Total Pageviews

Showing posts with label narcoterror. Show all posts
Showing posts with label narcoterror. Show all posts

Saturday, 2 June 2018

भारत-नेपाळ सीमेवर बेधडक चालतोय कोकेन-अमली पदार्थांचा व्यापार, मानव तस्करीही सुरू शशी भूषण, प्रवीण वर्मा, अतुल उपाध्याय



बिहारच्या भागातील भारत-नेपाळच्या नियंत्रण रेषेवर (लाइन ऑफ कंट्रोल) कोणाचे नियंत्रण आहे? सशस्त्र सीमा दलाचे, नेपाळच्या सशस्त्र पोलिस दलाचे, कस्टमचे, आयबीचे, सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलिसांचे की यापैकी कोणाचेही नाही? वस्तुस्थिती अशी आहे की, नियंत्रण रेषेवर पूर्ण नियंत्रण यापैकी कोणाचेही नाही. कायदेशीरदृष्ट्या पश्चिम चंपारणच्या वाल्मीकीनगरपासून किशनगंज गलगलियापर्यंत भारत-नेपाळदरम्यान अनेक व्यापारी रस्ते आहेत, पण वस्तुस्थिती अशी आहे की, खुल्या सीमेवर असंख्य चोरदरवाजे आहेत. दोनशेपेक्षा जास्त नदी-नाले आहेत.

नेपाळने ते उघडले आहेत. दिव्य मराठीचा चमू येथे पोहोचला तेव्हा मित्रराष्ट्रांच्या जनतेच्या अडथळ्याविना सुरू असलेल्या येण्या-जाण्याच्या नावाने या रस्त्यांच्या भरपूर फायदा असामाजिक तत्त्वे घेत आहेत. ७२९ किमी लांबीच्या या सीमेची दिव्य मराठीच्या चार चमूंनी पाच दिवस संपूर्ण पडताळणी केली. चमूंना असे आढळले की, सीमेवर तस्करीने व्यवसायाचे रूप धारण केले आहे. अमली पदार्थ, जनावरे, शस्त्रास्त्रे आणि मानव तस्करीसाठी ही खुली सीमा धोकादायक झाली आहे. तस्करीच्या यादीत बिहारमध्ये दारूबंदीनंतर दारू आणि पंधरवड्यापासून डिझेल-पेट्रोल या नव्या वस्तू आहेत. सीमा सुरक्षा दलाजवळ (एसएसबी) रायफल, दुर्बीण आणि नाइट व्हिजन डिव्हाइसशिवाय काहीही नाही. दुचाकी तर सोडा, सायकलही नाही. चर्चेत एसएसबीचे अधिकारी मान्य करतात की, सद्य:स्थितीत सीमा फुलप्रूफ बनवणे अशक्य आहे. दोन्ही देशांत रोटी-बेटीचे नाते आहे. सीमेवरील अनेक लोकांकडे दुहेरी नागरिकत्व आहे. लोकांची शेती दोन्ही बाजूंकडे आहे. बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्याच्या सुस्ता येथून वाल्मीकीनगरकडून रक्सौलपर्यंतच्या खुल्या नेपाळ सीमेचा १२० किमीचा रस्ता नदी-नाले, घनदाट जंगल आणि पहाडांतून जातो.
तेथे स्मगलिंग जोरात सुरू आहे. दिव्य मराठीच्या पाच दिवसांच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, जंगल तस्करीचे ग्रीन कॉरिडॉर बनले आहे. हजारो गुप्त मार्ग आणि पायवाटा आहेत. घनदाट जंगलात वाहनांच्या चाकांच्या खुणाही दिसतात. या भागात गंडक नदीच दोन्ही देशांची सीमा आहे. नदीमार्गे दररोज तस्कर सुस्ता येथून भारतीय सीमेत घुसतात. सुस्ता गावाची सीमा ओलांडण्याची परवानगी आपले पोलिस आणि एसएसबीला नाही.
आणि सीमाही कशी आहे? फक्त एक-दोन फूट इंच कुंपण आहे. ते रहुआटोला (भारत) आणि सुस्ताच्या लोकांनी परस्पर सहमतीने बनवले आहे. गंडक नदीचा मार्ग जनावरांच्या तस्करीसाठी वापरला जातो. भारताच्या बाजूने नदीकिनारी असलेल्या गावांच्या मदतीने तस्करांनी काही म्हशींना असे प्रशिक्षित केले आहे की, त्या चरता-चरता इतर जनावरांना नदीच्या पलीकडे घेऊन जातात.
या प्रशिक्षित म्हशींची ओळख म्हणजे त्यांच्या गळ्यात बांधलेली घंटा. तस्करांच्या जगात त्यांना टीम लीडर म्हटले जाते. नदी तीरावर चालताना आमचा सामनाही तस्करांशी झाला. ते नेपाळहून येत होते, पण सोबत चालत असलेले एसएसबीचे गस्त पथक पाहून त्यांनी पुन्हा नेपाळच्या बाजूला पळ काढला. सुस्तातील अनेक लोकांकडे भारत आणि नेपाळे या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. सुस्ताच नाही तर किशनगंजच्या गलगलिया सीमेवरील भद्रपूरपर्यंतच्या (नेपाळ) अनेक लोकांकडे दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे.
सीमेवर चालतो व्याजाचा बाजार, रक्सौलमध्येच ८० केंद्रे
रक्सौल कस्टम कार्यालयासमोरून रेल्वे गुमटीच्या पलीकडे मनी एक्स्चेंजचे स्टॉल रांगेत आहेत. स्टॉलवर ५००, २००, १००, ५०, १० रु. च्या नव्या नोटांची गड्डी ठेवली होती. आम्हाला नेपाळमधून परतलेले भारतीय समजून मनी एक्सचेंजरने नोट बदलण्यासाठी बोलावले. कॅमेऱ्याचा फ्लॅश चमकला तेव्हा सर्व स्टॉल बंद करू लागले. असे समजले की, सर्व अवैधरीत्या येथे मनी एक्स्चेंजचे काम करतात. १०० रुपयांसाठी ४ रुपये कमिशन घेतात. नियमानुसार नेपाळच्या वीरगंजमधील नेपाळ राष्ट्र बँकेतच नोटा बदलल्या जातात. पण तेथे ५००० पेक्षा जास्त भारतीय चलन दिले जात नाही. मनी एक्स्चेंजच्या स्टॉलवर तशी मर्यादा नाही. नेपाळ राष्ट्र बँकेत १६० रु. ची नेपाळी नोट दिल्यानंतर १०० रु. ची भारतीय नोट मिळते. रक्सौलमध्ये अवैधपणे उघडलेल्या सेंटरवर १६४ रु. ची नेपाळी नोट दिल्यावर १०० रु.ची भारतीय नोट दिली जाते. येथे अशी ८० केंद्रे आहेत.
मानवी तस्करीचा नवा मार्ग, या वर्षी अशा २३ घटना
खुटौना विभागाची लौकहा पंचायत भारत-नेपाळ सीमेजवळच आहे. अधिकृत मार्गाने येथे भारतातून सफरचंद, द्राक्षे, धान जाते. थोड्याच अंतरावर भुतही बलान नदी आहे. सध्या तिला पाणी नाही. हा नेपाळ आणि भारतादरम्यानचा नवा मार्ग आहे. आठवडाभराआधी नेपाळहून भारतात आणलेल्या सहा मुलींना एसएसबीने नदी भागात पकडले. लौकहापासून सहा महिन्यांपूर्वी दिल्लीसाठी बससेवा सुरू झाल्यानंतर तस्करी वाढली आहे. सध्या नेपाळहून जास्त मानवी तस्करी सीमा भागातील भारतीय गावांतून इतर शहरांत होते. ती रोखण्यासाठी एसएसबीने सोनबरसा, पूर्व चंपारण, सीतामढी, मधुबनी आणि जोगबनीत जागृती बस सुरू केली आहे. २०१८ मध्ये येथे मानवी तस्करीच्या २३ घटना समोर आल्या.

