Total Pageviews

Wednesday 31 August 2011

DANGERS PEST CONTROL

काही महिन्यांपूर्वीची घटना आहे. पुण्यातील एक कुटुंब मोटारीने नाशिकला गेले. माघारी परतत असताना एका हॉटेलमध्ये काहीतरी खाल्ले. घरी आल्यानंतर सर्वानाच त्रास सुरू झाला. संपूर्ण कुटुंब अत्यवस्थ झाले, त्यापैकी एका लहान मुलीचा अंत झाला. हॉटेलमध्ये खाल्लेल्या पदार्थामुळे विषबाधा झाला असावा, असे प्राथमिक कारण सांगण्यात आले. पण काही दिवसांनी असे स्पष्ट झाले, की हा सारा पेस्ट कंट्रोलचा प्रताप होता. घरातील झुरळे, ढेकूण यांसारखे कीटक मारण्यासाठी केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे हे घडले होते. पेस्ट कंट्रोल केल्याने घर पूर्ण बंद ठेवावे लागले. त्यामुळेच हे कुटुंब नाशिकला गेले. माघारी आल्यावर कीटकनाशकांचे विषारी वायू बाहेर पडण्याची पुरेशी काळजी न घेताच ते घरात गेले. हेच त्यांच्यावर बेतले.. दुसऱ्या एका घटनेत एका फ्लॅटमध्ये पेस्ट कंट्रोल केल्यावर ते कुटुंब इतरत्र निघून गेले. पण त्यांच्या घरातून घातक वायू बाहेर पडले. अनेकांनी आग लागल्याचे समजून अग्निशामक दलाला पाचारण केले.. या घटनांची आठवण होण्याचे कारण असे की गेल्याच आठवडय़ात पुण्यात अशा प्रकारे पेस्ट कंट्रोलमुळे जुळ्या महिलांचा मृत्यू झाला. एकटय़ा पुण्यात काही महिन्यांमध्ये घडलेल्या या घटना! या प्रातिनिधिक आहेत, इतर भागातही त्या घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत.
पेस्ट कंट्रोल करणारे अशा प्रकारे कीटकनाशके फवारून निघून जातात. एक-दोन दिवसांसाठी घर बंद ठेवावे लागते. त्या काळात घरातील झुरळे, ढेकूण, कोळी, डास असे कीटक मेल्यानंतर मग माणसांनी प्रवेश करायचा असतो, पण त्यासाठी विशिष्ट काळजी घ्यावीच लागते. हे घातक वायू पूर्णपणे बाहेर पडू द्यावे लागतात. या फवारणीचा ठेका घेणारे मोघमपणे काही गोष्टी सांगतात. त्यात असलेल्या धोक्यांची पुरेशी माहिती न दिल्याचे परिणाम मात्र रहिवाशांना भोगावे लागतात. त्यातून मृत्यू होत असल्याने हे परिणाम अधिकच गंभीर ठरत आहेत. आपल्याकडे नव्यानव्या गोष्ट येत असताना-मग ते तंत्रज्ञान असो वा आधुनिक सुखसोयी-त्या स्वीकारताना त्यासाठी आवश्यक असणारी शिस्त व खबरदारीसुद्धा आत्मसात करावी लागते. त्यात आपण कमी पडत असल्याचे अलीकडच्या उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे.
अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रभर, विशेषत: शहरी भागातच पेस्ट कंट्रोलची टूमच निघाली आहे. लहान शहरांमध्येसुद्धा जागोजागी पेस्ट कंट्रोलच्या जाहिराती झळकतात. यावरून त्यांच्या मार्केटची कल्पना येते. एकाच वेळी घरातील झुरळांपासून ढेकणांपर्यंत आणि कोळ्यांपासून पालींपर्यंत सर्वाचाच घातक रसायने वापरून खातमा करण्याचा हा उपाय! पण त्यासाठीची काळजी घेत नसल्याचे अनेक अपघात होत आहेत. सध्याच्या ‘स्वच्छते’च्या लाटेवर स्वार होऊन पेस्ट कंट्रोल करावे का, हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याचे आरोग्यासाठी व पर्यावरणासाठी गंभीर परिणाम होत असल्यानेच त्याचा सार्वजनिक विचार करावा लागतो. म्हणूनच आता पेस्ट कंट्रोलबाबत पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे.
पेस्ट कंट्रोलसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांसारखीच घातक रसायने शेतीतही फवारली जातात. त्यांचे दुष्परिणाम सर्वश्रुतच आहेत. त्यांच्यामुळे होणारे माती, पाणी व हवेच्या प्रदूषणांचे परिणाम बागायती शेतीच्या पट्टय़ात पाहायला मिळत आहेतच. पंजाबमधील काही भागांना कॅन्सर व शारीरिक व्यंगांसारख्या गंभीर आजारांनी कसा विळखा पडला आहे, हे आता उघड झालेले आहे. पेस्ट कंट्रोलच्या टूममुळे हा धोका आता आपल्या घरात येऊन पोहोचला आहे. आतापर्यंत घरात केवळ फरशी किंवा स्वच्छतागृहे साफ करण्यासाठी फिनेलसारखी रसायने वापरली जायची. पण आता एखादे झुरळ दिसले तरी अशी घातक (मग काहींना सुगंध येत असला तरी) रसायने वापरली जातात. या उद्योगात जगभर असलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीमुळे या घातक परिणामांबाबत खऱ्याचे खोटे व खोटय़ाचे खरे केले जात असल्याचे दिसते. त्यामुळेच इंटरनेटवर ‘पेस्ट कंट्रोलचे घातक परिणाम’ या माहितीचा शोध घेतला, तरी दिसणारी संकेतस्थळे ही कीटकांमुळे (झुरळ ते डास) होणाऱ्या घातक परिणामांबाबतच बोलतात. या उद्योगाकडून जगभरच (त्याला भारतही अपवाद नाही!) जाहिरातींचा प्रचंड भडिमार केला जात आहे. त्यांना भुलून मग आपल्याकडील गृहिणीसुद्धा घरात एखादे झुरळ दिसले की त्याच्यामागे कीटकनाशकांचा ‘स्प्रे’ घेऊन धावताना दिसतात. एकूणच आपला समाज विज्ञान आणि पर्यावरणाबाबत शिक्षित नाही. आता कुठे शालेय शिक्षणात पर्यावरणाचा समावेश झालेला आहे. तो शिकविण्याची सद्य:स्थिती पाहता याबाबत लगेच तरी जागरूकता येण्याची शक्यता नाही. त्यामुळेच घरात कोणती रसायने वापरली जावीत, याबाबत काही आचारसंहितेची नितांत आवश्यकता वाटते. हल्ली पेस्ट कंट्रोल करणाऱ्या संस्था/ कंपन्यांचे पेवच फुटले आहे, त्या आता गल्लोगल्ली दिसू लागल्या आहेत. त्या नेमके काय करतात, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाला पार पाडावी लागेलच. पण त्यासाठी प्रशासन पुरे पडणार नाही. आम्ही सर्व जण याबाबत किती जागरूक बनतो? किमान अलीकडे घडलेल्या दुर्घटनांच्या पाश्र्वभूमीवर तरी आपण जागे होणार का आणि पेस्ट कंट्रोल या गोष्टीकडे डोळसपणे पाहणार का? हा कळीचा मुद्दा आहे.

No comments:

Post a Comment