस्ट्रेलिया हा तसा गवताळ प्रदेश आहे. इथे 'नेमेचि येतो वणवा' असा प्रकार आहे. तसं यंदाच्या इथल्या वणव्यांनी रौद्र रूप धारण केले आहे, ही आजची वस्तूस्थिती आहे. मात्र निम्म्याहून अधिक वणवे मात्र मानवनिर्मित असल्याचा अग्निशमन दलाचा दावा आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
ऑस्ट्रेलियात पेटलेले आणि झपाटयानं सर्वत्र पसरू पाहणारे वणवे ही आजची सनसनाटी ताजा खबर झाली आहे. वास्तविक तसं होण्याचं कारण नाही, ऑस्ट्रेलियातल्या वणव्यांचा फार जुना इतिहास आहे. यंदा या वणव्यांनी अधिक भयंकर स्वरूप धारण केलं आहे आणि अधिक व्यापक प्रदेशावर आक्रमण केलं आहे, हे मान्य. त्यामुळेच त्याची जगभर गांभीर्यानं दखल घेतली जात आहे. पण वणवे हा ऑस्ट्रेलियाचा स्थायिभाव आहे.
त्याची कारणंही अवगत आहेत. इथे ज्याला बुश म्हटलं जातं, अशा गवतांनी आणि फार फार तर कमरेइतक्या उंचीच्या झुडपांनी सर्व खंडच व्यापलेलं आहे. लोकवस्ती तुरळक आणि मुख्यत्वे किनाऱ्यावरच्या प्रदेशातच स्थापित राहिलेली असल्यामुळे विशाल प्रदेशावर या बुशचंच राज्य आहे. त्यांच्यातच काही उंच वृक्षांनी पाय पसरले आहेत. एक प्रकारे विस्तृत जंगलांनी बहुतांश प्रदेश व्यापलेला आहे.
 
या वृक्षराजीची आणखी काही वैशिष्टयं आहेत. ती सहजासहजी आगीला बळी पडणाऱ्या प्रकृतीची आहे. काहींच्या जीवनचक्रातच अग्नीला कळीचं स्थान आहे. एकदा वृक्ष आगीला बळी पडला की त्यानंतरच त्याची पुढची पिढी जन्माला येऊ शकते. त्यामुळे काही वेळा तर या झाडांची व्यवस्थित वाढ व्हावी, म्हणूनही आगी लावल्या जातात. त्या नियंत्रणात राहिल्या नाहीत की त्यांचं वणव्यांमध्ये रूपांतर होतं. त्यात भर पडते ती इथल्या हवामानाची. हे खंड जगातलं सर्वात कोरडं खंड आहे. इथे पर्जन्यवृष्टी फार कमी होते. हवेत बाष्पाची कमतरता असून ती नेहमी कोरडीच राहते. त्यापायी आणि उन्हाळयातील चढया तापमानापायी झाडंझुडपं साफ वाळून जातात. त्यांचं सरपणात रूपांतर होतं. अशात जर वीज कोसळली किंवा इतर काही कारणांनी ठिणगी पडली, तर ती गवताळ झुडपं पेटायला वेळ लागत नाही. झाडीही इतकी गर्द आणि एकमेकाला चिकटून असते की वाऱ्याचा झोत अनुकूल असेल, तर आग माकडांसारखी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, तिथून तिसऱ्या झाडावर अशा उडया घेत झपाटयाने पसरत जाते.
डिसेंबर ते फेब्रुवारी हा इथला उन्हाळा. त्यामुळे देशाच्या दक्षिण भागात चढं तापमान आणि कोरडं हवामान यापायी वणव्याला आमंत्रण देणारी परिस्थिती उत्पन्न होते. आपल्याकडे जसा 'नेमेचि येतो पावसाळा', तसा इथे 'नेमेचि येतो वणवा' असा प्रकार आहे. यंदा आपल्याकडेही जसं पावसाने अतिरेकी धुमाकूळ घालून सर्वांचीच पाचावर धारण बसवली होती, तसं यंदाच्या इथल्या वणव्यांनी रौद्र रूप धारण करत सर्वांच्याच तोंडचं पाणी पळवलं आहे. गेला दीड महिना हे वणवे वाटेत येईल ते जाळत आले आहेत आणि अजूनही काढता पाय घेण्याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.
 
यंदाच्या वणव्यांचं भीषण स्वरूप उघड करणारी काही आकडेवारी स्तिमित करणारी आहे. आजपर्यंत एकूण एक कोटी हेक्टर क्षेत्र वणव्यात जळून खाक झालं आहे. आपल्याला सहज समजेल अशा भाषेत सागायचं, तर संपूर्ण इंग्लंड देशाचं एकूण क्षेत्रफळही साधारणपणे एवढंच आहे. एकटया न्यू साउथ वेल्स या राज्यात हॉलंड देशाएवढं - म्हणजेच पन्नास लाख हेक्टर क्षेत्रफळ वणव्यात सापडलं आहे. आजवरची सर्वात मोठी आग गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये ऍमेझॉनच्या जंगलांमध्ये लागली होती. पण तिची व्याप्तीही फक्त नऊ लाख हेक्टर इतकीच होती. तरीही त्या आगीनं साऱ्या जगाला त्रस्त केलं होतं. त्याच्या कितीतरी पट अधिक ऑस्ट्रेलियातले सध्याचे वणवे आहेत.