नेपालमधून स्वस्त पेट्रोल आणून भारतात करतात विक्री
नरकटियागंजच्या जवळ सीमेवर गावागावांत पेट्रोलची दुकाने आहेत. नेपाळहून पेट्रोल येते. तेथे पेट्रोलचा दर ६७.५० रुपये आहे आणि डिझेल ५५ रुपये लिटर. गम्हरिया गावातील पेट्रोल पंपचालकाने सांगितले की, गावातील बहुतांश लोक नेपाळ सीमेत जाऊन पेट्रोल भरतात. माझ्याकडे येथे १२,५०० लिटरच्या टाकीतील पेट्रोल २०-१५ दिवसांत विकते. कधी-कधी दीड महिनाही लागतो. गावातील अनेक लोक दिवसभर नेपाळच्या बाजूने पेट्रोल आणून विकतात. अशी अनेक दुकाने संपूर्ण सीमेवरील वस्त्यांत आहेत.

अशी होते कपड्यांची तस्करी
रक्सौलमध्ये रेल्वेमार्ग ओलांडल्यानंतर सिसवा नदीवर पूल आहे. पुलाच्या दुसरीकडे नेपाळ सीमेच्या नो मॅन्स लँडवर काही महिला गटागटांत दिसतात. महिलांनी आपल्या शरीराच्या चारही बाजूंनी कपड्याचे गठ्ठे बांधले होते. या सर्व जणी साडी, सलवार-सूटचे कापड नेपाळच्या वीरगंज बाजारात नेत आहेत, असे समजले. गठ्ठे उघडण्यास सुरुवात केली तेव्हा त्या शिव्या देऊ लागल्या. म्हणाल्या-तीन सेट कपड्याने काय होणार? येथे तर कोट्यवधींची हेराफेरी होत आहे.
८ सेट कापडाचे गठ्ठे सोडवण्यासाठी १० हजार मागत आहात? रक्सौलमध्येच एका महिलेला आणले होते. तिला सिकटात ४ किलो चरससोबत पकडण्यात आले होते. तिने हे चरस नेपाळमधून कमरेला बांधून आणले होते. सिकटा येथून बेतियाला जाणाऱ्या बसमध्ये ती बसली होती. तेव्हाच गुप्त माहितीच्या आधारे एसएसबीने तिला पकडले आणि रक्सौलला पाठवले. तिथे एसएसबीची महिला शाखा आहे.

