Total Pageviews

Showing posts with label #kagil war. Show all posts
Showing posts with label #kagil war. Show all posts

Saturday, 22 July 2023

कारगिलची पुनरावृत्ती होईल का?


  

२६ जुलै रोजी कारगीलच्या युद्धाला23 वर्ष पुर्ण होत आहेत. यानिमित्ताने कारगील युद्धातुन आपण काय शिकलो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारगीलसारखे युद्ध भारतासमोर पुन्हा येऊ शकते का यावरही चर्चा होणे गरजेचे आहे. कारगीलच्या युद्धानंतर सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली "कारगील रिव्ह्यू कमीटीची" स्थापना करण्यात आली होती. कारगील युद्धादरम्यान आपल्या काय चुका झाल्या आणि यापुढे कोणती काळजी घेणे गरजेचे आहे हे तपासण्याचे काम या समितीचे होते. या समितीच्या अहवालात अनेक सुधारणा सुचविल्या होत्या. लवकरात लवकर सैन्याचे आधुनिकीकरण करणे, सीमेवरती रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, सैन्यामधील रिक्त जागा भरण्यास या समितीने सांगितले होते. मात्र १६ वर्ष उलटुनही या समितीच्या सुचनांवर पुरेशी कार्यवाही करण्यात आली नव्हती. मात्र गेल्या वर्षभरात सैन्याच्या आधुनिकीकरणाला गती मिळालेली आहे. सैन्यदलाचे बजेट दरवर्षी २५ टक्क्यांनी वाढविले तरीही सैन्यदलाचे आधुनिकीकरण करण्यास दहा ते पंधरा वर्ष लागू शकतात. सध्याचे सरकार या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न करेल आणि सीमेवर रस्ते बांधण्यासाठी ठोस पावले उचलेल अशी अपेक्षा आहे.

लद्दाख १७ माऊंटन स्ट्राईक कोर 

ज्या लेह लद्दाख भागात कारगीलचे युद्ध झाले त्या भागात आपले सैन्य फार कमी होते. या भागात भारतीय लष्कराने सैन्याची संख्या आणि पेट्रोलिंग वाढविल्यामुळे या भागात पुन्हा कारगील युद्धासारखी परिस्थिती निर्माण होणे जवळपास अशक्य आहे. तो भाग आता सुरक्षित झाला आहे. मात्र लद्दाखच्या भारत-चीन सीमेवर अद्यापी सैन्याची संख्या फारच कमी आहे. त्या भागात कारगीलसारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे हे होऊ नये यासाठी १७ माऊंटन स्ट्राईक कोर नावाची एक नवी लष्करी तुकडी तयार करावी असे सुचवले होते.आजच्या घडीला पैसे मिळाले तरी आगामी तीन ते चार वर्षात ही तुकडी तयार होऊ शकते.

आंदमान निकोबार लक्षद्विप,मिनीकोय 

भारताकडे आंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्विप,मिनीकोय हे दोन द्विपसमुह आहेत. आंदमान आणि निकोबारच्या ६५० बेटांपैकी केवळ २८ बेटांवरच मनुष्य वस्ती आहे. उर्वरित बेटांवर मनुष्यवस्ती नसल्यामुळे तसेच त्या भागात सैन्य नसल्यामुळे समुद्री लुटेरे   किंवा दहशतवादी तेथे आपले तळ बनवू शकतात अशी भीती आहे. त्यामुळे या बेटांवरती कोस्टगार्ड, नौदल,तसेच हवाई दलाच्या माध्यमातुन पेट्रोलिंग वाढविण्याची गरज आहे. अशी बेटे शत्रुने ताब्यात घेतल्यास ती बेटे परत मिळविण्याची ताकद आपल्या सैन्यात असणे गरजेचे आहे. आंदमान आणि निकोबारमध्ये सैन्याच्या दोन बटालियन्स तैनात करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक बेटावर सैन्य ठेवायचे असल्यास मोठ्या प्रमाणावर सैनिकांची तसेच पैशांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सध्यातरी या भागात टेहाळणीचा पर्यायच लष्कराने स्वीकारला आहे. या भागात कुणीही आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्याची क्षमता भारतीय सैन्यामध्ये आहे.

