Total Pageviews

Wednesday, 17 August 2011

ANNA HAZARE AGAINST CORRUPT GOVERNMENT 23


स्रोत: tb      तारीख: 8/17/2011 7:09:59 PM



MANMOHAN ADVISORS AWAY FROM REALITY
काळ्या इंग्रजांची हुकूमशाही
लॉर्ड मेकॉले याने इंग्लंडला पाठविलेल्या एका पत्रात असे म्हटले होते की, भारतावरचे इंग्रजांचे राज्य जरी संपले, तरी या देशात काळे इंग्रज कायम राहतील अशी व्यवस्था आम्ही शिक्षणातून केली आहे. आज लॉर्ड मेकॉले खदाखदा हसला असेल. भारतात सत्तारूढ असलेल्या काळ्या इंग्रजांनी तर आज इंग्रजांच्याही पुढे मजल मारली. इंग्रजांच्या दमनकारी बंदुकांना, सैन्याला भारतातल्या एका साध्या माणसाने केवळ आत्मबलाच्या आधारे, सत्य-अहिंसा ही दोन तत्त्वे हाती घेऊन अक्षरश: नमविले होते. महात्मा मोहनदास करमचंद गांधी या नावाची इंग्रजांना जबरदस्त दहशत होती. मात्र, इंग्रज महात्मा गांधींना उपोषणाला बसण्याची परवानगी कधी नाकारत नव्हते. आताच्या मनमोहनसिंग सरकार नावाच्या काळ्या इंग्रजांनी गोर्‍या इंग्रजांपेक्षाही पुढे मजल मारत, शांततापूर्ण पद्धतीने भारतातील कोट्यवधी जनतेचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचविण्यासाठी उपोषणाला बसू इच्छिणार्‍या अण्णा हजारे यांना, उपोषणाला बसण्यासाठी घराबाहेर पडण्याच्या आधीच अटक केली. अण्णांनी उपोषणाला बसू नये यासाठी सरकारने चंग बांधला होता. विरोध तर थेट करायचा नाही आणि उपोषणही होऊ द्यायचे नाही. अण्णांची बदनामी करता आली, तर तीही करायची, अशा अनेक मार्गांनी या काळ्या इंग्रजांनी डावपेच आखले होते. भारतातील सामान्य जनतेने काळ्‌या इंग्रजांच्या या काळ्या सावलीच्या विरोधात सामूहिक समाजमनाच्या इच्छाशक्तीचे गावोगावी, रस्तोरस्ती जबरदस्त प्रदर्शन करीत काळ्या इंग्रजांची दहशत उधळून लावली. जनतेच्या दबावापुढे सरकारला नमते घ्यावे लागले आणि अण्णांची बिनशर्त सुटका करावी लागली. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणखी मोठी झाल्याचे हे उदाहरण आहे. लोकशाही मूल्यांवर प्रेम करणार्‍या भारतीय जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. असे असले तरी यापुढे अण्णा हजारे आणि सामान्य जनतेला कायम सतर्क राहावे लागणार आहे.
आधी अण्णांनी जंतरमंतर येथे उपोषण करणार असे जाहीर केले, तेव्हा जंतरमंतर येथे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. अण्णांनी अन्यत्र कोठेही बसावे असे जाहीर करण्यात आले. आम्ही अण्णांच्या उपोषणाला भीत नाही. फक्त संसदेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जंतरमंतरवर नको, तर अन्यत्र उपोषण करावे, असे जाहीर करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी आधी अण्णांना जयप्रकाश नारायण पार्कची जागा सुचविली. अण्णांनी ती मान्य केली. मात्र, पोलिसांनी अण्णांना अशा अटी टाकल्या की अण्णांच्या आंदोलनाची जणू चेष्टाच सरकारने पोलिसांमाफत चालविली. बेमुदत उपोषण फक्त तीनच दिवस चालले पाहिजे, असा म्हणे पोलिसंाचा खाक्या होता. अण्णांना रोज जेवण केल्याशिवाय उपोषण करता येणार नाही, असे या दिल्लीच्या विद्वान सरकारी पोलिसांनी अण्णांना अटीत सांगितले नाही, हे नशीबच म्हणायचे. पोलिसांच्या अटीच अशा होत्या की अण्णाच काय कोणीही सत्याग्रही त्या अटी मान्य करणारच नाही. त्या अटी मान्य केल्या तर मग सत्याग्रहाला, आंदोलनाला काही अर्थच राहिला नसता. दिग्विजयसिंग, कपिल सिब्बल यांच्यासारखे अति शहाणे लोक नंतर अण्णांची टिंगल उडवीत हायकमांडच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी स्पर्धा करत पुढे सरसावले असते.
