Total Pageviews

Tuesday, 23 August 2011

CRICKETERS BOTHERED ABOUT IPL RATHER THAN TEST CRICKET

पुरती बेअब्रू!गेले काही दिवस अण्णा हजारे यांच्या आंदोलनावरून अनेक एसएमएस फिरत आहेत. त्यातलाच एक असा होता की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंदसिंग ढोणी याने अण्णांना खास पत्र पाठवून त्यांचे आभार मानले. भारतीय संघाच्या खराब कामगिरीवरून अण्णांच्या उपोषणाकडे अवघ्या देशाचे लक्ष वळविल्याबद्दल! देशातील जनतेचे लक्ष अण्णांच्या आंदोलनाकडे लागले आहे हे खरेच आहे, परंतु भारतीय क्रिकेट संघाच्या दुरवस्थेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असे नाही. आपल्या संघाने इंग्लंडमध्ये पाऊल ठेवले ते जगज्जेते म्हणून आणि ते परत येताहेत तिसऱ्या स्थानावर गेल्यावर! इंग्लंडचा संघ सध्या फॉर्ममध्ये आहे आणि फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही बाबतींत तो आपल्या वरचढ होता हे मान्य करावेच लागेल. तरीही, इंग्लंडने आपल्याला हरविले असे म्हणणे जेवढे योग्य आहे तितकेच आपणच पराभूत मनोवस्थेने खेळलो, म्हणून पराभूत झालो, असेच म्हणावे लागेल. आपल्या खेळाडूंच्या खेळात काहीच जोश दिसत नव्हता. खेळाडू शारीरिक मानसिकदृष्ट्या थकलेले दिसत होते. अपवाद फक्त राहुल दविडचा. तो नसता तर काय झाले असते ही कल्पनाही करवत नाही. राहुलची तीन शतके सोडली तर एकाही भारतीयाला शतक झळकाविता आलेले नाही. त्याखालोखालच्या धावा म्हणजे सचिनच्या ९१ नंतर फिरकी गोलंदाज म्हणून संघात आलेल्या अमित मिश्राच्या ८४. सचिनसह बाकी सर्व फलंदाज या मालिकेत अयशस्वी ठरले. त्यामुळेच संपूर्ण मालिकेत भारताला तीनशेचा टप्पा एकदाच गाठता आला. नाही तर आपण २८८ या धावांच्या पलीकडे जाऊ शकलो नाही आणि भारतीय संघाला इतिहासात सातव्यांदा मालिकेतील सर्व सामने हरण्याची नामुष्की सोसावी लागली. 'आम्ही मालिका हरण्याचे कोणतेही एक ठोस कारण देऊ शकत नाही', असे ढोणी म्हणाला, ते खरेच आहे. कारण पराभवाची बरीच कारणे आहेत. हरभजनसिंग, श्रीसंतला सूर सापडला नाही. हरभजन, गंभीर, झहीर, सेहवाग आणि युवराज सिंग जखमी वा अनफिट खेळाडूंच्या यादीत जाऊन बसले. खेळपट्ट्या अथवा इंग्लिश हवामानाला दोष देण्याचे काहीच कारण नाही. शेवटच्या डावात अमित मिश्रा ज्या पद्धतीने खेळला किंवा त्याआधीच्या कसोटीत प्रवीणकुमारही ज्या सहजतेने फलंदाजी करत होता, ते पाहता आपल्या प्रमुख खेळाडूंना काहीच चमक दाखविता आली नाही असेच दिसते. राहुल बाद झाला की आपला संघ पत्त्याप्रमाणे कोसळत होता. आठही डावांत हेच दिसून आले. जे फलंदाजीत तेच गोलंदाजीतही. प्रवीणकुमारचे १५ बळी ही आपली सवोर्च्च कामगिरी. बाकीच्या सर्व गोलंदाजांना प्रत्येक बळीमागे सरासरी ६० धावांपेक्षा अधिक धावा मोजाव्या लागल्या. आकडेवारी नेहमीच खरे बोलते असे नाही, परंतु भारतीय खेळाडूंची आकडेवारी अगदीच दयनीय आणि म्हणूनच खूप बोलकी आहे. जखमी अथवा बऱ्याच प्रमाणात अनफिट असलेल्या खेळाडूंची संघात मुळात निवड कशी होते हा प्रश्न गंभीरपणे हाताळला गेला पाहिजे. केवळ खेळाडूचे नाव मोठे आहे म्हणून त्याला संघात घ्यायचे हे बरोबर नाही. अशा खेळाडूला संघात घेण्यामागे निवड समिती, कर्णधार, संघ व्यवस्थापन यांचे साटेलोटे असते काय हेही पाहिले गेले पाहिजे. या खेळाडूंना फिटनेस सटिर्फिकेट देणाऱ्याचीही चौकशी झाली पाहिजे. राहुल दविडने वनडेमधून निवृत्ती घेतलीच आहे. तो, सचिन आणि लक्ष्मण यांची कसोटी निवृत्ती फार लांब नाही. अशा वेळी दुसरी दमदार फळी उभारण्यासाठी आपल्या व्यवस्थापनाने काय केले? दुदैर्वाने याचे उत्तर 'काहीही नाही', असेच येते. भारतात सर्वात श्रीमंत असलेला हा खेळ अधिकाधिक 'व्यापारी' होत आहे. एक स्पर्धा संपल्यावर दुसरी लगेच सुरू होते आहे. खेळाडूंचे खिसे भरतात, परंतु शारीरिक मानसिक थकवा येतो त्याचे काय? स्पर्धा सतत होतात, पण खिसेही त्याच वेगाने भरतात, त्यामुळे कोणीच खेळाडू सहसा विरोध करत नाही. गोलंदाजीतही चित्र वेगळे नाही. इंग्लंड संघाला एका डावात बाद करू शकेल अशी गोलंदाजांची जोडी वा चौकडी आपल्याकडे नाही. या दौऱ्यात अजून एक दिवसीय सामने आणि एक ट्वेंटी२० सामना बाकी आहे. त्यासाठी संघही निवडला गेला आहे. त्यात आपण चांगली कामगिरी करू अशी केवळ आशा करू शकतो. खात्री वाटावी अशी परिस्थिती सध्या तरी नाही

No comments:

Post a Comment