अरबी समुद्रातील लक्षद्विप समुहावरही अशीच परिस्थिती आहे. सोमालियन चाचे, पाकिस्तान आणि मालदिव या भागातील दहशतवादी या भागातून जात असल्याची शक्यता गुप्तहेर खात्याने कायमच वर्तवली आहे. त्यामुळे या द्विपसमुहावरतीही लक्ष ठेवण्याची गरज आहे. मात्र ही बेटे आंदमान-निकोबर द्विपसमुहाच्या तुलनेत लक्षद्विप बेटे भारतीय सीमेपेक्षा जवळ असल्याने गरज पडल्यास दहशतवाद्यांना हुसकावण्यासाठी आपल्या सैन्याला लागणार्या बोटी आणि विमाने तयार आहेत. त्यामुळे या बेटाच्या सुरक्षेची जास्त काळजी करण्याची गरज नाही.

भारताच्या समुद्री सीमा आजही असुक्षित आहेत. २६/११च्या हल्ल्यानंतर कोस्टगार्ड, नौदल, पोलीसांकडे असलेल्या बोटी, रडारांची संख्या वाढलेली असली तरीही अजूनही किनारपट्टीवरून अतिरेक्यांची घुसखोरी, शस्त्रे, बनावट नोटा, अंमली पदार्थांची तस्करी सुरूच आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा अजून सक्षम करण्याची गरज आहे.

कोणत्याही प्रकारचे युद्धाला चोख प्रत्युत्तर 


आगामी काळात कारगीलसारखी युद्धे कमी होतील आणि युद्धाचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ कारगीलसारख्या युद्धासाठीच तयार राहणे शहाणपणाचे ठरणार नाही. आपल्या शत्रुंनी कोणत्याही प्रकारचे युद्ध लादले तर त्या युद्धाला चोख प्रत्युत्तर देता आले पाहिजे. सध्या पाकीस्तानने भारताच्या अंतर्गत सुरक्षेची परिस्थिती गंभीर करून ठेवलेली आहे. काश्मीरमध्ये रोजच फडकणारे इसिस आणि पाकिस्तानी झेंडे पाहता काश्मीरमध्ये छुपे युद्ध पुकारण्यात आले आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. याशिवाय ईशान्य भारतातील काही बंडखोरांनी नुकतेच आपल्या काही जवानांना ठार मारले होते. त्याला प्रत्यूत्तर म्हणून आपल्या सैनिकांनी म्यानमारच्या सीमेत घुसून बंडखोरांना यमसदनी पाठविले होते. ईशान्य भारतात दहशतवादी कारवाया करणार्या अतिरेक्यांचे ट्रे्निग कॅम्प मुख्यत्वेकरून म्यानमार मध्ये आहेत. चीन आणि बांग्लादेशमध्येही या दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत. अशा दहशतवाद्यांची घुसखोरी थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एखादा दहशतवादी आत आलाच तर, दहशतवादविरोधी कारवाई करून त्याला संपवले पाहिजे. 


भारत-पाकिस्तान सीमेकडे सर्वांचेच लक्ष असते. मात्र भारत-चीन, भारत-नेपाळ, भारत-म्यानमार, भारत-बांग्लादेश, भारत-श्रीलंका येथूनही दहशतवाद्यांची घुसखोरी कायमच सुरू असते. या सर्व सीमा सुरक्षित करण्याची गरज आहे.

चीन, पाकिस्तानसह भारताच्या इतर शत्रुंनी भारताच्या अंतर्गत सुरक्षेची अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. यासाठी आपल्याला आपल्या सीमा अजून सुरक्षित कराव्या लागणार आहेत. अर्थातच गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सीमा काही प्रमाणात सुरक्षित झालेल्या असल्या तरी अजूनही त्या पूर्णपणे सुरक्षित झालेल्या नाहीत. भारतासमोरील सुरक्षेची आव्हाने बहुआयामी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धांना सामोरे जाण्यासाठी लष्कराची ताकद वाढविण्याची गरज आहे. कारगील दिवसाच्या निमित्ताने आपले सरकार या सगळ्या सुरक्षेच्या पैलूंवरती विचार करेल अशी अपेक्षा आहे. 

सैनिकांना विसरते 

कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो. पण आपल्याकडे या पराक्रमाला किंवा सैनिकांच्या या बलिदानाला पाहिजे तसे महत्त्व दिले जात नाही. कितीही मोठे तंत्रज्ञान आले तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात.कुठलाही देश किती सुरक्षित आहे हे त्याच्याकडे किती शस्त्रसाठा आहे यावरून ठरत नसते तर त्यांच्याकडे असणार्या सैनिकांवरून ठरत असते. एका म्हणी नुसार ‘देव आणि सैनिकांवर आपण सर्वच प्रेम करतो. पण जेव्हा आपल्याला किंवा देशाला धोका निर्माण झाले तेव्हाच त्यांची आठवण येते. ते संकट जाते तेव्हा आपण त्यांना विसरतो. जे राष्ट्र आपल्या सैनिकांना विसरते ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो. 