ुुउपोषणाला परवानगी देताना मान्य करता येणार नाहीत अशा अटी घालायच्या आणि अटी मान्य केल्या नाहीत, असे सांगत अटक करायची, ही लोकशाहीची हत्याच आहे. हा धडधडीत विश्‍वासघात आहे. या विषयाच्या घटनाक्रमातील हा दुसरा विश्‍वासघात आहे. पहिला विश्‍वासघात लोकपाल विधेयकाचा मसुदा ठरविताना केला गेला. अण्णा जंतरमंतरवर उपोषणाला बसले होते तेव्हा सरकारने अण्णांना आश्‍वासन देत लोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीत अण्णांनी सुचविलेले असरकारी सदस्य सामील तर केले. मात्र, या सदस्यांनी सुचविलेले एकही कलम नसलेले जनलोकपाल विधेयक संसदेत मांडले जाईल, अशी बदमाशी केली. आता त्या सरकारी जनलोकपाल विधेयकाला विरोध करताच अण्णा संसदेचा अवमान करत आहेत, असे म्हणणे ही तर शुद्ध बदमाशीच म्हटली पाहिजे. अशी बदमाशी करताना देशातील लोकांना मूर्ख समजून हे सरकार आणि त्यांचे बगलबच्चे कपटनीती करत होते. कॉंग्रेसचे प्रवक्ते असलेल्या मनीष तिवारी या महाभागाने अण्णांचा उल्लेख पत्रकार परिषदेत एकेरी भाषेत करून आपल्या आणि आपल्या पक्षाच्या उर्मट गुन्हेगारी वृत्तीचेच जणू दर्शन घडविले. या दगाबाजीमुळे अण्णांनी उपोषण करण्याचा आणि दुसर्‍या स्वातंत्र्याची लढाई करण्याचा निर्धार जाहीर केला. अण्णा उपोषण करणार असे म्हणताच या काळ्या इंग्रजांचे धाबे दणाणले. त्यांनी कपटनीतीची परिसीमा गाठत आज अण्णांना घराबाहेर पडण्याच्या आधीच अटक केली. वास्तविक अण्णांचे आंदोलन रोखण्यासाठी जमावबंदीचा आदेश जयप्रकाश नारायण उद्यानाच्या तिथे लागू करण्यात आला होता. मात्र, अण्णांना ज्या मयूरविहार येथे अटक करण्यात आली, तेथे तर जमावबंदीचा आदेश नव्हता. ना तेथे अण्णांनी जमाव जमा केला होता. देशातील एखादा सामान्य माणूस आपल्या घराबाहेर पडण्याआधी पोलिस तेथे जातात आणि तो घराबाहेर पडून देशाच्या शांततेला धोका निर्माण करेल म्हणून अटक करतात, हे तर आणिबाणीपेक्षाही भयानक आहे. आणिबाणीत अशाच प्रकारे अनेक नेत्यांना घरी जाऊन झोपेतून उठवून कोणतेही कारण न देता अटक करण्यात आली होती.
अण्णांना न्यायालयात उभे करताना पोलिसांनी जी कलमे लावली त्या आधारे न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी दिली. अण्णांना जामीन देऊ केला होता. मात्र, तो अण्णांनी बाणेदारपणे नाकारला. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर कोणत्या कैद्याला कोठे ठेवावे याचे तारतम्य सरकारच्या गृहखात्याला असायला हवे. पी. चिदंबरम् यांच्या पोलिसांनी अण्णा हजारे यांची रवानगी थेट तिहार जेलमध्ये केली, याच्याइतकी दुसरी विसंगती नसेल. ज्या तिहारमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणारे महाघोटाळाराक्षस ए. राजा आणि सुरेश कलमाडी यांना ठेवण्यात आले आहे, त्याच तिहारमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्वस्व पणाला लावून लढणार्‍या अण्णांना ठेवणे यात सरकारची कुवत आणि सडकी दृष्टी दिसून येते.
अण्णांना अटक करताच दिवसभर देशाच्या कानाकोपर्‍यातून सर्वसामान्य माणसे रस्त्यावर उतरली. लाखो लोकांनी अटक करून घेतली आहे. विरोधी पक्षांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज गदारोळामुळे कामकाज होऊ शकले नाही. काळ्या इंग्रजांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही समजल्या जाणार्‍या लोकशाहीचा खून केला; तोही भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ! हा विचार भारतातील गावागावातील तरुणांना, मोठ्यांना सर्वांना अस्वस्थ करणारा आहे. त्या अस्वस्थतेतून लोक घराबाहेर पडून आंदोलनात उतरत आहेत. नितीन गडकरी यांनी सरकारची ही हुकूमशाही पाहून आणिबाणीसारखी परिस्थिती देशात निर्माण