 
ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधील ज्येष्ठ प्राध्यापक स्टीफन पाईन यांनी ऑस्ट्रेलियातील वणव्यांचा समग्रा अभ्यास करून 'बर्निंग बुश' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी आजवरच्या विविध वणव्यांचा तौलनिक अभ्यास केला आहे. गेल्या वर्षापर्यंत सर्वाधिक भीषण वणवा 2009 सालातील ब्लॅक फ्रायडे या नावाने ओळखला जाणारा होता. त्याने पंचेचाळीस लाख हेक्टर क्षेत्राचा घास घेतला होता. पण यंदाच्या वणव्याची व्याप्ती पाहता त्याला केवळ शेकोटीच म्हणावं लागेल.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 परंतु या संकटाचा सामना करण्याची जी आपत्कालीन व्यवस्था इथे आहे, तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. वणव्याची माहिती मिळताक्षणीच अग्निशमन दल तिथे धावून जातं आणि दलाचे जवान आणि अधिकारी आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न दिवसरात्र करत राहतात. आगीवर पाण्याचे जोमदार फवारे तर मारले जातातच, तसंच हेलिकॉप्टरद्वारे आकाशातून त्याच्यावर पाणी तसंच अग्निरोधक वायू आणि रसायनं यांचाही मारा केला जातो. अग्निशमन दलातले बहुतांश जवान स्वयंसेवी आहेत. दलाचे नियमित वेतनधारी कर्मचारी संख्येने कमी आहेत. पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच तत्परतेने काम करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून आपल्या कामधंद्यातून सुटी घेऊन धावून जाणाऱ्या व्यक्तींची कमतरता नाही. इतर मंडळीही मदतकार्यात स्वतःला झोकून देतात. मदतीसाठी अर्थबळाचा तर ओघच लागतो. ही या देशाची खासियत आहे. दानधर्मात सर्वच जण आघाडीवर असतात. कोणत्याही आपत्तीच्या वेळी - मग ती नैसर्गिक असो की मानवनिर्मित, मदत करण्याची अहमहमिकाच लागते. यापायीच इतकी गंभीर समस्या उद्भवल्यानंतरही आतापर्यंत फक्त पंचवीस जणांचेच बळी गेले आहेत. त्यातही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. मालमत्ता आणि गुरंढोरं यांची मात्र फार मोठया प्रमाणात हानी झाली आहे. गावंच्या गावं जळून खाक झाली आहेत.
 
वणव्यांची सुरुवात होण्याची दोन कारणं आहेत. गवताळ झुडपांनी व्यापलेल्या प्रदेशावर जवळच्या झाडांची सुकलेली पानं आणि काटक्या सतत पडत राहतात. अवर्षण आणि दीर्घ काळचं कोरडं हवामान यापायी हा सर्व पालापाचोळा सुकून सरपणासारखा होतो. त्यावर वीज पडली किंवा सोसाटयाच्या वाऱ्यामुळे होणाऱ्या घर्षणापायी ठिणगी उडाली की तो झटकन पेट घेतो. वारा आग पसरवायला मदतच करतो.
 
निम्म्याहून अधिक वणवे मात्र मानवनिर्मित असल्याचा अग्निशमन दलाचा दावा आहे. यातील काही समाजविघातक मंडळींकडून जाणूनबुजून लावलेल्या आगीपायी उद्भवतात. काही शेतकरी पुढील हंगामासाठी जमिनीची मशागत करण्यासाठी आगी लावतात. त्या मग नियंत्रणाबाहेर जाऊन त्यांचं वणव्यात रूपांतर होतं. आपल्याकडेही बोरघाटातल्या डोंगरांवर अशा आगी दिसतात. पण त्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशाची स्थिती इथल्या जंगलांसारखी नसल्यामुळे त्यांचं व्यापक वणव्यांमध्ये रूपांतर होणं टळतं.
काही आगी तर अग्निशमन दलाकडून बुध्दयाच लावल्या जातात. वणव्यांवरच्या प्रतिबंधक उपायांचा तो एक भाग असतो. जो प्रदेश वणव्यांना बळी पडण्याची शक्यता असते, त्याच्या भोवती रिंगणाकार आग लावून ते रिंगण जाळून टाकलं जातं. रिंगणात मग जळू शकेल असं काहीही राहत नाही. त्यायोगे मग त्याच्या पलीकडे लागलेली आग त्या प्रदेशावर आक्रमण करू शकत नाही. काही वेळा ही रिंगणाकारी आग लावताना चुका होतात आणि प्रतिबंधक उपायांऐवजी वणव्यांना पोषक परिस्थिती प्रस्थापित होते.
