Total Pageviews

Showing posts with label आव्हान-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे. Show all posts
Showing posts with label आव्हान-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे. Show all posts

Tuesday, 11 February 2020

उमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना धडा शिकवाच! दिनांक 11-Feb-2020

ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली (पीएसए) स्थानबद्ध करण्याच्या आपल्या निर्णयाचे जम्मू-काश्मीर प्रशासनाने समर्थन केले आहे. यासाठी जी कारणे देण्यात आली, ती पाहता कुणीही राष्ट्रभक्त नागरिक या दोघांच्या स्थानबद्धतेचे समर्थनच करेल.
जम्मू-काश्मिरातून कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून डॉ. फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना प्रतिबंधात्मक आदेशाखाली स्थानबद्ध केले होते. याची सहा महिन्यांची मुदत नुकतीच संपली. या तिघांना मुक्त केले तर जम्मू-काश्मिरातील कायदा आणि सुव्यवस्थेसोबत देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचू शकत होता. त्यामुळे यातील ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती या दोन माजी मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. या कायद्यानुसार स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीला आपल्या अटकेला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही, वकिलाचीही मदत घेता येत नाही तसेच या व्यक्तीला न्यायालयात उभे करणेही पोलिसांवर बंधनकारक नसते.
दहशतवाद्यांबाबत घेतलेली नरम भूमिका, विघटनवादी शक्तींसोबत काम केल्याचा आरोप तसेच 370 कलम रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर केलेली आक्षेपार्ह विधाने, या तीन प्रमुख कारणांमुळे मेहबुबा मुफ्ती यांना पीएसएखाली स्थानबद्ध करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर प्रशासनाला घ्यावा लागला. उमर अब्दुल्ला यांनाही पीएसएखाली स्थानबद्ध करण्यामागेही हीच कारणे आहेत.
मुळात डॉ. फारूक अब्दुला, त्यांचे पुत्र ओमर तसेच मेहबुबा मुफ्ती, या राज्याच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांची देशावरील निष्ठा ही नेहमीच संशयास्पद राहिली आहे. राहायचे, खायचे भारतात आणि गुण गायचे पाकिस्तानचे, अशा या तीन माजी मुख्यमंत्र्यांचे नेहमीच राजकारण राहिले आहे.
त्यामुळे त्यांच्यावर नेहमीच पाकिस्तानधार्जिणे असल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे देशाच्या अन्य राज्यातील एखाद्या मुख्यमंत्र्यावर असा पाकिस्तानधार्जिणे असल्याचा आरोप झाला असता, तर तो वेडा झाला असता. आपण पाकिस्तानधार्जिणे नाही तर देशभक्त असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याने आकाश-पाताळ एक केले असते; पण डॉ. फारूक अब्दुल्ला, ओमर आणि मेहबुबा मुफ्ती यांना हा आरोप म्हणजे आपला गौरव वाटतो, आपल्याला मिळालेला बहुमान आहे, आपल्या अंगावरची कवचकुंडले आहेत असे वाटते, हे देशाचे दुर्दैव आहे.
डॉ. फारूक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला हे बापलेक नॅशनल कॉन्फरन्सचे, तर मेहबुबा मुफ्ती या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी). नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे भारतातील राजकीय पक्ष असले, तरी या दोन्ही पक्षांचे पाकिस्तानप्रेम कधी लपून राहिले नाही. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ते कधी लपवूनही ठेवले नाही. मुख्य म्हणजे त्याची त्यांना गरजही वाटली नाही. उलट, आपले पाकिस्तानप्रेम जाहीर करून भारताच्या अंतर्गत राजकारणात त्यांनी त्याचा भरपूर फायदाही लाटला.
या नेत्यांनी जम्मू-काश्मीर ही आपल्या बापाची जहागीर समजली. ती समजण्यासाठी फारूक अब्दुल्ला यांना आपले वडील शेख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना आपले वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या राजकारणाचा फायदा मिळाला. या नेत्यांनी घराणेशाहीच्या राजकारणातून आपल्या पक्षीय स्वार्थासाठी जम्मू-काश्मीरचा फार सत्यानाश करून टाकला. राज्यातील लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागणार नाही तसेच पाकिस्तानबद्दलचे प्रेम विझणार नाही, उलट ते जास्तीत जास्त जागृत राहील, याची काळजी घेतली.