ऑपरेशन विजय’ आणि कारगिल युध्दाची विरगाथा

 


हे व्यार्थ न हो बलिदान

२६ जुलै २०२3ला कारगिल युद्धाला २4 वर्षे पूर्ण होतिल.कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. २६ जुलै १९९९ हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेमधील सोनेरी पान म्हणून सर्व भारतीयांच्या कायम लक्षात राहील.

काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर ,फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते.पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले.

कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो. 

२६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येकवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

जगभरात उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी कारगिल युद्ध एक उदाहरण आहे. पाकिस्तानचे किमान चार हजार जवान या युद्धात मारले गेले. भारतीय लष्करातील ५४३ अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले .१३०० जवान जखमी झाले. कारगिल युद्धात ठार झालेल्या भारतीय जवानांचा वयोगट १९ ते २८ असा होता.

१९९९ मध्ये पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याला दोन कारणे होती. पाकिस्तानला सियाचिन सिमेवर असलेल्या भारतीय सैन्याची रसद तोडण्याकरीता कारगिल-श्रीनगर या मार्गावर कब्जा करायचा होता. दुसरे जम्मु काश्मिरमध्ये दहशतवादाला पुन्हा पुनरजिवीत करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने याआधी दुर्लक्षित असलेल्या भागाकडे भारतीय सैन्याचे लक्ष एकवटण्यास भाग पाडायचे होते.

ऑपरेशन विजय’

स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दन लाईट इन्फ्रट्रींच्या  ११ बटालियन तुकड्या या युद्धात गुंतवल्या होत्या.भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय’ या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कारवाई चालू केली. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता रेजिमेंटल व बटालियनपुरतीच कारवाई शक्य होती. त्यामुळे फौजेची संख्या केवळ वीस हजारपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. टायगर हिल व तोलोलिंग येथला संग्राम भारतीय जवानांच्या साहसाचा पराक्रमाचा कळस होता .

हा भाग प्रचंड डोंगराळ असल्याने या भागात तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग होत नव्हता. हे युद्ध पायदळाचे युद्ध होते. पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात चार परमवीर चक्र, चार महावीर चक्र, २९ वीरचक्र आणि ५२ सेना मेड्ल प्रदान करण्यात आले होते.

कारगिल युद्धात अतिशय क्रुरपणे ठार मारलेल्या लेफ्टनंट सौरभ कालिया यांचे नाव आजही भारतीयांच्या जीभेवर आहे. मे १९९९ रोजी एका स्थानिक मेंढपाळाकडून मिळालेल्या माहितीनंतर बटालिक सेक्टरमध्ये लेफ्टनंट सौरभ कालिया आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर गेले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे तेथील घुसखोरी उजेडात आली.

कॅफ्टन विक्रम बत्रा :विजयी ध्वज रोवून त्यात लपेटून येईल

कारगिल युद्धात शहिद झालेले कॅफ्टन विक्रम बत्रा यांचे सहकारी त्यांना शेरशाह असे म्हणत. केवळ १८ महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात भरती झालेले बत्रा त्यांच्या ऐतिहासिक संदेशासाठी स्मरणात राहतात. बत्रा यांनी युद्धावर जाण्यापूर्वी सांगितले होते, की भारताचा विजयी ध्वज रोवून परत येईल किंवा त्यात लपेटून येईल.

त्यांच्या कंपनीला पॉईंट ५१४० पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून परत घेण्याचा आदेश मिळाला होता. त्यांनी शत्रूची दिशाभुल करण्यासाठी शिखराच्या दुसरीकडून चढण्याची योजना आखली होती. त्यात त्यांना यश आले. बत्रा यांनी पाकिस्तानी लष्कराच्या तीन जवानांना ठार मारले. परंतु, या लढाईत ते जखमी झाले. तरीही ते लढत राहिले. २० जून १९९९ रोजी सकाळी ३.३० वाजता त्यांच्या कंपनीने शिखर ताब्यात घेतले.