तरीही यंदाच्या भीषण वणव्यांना हवामान बदल कारणीभूत असल्याचा दावा पर्यावरणवादी मंडळी करत आहेत. जगभरच आज ऋतुमानात फार मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी आपल्याकडे देशभर पुरांनी जे थैमान घातलं होतं, त्याचीही कारणमीमांसा अशीच केली गेली आहे. यावर अजूनही तज्ज्ञांचं एकमत नसलं, तरी त्यावर आतापासूनच प्रतिबंधक उपाय योजावे हे बहुतेकांनी अधोरेखित केलं आहे. शिवाय हे उपाय जागतिक स्तरावर झाले, तरच लाभदायक ठरू शकतील. त्यामुळेच पॅरिस करारातून अमेरिकेने अंग काढून घेणं आणि त्यावर बहुतांश विकसित देशांनी मौन पाळणं याला जगभरातून जोमदार विरोध होत आहे.
अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रसारमाध्यमांचं वर्तन कसं असावं याचा वस्तुपाठ येथील मुद्रित तसंच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी घालून दिलेला आहे. वणव्यांचं वास्तव वर्णनच दिलं जात आहे. जिथे वणवा आहे, तेथील स्थानिक वार्ताहर परिस्थितीविषयी यथातथ्य माहितीच देतात. सनसनाटी वार्तांकन टाळल्यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण घबराट पसरत नाही. मदतकार्य करणाऱ्याचं मनोबल तर वाढतंच, आणि ते करत असलेल्या प्रयत्नांना नागरिकांचं उत्स्फूर्त सहकार्य लाभतं. त्यांनी दिलेल्या आदेशांचं व्यवस्थित पालन होतं. त्यापायीच जीवितहानी टाळण्यातही मदत होत आहे.
अग्निशमन दलं कोणत्या संकटांशी सामना करत आपलं काम निष्ठापूर्वक पार पाडत आहेत, हेही दाखवलं गेल्यामुळे नागरिकांनाही धीर येतो व मदतकार्य शिस्तबध्दरीत्या पार पाडता येत आहे. कोणत्याही वाहिन्यांवर गल्लीबोळातल्या तथाकथित तज्ज्ञांना पाचारण करून त्यांचं भाष्य ऐकवणं कटाक्षानं टाळलं जात आहे. मुलाखती घेतल्या जातात त्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्याच. तेही वस्तुस्थितीचं संयत वर्णन करून नागरिकांनी पाळायच्या पथ्याविषयीच बोलतात. स्वयंघोषित तज्ज्ञांना आणि राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना बोलावून केल्या जाणाऱ्या आक्रस्ताळी कंठाळी चर्चांची गंमत येथील प्रसारमाध्यमांना समजलेली नाही.
या वणव्यांचं राजकारण करण्याची संधी कोणीही साधलेली नाही. राजकारणी मंडळी कुठेच दिसत नाहीत. फक्त व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्स या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीच हजेरी लावली आहे. तीही नागरिकांच्या मदतीसाठी कोणत्या सोई केल्या आहेत याची माहिती देण्यासाठी, तसंच मदतीचं आवाहन करण्यासाठी. बळी पडलेल्या नागरिकांना सरकारने तातडीने अनुदान जाहीर करावं, कर्जमाफी करावी अशा प्रकारच्या मागण्या विरोधी पक्षांनीही केलेल्या नाहीत, ना त्यांनी या वणव्यांसाठी सरकारला जबाबदार धरून त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रस्त्यांवर उतरून आकांडतांडव करत मोर्चे काढले जात नाहीत. याला अपवाद काही पर्यावरणवाद्यांचा. हवामान बदलाविषयीचं धोरण तातडीने अंमलात आणावं असा आग्राह धरून त्यांनी मोर्चे काढण्याचे प्रयत्न केले. पण त्याला मर्यादित पाठिंबाच मिळालेला आहे. नाही म्हणायला पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या विरोधात काही घोषणाबाजी झाली. पण ती त्यांनी या काळात हवाई बेटांवर जाण्यासाठी घेतलेल्या सुटीवर टीका करण्यासाठी. तसंच रिंगणाकार आगी लावण्याचे प्रतिबंधक उपाय योजायला त्यांनी उशीर केल्याबद्दल. पण काही तज्ज्ञांनी हे उपाय रामबाण नसल्याचं सांगून त्यांच्यावरच्या दोषारोपांचं गांभीर्य कमी केलं आहे.
काही तज्ज्ञांनी मात्र इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभ्यास करण्याची वेळ आल्याचं ठासून सांगितलं आहे. त्यातला एक तर त्यांनी आताच सुचवला आहे. जागा मुबलक असल्यामुळे इथे बहुमजली रहिवासी इमारती फारशा नाहीत. ग्राामीण भागात तर अजिबात नाहीत. स्वतंत्र घरं, भोवताली गवताळ कुरण व बाग हाच तिथला भूगोल आहे. मात्र या घरांच्या बांधणीत लाकडाचा फार मोठया प्रमाणावर वापर केला जातो. फार फार तर सर्वात बाहेरच्या भिंतीसाठी विटा आणि सिमेंट वापरले जातात. त्यापायी मग घरं ज्वलनशील बनतात आणि जेव्हा वणवा जंगलाची हद्द तोडून गावात शिरतो, तेव्हा ही घरं त्याला सहजासहजी बळी पडतात. पोलाद, ऍल्युमिनियम, काच आणि उच्च दर्जाचं सिमेंट यांनी बांधलेली घरंही संपूर्णपणे अग्निविरोधक असतात असं नाही. पण ती पटकन पेट घेत नाहीत. त्यामुळे आता घरबांधणीकडे नव्या नजरेने पाहायला हवं, असा आग्राह धरला जात आहे.