यासाठी या नेत्यांनी 370 कलमाचा जितका करता येईल तितका दुरुपयोग केला. मुळात 370 कलमाचा उपयोग जम्मू-काश्मीरच्या लोकांना भारताशी जोडण्यासाठी करायला हवा होता, पण या नेत्यांनी तो भारतापासून तोडण्यासाठी केला. जम्मू-काश्मिरातील लोकांना देशाच्या मुख्य प्रवाहात मनापासून सहभागी होऊच दिले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय घ्यावा लागला.
मोदी सरकारच्या या निर्णयाचे पाकिस्तानवगळता जगातील बहुतांश देशांनी स्वागत केले. पाकिस्तानने आगपाखड करणे स्वाभाविक होते. कारण हे कलम रद्द झाल्यामुळे पाकिस्तानला, भारताचा मुकुटमणी असलेल्या राज्यात हस्तक्षेप करणे कठीण झाले. पाकिस्तानचे राजदूत म्हणून या निर्णयाविरुद्ध जम्मू-काश्मिरात असंतोष निर्माण करण्याची सुपारी या तीन नेत्यांनी घेतली, त्यामुळे त्यांना स्थानबद्ध करावे लागले.
मेहबुबा मुफ्ती यांनी 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी जी प्रक्षोभक अशी विधाने केली, ती पाहता धक्काच बसतो- ‘‘370 आणि 35 ए कलम रद्द करण्याचा निर्णय घेणे म्हणजे दारूगोळ्याच्या कोठाराशी खेळणे आहे. जे असा निर्णय घेतील, यामुळे त्यांचे फक्त हातच पोळणार नाहीत, तर संपूर्ण शरीर राखेत भस्म होईल,’’ असे विधान त्यांनी केले होते. ‘‘370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मिरात राष्ट्रध्वज पकडायलाही कुणी उरणार नाही,’’ असे दुसरे आणि तितकेच आक्षेपार्ह विधान मेहबुबा मुफ्ती यांनी केले होते. चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांचा सन्मान करताना, भारतीय सैन्यातील जवानांविरुद्ध रासायनिक शस्त्रांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.
ओमर अब्दुल्लाही यात मागे नव्हते. ‘‘370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला वा त्यात काहीही बदल केला, तरी जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलयावर नव्याने चर्चा सुरू होईल,’’ असे तारे तोडताना, ‘‘जम्मू-काश्मिरातील भारताचे विलीनीकरण हे पूर्ण नव्हते, तर अर्धवट स्वरूपाचे होते,’’ असे ओमर अब्दुल्ला बरळले. या दोघांची अशी आक्षेपार्ह विधाने पाहता, त्यांना पीएसएखाली स्थानबद्ध करण्याचा निर्णय हा अतिशय क्षुल्लक आहे, या दोघांवर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करत त्यांना आणखी कठोरातील कठोर शिक्षा करायला पाहिजे, असे वाटते.
अब्दुल्ला तसेच सईद परिवारातील या दिवट्या कन्या तसेच पुत्राचे पाकिस्तानप्रेम पाहता, त्यांना पाकिस्तानातच पाठवले पाहिजे, अशा राष्ट्रद्रोही लोकांसाठी या देशात जागा नाही. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या एका निदर्शकाला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देणार्‍या उत्तरप्रदेशातील एका पोलिस अधिकार्‍याचा व्हिडीओ मध्यंतरी सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. तसेच आता तुम्ही पाकिस्तानात जा आणि पाकिस्तानप्रेमाच्या कव्वाल्या तिथे खुश्शाल गा, असे या नेत्यांना ठणकावून सांगायची वेळ आली आहे.
फारूक असो, ओमर असो की मेहबुबा मुफ्ती, यांनी जम्मू-काश्मीरचे अपरिमित नुकसान केले आहे. राज्यातील जनतेची दिशाभूलच केली नाही, तर जसे एखाद्याला वाममार्गाला लावले जाते, तसे राज्यातील जनतेला पाकिस्तानमार्गाला लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या नेत्यांच्या गुन्ह्याला माफी नाही. रामशास्त्री प्रभुणेसारखे न्यायाधीश आज असते, तर त्यांनी या नेत्यांना त्यांच्या राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यासाठी देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली असती. गेला बाजार काळ्या पाण्यावर तरी पाठवले असते.
या नेत्यांना पीएसएखाली स्थानबद्ध करणे म्हणजे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना तुरुंगवास न करता 100 रुपये दंड करण्यासारखे आहे. अब्दुल्ला आणि मुफ्ती परिवारातील या दिवट्यांना अशी शिक्षा करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रद्रोह करण्याची या देशात पुन्हा कुणाची हिंमत होणार नाही.

