पोलिसांनी मारहाण केल्याची महिलेची तक्रार
-
Wednesday, August 31, 2011 AT 01:45 AM (IST)
नाशिक - जिल्हाधिकारी कार्यालयातील महाफेरफार अदालतीत एका केसच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी गेलेल्या सातपूरच्या सुक्षिक्षित महिलेला पोलिस यंत्रणेकडून अतिशय मानहानीकारक अनुभव आला. पालकमंत्र्यांना तक्रारीचे निवेदन दिल्यानंतर जवळ असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने आपल्याला हटकले आणि चार ते पाच महिला पोलिसांनी मारहाण करीत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आणले. त्यानंतर सायंकाळी साडेपाचपर्यंत सरकारवाडा पोलिस ठाण्यात बसवून ठेवले, अशी तक्रार या महिलेने निवेदनाद्वारे केली आहे.
अनिता नवनीत मेहता असे या महिलेचे नाव असून, जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीची व्यथा त्यांनी "सकाळ'कडे मांडली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाफेरफार अदालतीत एका केसच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी त्या आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या. तेथून मेहेर सिग्नलकडील प्रवेशद्वाराने बाहेर पडताना, प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाने त्यांना अपमानास्पद पद्धतीने दुसऱ्या बाजूच्या प्रवेशद्वाराने जाण्यास सांगितले. त्या वेळी त्याने अपशब्दही वापरले. दरम्यान, काही वेळानंतर या प्रकाराबद्दल संबंधित सुरक्षारक्षकाची तक्रार देण्यासाठी श्रीमती मेहता पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन घेऊन गेल्या. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना एक-दोन विभागांकडे जायला सांगितल्याने शेवटी त्या जिल्हाधिकाऱ्यांकडेच तक्रार देण्यासाठी गेल्या. दरम्यान, त्याच वेळेस महाफेरफार अदालतीच्या निमित्ताने पालकमंत्री छगन भुजबळ तिथे आल्याने त्यांच्याकडे श्रीमती मेहता यांनी तक्रारीचे निवेदन दिले. श्री. भुजबळ यांनी तक्रार वाचली आणि ते बैठकीसाठी रवाना झाले. दरम्यान, श्रीमती मेहता सिंहस्थ हॉलबाहेरच्या एका खुर्चीवर बसल्या असता शेजारीच असलेल्या सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने त्यांना हटकले आणि तेथून जायला सांगितले. पालकमंत्र्यांकडून आश्वासन घेतल्याशिवाय जाणार नाही, असे मेहता यांनी सांगितल्यावर या अधिकाऱ्याने महिला पोलिसांना बोलावून घेतले. त्यांनी श्रीमती मेहता यांना मारहाण करीत जिन्यावरून खाली आणले. "मारहाण करू नका, मी तुमच्या बरोबर येते' असे सांगूनही महिला पोलिसांनी ऐकले नसल्याचे श्रीमती मेहता यांचे म्हणणे आहे. दरम्यान, त्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याच्या आदेशाने त्यांना सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेण्य
ात येऊन तिथे कुठल्याही चौकशीशिवाय सायंकाळी साडेपाचपर्यंत बसवून ठेवण्यात आले. अखेर एका ओळखीच्या महिलेने हमी लिहून दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. विशेष म्हणजे यासंदर्भात कुठलीही तक्रार किंवा गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याचे श्रीमती मेहता यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार द्यायला गेलेल्या महिलेला सर्वांदेखत अत्यंत हीन आणि अपमानस्पद वागणूक देण्याचा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे मत श्रीमती मेहता यांनी "सकाळ'कडे व्यक्त केले. माझा काहीही गुन्हा नसताना पोलिसांनी मारहाण केलीच, शिवाय माझ्याकडूनच लेखी का घेतले, ते मला अजूनही समजले नसल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, यासंदर्भात सरकारवाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, अनिता मेहता नावाच्या महिलेला सरकारवाडा पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसून, त्यांच्यावर गुन्हाही नोंदविण्यात आला नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले
No comments:
Post a Comment