स्त्रीशक्तीचा जागर
ऐक्य समूह
Saturday, August 27, 2011 AT 12:52 AM (IST)
Tags: editorial
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मभूमीतूनच खा. सुप्रिया सुळे यांनी सुरू केलेल्या "जागर हा जाणिवांचा, तुमच्या-माझ्या लेकींचा', या जनजागरण पदयात्रा मोहिमेचे राज्यातल्या जनतेने स्वागत करायला हवे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने सुरू झालेली ही पदयात्रा 28 ऑगस्ट रोजी पुण्यात संपेल. पण, पुढे पाच वर्षे हे प्रबोधनपर्व सुरूच ठेवायचा सुप्रियाताईंनी केलेला निर्धार पुरोगामी महाराष्ट्रावरचा स्त्री भ्रूणहत्येचा सामाजिक कलंक धुवून काढायला नक्कीच परिणामकारक ठरेल. ज्या सावित्रीबाईंनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया घातला, अनाथ मुला-मुलींना छातीशी कवटाळत नवजीवन दिले त्याच राज्यात गेल्या पंधरा वर्षात, "वंशाचा दिवा' हवा या वेडगळ आणि अमानुष हव्यासापोटी लाखो कळ्या उमलण्याआधीच आईच्या उदरातून खुडल्या गेल्या. आपण आपल्याच रक्तामांसाच्या गोळ्याच्या गळ्याला जन्माला यायच्या आधीच नख लावीत आहोत, तिचा खून करीत आहोत, या सामाजिक गुन्ह्याची जाणीवही या अंधश्रद्धेच्या परंपरेत सामील झालेल्या क्रूर मातांनाही झाली नाही. ज्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला सर्वोच्च मानाचे, सन्मानाचे स्थान आहे, जिचा गौरव स्त्री शक्ती असा केला जातो, त्याचाही विसर या दुष्ट महिलांना आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना-केवळ पैशाच्या हव्यासापोटी मुलींचे गर्भ खुडून टाकणाऱ्या सामाजिक गुन्हेगार डॉक्टर मंडळींनाही झाला. परिणामी गर्भलिंग चिकित्सेवर बंदी असतानाही, राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत सोनोग्राफी यंत्रांचा सुळसुळाट झाला. सरकारने केलेल्या गर्भपात कायद्याचा खुलेआम गैरवापर करीत, बीडसारख्या मागासलेल्या जिल्ह्यातही पैशाचा लोभ सुटलेल्या डॉक्टर मंडळींनी गर्भपाताचे कत्तलखाने सुरू केले. कोवळ्या जिवाला जगाचा प्रकाश दिसायच्या आधीच त्याला अंध:कारात लोटायचे हे महापाप आहे, याची गंभीर जाणीवही संबंधित गुन्हेगारांना झाली नाही. आईची थोरवी जपणाऱ्या महाराष्ट्राच्या संत भूमीत, पुरोगामी विचारांच्या मातीत हे सारे तिरस्करणीय आणि किळसवाणे आहे, याचे भानही माणसांना तारणाऱ्या संबंधित डॉक्टरांना राहिलेले नाही. गेल्या काही वर्षात गर्भपात करणे हे सर्वसामान्य झाले. समाजातली नीतिमूल्येही बदलली. नैतिकतेची व्याख्याही बदलली. गर्भपाताच्या गोळ्यांचा सर्रास वापर धडाक्याने सुरू झाला. हे सारे निसर्ग नियमांच्या विरुद्ध असतानाही, अशिक्षितांपासून ते अगदी उच्च विद्याविभूषित कुटुंबातल्या महिलांच्यापर्यंत घडायला लागले. परिणामी दर हजारी मुलींचा जन्मदर 800 पर्यंत खाली आला. काही जिल्ह्यात तर तो 600 ते 700 इतक्या खालच्या पातळीपर्यंत पोहचला. हे सारे अति गंभीर आणि समाजाचा समतोल ढासळवणारे आहे, अशी प्रबोधन मोहीम सरकारने राबवूनही काही उपयोग झाला नाही. स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच गेले. हा सारा अनर्थ घडला त्याला संबंधित डॉक्टरांच्या इतकाच महाराष्ट्रातला समाजही जबाबदार आहे, हे स्वच्छपणे सांगायला हवे. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा-यंत्रसामुग्रीचा वापर रोगाच्या अचूक निदानासाठी करण्याऐवजी, त्याचा दुरुपयोग फक्त पैशांसाठी होत असतानाही, डॉक्टरांच्या संस्थांनी-संघटनांनीही अशा गुन्हेगार डॉक्टरांच्याविरुद्ध कडक पावले उचलली नाहीत. एखाद्या डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्यावर निषेधासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या डॉक्टरांनी स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टर्सविरुद्ध निदर्शने केल्याच्या, त्याच्यावर बहिष्कार टाकायच्या घटना घडलेल्या नाहीत. डॉक्टरांना समाजात नवजीवन देणाऱ्या देवाची उपमा दिली जाते. पण, यातलेच काही डॉक्टर्स स्त्री भ्रूणहत्येची दुकाने उघडून राक्षसी वृत्तीने वागायला लागले, वैद्यकीय व्यवसायाला त्यांनी कलंक लावला, चूड लावली हे सारे घृणास्पद आणि अक्षम्य असेच आहे.