शिखर ताब्यात आल्यावर बत्रा म्हणाले होते, की ये दिल मांगे मोर. त्यांच्या याच शब्दांमध्ये त्यांची विरता दडलेली आहे. ८ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने एतिहासीक यश मिळवित १६ हजार फूट उंचिवर असलेले ४८७५ शिखर परत मिळविले. परंतु, या मोहिमेत कॅप्टन बत्रा कामी आले.४८७५ शिखर सर करताना बत्रा यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत येण्यास मनाई केली. तुमच्या मागे मुलंबाळं आहेत, असे म्हणत ते पुढे गेले होते.बत्रा यांना मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

१५ मीटर अंतरावरून शत्रूशी लढत होते विजयंत थापर

राजपूताना रायफल्समध्ये असलेले कॅप्टन विजयंत थापर यांना कारगिल युद्धात डर्टी डजन या १२ सदस्यीय घातक टीमचे प्रमुख करण्यात आले होते. त्यांच्याकडे टोलोलिंग शिखर सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. १२ जून १९९९ च्या रात्री विजयंत यांनी त्यांच्या प्लाटूनला लीड केले. टोलोलिंग सर केल्यानंतर त्यांना पिंपल्स आणि नॉल सर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास त्यांनी कठीण पर्वत चढून शत्रूच्या चौकीजवळ ठाण मांडला. शत्रूच्या चौकीवर जोरदार हल्ला केला. त्यांनी केवळ १५ मीटर अंतरावरून पाकिस्तानी लष्कराच्या अनेक जवानांचा खातमा केला. यात त्यांना वीरमरण आले.

बॅटल ऑफ थ्री पिंपल्समध्ये त्यांना शिखर ताब्यात घ्यायचे होते. विजयंत यांच्या प्लाटूनचे कमांडर मेजर पी. आचार्य शहिद झाले तेव्हा त्यांनी कमांड आपल्या हातात घेतली. २२ वर्षांचे विजयंत केवळ काही महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र बहाल करण्यात आले.

पाकिस्तानी चौकीवर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, की जर तुम्हाला शक्य असेल तर येथे येवून बघा तुमच्या भविष्यासाठी भारतीय लष्कराने कुठे युद्ध लढले. विजयंत यांचे वडील निवृत्त कर्नल वी. एन. थापर प्रत्येक वर्षी हजारो मैलांचा प्रवास करून मुलगा जेथे शहिद झाला होता तेथे जातात. मुलाला श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्याने दिलेला शब्द पाळतात.

मनोज पांडे यांचे अंतिम शब्द , त्यांना सोडू नका

खालूबर रिजलाइनला पाकिस्तानी जवानांच्या ताब्यातून सोडविताना कॅफ्टन मनोज पांडे शहिद झाले. कारगिल सेक्टरमधील खालूबर रिजलाइन अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण होते. त्यावर पाकिस्तानी लष्कराने कब्जा केला होता. २३ जुलैच्या रात्री पाकिस्तानी जवानांनी कॅप्टन पांडे आणि त्यांच्या टीमवर तुफान गोळीबार केला. शत्रू पक्षाचे लक्ष विचलित करण्याची जबाबदारी पांडे यांना देण्यात आली होती. त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या दोन जवानांना ठार मारून पहिल्या पोझिशनवर कब्जा केला. त्यानंतर आणखी दोन जवानांना मारून दुसरे पोझिशन मिळविले. तिसऱ्या पोझिशनवर हल्ला करताना त्यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली. जखमी अवस्थेतही त्यांनी शत्रूपक्षावर गोळीबार सुरू ठेवला. कॅप्टन पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौथी पोझिशनही ताब्यात घेतली. यावेळी पाकिस्तानी लष्कराची एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली. यात ते शहिद झाले. यावेळी त्यांचे अंतिम शब्द होते, ना छोडनू. ( नेपाळी भाषेचा मराठी अर्थ त्यांना सोडू नका) २४ वर्षांचे पांडे यांना मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

शस्त्रापेक्षा शस्त्र चालवणारा सैनिक जास्त महत्वाचा

द्रास गावामध्ये आता एक स्मारक बांधलेले असून तेथे अनेक पर्यटक भेटीसाठी जातात. तिथे गेल्यानंतर ही जी शिखरे आहेत ती दिसतात आणि नकळतपणे कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो.  आपल्याकडे या पराक्रमाला किंवा सैनिकांच्या या बलिदानाला पाहिजे तसे महत्त्व दिले जात नाही. कितीही मोठे तंत्रज्ञान आले तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात .जे राष्ट्र आपल्या सैनिकांना विसरते ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.