सीमेवर दारूची तस्करी जोरदार सुरू
रक्सौल ब्लॉकच्या महदेवा गावात एसएसबीची छावणी आहे. एका जवानाने दारू तस्करीच्या नव्या पद्धतीविषयी सांगितले. मुसहरवा सीमेच्या नो मॅन्स लँडवर दोन्ही देशांतर्फे प्राथमिक शाळा आहेत. चहाच्या दुकानात तस्करांचे सिंडिकेट एक मोठी डील करत होते. या सीमा मार्गाने भारतातून नेपाळला ब्राऊन शुगर पोहोचवली जाते, असे सांगण्यात आले. नो मॅन्स लँडवर नेपाळच्या बाजूने असलेल्या झोपड्यांत दारूचे अड्डे होते.
आदापूर ब्लॉकच्या बेलदरवा छावणीच्या पलीकडे नीलकंठवा गाव आहे. नो मॅन्स लँडवरील एका खासगी भारतीय शाळेत नेपाळची अनेक मुले शिकतात. मुरतिया सीमेवरून जनावरांची तस्करी बेधडक सुरू आहे. कोरैया सीमेच्या पलीकडेही कोरैया गाव आहे. कोरैया आणि चंद्रमन सीमेवर तस्कर दारू आणि खत यांचे आदान-प्रदान करताना दिसले.

जनावरांच्या तस्करीसाठी लाई खोखर बदनाम
सीमेत लाई खोखर नावाचे गाव आहे. जनावरांच्या तस्करीसाठी ते कुख्यात आहे. तेथे एसएसबीचे जवान आणि ग्रामस्थ यांच्यात अनेकदा संघर्षही झाला आहे. एकदा तर ग्रामस्थांनी जवानांना ढकलून देत नेपाळच्या सीमेत पोहोचवले होते. जवान कसे तरी जीव वाचवून तेथून पळून आले. तेथे शस्त्रांसह सीमा ओलांडण्यास मनाई आहे.

प्रणाम सर हाही एक कोड वर्ड
सीमेवरील मुलांना असे प्रशिक्षण दिले की, एसएसबीच्या जवानांना पाहताच ते प्रणाम सरअसे म्हणतात. आम्ही एसएसबीच्या एका अधिकाऱ्याला म्हटले की, गावांतील मुले तुमच्याकडे आदराने पाहतात. तेव्हा तो अधिकारी म्हणाला की, हा आदर नाही. एसएसबी गस्त घालत आहे असा अवैध व्यापारात सामील लोकांसाठी दक्षतेचा इशारा आहे.


बांगलादेशात ‘ड्रग्ज लॉर्ड’चा प्रशासनाने गळा आवळत तब्बल १०० ड्रग्जमाफियांना यमसदनी धाडले- तुषार ओव्हाळ-महा एमटीबी 30-May-2018

बांगलादेश मेक्सिकोच्या मार्गावर?