नैसर्गिक आपत्ती सर्वतोपरी टाळणं अशक्यच असतं. त्यापायी जीवितहानी होणार नाही याचीच काळजी घेणं शक्य असतं. त्यासाठी लोकशाही देशांमध्ये शासन, शासकीय संस्था यांच्या बरोबरीने सर्वसामान्य नागरिकाचंही काही उत्तरदायित्व असतं याची पुरेपूर जाणीव ऑस्ट्रेलियन समाजात दिसून येते. येथील लोकशाही प्रगल्भ झाल्याचीच ही लक्षणं आहेत.

Sunday, 17 June 2018

नैसर्गिक आपत्तींचे आव्हान दिवसेंदिवस तीव्र होत असताना-प्रमोदन मराठे, (निवृत्त कर्नल,

नैसर्गिक आपत्तींचे आव्हान दिवसेंदिवस तीव्र होत असताना, दुसरीकडे आपल्या देशाची आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता आजही कमकुवत आहे. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील ताजा अहवाल हेच अधोरेखित करतो. या अहवालानुसार, देशातील प्रगतिशील राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राची या आघाडीवरची स्थिती दयनीय आहे. त्याची सखोल कारणमीमांसा करायला हवी. नैसर्गिक आपत्तींच्या व्यवस्थापनातील सर्वसमावेशक दृष्टिकोनाअभावी राज्यावर ही वेळ ओढवली आहे. आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्‍यक क्षमता विकसित करण्याची आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दूरदृष्टी राज्याला दाखविता आलेली नाही. त्यामुळेच, मुंबईसारख्या महानगरात पावसाळ्यात होणाऱ्या जीवित व वित्तहानीचेही आता आश्‍चर्य राहिलेले नाही. पुणे किंवा विकासाबाबत या महानगरांपासून कायमच कोसो दूर असलेल्या ग्रामीण भागाचे चित्रही वेगळे नाही. 
मॉन्सूनच्या आगमनानंतर सरकारी विभागांबरोबरच सार्वजनिक व खासगी संस्था आणि वैयक्तिक पातळीवरील सक्रियताही वाढते. मात्र नैसर्गिक आपत्तींचे विश्‍लेषण करून त्याची तीव्रता कमी करणाऱ्या प्रतिबंधात्मक अशा दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. पावसामुळे नद्यांना येणारा पूर आणि खेड्यांपासून शहरांपर्यंत निर्माण होणारी पूरसदृश स्थिती, ही सर्वाधिक धोक्‍याची बाब. त्याचबरोबर विजा कोसळणे, शॉर्टसर्किटमुळे आग लागणे, विजेचा धक्का बसणे, कमकुवत बांधकामे तसेच नद्यांवरील पूल पडणे, झाडे पडणे आदी दुर्घटनाही घडतात. याशिवाय, संसर्गजन्य आजारांच्या साथीसारख्या जैविक संकटाचे आव्हान वेगळेच. त्यामुळेच, संभाव्य धोका लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्तींची जोखीम कमी करणाऱ्या समन्वित आराखड्याची गरज आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती उद्‌भविल्यानंतरच्या कृतींबद्दल खेड्यापासून शहरापर्यंतचे सर्वसामान्य अनभिज्ञ आहेत.
प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक, तसेच कौटुंबिक पातळीवर अशा आपत्तींचा सामना नेमका कसा करायचा, हे माहीत हवे. विविध संस्थांनीही आपले मनुष्यबळ, तसेच पायाभूत घटकांना असलेला धोका कमी करायला हवा. सरकारी पातळीवर नद्यांच्या वाढणाऱ्या पातळीवर लक्ष ठेवून या पाण्याचे धरणांमध्ये सुयोग्य व्यवस्थापन, अतिशय महत्त्वाचे. पावसाळ्यात ही गोष्ट अहोरात्र करायलाच हवी. शहरापासून राज्यस्तरापर्यंतच्या आपत्कालीन केंद्रांनी सरकारी विभागांबरोबरच स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्यांशी प्रभावीरीत्या जोडून घ्यावे. पूरग्रस्त प्रदेशात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागते. त्यामुळेच, सार्वजनिक वाहतूक यंत्रणा नजरेसमोर ठेवूनच स्थलांतराचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे, आपत्तींना योग्य प्रतिसाद देण्यासाठी आवश्‍यक साधने जमवितानाच ती संबंधित यंत्रणा, तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावर वितरित करावी लागतील. 