Monday, 30 September 2019

काश्मीरची वास्तव स्थिती! दिनांक :01-Oct-2019 - tarun bharat



वास्तव हे कटु असते, पण देशहितासाठी ते मांडावेच लागते. भारताच्या मुख्य धारेतील प्रसिद्धिमाध्यमे (मीडिया) नेमके हेच विसरले आहेत. या मीडियाचा उथळ व पोकळपणा काश्मीरच्या संदर्भात फारच प्रकर्षाने जाणवत आहे. 5 ऑगस्टनंतर काश्मीरची काय स्थिती आहे, हे सर्व जाणतातच. या दिवसानंतर जम्मू-काश्मीर हे राज्य न राहता, त्याचे दोन- जम्मू व काश्मीर आणि लडाख असे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले आणि त्या पूर्वी संविधानातील कलम 370 निष्प्रभ करण्यात आले. याला विरोध होणार होता. तो हिंसकच राहण्याची शक्यता अधिक होती. म्हणून प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून केंद्र सरकारने तिथे सुमारे 40 हजार जवानांची अधिकची कुमक पाठवून हा संपूर्ण प्रदेश अंशत: संचारबंदीखाली आणला. एकही दगडफेक व हिंसा होऊ नये तसेच सुरक्षा दलांना एकही गोळी झाडावी लागू नये, यासाठी हा बंदोबस्त होता. आता याला सुमारे 55 दिवस होत आहेत. केंद्र सरकारने इच्छिल्याप्रमाणे काश्मीर खोर्‍यात कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. अनेकांना हेच छळत आहे. जिथे लहानसहान घटनांवरून सुरक्षा दलांवर दगडफेक, गोळीबार, त्यांची अवहेलना होत होती, तिथे इतकी मोठी शस्त्रक्रियाझाल्यावरही दगड तर सोडाच, साधा खडाही कुणी फेकून मारला नाही! ‘‘आम्हा सर्वांचे अंदाज हे मोदींचे सरकार असे कसे खोटे ठरवत आहे?’’ बस्स, या एका अहंकारातून मीडियाने काश्मीरच्या वस्तुस्थितीबाबत बेताल, निराधार वक्तव्ये देणे सुरू केले.
जेव्हा अशी असामान्य स्थिती असते, तेव्हा सरकारी खुलाशावर जास्त भरवसा ठेवण्याकडे जनतेचा कल नसतो. नेमके याच क्षणी मीडियाची जबाबदारी सुरू होते. मीडिया प्रस्थापितांच्या विरोधात असायला हवा, हे जरी खरे असले, तरी देशहिताच्या संदर्भात त्याने देशद्रोहाची भूमिका घेता कामा नये. हस्तिनापूरच्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घेणारे व ऐन महत्त्वाच्या क्षणी डोळे बंद करणारे भीष्म आणि देशहिताची गरज असतानाही सरकारविरोधातच भूमिका घेणारा आजचा मीडिया, यांच्यात मग फरकच कुठला राहिला? त्यामुळे नागरिकांनीच आता काश्मिरातील वास्तव काय आहे, हे नेमके जाणून घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तेव्हा काश्मिरातील नेमकी काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी दिल्लीतील काही पत्रकार नुकतेच काश्मिरात जाऊन आलेत. या पत्रकारांनी नंतर दिल्लीत येऊन जे सांगितले ते धक्कादायक आहे. भारतीय मीडिया जे काही सांगत आहे, त्याच्या अगदी उलट स्थिती काश्मिरात असल्याचे त्यांना आढळून आले. केवळ श्रीनगर म्हणजे काश्मीर नाही. श्रीनगरचा काही अतिसंवेदनशील भाग सोडला, तर उर्वरित काश्मीर खोर्‍याचा भाग जवळपास