बांगलादेशात ‘ड्रग्ज लॉर्ड’चा प्रशासनाने गळा आवळत तब्बल १०० ड्रग्जमाफियांना यमसदनी धाडले आहे. फिलिपाईन्समध्येही जेव्हा हे ‘ड्रग्ज लॉर्ड’ डोईजड झाले, तेव्हा तिथल्या प्रशासनाने ड्रगमाफियांविरोधात मोर्चा उघडत त्यांना कंठस्नान घातले.
मेक्सिको हा अमेरिकेचा शेजारी. पाब्लो एस्कोबार हा तिथला कुविख्यात ड्रगमाफिया. त्याने मेक्सिकोमध्ये ड्रग्जचा व्यवसाय इतका विस्तारला की ड्रग्जच्या विक्रीत मेक्सिको आघाडीचा देश... संपूर्ण देशाची व्यवस्था भ्रष्टाचाराने माखून एस्कोबार हे कार्य करत होता. हे ड्रग्ज मोठ्या प्रमाणात अमेरिकेत बेकायदेशीररित्या दाखल झाल्याने तेथील ‘ड्रग्ज एन्फोर्समेंट’ने या माफिया आणि त्याच्या ड्रग्जच्या जाळ्यावरोधात आघाडी उघडली आणि माफियाराजचा खात्मा केला. या सगळ्यात मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे, बांगलादेशही मेक्सिकोच्या मार्गावर चालला आहे की काय, अशी शंका यावी अशी घटना घडली आहे. नुकतंच बांगलादेशात ‘ड्रग्ज लॉर्ड’चा प्रशासनाने गळा आवळत तब्बल १०० ड्रग्जमाफियांना यमसदनी धाडले आहे. फिलिपाईन्समध्येही जेव्हा हे ‘ड्रग्ज लॉर्ड’ डोईजड झाले, तेव्हा तिथल्या प्रशासनाने ड्रगमाफियांविरोधात मोर्चा उघडत त्यांना कंठस्नान घातले. यामुळे फिलिपाईन्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गदारोळ झाला. मानवी हक्कासाठी लढणार्‍यांनी याविरोधात मोठा आवाज उठवला. पणफिलिपाईन्सच्या प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत आपली कारवाई चालूच ठेवली. आता ड्रग्जमाफियांविरोधात तशीच कडक कारवाई बांगलादेशात होईल काअशी शंका आता वर्तविण्यात येत आहे.
बांगलादेशची अर्थव्यवस्था ही जगातील ४४ या क्रमांकावरची. विकसनशील देशांच्या वर्गात मोडणार्‍या या देशात प्रामुख्याने रेडिमेड कपडे आणि शेती ही संपत्तीनिर्मितीची प्रमुख माध्यमं. तसेचपरकीय मदतीवरही या देशाचा कारभार तितकाच अवलंबून आहे. बांगलादेशात देहविक्रीला शासनाची मान्यताही आहे. त्यामुळे या गोष्टींवरून बांगलादेशाची आर्थिक परिस्थिती किती वाईट आहेहे लक्षात येईल.
दि. १५ मे रोजी प्रशासनाने ड्रग्जमाफियांविरोधात आघाडी उडली आणि अवघ्या १४ -१५ दिवसांत १०० असे माफिया मृत्युमुखी पडल्याने स्थानिक माध्यमांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. या कारवाईदरम्यान बाराशे लोकांना अटक करण्यात आली. या सर्व घडामोडींवर तेथील प्रशासनाचे म्हणणे आहे कीपोलिसांच्या चकमकीत फार कमी जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना पोलिसांनी ठार केलेत्यांच्यावर किमान १० -१२ गुन्हे दाखल आहेत. तसेच घटनास्थळी त्या माफियांकडे बंदुकाही आढळून आल्या. पोलिसांनी विचारणा केली असतात्यांनी पहिल्यांदा गोळीबारास सुरुवात केली आणि या चकमकीत माफियांचा मृत्यू ओढवला. बहुसंख्य ‘ड्रग्ज लॉर्ड’ हे आपापसांतील संघर्षामुळेच मेले. त्यांच्या झालेल्या मतभेदामुळे अनेक गट आपापसांत भिडलेगोळीबार झाला आणि लोकांनी आपला जीव गमावला. बांगलादेश हा २०१६ पासून ड्रग्ज निर्मिती-विक्रीचे स्वर्ग असणारा मेक्सिको होतोय की कायहे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये तब्बल २ कोटी ९० लाख ‘मेथाफेटामाईन’ या ड्रग्जच्या गोळ्या प्रशासनाने जप्त केल्या. मागच्या वर्षी चार कोटी ड्रग्जच्या कॅप्सुल्स प्रशासनाने जप्त केल्या. पणएक माहिती पुढे समोर आली कीएकूण कॅप्सुल्सची संख्या ही २५ ते ३० कोटींच्या घरात होती. पणत्यापैकी फक्त चार कोटी कॅप्सुल्स हस्तगत करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे बांगलादेशमधील या ड्रग्जमाफियांविरोधांतील कारवाईला पंतप्रधान शेख हसीना यांचा पूर्ण पाठिंबा असून या कारवाया अशाच पुढे चालू ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच ड्रग्जमाफियांनाही त्यांनी खडसावून असून ही कारवाई अधिकाधिक तीव्र करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांत बांगलादेशमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. कारणकाही महिन्यांपूर्वी आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांनी मोठी निदर्शने केली होती. यावेळी हिंसाचारही उफाळून आला होता. शेवटी जनमताचा कल पाहतापंतप्रधानांना आरक्षण मागे घ्यावे लागले. आता या ड्रग्जमाफियांविरोधात आघाडी उघडल्याने काही निष्पाप नागरिकांचाही त्यामध्ये बळी गेल्याचे वृत्त आहे. तेव्हा ओल्याबरोबर सुकेही जळते हा इतिहास आहे. यावर एकच मार्ग म्हणजे, रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण. कारण, जेव्हा लोकांच्या हाती काम नसतं, पोटाला अन्न नसतं, तेव्हा नाईलाजाने लोक वाममार्गाकडे वळतात. म्हणूनच, तरुणांना चांगल्या शैक्षणिक सुविधा आणि उद्योजकतेला प्रोत्साहन दिल्यास ड्रग्जसारख्या नशेच्या व्यवसायावर पायबंद बसेल