दरवर्षीच मॉन्सूनला सुरवात होण्यापूर्वी गटारे व नालेसफाई व्यवस्थित व्हायला हवी. अन्यथा, पहिल्याच पावसात शहरे तुंबत राहतील. कमकुवत आणि धोकादायक इमारती ओळखून त्यातील रहिवाशांना वेळेवर तिथून हलविणे गरजेचे आहे. पावसाळ्यात तुटलेल्या कमजोर विद्युत तारांचा धक्का बसून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी अशा तारांची तपासणी करावी. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साठण्याची समस्या नेहमीचीच. त्याची परिणती जैविक संकटात होते. डासांमुळे अनेक आजार पसरत असले तरी डासविरोधी मोहिमेचे यश मर्यादितच राहिलेय. त्यामुळे, आता डासांविरुद्ध अधिक व्यापक मोहीम राबवावी लागेल.
प्रत्येक रहिवाशाने आपल्या घराच्या मजबुतीकडे लक्ष देण्याची गरज असून, घरातील जुने वायरिंग वेळीच बदलावे. आपत्कालीन परिस्थितीत किमान 24 तास तग धरण्याची क्षमता विकसित करतानाच अशावेळी करावयाच्या कृतीचेही धडे गिरवायला हवेत. ग्रामीण भागात पावसाळ्यात वीज कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. झाडाखाली आसरा घेणे, पूल, तसेच पाण्यात बुडालेला मार्ग ओलांडणे म्हणजे स्वत:ला मृत्यूच्या दारात पोचविण्यासारखेच. 
शाळांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. आणीबाणीच्या वेळी किमान 24 तास तरी विद्यार्थ्यांच्या सर्व गरजा भागविण्याची तरतूद या दृष्टीने आवश्‍यक आहे. पावसाळ्यात निसर्ग फुलतो, तसेच सणासुदीलाही उधाण येते. त्यामुळेच सणांदरम्यान पावसाळ्यातील आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी वरवरच्या मलमपट्टीपेक्षा वास्तववादी दृष्टिकोन रुजवायला हवा. खरेतर, विविध आपत्तींना दिला जाणारा प्रतिसाद हा सार्वजनिक शिक्षणाचाच भाग.
तो वेगवान आणि अचूक हवा. स्वत:बरोबरच इतरांचीही सुरक्षितता ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. योग्य वेळेवर स्थलांतर, अनमोल मानवी आयुष्याची, तसेच घर, औद्योगिक आणि सार्वजनिक सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची. आपत्तीला सर्वच पातळ्यांवर दिलेला समन्वित प्रतिसादच आपल्याला तारून नेईल.  
- 

Friday, 28 June 2013

UTTARAKHAND & INDIAN ARMY

हजारोंचे रक्षणकर्ते भारतीय लष्कर
उत्तराखंडामध्ये आलेल्या नैसर्गिक प्रकोपानंतर सर्वत्र हाहाकार उडाला असताना बचाव कार्याचे श्रेय लाटण्यावरून राजकीय नेत्यांची स्पर्धा सुरु झाली आहे. महाप्रलयानंतर काँग्रेस सरकारने वृत्तपत्रांतून जाहिरातींची मालिका सुरू केली असताना आज (गुरुवारी) काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) खासदारांनी तर मर्यादाच ओलांडली.डेहराडून विमानतळावर तेलगू देसमचे खासदार रमेश राठोड व काँग्रेसचे खासदार व्ही हणुमंत राव समोरासमोर भिडले आणि आपणच या यात्रेकरूंना आंध्रप्रदेशमध्ये पोचवणार असा पवित्रा त्यांनी घेतला. वाद आणखीच चिघळल्यानंतर तर दोन्ही खासदारांमध्ये अक्षरश: 'सिनेस्टाईल झटापटही झाली.
उत्तराखंडातील जलप्रलयात सापडलेल्या आणि त्यातून बचावलेल्या पर्यटक आणि भाविकांनी सांगितलेले अनुभव ऐकल्यानंतर एक गोष्ट चांगलीच लक्षात येते की, तिथल्या राज्य सरकारच्या आपत्ती निवारण यंत्रणेतील कर्मचारी बचाव आणि मदतकार्यात सहभागी होत नव्हते.अर्थात ते साहजिक आहे कारण ते शेवटी सरकारी नोकर असतात. आलेली आपत्ती अभूतपूर्व आहे. या पार्श्वभूमीवर लष्कराचे जवान फार हिरीरीने बचावकार्यात सहभागी झाले आहेत. त्यानंतर गती आली. परंतु त्यांना दोनच दिवस काम करता आले. दोन दिवसांनी पुन्हा मुसळधार पावसाने मदतकार्यात व्यत्यय आणले. पुन्हा नव्याने पाऊस सुरू झाला. आभाळ सतत भरून आले. ढगांमुळे आसपासचा प्रदेश दिसेनासा झाला. पावसामुळे पुन्हा नद्या भरून वाहायला लागल्या आणि मदतकार्य पुन्हा थांबले. उत्तराखंडचा प्रदेश हा डोंगर आणि द-यांनी व्यापलेला असल्यामुळे तिथे बचाव आणि मदतकार्यासाठी फक्त आपत्ती काळात मदत करण्याचा अनुभव असलेल्या लष्कराला पाचारण करण्यात आले होते. त्यातच भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टर्स आणि आयटीबीपी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जोखमीचे काम पार पाडत आहेत.
