राजकीय अस्पृश्यता‘हिंदू’ हे विशेषण गतिशून्य आर्थिक विकासासाठी वापरावे, ‘अडगळ’ शब्दाचे वैशिष्ट्य सांगण्यासाठी वापरावे. ‘भगवा’ शब्द जातीयवादाचे तसेच प्रतिगामीपणाचे वर्णन करण्यासाठी उपयोजावा आणि ‘हिंदू’ शब्दाचा सार्थ अभिमान बाळगणार्या व्यक्तींवर बहिष्कार टाकावा ही रीतच जणू वर्तमानात रूढ झाली आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी हे हिंदुस्थानी हिटलर आहेत, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे हिंदुस्थानातल्या बहुविधतेचे शत्रु आहेत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना इत्यादी संघटना हिंदुस्थानला खड्ड्यात घालू पाहत आहेत अशा उद्घोषांचा पुरोगामी वर्तुळात डिंडीम चालू आहे. या बेगडी पुरोगाम्यांना स्वामी विवेकानंदांवरही अन्याय करताना कसली दिक्कत वाटत नाही. स्वामीजींनी खूप सुस्पष्ट व नि:संदिग्ध शब्दांत ‘भारत हे हिंदू राष्ट्र’ आहे असे अनेक ठिकाणी म्हटले आहे, पण स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारे महाभाग जाणीवपूर्वक विवेकानंद-वाङ्मयातून ‘हिंदू’ शब्द वगळतात व तिथे ‘हिंदी’ किंवा ‘भारतीय’ हा शब्द उपयोजितात. स्वातंत्र्यवीर सावरकर तर या मंडळींच्या दृष्टीने शत्रू क्रमांक एक आहेत. हे शहाणे लोक सावरकर व जीना यांना एकाच पंक्तीत बसवितात. सावरकरांनाही पंथप्रेरित राजकारण प्रिय होते वगैरे आशयाचे जावईशोध लावण्यात याच आगाऊ मंडळींचा पुढाकार असतो. साहजिकच कुणा मणिशंकर अय्यर नावाच्या तत्कालीन मंत्र्याने वीर सावरकरांच्या अजरामर पद्यपंक्ती अंदमानच्या कारागृहाच्या भिंतीवरून काढून टाकल्या तर या स्वच्छंदी लोकांना आनंदाच्या उकळ्याच फुटत असतील.
बरं, हिंदू समाजातल्या सुधारणांना यांचा पाठिंबा आहे व म्हणून त्यांच्या लेखी कडव्या व जहाल ठरलेल्या हिंदुत्वनिष्ठांना ते शिव्या देतात असा संशयाचा फायदा या सेक्युलॅरिस्टांना द्यावा असा आपण विचार केला तर मग कडव्या, जहाल जिहादी मुसलमानांविषयी हे शहाणे का मूग गिळून बसतात? हिंदुत्ववादी संघटना या महाशयांना अप्रिय, तर मुस्लिम लीग सोनिया कॉंग्रेसच्या आघाडीत आहे व या लीगचा एक खासदार सोनिया-कृपेने परराष्ट्रखात्याचा मंत्री बनला आहे हे या सेक्युलर मंडळींना कसे रुचते? आश्चर्य म्हणजे या पुरोगाम्यांना पाकिस्तानविषयी एकदम भाबडी भीती वाटते. कसाब, अफजल हे दहशतवादी लवकरात लवकर फासावर जावेत ही सर्वसाधारण हिंदुस्थानी नागरिकांची इच्छा यांना जातीयवादी वाटते. अयोध्याप्रकरणी ‘‘न्यायसंस्थेने हिंदूंच्या पूर्वग्रहांना कडेखांदी घेतले व तर्काला तुडविले’’ अशी अफलातून आरोळी ठोकणारे हे पुरोगामी बडवे हजरत बाल प्रकरण झाले तेव्हा मौनव्रताचे स्वामी झाले होते. तेव्हा हाती लागलेला बाल म्हणजे केस म्हणे हजरत बाल होता हे सांगणार्यांकडे पुरोगाम्यांनी प्रमाणे वा पुरावे का मागितले नाहीत? ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग या शहाण्यांना फार लाडका वाटतो. यामुळे ‘भगवा’ शब्द बदनाम होतो, हिंदुस्थानच्या भावविश्वाचा अपमान होतो, सत्याचा अपलाप होतो याची या वाचाळवीरांना खंत वाटत नाही. या अशा लोणकढी शब्दप्रयोगाचा पाकिस्तानी पुढारी फायदा घेतात, त्यामुळे हिंदुस्थानची बदनामी करण्याची हिरव्या जात्यंधांना संधी मिळते याचाही ना खेद, ना खंत!
वास्तविक कुणाही हिंदुत्वनिष्ठाला मुस्लिमांविषयी अथवा खिश्चनांविषयी घाऊक वैर पसरविणे मान्य नाही. हिंदू रक्तच स्वागतशील आहे, बहुविधतेची पूजा करणारे आहे. पण महमद बिन कासीमपासून महमंद अली जीनांपर्यंत हिंदुमात्राच्या मनात राग आहे, तो राग समर्थनीय आहे. वर्तमानातल्या मुसलमानाने ही परंपरा त्यजावी आणि गुरू गोविंदसिंह, राणा प्रताप व शिवाजी महाराज यांची परंपरा स्वत:ची मानावी या भूमिकेत काय गैर आहे.
रिपाइं नेते रामदास आठवले यांना बेगडी पुरोगाम्यांची एकूण वाटचाल कळली, या वाटचालीचा वीट आला आणि अनुभवातून उचित निष्कर्ष काढून त्यांनी सेना-भाजप युतीत सहभागी होण्याचे ठरविले तर त्यात चूक काय आहे? ज्याचे जळते त्यालाच कळते! कॉंग्रेसवाल्यांनी डॉ. आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत केले आहे हे त्रिवार सत्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा जे पत्रक प्रसिद्धीस दिले त्यात त्यांनी म्हटले होते - ‘‘जवाहरलालजींना मुस्लिम तुष्टीकरण करताना दलितोद्धाराचा विसर पडला आहे.’’ सामाजिक अस्पृश्यतेमागची राजकीय व वैचारिक अस्पृश्यता देशाला घातक आहे. ‘‘जरि हजार अमुच्या जाती, संकटामध्ये विरघळती’’ हे कविवचन १९६२च्या चिनी आक्रमणाच्या पृष्ठभूमीवर जन्माला आले होते. आजही आपल्या मायभूमीची अवस्था वाईट आहे, बिकट आहे. हिंदुस्थानला पाक व चीन अशा राहूकेतूंनी वेढले आहे; बुद्धिमान माणसे मत्सरग्रस्त, सत्ताधीश, संशयग्रस्त, तर जनसामान्य अज्ञानग्रस्त असे एकूण वर्तमान आहे
No comments:
Post a Comment