Wednesday, 21 February 2018

गुडगुड’ करून आरोग्याचा नाश नको रे बाबा!-February 20, 2018 | 8:10 am-डॉ. संजय गायकवाड


पाश्‍चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात आणि आनंदाच्या भ्रामक संकल्पनांची भुरळ पडल्यामुळे आजच्या तरुणपिढीमध्ये व्यसनाधिनता वाढत चालली आहे. सिगारेट, दारु यांबरोबरच नव्या पिढीत हुक्‍का कल्चर फोफावत चालले आहे. कमला मिल येथे घडलेले अग्निकांड हुक्‍यातील ठिणगीमुळे घडल्याचे समोर आले आहे. आज शहरा-महानगरांबरोबरच गावांमध्येही हुक्‍क्‍याची गुडगुड तरुणांबरोबरच तरुणींनाही आपल्या कह्यात घेत आहे.
नवी दिल्लीला वाढत्या प्रदूषणामुळे स्मॉगसारख्या संकटाला सामोरे जावे लागत असताना मुंबई आणि राज्यातील अनेक शहरांना मात्र वेगळ्याच धुराने ग्रासले आहे. हा धूर एखाद्या विटभट्टी किंवा कारखान्यातील नसून तो हुक्‍काबारमध्ये धुंद होणाऱ्या हजारो तरुणांच्या तोंडातून बाहेर पडणारा आहे. कमला मिल कम्पाऊंडमधील एका पबमधील हुक्काबारच्या ठिणगीने वणवा पेटला आणि अग्नितांडवाने काही जणांचा बळी घेतला. ही ठिणगी बदलत्या समाजाचे भयानक चित्र उभी करणारी आहे. या ठिणगीवर वेळीच पाणी मारणे गरजेचे आहे; कारण ती या देशाच्या आधारस्तंभांना आपल्या कह्यात घेत आहे.
गेल्या काही वर्षात पाहिलं तर व्यसनाकडे वळण्याचा सरासरी वयोगट कमी होत चालला आहे असे दिसते. आजमितीला 18 वर्षांखालील मुलांमध्येही व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात आहे. साहजिकच, या सर्वांमागची कारणे काय असा प्रश्‍न उपस्थित केला जातो. अशा प्रकारे पार्टीकल्चर, व्यसनाधिनता वाढण्याला अनेक कारणे आहेत. यातील पहिले कारण म्हणजे अलीकडील काळात पार्टी करण्याला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यातच मग एकत्र जमून सेलीब्रेशन करताना अंमली पदार्थ घेतल्याशिवाय एंजॉय करताच येत नाही असा एक भ्रामक आणि चुकीचा समज बळावत चालला आहे. त्यामुळे हे प्रकार वाढत आहेत.
दम मारोदमअसे म्हणत अंमली पदार्थाचे सेवन करणारी चित्रपटातील नायक-नायिका जेव्हा बेधुंद होऊन नाचते तेव्हा ते भारतातील तरुणपिढीमध्ये पसरत चाललेल्या व्यसनाधिनतेचे निदर्शक असते. हरे रामा हरे कृष्णा.. या चित्रपटाला चार दशकाहून अधिक काळ लोटला आहे. त्यावेळी त्या व्यसनाने भारतात बाळसे धरले होते. आता त्याची व्याप्ती महाकाय बनली आहे. अंमलीपदार्थाबराबेरच गुडगुड..आवाज करत धूर काढणारी तरुणाई ही हुक्‍क्‍चा आहारी गेलेली दिसून येत आहे. हुक्का पार्लरच्या नावाखाली नव्या पिढीला व्यसनांध करणारा व्यवसाय आता केवळ मुंबई, पुण्यापुरतीच मर्यादित राहिला नाही तर ग्रामीण भागातही पोहचू लागला आहे. उदाहरणच घ्यायचे असेल तर सांगलीतील विश्रामबाग अणि मिरजेतील महाविद्यालयीन परिसरात अशा प्रकारचे पार्लर सुरू असल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या.
नशा, थ्रील, मजा, धिंगाणा, मस्ती या भोवती घुटमळत असताना तरुण व्यसनाच्या आहारी कधी जातात, हे कळतही नाही.
हुक्‍क्‍याची नशा म्हणजे सुगंधी तंबाखू ओढण्याचाच प्रकार असल्याचे सांगितले जाते. उत्तरेकडील अगदी काश्‍मीरपर्यंत खेडोपाडी अशा प्रकारचा हुक्का ओढला जातो. जुन्या बहुतांशी चित्रपटात हुक्का ओढणारा खलनायक किंवा बुजूर्ग मंडळी आपण पाहिली असेल. देवदाससारख्या चित्रपटात ऐश्‍वर्याचा पती हुक्‍का ठाकुरों की शान हैअसे म्हणताना दिसला होता. अशा प्रकारचे उदात्तीकरण सिनेमासारख्या माध्यमातून केले गेल्यामुळे हुक्‍क्‍याविषयीचे आकर्षण वाढत गेले. आज काळानुरुप यामध्ये स्ट्राबेरी, बनाना, पायनापल अशा विविध फ्लेवर उपलब्ध झाले आहेत. शंभर ते पाचशे रुपयात तासभर नशापाणी केले जाते. दर्जानुसार त्याचे दर निश्‍चित केले जातात. या सुंगधी तंबाखूबरोबरच गांजा किंवा अंमली पदार्थाचे सेवनही केले जाते. एकूणच ही हुक्‍का पार्लर म्हणजे नव्या पिढीला बरबाद करणारी केंद्रे ठरत आहे.
