Total Pageviews

Wednesday, 31 August 2011

BIHAR CORRUPTION WILL BE ON U TUBE

' बिमारू ' राज्यांपैकी एक म्हणून परिचित असणारे बिहार आता कात टाकत आहे . तेथील बदलांनी अनेकांना तोंडात बोट घालायला लावले आहे . भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी अण्णांनी केलेले आंदोलन सर्वश्रूत आहेच ; पण बिहार सरकारने त्यापुढे पाऊल टाकत , हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरविले आहे . सरकारी कार्यालयांत मोठ्या प्रमाणात असणाऱ्या भ्रष्टाचाराला थोपविण्यासाठी राज्य सरकारने चक्क ' यू ट्यूब ' ची मदत घेण्याचे ठरविले आहे .
एखाद्या सरकारी कार्यालयात टेबलाखालून देण्यात येणारी रक्कम अथवा भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम रेकॉर्ड करायचा आणि त्याची चित्रफीत साग्रसंगीतपणे ' यू ट्यूब ' वर अपलोड करायची . ' बिहार सरकारतर्फे भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे ,' असे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी नुकतेच सांगितले .
नितिशकुमारांच्या या उपक्रमामुळे अत्यंत गरीब आणि बेघर असणाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ' इंदिरा आवास ' सारख्या योजनांचे लोणी खाणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे . ' यू ट्यूब ' वर अपलोड करण्यात येणाऱ्या अशा पद्धतींच्या चित्रफितींमुळे भ्रष्टाचाऱ्यांना चांगलीच चपराक बसणार असून , योजना लाभार्थींपर्यंत पोचेल असा विश्वास बिहारचे ग्रामीण विकास सचिव संतोष मॅथ्यू यांनी व्यक्त केला . सध्याच्या स्थितीत बिहारमध्ये ३० लाखांपेक्षा अधिक नागरिक दारिद्र्यरेषेखाली असून , त्यांच्यासाठी केंद्र सरकारने ' इंदिरा आवास ' योजना राबविली . मात्र , योजनेचा फायदा मिळविण्यासाठी नागरिकांना अधिकाऱ्यांचे हात ओले करावे लागत असत . त्यामुळे योजनेचा अधिक फायदा सरकारी बाबूंनाच मिळत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या . बऱ्याचवेळा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे मिळत नसल्याने अधिकाऱ्यांचे फावू लागले . त्यामुळे भ्रष्टाचाराच्या क्लिपिंग तयार करून त्या ' यू ट्यूब ' वर अपलोड करण्याची कल्पना पुढे आली आणि बिहारच्या विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या नितिशकुमारांनी ती उचलून धरली . या अनोख्या उपक्रमामुळे अधिकाऱ्यांमध्ये दहशत बसली असून , खुलेआम पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांनी हाय खाल्ली असल्याचे चित्र बिहारच्या सरकारी कार्यालयांत दिसून येत आहे

No comments:

Post a Comment