हवाई दलाचे मदतकार्यगौरीकुंड येथे अडकलेल्या यात्रेकरूंना वाचविण्यासाठी जाताना हेलिकॉप्टर कोसळले आणि जवानांनाच जीव गमवावा लागला. त्याच्या आदल्याच दिवशी हवामान खराब असूनही हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनी 330 उड्डाणे करून साडेचार हजार यात्रेकरूंचे जीव वाचविले. जगातील सर्वांत मोठी बचाव मोहीम ठरलेल्या या प्रयत्नांत आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांना वाचविण्यात यश आले आहे. हवाई दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरांच्या साहाय्याने लोकांना दुर्गम भागातून सुरक्षित ठिकाणी आणण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना त्यांच्या स्वत:च्या जीवाला धोका आहे.हेलिकॉप्टरला गौरीकुंड ते केदारनाथ या मार्गावर मंगळवारी अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण २० जवान होते. त्यात हवाई दलाचे पाच, सहा आयटीबीपी आणि उर्वरित नऊ जण राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन दलाचे जवान होते. बुधवारी हवाई दलप्रमुख ब्राऊन यांनी उत्तराखंडला भेट दिली आणि तेथील जवानांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम केले. जोपर्यंत मदतकार्य पूर्ण होत नाही, तोपर्यंत हवाई दल मागे हटणार नाही, मदतकार्य थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हेलिकॉप्टरच्या अपघातात महाराष्ट्रातील दोघे जवान शहीद झाले. त्यापैकी एक जळगावचा तर दुसरा धुळय़ाचा जवान आहे. .
लष्कराचे मदतकार्यउत्तराखंडमधील निसर्गाच्या प्रकोपाने उद्‌ध्वस्त झालेले जनजीवन पुन्हा सावरण्यासाठी दीर्घकाळ झुंजावे लागणार आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे; परंतु पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचविण्याच्या मोहिमेत लष्कराने जी शर्थ केली, जे अपार परिश्रम घेतले त्याची कृतज्ञतापूर्वक नोंद घ्यावी लागेल. मुळात कुठल्याही युद्धात सैन्याच्या सर्वच क्षमतांचा कस लागत असतो; पण परकी शत्रूशी युद्ध असेल, तर लक्ष्य तरी सुस्पष्ट असते. इथे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर, अनेक प्रकारांनी लढावे लागत आहे. खराब हवामानाशी, प्रतिकूल परिस्थितीशी, नकारात्मक आणि पराभूत मनोवृत्तीशी आणि वेळेशीदेखील ही लढाई आहे. जवानांनी या सगळ्या परिस्थितीशी टक्कर देत हजारो यात्रेकरूंना मृत्यूच्या खाईतून बाहेर काढले. हे काम किती कठीण आहे, याची जाणीव बचावकार्यात गुंतलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेने करून दिली आहे.
लष्कराच्या एका अधिका-याने एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना असे म्हटले की, कोणतेही मदतकार्य युद्धापेक्षा कठीण असते. युद्धात शत्रूला टिपणे व त्याचा भूप्रदेश ताब्यात घेणे अशी उद्दिष्टे असतात, पण मदतकार्यादरम्यान प्रत्येक जवानाला आपद्ग्रस्तांमध्ये प्रथम आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. या प्रत्येकाचा जीव वाचवण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. आपल्या लष्कराने केदारनाथमध्ये प्रलय आल्यानंतर दोन दिवसांत संपूर्ण तयारी करून थेट घटनास्थळी सर्वशक्तीनिशी स्वत:ला झोकून दिले. या जवानांनी अक्षरश: तासा-दोन तासांत आपत्कालीन पूल बांधले.दोरीच्या साहाय्याने शेकडोंचे प्राण वाचवले. दळणवळण सुरळीत व्हावे म्हणून कोसळलेल्या दरडींची हजारो टन माती हातावेगळी केली. खराब हवामान असतानाही हजारो पर्यटकांना डेहराडूनमध्ये आणण्यासाठी विमानांच्या फे-या मारल्या. दरडीमध्ये, मातीच्या ढिगा-याखाली अडकलेल्यांची सुटका करून त्यांना पाठीवरून सुरक्षित स्थळी नेले. लष्कराच्या दृष्टीने या आपत्तीत सापडलेला प्रत्येक जण प्रथम भारतीय होता. लष्कराच्या साहसाचे, त्यांच्या अतुलनीय कामगिरीचे कौतुक केले पाहिजे. आपल्या लष्कराने केदारनाथमध्ये प्रलय आल्यानंतर दोन दिवसांत संपूर्ण तयारी करून थेट घटनास्थळी सर्वशक्तीनिशी स्वत:ला झोकून दिले. या जवानांनी अक्षरश: तासा-दोन तासांत आपत्कालीन पूल बांधले.दरडीमध्ये, मातीच्या ढिगा-याखाली अडकलेल्यांची सुटका करून त्यांना पाठीवरून सुरक्षित स्थळी नेले.लष्कराच्या एका तुकडीला बदासूमध्ये हेलिकॉप्टरने उतरवण्यात आले. हरसिलमध्ये पूल उभारून जवानांनी 600 नागरिकांना बाहेर काढले.हरसिल गंगोत्रीत एक स्वतंत्र रस्ता तयार करून 100 नागरिकांना वाचवले गेले.