पूर्वीच्या काळी शहरातील व्हिडिओ पार्लरमध्ये जमणारी तरुणाई आता या हुक्कापार्लरमध्येही दिसू लागली आहे.
काही वर्षांपूर्वी जेथे स्मोकिंग झोन होता, त्या हॉटेल्समध्ये हुक्का ठेवण्यास अडचण नाही, अशी न्यायालयाने संमती दिली होती. त्यानंतर हुक्काबारने डोके वर काढले. हुक्‍क्‍यावर बंदी आली असली तरी हुक्का ज्या पेनमधून मिळतो, त्या पेन्सची चलती विद्यार्थ्यांत वाढली आहे. अवघ्या शंभर रुपयात मिळणारी अशी शेकडो पेन्स ही व्यसनमुक्तीच्या विरोधात काम करणाऱ्या संस्थांनी ताब्यात घेतली आहेत. एक ग्रॅम कोकेन 3000 रुपयाला असताना व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना 150 ते 200 रुपयांना मिळणारे एमडी आणि तासाच्या हिशेबाने तीनशे ते पाचशे रुपयांना मिळणारा हुक्का अधिक स्वस्त वाटू लागला. जागा मिळाली नाही तर भाड्याने राहणाऱ्या मित्रांच्या घरीही हुक्का पार्ट्यांचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे.
आरोग्याचा धूर
हुक्‍क्‍याचा एक कश हा शंभर सिगारेट ओढल्याइतका घातक असतो. हुक्‍क्‍याचे पॅसिव्ह स्पोकिंगही तितकेच भयानक असते. हुक्‍क्‍यात असलेल्या कोळशामुळे कार्बन मोनोऑक्‍साईडसह अनेक घातक वायू तयार होतात आणि त्याचा आरोग्यावर दुष्पपरिणाम होतो. ग्रामीण आणि शहरी भागातील कर्करोगाचे वाढते रुग्ण पाहिल्यास त्यांमध्ये हुक्‍क्‍याचे व्यसन असणारे हमखास आढळतात. अर्धा ते पाऊणतास सतत हुक्का ओढत राहिल्यास शरिरातील निकोटीनचे प्रमाण 200 टक्‍क्‍यांहून अधिक वाढते. कर्करोगाचा विळखा जेवढा तंबाखू आणि सिगारेटमुळे आवळत जातो, तितकाच तो हुक्‍क्‍यामुळेही आवळू शकतो. हुक्‍क्‍यातील व्यसन हे 18 ते 24 या वयोगटात अधिक आहे. यामध्ये तरुणांइतकेच तरुणींचे प्रमाणही अधिक आहे. अशा प्रकारच्या घटना समोर आल्या की पोलिस यंत्रणा काय करते असा प्रश्‍न विचारला जातो.
व्यसनांबाबतचे कायदे असूनही, व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढते आहे, याचा अर्थ एक तर कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही असा शेरा मारला जातो. परंतु एकट्या पोलिसांना दोष देऊन आपल्याला जबाबदारीतून मोकळे होता येणार नाही वा हात झटकता येणार नाही. व्यसनमुक्‍त समाजाची निर्मिती करणे ही या समाजातील प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. यामध्ये अधिक जबाबदारी आहे ती पालकांची. आज जीवनशैलीत बराच बदल झाला आहे. आधुनिकतेचे वारे वाहत आहे. पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभावही वाढत आहे. परंतु त्याच वेळी आई-वडील आणि मुले यांच्यातील संवाद दुर्मिळ होत चालला आहे. आपली मुले काय करतात, ती कोणाच्या संगतीत आहेत याची बहुतांश पालकांना कल्पना नसते. ते फक्त मुलांना लागेल तसा पॉकेटमनी पुरवतात. परंतु पालकांनी आपल्या मुलांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांबाबतची जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे.
पालकांप्रमाणेच शिक्षकांची जबाबदारीही यामध्ये मोठी आहे. आपल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे, त्यांना व्यसनांकडे न वळण्याबाबतचे शिक्षण देणे ही जबाबदारी शिक्षकांनी पार पाडायला हवी. मीडियाचीही जबाबदारी यामध्ये मोठी आहे. व्यसनमुक्‍तीसाठी प्रबोधन करण्यामध्ये त्यांनीही अधिक प्रमाणात सहभागी व्हायला हवे. एकूणच, मुलांना व्यसनांपासून रोखण्यासाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करायला हवेत