सामान्य जीवन जगत आहे. हे खरे आहे की, दुकाने बंद आहेत (आणि तीही दहशतवाद्यांच्या धाकाने), परंतु रस्त्याच्या कडेला भरणारे बाजार व्यवस्थित सुरू असून तिथून नागरिक जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करत आहेत. रुग्णालयांतही नेहमीप्रमाणेच रुग्णांची गर्दी आहे. औषधी दुकानेही सुरू आहेत. मोबाईल व इंटरनेट सेवेचा गैरफायदा घेऊन दहशतवादी राज्यात हिंसा चार घडवून आणण्याची शक्यता असल्याने या सेवा मात्र बर्‍याच ठिकाणी बंद ठेवण्यात आल्या असल्या, तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारी लॅण्डलाईन सेवा विशिष्ट ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. रस्त्यांवरील रहदारी तुरळक दिसत असली तरी सर्वसामान्यांना कुठलेच बंधन नाही. या पत्रकारांनी वर्णन केलेली काश्मिरातील ही स्थिती दिलासा देणारी आहे, हे निश्चित! या पत्रकारांना तर दक्षिणेतून आलेला पर्यटकांचा एक गटही मुक्तपणे फिरताना भेटला. हॉटेल्स, दुकाने यांची समोरची दारे बंद असली, तरी मागून सर्व व्यवहार सुरू असल्याचेही यांना आढळले. ही जर स्थिती असेल तर यात काश्मिरी नागरिकांचे जगणेच कठीण झाले आहे, असे कोण म्हणेल? काश्मीरचे हे वास्तव या पत्रकारांनी जसे जगासमोर आणले, तसे इतरही पत्रकारांना तिथे जाऊन नेमकी स्थिती जाणून घेता येते. या पत्रकारांना परवानगी मिळते तर इतरांना का नाही? हेही निश्चित की, काश्मीर खोर्‍यात सर्वच काही सुरळीत नाही. तसे तर 5 ऑगस्टपूर्वीही कधी तिथे सर्व सुरळीत राहिले नाही. दहशतवादी तसेच फुटीरतावाद्यांमुळे काश्मीर खोर्‍यात वारंवार हरताळ असलेला आपण पाहिला आहे. मग, कलम 370 निष्प्रभ केल्यानंतर सामान्य जनजीवनावर थोडा विपरीत प्रभाव पडला असेल तर ते समजून घ्यायला हवे. या मीडियाला हे बघायचेच नाही आहे. त्यांना कसेही करून, काश्मीरबाबतीत मोदी सरकार कसे नाकाम ठरले, त्यांचा हा निर्णय किती अंगलट आला, हेच जगाला दाखवायचे आहे. परंतु, वस्तुस्थिती तशी असती तर तेही मान्य करता आले असते.




मीडियाचे म्हणणे आहे की, जे झाले ते झाले. आता तिथली संचारबंदी उठविण्यात यावी. काश्मिरातील नागरिकांना हिंडण्या-फिरण्याची पूर्ण मोकळीक नसणे, तसेच तिथे संवादाचे माध्यम उपलब्ध नसणे हे मानवाधिकाराचे हनन आहे. काही राजकीय नेत्यांना अटकेत टाकले आहे, हे लोकशाहीविरोधी आहे. मान्य. पण हे नेते कोण आहेत? त्यांची लायकी काय? फारुख व ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आदी नेते तर नेते म्हणवून घ्यायच्याही लायकीचे नाहीत. आता तर अशी माहिती समोर येत आहे की, सुरक्षा दलांवर दगडफेक करणार्‍या काश्मिरी तरुणांना हीच नेतेमंडळी पैसा पुरवत होती. म्हणजे इकडे काश्मिरी तरुणांची माथी भडकवायची आणि तिकडे दिल्लीत येऊन लोकशाहीच्या बाता मारायच्या. अशा लायकीच्या नेत्यांचे स्थान तुरुंगातच असायला हवे होते आणि आता ते आहे.
रविवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरच्या स्थितीबाबत मार्मिक भाष्य केले आहे. काश्मिरी जनतेच्या मानवाधिकारांच्या बाता करणार्‍या कथित मीडिया व विचारवंतांना अमित शाह यांनी खडसून विचारले की, गेल्या 70 वर्षांत या राज्यात दहशतवादी कृत्यांमुळे 41 हजार लोकांचा बळी गेला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांच्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे काय? मृताची पत्नी, मुलेबाळे, आईवडील, नातलग मानव नाहीत काय? हे लोक घरचा कर्ता मरण पावल्यानंतर कसे जीवन जगत आहेत, याची कुणालाच तमा नाही. तेव्हा मात्र कुणीच मानवाधिकाराचा ओरडा करीत नाहीत! नेत्यांच्या अटकेवरून अश्रू ढाळणार्‍या कॉंग्रेस व अन्य लोकांना धारेवर धरत अमित शाह म्हणाले की, शेख अब्दुल्ला यांना कॉंग्रेस सरकारने 11 वर्षे कैदेत ठेवले. त्यावर कुणीच प्रश्न उपस्थित करीत नाहीत आणि इकडे देशहितासाठी मोदी सरकारने फारुख अब्दुल्लासह काही नेत्यांना दोन महिने नजरकैदेत ठेवले तर काय गदारोळ सुरू झाला आहे. लाखो काश्मिरी पंडितांना घरदार सोडून जिवाच्या आकांताने पळावे लागले आणि आज ते गेल्या तीस वर्षांपासून आपल्याच देशात निर्वासिताचे जीवन जगत आहेत, त्यांच्या मानवाधिकारांचे कुणालाच काही नाही. फोन व इंटरनेट बंद असणे म्हणजे मानवी अधिकारांचे उल्लंघन होत नाही, असे अमित शाह यांनी ठणकावून सांगितले आहे. काश्मिरातील वास्तव हे आहे की, तिथली परिस्थिती झपाट्याने सामान्य होत आहे. काही निर्बंध असले तरीही तिथले जनजीवन व्यवस्थित सुरू आहे. आता तर तिथे लवकरच पंचायत स्तरावरील निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. परंतु, या सर्व वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करायचे अन्‌ जगात भारताची प्रतिमा डागाळण्याचे काम करायचे, हेच मीडियाने सुरू ठेवले आहे. परंतु, मीडियाने याचे तारतम्य ठेवले पाहिजे


Sunday, 30 June 2019

काश्मिरात दिसलेला फरक-PUDHARI


नवे सरकार स्थापन होऊन आता एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला आहे आणि सतराव्या लोकसभा निवडणुका संपून संसदेचे अधिवेशनही सुरू झालेले आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 देशांच्या संमेलनासाठी जपानच्या ओसाका शहरात गेलेले असून, जागतिक नेत्यांशी संवाद साधला जात आहे आणि इथे देशाचे नवे गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांची काश्मीर भेट उरकून पुन्हा संसदेत उपस्थित झाले आहेत. त्यांनी काश्मिरातील राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ देण्यासाठी विधेयक सादर केलेले आहे. ही मुदतवाढ मागण्याचा सरळ अर्थ इतकाच आहे, की नजीकच्या काळात तिथे विधानसभा निवडणुका घेण्याचा केंद्र सरकारचा विचार नसावा. अर्थात, गेली अनेक वर्षे काश्मीरला जिहादी दहशतवादाने ग्रासलेले आहे आणि पाकिस्तानी दलालांच्या दबावाखाली एकूण शासन व्यवस्थाच कोलमडलेली होती. ती लोकशाही मार्गाने स्थिरस्थावर करण्यासाठी मोदी सरकारने पक्षीय पातळीवरही प्रयत्न करून झालेले आहेत.
वैचारिक मतभेद असूनही पीडीपी या पक्षाशी आघाडी सरकार स्थापन करून मधला मार्ग शोधण्याचा प्रयत्न निकामी झाला. अखेरीस भाजपला सरकारमधून बाहेर पडावे लागलेले होते. त्यामुळेच दीर्घ काळ चालू असलेले सामंजस्याचे धोरण गुंडाळून कठोर पवित्रा घेण्याला पर्याय उरलेला नव्हता. यातले अनेक कंगोरे लक्षात घ्यावे लागतील. राजकीय निवडणुकांमध्ये भाग घेणारा एक गट आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानशी बोलणी करायचा हट्ट धरून बसलेला हुर्रियत नावाचा गट आहे. तर तिसरा शस्त्र हाती घेऊन प्रशासन उद्ध्वस्त करण्यासाठी अखंड लढणारा वर्ग असून, अप्रत्यक्ष त्याला रसद पुरवणारा बिगर काश्मिरी हस्तकांचाही चौथा गट दिल्लीत बसून उचापती करीत असतो.
या सर्वांचा बोलविता धनी पाकिस्तान असल्याचे वेगळे सांगण्याचे कारण नाही. त्यांची नांगी नुसत्या शस्त्राने ठेचणे शक्य नाही, तर काही प्रसंगी त्यांच्याच गनिमी काव्याचा उपयोग करून त्यांना शह देणे आवश्यक होते. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर त्याच दिशेने हालचाली सुरू झालेल्या आहेत. किंबहुना, मवाळ स्वभावाचे राजनाथ सिंह यांना संरक्षण खात्यात पाठवून अमित शहांना गृह खाते सोपवण्यामागे तोच हेतू असावा, असे आता म्हणायला हरकत नाही. कारण, दोन दिवसांचा काश्मीर दौरा करून शहांनी आपल्या नव्या धोरणाची प्रचिती आणून दिलेली आहे.