भाविकांना सुखरूप बाहेर काढण्याची मोहीम ज्या दिवशी प्रारंभ झाली, त्याच दिवशी लेफ्टनंट जनरल अनिल चैत म्हणाले होते, ‘हम भगवान नही है| देशके सेवक है, जनताके सेवक है | हमारे जवान हमारा कर्तव्य पूरी ताकद और निष्ठा के साथ निभा रहे है | अनिल चैत यांचे म्हणणे खरेच आहे. ते भगवान नाहीत, पण देवदूत जरूर होते. अगदी देवासारखे ते धावून आले होते. अगदी अंगावर काटा यावा, अशी ती शोध आणि बचाव मोहीम होती. संपूर्ण जग हे दृश्य बघत होते. आज बचावलेला प्रत्येक भाविक केवळ लष्कर आणि वायुदलाला मनापासून धन्यवाद देत आहे. त्याच वेळी राज्य शासनाने कवडीची मदत केली नाही, अशा शब्दात आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत आहे. हम फौजके उपकार जिंदगीभर नही भूल सकते | केवल उनकी वजहसेही हमे पुनर्जन्म मिला है, हे भाविकांचे उद्गार आमच्या गौरवशाली लष्कराला हिमालयाच्या उंचीवर नेण्यासाठी पुरेसे आहेत. उत्तराखंडमध्ये मदत कार्य सुरू असतानाच, काश्मिरमध्येही पाक अतिरेक्यांच्या हल्ल्यात आमचे आठ जवान शहीद झाले. देशासाठी प्राणपणाने लढता लढता प्राणाचे बलिदान देण्याची महान परंपरा भारतीय सैन्याने जोपासली आहे. अगदी १९४८ पासून तर कारगिल युद्धापर्यंतच्या कामगिरीचा अभ्यास केला तर त्याची प्रचिती येईल. त्याचेच दर्शन उत्तराखंडमध्ये आमच्या जवानांनी घडविले आहे.
अजूनही अनेक पर्यटकांपर्यंत ही मदत पोहोचू शकलेली नाही. आपली वाटशोधत त्यांचे मार्गक्रमण सुरू असणार. त्यांना शोधण्यासाठी लष्कर आता या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करणार आहे. उत्तराखंडमधून आपल्या गावी सुरक्षितपणे परतणारा प्रत्येक पर्यटक जवानांच्या धैर्याला, मदतीला सलाम करतो आहे ते यामुळेच.आताही अत्यंत खराब हवामानात अत्यंत चपळ हालचाली करून जवान मदतकार्याला वेग आणत आहेत. त्यांच्याच जोरावर आतापर्यंत हजारो जणांचे प्राण वाचले आहेत. युद्ध असो की, नैसर्गिक आपत्ती यातून मार्ग काढण्यासाठी लष्करच पुढाकार घेते. उत्तराखंडातील स्थानिकही पर्यटक आणि भाविकांना आपल्या परीने मदत करत आहेत. सीमेवर तैनात असलेले जवान आज राष्ट्रीय आपत्तीतही हिरीरीने मदत करत आहेत. या कार्याबद्दल प्रत्येकालाच त्यांचा अभिमान आहे.आपल्या जवानांचे कौतुक यासाठी करायला हवे की, अत्यंत दुर्गम भागात वेळेवर पोहोचून या जवानांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले तसेच येथील परिस्थिती आपल्या नियंत्रणाखाली आणली.आपल्या जवानांनी हा हिंदू, हा मुस्लिम, हा मराठी, हा पंजाबी असा भेदभाव केला नाही. हजारो वृद्ध पुरुष-स्त्रिया, लहान मुले, अपंग, गरीब, श्रीमंत यांचे प्राण वाचवताना या जवानांनी स्वत:च्या जिवाची पर्वा केली नाही. या जवानांच्या जिगरबाज व दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे वाचले आहेत.
गोरखा रायफल्सचे मेजर महेश कर्की लष्करी गणवेश अंगावर असलेला अधिकारी प्राणाची बाजी लावून नागरिकांची मदत करतोच; परंतु देशसेवा अंगी भिनलेल्या लष्करातील अधिकाऱ्याची केवळ गणवेश हीच ओळख नसते, हे उत्तराखंडमध्ये कुटूंबीयांसमवेत सुट्टीवर आलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने सिद्ध केले. गोरखा रायफल्सचे मेजर महेश कर्की हे या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी डेहराडून येथून बद्रीनाथ येथे आपली दोन मुले, पत्नी व सासुबाईंसमवेत जात होते. जोशीमठ येथे आल्यानंतर तेथील रस्ता उद्‌ध्वस्त झाल्याचे त्यांना आढळले. अडकलेल्या कर्की कुटूंबीयांना तेथून परत फिरण्यासाठी सांगण्यात आले. अशा वेळी आपल्या कुटूंबीयांसह सुरक्षित ठिकाणी परतणे वा उद्‌ध्वस्त झालेल्या रस्त्याच्या पलीकडे अडकलेल्या लोकांची सुटका करणे, असे दोन पर्याय कर्की यांच्यापुढे होते.