Saturday, 21 October 2017

ड्रग्जविरोधी बुलंद आवाज हीच काळाची गरज October 18, 2017 iसुशांत द. तांडेल


याच बक्कळ धनाच्या उन्मादाने निर्माण होत असलेल्या देशी-विदेशी दुर्योधनांना वेळीच लगाम घालणे ही काळाची गरज आहे. या दुष्ट दुर्योधनांच्या मोहजाळ्यात अडकलेल्या सामान्यांना मात्र आवरण्या व सावरण्यासाठी पुरेशी संधी देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
निसर्गाचा वरदहस्त लाभल्याने देशी-विदेशी पर्यटकांना अगदी मोहवून टाकणारे आपल्या चिमुकल्या गोव्याचे नयनरम्य समुद्रकिनारे व त्यामुळेच जगभर सुपरिचित झालेले येथील किनारी पर्यटनहे आज ड्रग्ज’(मादकपदार्थ) सारख्या अनेक गंभीर समस्यांच्या आगरात किंवा सागरात नव्हे तर चक्क महासागरात बुडत चालल्याची चर्चा समस्त गोमंतकियांना अगदी नित्याचीच झालेली आहे. परिणामस्वरुप – ‘किनारी पर्यटनः शाप की वरदान?’ हा एवढी वर्षे चर्चिला जाणारा विषय आज अगदीच नगण्य वाटून त्याऐवजी किनारी पर्यटनः शाप की महाशाप?’ हाच गहन चर्चेला परिस्थितीनुरुप योग्य विषय ठरल्यास नवल नाही.
ड्रग्जच्या विषयावर खुलेपणाने लिहिणे किंवा बोलणे हे आज आपल्या गोव्यात मुंगीला मेेरूपर्वत ओलांडणे किंवा माशीला सागर तरून जाणे जेवढे अवघड आहे तेवढेच अवघड बनले असल्याचा स्पष्ट संदेश सध्याची परिस्थिती व चहुबाजूचे वातावरण देते आहे. परिणामी, या अत्यंत गंभीर व दूरगामी परिणाम करू शकणार्‍या विषयावर सबळ पुराव्याविना स्पष्ट बोलणे तर सोडाच, पण साधा ब्रसुद्धा काढणे आजच्या परिस्थितीत कठीण झाले आहे. पण लाट कितीही लहान असली, तरी ती जशी सागराशिवाय एकटी येऊच शकत नाही किंवा धूर कितीही कमी असू दे, खाली आग असल्याशिवाय तो येऊच शकत नाही, तशीच परिस्थिती या ड्रग्ज संदर्भात बनली आहे.
वास्तविक पिढ्यानपिढ्या आपण सर्वजण ऐकत आलेला सुपरिचित वाक्‌प्रचार,‘वाळूचे कण रगडिता तेलही गळेहा आज अगदीच गचाळ वाटू लागल्यास नवल ते काय?.. कारण, चहुबाजूंनी आज चर्चिला जाणारा ड्रग्जचा विषय लक्षात घेता,‘‘वाळूचे कण चाळिता, ‘ड्रग्जही ड्रग्जमिळेहाच वाक्प्रचार येणार्‍या काळात सुपरिचित होण्याची भीती आज निर्माण झाली आहे.
बैल विकून गोठा बांधणार्‍याला किंवा पांघरुण जाळून त्या जाळाशी शेकत बसणार्‍याला सत्याची तोंडओळख करून देणार तरी कोण? व कशी? कारण आपण जे करीत आहोत ते चांगले की वाईट हे लक्षात येण्याएवढी देवाची बौद्धिक कृपाही त्याच्यावर नसावी तर मग आकाशच फाटल्यावर ठिगळ कुठे-कुठे लावणार?
सध्या तरी शासनाबरोबर संबंधित सामान्यजनांनाही बक्कळ धनप्राप्ती करून देणार्‍या या सरकारी अधिमान्यताप्राप्त किनारी पर्यटन क्षेत्राच्या ड्रग्जसारख्या दुष्परिणामांनाही सामोरे गेल्याशिवाय दोन्ही बाजूंना गत्यंतरच दिसत नाही. हे पर्यटन क्षेत्र जिवंत राहणे, किंबहुना भरभराटीला येणे हे दोघांच्याही हिताचेच नव्हे तर अत्यंत गरजेचेही आहे, यात तीळमात्र शंका नाही. पण याच बक्कळ धनाच्या उन्मादाने निर्माण होत असलेल्या देशी-विदेशी दुर्योधनांना वेळीच लगाम घालणे ही काळाची गरज आहे. असे करताना या दुष्ट दुर्योधनांच्या मोहजाळ्यात अडकलेल्या सामान्यांना मात्र आवरण्या व सावरण्यासाठी पुरेशी संधी देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