दीर्घ काळानंतर केंद्रीय गृहमंत्री काश्मीर भेटीला गेले आणि अतिशय शांततेमध्ये त्यांचा दौरा पार पडलेला आहे. अमरनाथ यात्रेची सुरक्षा आणि काश्मिरातील प्रशासनाला धीर देणे, असा शहांचा मूळ अजेंडा होता. त्यातला धोरण बदल त्यांनी कृतीतूनच दाखवून दिला आहे. तुलनेने शांत असलेल्या जम्मूला त्यांनी भेट दिली नाही आणि पूर्ण दोन दिवस शहा काश्मिरातच होते; पण त्यांनी हुर्रियत वा राजकीय नेत्यांपेक्षा पोलिसी कारवाईत हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी सवड काढली.
आजवर केंद्राचे गृहमंत्री वा कोणी मोठे नेते काश्मीर भेटीला गेल्यावर त्यांचे स्वागत खोर्‍यात बंद व श्रीनगरमध्ये हरताळाने केले जायचे. त्यांना काळे झेंडे दाखवणे व हिंसक निदर्शनांचे नाटक चालायचे. खेरीज, त्याच दरम्यान कुठे तरी मोठा घातपात घडवून आणला जायचा. शहांच्या दोन दिवसांच्या काश्मीर दौर्‍यात सगळीकडे शांतता होती आणि नेहमी अशा दौर्‍याच्या दरम्यान ज्या हुर्रियती इशार्‍यांची आतषबाजी चालायची, ती गायब झालेली होती. तिथे जाणार्‍या केंद्रीय नेत्याने, मंत्र्याने हुर्रियतच्या फुटीरवादी नेत्यांना भेटीसाठी बोलवावे आणि त्यांनी आमंत्रण फेटाळून लावावे, हा प्रघात झाला होता.
यावेळी स्थिती नेमकी उलटी होती. शांततेत दौरा पार पाडण्यात आलाच; पण गृहमंत्र्यांनी कुठल्याही हुर्रियत नेत्याला भेटायला बोलावले नाही. उलट, तेच लोक गयावया करीत बोलणी करावीत म्हणून विनंत्या करीत होते. खरे म्हणजे, फार थोडे असे घातकी हुर्रियतवाले सध्या मोकळे आहेत. त्यापैकी अनेकांना पाकिस्तानी पैसे घेऊन घातपात्यांना पुरवण्याच्या आरोपाखाली तुरुंगात डांबलेले आहे आणि त्यातून सुटण्यासाठी त्यांची तारांबळ उडालेली आहे. त्यांचे आर्थिक घोटाळे व दगाबाजी चव्हाट्यावर आणून त्यांच्या मुसक्या आधीच बांधून ठेवलेल्या आहेत. त्यामुळेच आपले शेपूट सोडवून घेण्यासाठी असे हुर्रियतचे नेते कासावीस झालेले आहेत. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत आणि दिल्लीत बसून त्यांचीच वकिली करणार्‍या अनेकांना पाकिस्तानकडून मिळणारी रसद सरकारने यशस्वीपणे तोडलेली आहे.
लष्करी व सशस्त्र कारवाईच्या सोबत ही सर्वात मोठी प्रभावी कारवाई हल्ली भारत सरकारने हाती घेतलेली आहे. कारण, ज्याला आपण सरसकट जिहादी दहशतवाद म्हणतो, तो नुसता देशद्रोह राहिलेला नाही. नक्षली असो किंवा जिहादी असो, दहशतवाद हा मोठा किफायतशीर धंदा झालेला आहे. त्याला शस्त्राची अजिबात भीती उरलेली नाही. मरायला खुळ्या तरुणांना भरती करून हा धंदा तेजीत चालवला जात असतो. म्हणूनच, एका बाजूला सशस्त्र कारवाई करीत असतानाच, दुसर्‍या बाजूला या व्यापाराला मिळणारी आर्थिक रसद किंवा गुंतवणूक तोडणे आवश्यक होते.