अशा वेळी देशसेवेचे कंकण बांधलेले कर्की आपल्या पत्नीस कुटूंबासह थांबण्यास सांगून रस्त्याच्या पलीकडे अडकलेल्या लोकांच्या मदतीस धावले. मुसळधार पावसात रस्ता पूर्णत: उद्‌ध्वस्त झाला असताना कर्की यांनी आपली गाडी त्याच्यावरून चालवत पलीकडे अडकलेल्या 25 लोकांची सुटका केली. एकावेळी चार लोकांना गाडीमध्ये बसवून जवळजवळ नसलेल्या रस्त्यावरून गाडी चालवित येथे अडकलेल्या सर्व लोकांना कर्की यांनी वाचविले. या सर्व लोकांना कर्की यांनी गोविंदमठ येथील सुरक्षित जागी सोडले. "या लोकांना मदत करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही,‘‘ असे कर्की यांनी सांगितले
हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतरही लष्कराचा निर्धार जराही मंदावलेला नाही. जवानांच्या कर्तृत्वाचे, धैर्याचे असे अनेक प्रसंग आता समोर येत आहेत. तवाघाट भागात एक गर्भवती महिला अडलेली आहे, हे कळताच पंधरा किलोमीटर पायी चालत जाऊन कॅप्टन फेबा सूजैन या डॉक्‍टर महिलेने तिची सुखरूप प्रसूती केली. बाळ-बाळंतिणीला सुखरूप आपल्या गावाकडेही पोचविले. या शौर्याला अन्‌ धैर्याला तोड नाही. लष्कराच्या शौर्यकथा प्रेरक आहेतच; पण त्यांतून प्रकटलेली शिस्त आणि इतर गुण समाजात झिरपणे हे जास्त महत्त्वाचे.
उत्तराखंड मदतकार्य- भारतीय लष्कराने सुरु केली वेबसाईटउत्तराखंडमध्ये युद्धपातळीवर कार्य करणा-या भारतीय लष्कराने मदतकार्याची माहिती देणारी वेबसाईट सुरु केली आहे.

नवी दिल्ली- उत्तराखंडमध्ये अडकलेल्या हजारो नागरिकांना वाचवणा-या आणि अद्यापही युद्धपातळीवर कार्य करणा-या भारतीय लष्कराने मदतकार्याची माहिती देणारी वेबसाईट सुरु केली आहे. http://suryahopes.in/ या वेबसाईटवर भारतीय लष्कराच्या मार्फत सुरु असलेल्या मदत कार्याची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती वेळोवेळी अपडेट केली जात आहे. त्याच बरोबर भारतीय लष्कराकडून ज्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले आहे त्यांची नावे या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या वेबसाईटवरील find your loved one या विभागात उत्तराखंडमध्ये अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेता येईल. महत्त्वाचे फोन नंबर, विभागवार सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आलेल्या व्यक्तींची नावे, जखमी व्यक्तींची नावे आदी तपशील या वेबसाईटवर देण्यात आला आहे.उत्तराखंडात आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र मंत्रालय

उत्तराखंड राज्यातील केदारनाथ परिसराला नैसर्गिक आपत्तीचा इतका भीषण तडाखा बसला आहे की येथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अनेक दिवस नाहीत तर अनेक महिने लागू शकतात.उत्तराखंडात आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे; त्या खात्याने नेमकी कोणती काळजी घेतली, हा प्रश्‍न विचारला पाहिजे. आता सगळ्या जगाचे आपत्तीकडे लक्ष वेधले गेले आहे म्हटल्यावर राजकीय नेत्यांचे "पर्यटन‘ सुरू झाले आहे. असल्या कोत्या मनोवृत्तीतून बाहेर पडल्याशिवाय मोठ्या संकटांना तोंड देण्याची तयारी समाज आणि देश म्हणून करता येणार नाही. अशा स्वरूपाची ही मोहीम आणखी काही काळ अशीच सुरू राहील; पण प्रश्‍न आहे तो या दुर्घटनेने जे धडे दिले त्यांच्यापासून शिकण्याचा. मुळात दुर्घटना घडूच नयेत, घडल्या तर त्यातील हानीची तीव्रता कमी व्हावी, यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात.विज्ञान-तंत्रज्ञानाने नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना मिळण्याची शक्‍यता पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे; पण प्रत्येक ठिकाणचे "आपत्ती निवारण विभाग‘ आपले काम आपत्तीशी संबंधित आहे, असे समजून एरवी बहुधा स्वस्थ बसतात. जवानांच्या शौर्याचे, शिस्तीचे उत्तराखंडात सध्या जे दर्शन होत आहे त्याचा काही अंश तरी समाजाच्या नेहमीच्या व्यवहारात आपण का नाही आणू शकत? आपत्ती निवारणासाठी आपली भिस्त मोठ्या प्रमाणावर लष्करावर दिसते. खरे म्हणजे पोलिस, प्रशासन, नागरी सुरक्षा दले, विविध स्वयंसेवी संस्था यांच्यातही आपत्तींना तोंड देण्याच्या दृष्टीने अद्ययावत प्रशिक्षण देणे अत्यावश्‍यक आहे.