झाल्याची टीका केली आहे. शांततामय मार्गाने आपले म्हणणे मांडू पाहणार्‍या समाजसेवकांना कोणताही गुन्हा केला नसताना अटक करणे, ही बदमाशीच आहे. सरकारने काही दलित कार्यकर्त्यांना भडकवून अण्णा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करत असल्याचा गैरसमज निर्माण करण्याचेही कपट कारस्थान करून पाहिले. ज्या कॉंग्रेसच्या लोकांनी पंतप्रधानांची खुर्ची वाचविण्यासाठी इंदिरा गांधींच्या काळात विरोधी सर्व खासदारांना तुरुंगात डांबून घटनादुरुस्ती करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, ज्या कॉंगे्रसजनांनी शहाबानोला मध्ययुगीन युगात लोटणारा पोटगी देण्याची गरज नाही अशा प्रकारचा कायदा उर्मट लोकांसमोर गुडघे टेकत करून डॉ. आंबेडकरांचा अवमान केला, त्या कॉंग्रेसवाल्यांनी विनाकारण दलितांच्या अस्मितांशी खोटा खेळ करण्याचे भयानक पाप करता कामा नये. अण्णांच्या समर्थनासाठी देशभर कानाकोपर्‍यात लोक सरकारचा निषेध करत रस्त्यावर आले. भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने ही अतिशय आशादायक गोष्ट आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनात असलेले लोकशाही मूल्यांबाबतचे प्रेम, प्रामाणिकपणा, भ्रष्टाचाराला असलेला प्रामाणिक विरोध याचे दर्शनच जणू या निमित्त्ताने जगाला घडले आहे. कोणतीही राजकीय, वैचारिक पार्श्‍वभूमी नसताना केवळ स्वयंस्फूर्तीने प्रचंड मोठ्या प्रमाणावर समाज भ्रष्टाचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरले हे चित्र आशादायी आहे. या संतप्त जनभावनेचा अंदाज सरकारला येईल असे काही वाटत नाही. विरोधी पक्षांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारने गोंधळ होऊन सभागृह बरखास्त झालेच पाहिजे अशी व्यूहरचना केली. काळ्या इंग्रजांच्या या रणनीतीला झुगारून विरोधी पक्ष आणि सर्वसामान्य जनतेने सरकारला नाकात दम आणेपर्यंत अण्णांच्या समर्थनार्थ आंदोलन चालूच ठेवले पाहिजे.
रामदेवबाबा असोत की अण्णा हजारे यांच्या मागण्या ना स्वत:करता होत्या, ना राजकीय कारणाने होत्या. रामदेवबाबा यांनी परकीय बँकांमधील काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली होती. अण्णांनी भ्रष्टचाराला रोखणारे लोकपाल विधेयक लागू करण्याची मागणी केलेली आहे. मात्र, सरकार जणू काळ्या पैशाचे आणि भ्रष्टाचाराचे समर्थक असल्यासारखे रामदेवबाबा आणि अण्णा हजारे यांच्या विरोधात उभे राहिले आहे. नव्हे या आंदोलनात उतरणार्‍या सर्वसामान्य लोकांवर दबावतंत्राचा प्रयोग करण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे. मात्र, भारताच्या इतिहासात ‘केला पोत जरी बळेचि खाले, ज्वाला तरी ते वरते उफाळे’ या उक्तीचा अनुभव भारतीय जनता, विरोधी पक्ष या दमनचक्र चालविणार्‍या काळ्या इंग्रजांना दाखविल्याशिवाय राहणार नाहीत! अण्णांना सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविणार्‍या काळ्या इंग्रजांनी अवघ्या चारच तासांत अण्णांची सुटका केली हे सरकार भेदरल्याचेच लक्षण आहे. अण्णांना अटक करून तुरुंगात धाडल्यास रामदेवबाबांच्या आंदोलनासारखे हाल होतील, असे सरकारला वाटले होते. पण, सरकारची खेळी त्याच्याच अंगलट आली. संपूर्ण देशातील जनता पेटून उठली, रस्त्यावर उतरली. त्यामुळे बिथरलेल्या सरकारने अण्णांवरील सर्व आरोप बिनशर्त मागे घेतले आणि जनतेच्या लढाईचा विजय झाला. कपिल सिब्बल, स्वत: डॉ. मनमोहनसिंग, मनीष तिवारी यांच्यासारखे जनमानसाची नाडी ओळखता न येणारे नेते कॉंग्रेसला आणि सरकारला चुकीचा सल्ला देत असल्यानेच कॉंग्रेसच्या सरकारची नाचक्की झाली, हेही तेवढेच खरे.

No comments:

Post a Comment