मागल्या वर्षभरात मोदी सरकारने त्यालाच हात घातला असून, गुन्हे तपास यंत्रणेपासून आर्थिक गुन्हे शोधणार्‍या संस्थाही काश्मिरी नेत्यांच्या मागे लावण्यात आलेल्या आहेत. त्याचेच हे परिणाम आहेत. हुर्रियतचे अनेक नेते खोट्या आर्थिक व्यवहारात फसले आहेत आणि अन्य मार्गाने काश्मीर खोर्‍यात येणारा पाकिस्तानी पैसा मिळत नसल्याने, तिथल्या तथाकथित निदर्शने व दगडफेकीला पायबंद घातला गेला आहे; मात्र त्याच वेळी बिळात दडी मारून घातपातापुरते बाहेर पडणार्‍या जिहादी उंदरांना शोधून त्यांचा नि:पातही चाललेला आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून शहांच्या भेटीत दोन दिवस काश्मिरात शांतता दिसू शकली. काश्मीर धोरणातला हा मोठा फरक आगामी दोन-तीन वर्षांत तिथला गोंधळ संपवायला मोठा हातभार लावू शकेल, यात शंका नाही
अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवी यात्रांसाठी देशभरातून लाखो भाविक कश्मीरात येतात. त्यातूनही स्थानिकांना रोजगार मिळतो, पण या यात्रा होऊ द्यायच्या नाहीत, भाविकांवर हल्ले करायचे असे दहशतवादी कारस्थान करतात. त्यात नुकसान कश्मिरी जनतेचेच होते. दोन्ही यात्रा सुरळीत पार पाडाव्यात हे नव्या गृहमंत्र्यांचे लक्ष्य आहे. ते पार पडले तर तेथील जनतेत विश्वास निर्माण होईल व नंदनवनावर जमलेले काळे ढग दूर होतील. अमित शहा यांचे कश्मीरमधील पहिलेवहिले पाऊल विजयी ठरो. कश्मीरात हिंदुस्थान झिंदाबादचे नारे लागोत हीच आमची सदिच्छा!
मित शहा यांनी गृहमंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यापासून परिणाम दिसू लागले आहेत. प. बंगालातील राजकीय हिंसाचार कमी झाला आहे. कायदा-सुव्यवस्थेचा विषय राज्याचा असला तरी परिस्थिती हाताबाहेर गेल्यास केंद्र सरकार नाड्या आवळू शकते, कदाचित राष्ट्रपती शासनही लागू शकते, हा संदेश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प. बंगालात पोहोचलेला दिसतो. हिंसाचार, नक्षलवाद आणि पाकपुरस्कृत दहशतवादाचा पुरता बीमोड करणे हे श्री. शहा यांचे लक्ष्य आहे. गृहमंत्री शहा कश्मीरला जाऊन आले व श्रीनगरला बसून त्यांनी जम्मू-कश्मीरच्या परिस्थितीवर चर्चा केली. शहा यांच्या दौऱ्याचे वैशिष्ट्य काय ते समजून घेतले पाहिजे. गेल्या तीस वर्षांत जेव्हा जेव्हा देशाचे गृहमंत्री कश्मीरला पोहोचले तेव्हा तेव्हा तेथील फुटीरतावाद्यांनी स्वागताचे फटाकेवेगळ्या पद्धतीने फोडले. गृहमंत्र्यांच्या आगमनापूर्वी निषेध म्हणून कश्मीर बंदची घोषणा होत असे. हुरियत वगैरे संघटना गृहमंत्र्यांचा धिक्कार करीत बंद पुकारून आपले पाकप्रेम उघड करीत. हे नाटक या वेळी बंद पडले आहे. केंद्रीय गृहमंत्री शहा कश्मीरात पोहोचले, पण त्यांच्या निषेधार्थ बंद पुकारण्याची हिंमत तेथील फुटीरतावाद्यांनी दाखवली नाही. नव्या गृहमंत्र्यांची ही जरब व सरकारचा धाक आहे. यापूर्वी पंतप्रधान श्रीनगरला पोहोचले तरी बंदचा पुकारा होत असे. आता चित्र बदलले आहे. अमित शहा यांनी दिल्लीहून कश्मीरला प्रयाण करण्यापूर्वीच चोख बंदोबस्त केलेला दिसतो. हे अत्यंत आशादायी आहे. यातून कश्मीरातील जनतेला आणि
सुरक्षा दलांना जो संदेश गेला 