वस्तुस्थिती पाहता या पर्यटनावर उदरनिर्वाह करणार्‍या गोमंतकीयांची संख्याही काही कमी नाही आहे. कष्ट कुठे नाहीत? या क्षेत्रातही ते लागतातच. पण, पारंपरिक धंदा-व्यवसाय किंवा साधारण नोकरीच्या तुलनेत इथल्या कष्टाचा मोबदला मात्र जास्त आकर्षक असणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच या व्यवसायाविषयीे पराकोटीचे आकर्षण असणे क्रमप्राप्तच आहे. या चकाकत्या आकर्षणाला बळी पडणार्‍या सामान्य गोमंतकीयांमधील तुटपुंजे शिक्षण घेतलेल्या, शिक्षणात संस्कारक्षम मूल्यांपेक्षा दिले जाणारे निरर्थक आदर्शही कारणीभूत नाहीत ना?
किनारी पर्यटनाशी निगडित व्यावसायिकांच्या जीवनमानात गेल्या आठ-दहा वर्षांच्या अल्प कार्यकालात झपाट्याने होत आलेले आमूलाग्र बदल सर्वत्र चर्चेचा विषय होणे स्वाभाविकच आहे. पण त्याचबरोबर विदेशींचा हैदोस, रात्री अपरात्री चालणारा, वाजणारा, कर्णकर्कष, कानठळ्या बसविणारा आवाज, ‘अतिथी देवो भवःम्हणत विविध सेवेत घालविलेल्या सलग व सतत पाच-सहा महिन्यांच्या रात्रीच्या जागरणांमुळे शारीरिक व्याधींचा ससेमिरा, व जणू एकावर एक फ्रीम्हणून प्राप्त झालेला मानसिक क्लेश, ज्यात दिवसाढवळ्या, घरा-दारासमोर मुलांबाळांसमोर घडत असतानाही अगदी उघड्या डोळ्यांनी पाहूनही दुर्लक्ष केल्याशिवाय गत्यंतर नसलेली विदेशी विकृतीपरिणामस्वरुप युवा पिढी हाताबाहेरच नव्हे तर अगदी अवाक्याबाहेर गेली आहे, या अशा विनाशकारी, क्लेशदायक घटनांचाही सविस्तर अभ्यास होणे व त्यावर सर्वंकष चर्चा होणे आवश्यक आहे.
या किनारी पर्यटनांतून मिळणार्‍या बक्कळ लक्ष्मीकडे महसूल किंवा उत्पन्न म्हणून पाहणार्‍यांना या पर्यटनाची ही दुसरी अघोरी बाजूही नक्कीच माहीत असणार, पण तरीही अगदी जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण तसे करणे हे विस्तवाशीच नव्हे तर चक्क अग्नितांडवाशी खेळ करण्यासारखे आहे.
वाहत्या पाण्याला वाटेत खाचखळगे लागले तर ते सर्व भरून काढल्याशिवाय ते पाणी पाऊलही पुढे घालत नाही तशीच परिस्थिती आज किनारपट्टीवरून हातपाय पसरत असलेल्या पर्यटनाच्या दुष्परिणामांची तर होणार नाही ना? याचा विचारही आजच गांभीर्याने होणे गरजेचे नव्हे तर अत्यंत निकडीचे आहे. पण दुर्दैवाने लक्ष्मीपुढे पाप पुण्याचा विचारही अविचार ठरावा याच्यासारखी शोकांतिका नाही.
धनरुपी मोहात आकंठ बुडालेल्या व ड्रग्ज सारख्या विनाशकारी परिणामाकडे डोळेझाक करणार्‍यांना जागे करण्याची वेळ आलेली आहे. ड्रग्जही केवळ सरकारपुढील समस्या नसून इथल्या प्रत्येकाचीच समस्या आहे आणि तिचे उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक सर्वसमान्यानेही पेटून उठले पाहिजे. संबंधित सरकारी यंत्रणेला केवळ सहकार्यच नव्हे तर स्वतः बोलावून कामाला लावले पाहिजे.
खालच्या मजव्यावर आग लागली म्हणून तिथल्या लोकांना दोष देत वरच्या मजल्यावर निवांत झोपणार्‍यांनाही त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. काळ सोकावत आहे. आज काही जण जात्यात आहेत आणि काही जण सुपात. त्यामुळे सुपात असलेल्यांना जात्यात भरडल्या गेलेल्यांविषयी कणव दिसत नाही, परंतु त्यांचीही गत जात्यातल्याप्रमाणे होण्यास वेळ लागणार नाही.
त्यामुळे वेळ न दवडता प्रत्येक सुज्ञ गोमंतकीयाने ड्रग्जविरोधी जनजागृतीचा विडा उचललाच पाहिजे. इथल्या प्रत्येक स्वयंसेवी संघटनेने या जनजागृतीत सर्वशक्तीनिशी उतरून ती जनचळवळ केल्यास मायबाप सरकारलाही ड्रग्जमुक्त गोवा करणे अशक्य अजिबात होणार नाही. गरज आहे ती केवळ आणि केवळ बुलंद आवाजाची