बुरसटलेली मानसिकता
मुलगी नको, मुलगाच हवा ही मानसिकता केवळ पुरुष मंडळीत नाही तर ती स्त्रियांच्यातच अधिक असल्यानेच स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले, हे कटू सत्य नाकारण्यात काही अर्थ नाही. आपल्या पोटातला गर्भ वाढवायचा आणि त्याला जन्म द्यायचा जन्मसिद्ध अधिकार फक्त मातेलाच असताना, काही वेळा तिच्यावरच सासर-माहेरची मंडळी गर्भलिंग चिकित्सेसाठी दबाव आणतात. तिचा शारीरिक आणि मानसिकही छळ होतो. हा छळ करणाऱ्यांत सासू, आई, नणंदा, बहिणी या साऱ्याही असतातच. खुद्द स्त्रियांनाही आपल्याला मुलगाच हवा, अशा मानसिकतेने झपाटले ते सामाजिक अंधश्रद्धा, रुढी-परंपरांच्या साखळदंडानेच! दोन मुली झाल्या म्हणून तिसरी मुलगी नको, ती झाल्यास आई- वडिलांनाही ती नकोशी असते. ग्रामीण भागात अद्यापही अशा मुलींची नावे "नकोशी' ठेवली जातात. "जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी' असा जाहीर सभा-समारंभातून मातृशक्तीचा गौरव करायचा आणि प्रत्यक्षात मात्र त्याच मातृदेवतेची खुळचट मानसिकतेला बळी पडून विटंबना करायची हा सामाजिक ढोंगीपणा, मुलींच्या जन्मातला सर्वात मोठा कोलदांडा ठरला आहे. ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही मुलांचे लाड करायचे, मुलींना उपेक्षेची वागणूक द्यायची, तिला शिकवताना टाळाटाळ करायची. मुलीला शिकवून काय उपयोग, ती दुसऱ्याच्या घरी जाणार, मुलगी हे परक्याचे धन, मुलगी म्हणजे पदरातला विस्तू, असा समज अद्यापही समाजात आहेच. परिणामी बालपणापासूनच लाखो मुलींचा जन्मदात्या आई- वडिलांच्याकडूनच मानसिक छळ होतो. तिची उपेक्षा होते. विटंबनाही होते. हे सारे पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला मुळीच शोभादायक नाही. स्त्री भ्रूणहत्येचा कायदा सरकारने अंमलात आणल्यावरही, स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण काही कमी झाले नाही, उलट ते वाढले. याचा दोष केवळ सरकारचा, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांचा-प्रशासनाचा नाही. सारा समाजच मुलींच्या भ्रूणहत्येचा गुन्हेगार आहे. सापडला तर चोर नाहीतर शिरजोर या म्हणीप्रमाणे हे गुन्हेगार आतापर्यंत कायद्याच्या कचाट्यातून सुटत राहिले. आपण स्त्री भ्रूणहत्या केल्या तरी कायद्याच्या तावडीतून आपण कसे सुटायचे, याच्या पळवाटा डॉक्टरांनी शोधल्या. कुटुंबियांनी लाखो स्त्रियांना सक्तीने गर्भलिंग चिकित्सा करायला भाग पाडले. लाखो कळ्या अशा अत्यंत निर्घृणपणे खुडल्या गेल्या आणि असा गुन्हा करणारे समाजात उजळ माथ्याने फिरत राहिले. हे सारे थांबायला हवे. त्यासाठी जनजागरण-प्रबोधनाशिवाय काहीही पर्याय नाही. सरकारला या आपत्तीची उशिरा का होईना पण, गांभीर्याने जाणीव होताच, स्त्री गर्भलिंग चिकित्सा आणि गर्भपातावर कायद्याचा कडक फास आवळला गेला असला तरी, सामाजिक जागृतीशिवाय हा समाजविघातक पायंडा पूर्णपणे बंद पडणार नाही, याची जाणीव झाल्यानेच खा. सुप्रियाताईंनी सावित्रीबाई फुलेंच्या जन्मभूमीतूनच, या नव्या जागराची मोहीम सुरू केली. एकविसाव्या शतकात भारतीय महिलांनी सर्व क्षेत्रात यशाची शिखरे आपल्या कर्तृत्वाने काबीज केली. स्त्री शक्तीचा आविष्कार देशवासियांना दाखवला. आता सामाजिक स्थिरता आणि सौख्यासाठी गर्भलिंग चिकित्सा आणि गर्भपात करणार नाही, अशी प्रतिज्ञाच महाराष्ट्रातल्या जनतेने करायला हवी. सावित्रीबाईंच्या आदर्शांना तीच खरी आदरांजली ठरेल! खा. सुप्रियाताईंच्या सामाजिक जागृतीच्या या मोहिमेत सर्वांनीच सहभागी होऊन स्त्रीशक्तीचा जागर नव्याने करायला हवा
No comments:
Post a Comment