तो मनोबल वाढविणारा आहे. कश्मीरवर हिंदुस्थान सरकारचीच
हुकमत चालेल, धिक्कार वगैरे कराल तर गाठ आमच्याशी आहे असा हा दणका आहे. सरदार पटेल यांनी हैदराबादच्या निजामाला असेच वठणीवर आणले होते. देशातील राजेरजवाडय़ांची संस्थाने अशीच विलीन केली होती. कश्मीरचा विषयही अमित शहा मार्गी लावतील. कश्मीरात गेल्या काही दिवसांत दोनशेहून जास्त दहशतवादी मारले गेले. सैनिकांनी आता दहशतवाद नष्ट करायचे ठरवले. या युद्धात आपले काही जवान, पोलिसांनी हौतात्म्य पत्करले. देश त्यांचे बलिदान सदैव लक्षात ठेवील. जम्मू-कश्मीर हे यापुढे अतिरेक्यांचे आणि फुटीरतावाद्यांचे नंदनवन राहणार नाही तर भारतवर्षाचे नंदनवन बनेल. गृहमंत्रालयाने कठोर पावले टाकली तर ते शक्य आहे. गृहमंत्री शहा यांनी कश्मीरात पाऊल ठेवले ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी. एक देश एक निशाणअसा नारा देत श्यामाप्रसादांनी कश्मीरात प्रवेश केला व तिथेच त्यांचे बलिदान झाले. कश्मीरास 35 , 370 कलमांनी जो विशेष दर्जा दिला, त्यामुळे ते एक स्वतंत्र राष्ट्र बनले आहे. त्यांना एकतर आझादव्हायचे आहे किंवा पाकिस्तानशी निकाह लावायचा आहे. हिंदुस्थानचे कायदेकानू तिथे लागू होत नाहीत. पुन्हा त्यांचे संविधान, निशाण म्हणजे ध्वजही वेगळा आहे. पाकिस्तानचे लष्कर, आयएसआय येथे दहशतवादी कारवाया करत आहेत. गेल्या तीस वर्षांपासून येथे हिंदूंचा आवाज उठला नाही. ज्यांनी उठवला ते मारले गेले.
कश्मिरी पंडितांची घरे
णि वसाहतीचे स्मशान झाले. हिंदुस्थानच्या इतर भागांतील लोकांना
तिथे जाऊन कायमस्वरूपी राहण्याचा, इंचभर जमीन खरेदी करण्याचा अधिकार नाही. हे सर्व ज्या 370 कलमामुळे घडत आहे ते काढावे असे कुणी सांगितले तर ‘‘370 काढून तर बघा, हिंसेचा आगडोंब उसळेल, कश्मीर फुटून निघेल’’ अशा धमक्या देण्यात आल्या. यापुढे अशा धमक्यांना भीक घातली जाणार नाही. ‘‘जायचे असेल तर खुशाल जा व अंगावर याल तर येथेच गाडून टाकू’’ असे ठणकावणारा गृहमंत्री कश्मीरच्या भूमीवर पोहोचला. कश्मीरातील तरुणांना रोजगार नाही. त्यामुळे त्यांनी हाती शस्त्र घेतले. हा नौटंकी प्रचार बंद व्हायला हवा. संपूर्ण देशात बेरोजगारी आहे म्हणून मुंबई, चेन्नई, दिल्लीच्या तरुणांनी हाती शस्त्र घेतले नाही. कश्मीरातील मुख्य रोजगार पर्यटन, पण दहशतवादामुळे हा व्यवसाय, रोजगार ठप्प झाला. त्यास हिंदुस्थान जबाबदार नाही. तेथील तरुणांनी फुटीरतावादी व दहशतवाद्यांविरुद्ध ठामपणे उभे राहिले पाहिजे. अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवी यात्रांसाठी देशभरातून लाखो भाविक कश्मीरात येतात. त्यातूनही स्थानिकांना रोजगार मिळतो, पण या यात्रा होऊ द्यायच्या नाहीत, भाविकांवर हल्ले करायचे असे दहशतवादी कारस्थान करतात. त्यात नुकसान कश्मिरी जनतेचेच होते. दोन्ही यात्रा सुरळीत पार पाडाव्यात हे नव्या गृहमंत्र्यांचे लक्ष्य आहे. ते पार पडले तर तेथील जनतेत विश्वास निर्माण होईल व नंदनवनावर जमलेले काळे ढग दूर होतील. अमित शहा यांचे कश्मीरमधील पहिलेवहिले पाऊल विजयी ठरो. कश्मीरात हिंदुस्थान झिंदाबादचे नारे लागोत हीच आमची सदिच्छा!