Total Pageviews

Sunday 28 August 2011

LET US BRIBE & BECOME RICHER

आपले हात एकमेकांच्याच खिशात आहेत, या दारुण सत्याकडे आपण किती वेळ दुर्लक्ष करणार? एकंदरीत काय, तर एकूण एक, प्रत्येक स्तरावर, लाच मागू नका-घेऊ नका-देऊ नका.
अण्णांनी अखेर स्वातंत्र्याची नवी लढाई छेडलीच. तिला दुसरी अथवा तिसरी हा क्रम देण्यात वेळ वाया घालवण्याची गरज नाही. देशभरातून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळणे यात नवल पण नाही. त्यांचे आंदोलन वैतागलेल्या जनतेच्या प्रचंड असंतोषाचा, अगतिकतेचा अंतिम दृष्य परिणाम आहे. नेमक्‍या अशा वेळी अण्णांसारख्या प्रतिमेची मंडळी मैदानात उतरली तर दुसरे काय होणार?

आंदोलनाची धुरा अशा काही भूतपूर्व सनदी/पोलिस अधिकाऱ्यांच्या तावडीत आहे ज्यांचा सरकारबद्दल आकस असल्याची वदंता आहे. तथाकथित समाजसेवी संस्था या लाटेत आपले हात धुवून घेत आहेत. हजारे टोपी व मेणबत्ती निर्माते/विक्रेते खुशीत आहेत. आंदोलनाच्या नेतृत्वांत फूट पाडण्याचे शासनाचे निष्फळ प्रयत्न होत आहेत. गांगरलेले प्रशासन जनक्षोभाची ही सुनामी ओसरण्याची असहायपणे वाट बघते आहे. प्रसारमाध्यमांना तर ही दीर्घकाल पुरणारी पर्वणीच मिळाली. ऍक्‍युप्रेशरच्या तत्त्वानुसार प्रसारमाध्यमांच्या इतर महत्त्वाच्या घडामोडींबद्दलच्या संवेदना तूर्त नष्ट झाल्या आहेत. इतरत्र जगात व देशात जणू काही होतच नसावे असा भास वृत्तपत्रवाचकांना झाल्यास नवल नाही. या मोहिमेत भाग घेणारा अथवा त्यावर भाष्य करणारा प्रत्येक विद्वान मात्र मेंढरांच्या कळपातील शेळीप्रमाणे वाहवला गेला आहे असे दिसते. मोहिमेत सक्रिय भाग घेणारे हजारो हजारे टोपीधारक, मेणबत्त्या/ मशाल पेटवणारे, मोर्चे, फेसबुक व ट्विटर बहाद्दर, नाश्‍ता झाल्यावर रात्रभोजनापर्यंत उपोषण करणारे; परंतु निवडणुकीत मतदान न करता सहलींवर जाणारे तुम्हा-आम्हांसारखे पांढरपेशे मध्यमवर्गीय व आर्थिक सुधारणांपासून लाभ झालेले नवश्रीमंत आहेत असे म्हटल्यास राग येईल; पण ते खरे आहे. कारण भ्रष्टाचार या व्याधीचे बीज देशाच्या संपूर्ण जनतेच्या मनातच खोलवर रुजले आहे, हे एक कटू सत्य आहे. प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे अंतर्मुख झाल्याशिवाय पुढील युक्तिवाद पटणे कठीण आहे.

ध्वनी / रेडिओ लहरी जशा निरनिराळ्या पातळीवर कार्यरत असतात, थेट तसेच भ्रष्टाचार आणि काळा पैसा निर्मितीचे पण आहे. तिहारवासी बड्या मंडळींची भूक, गरजा, हाव फार प्रचंड. साहजिकच ती भागवणे केवळ उद्योजकांनाच शक्‍य असते. शासनातील लायसेन्स-परमिट वहिवाट हा महामार्ग त्यासाठीच सोयीचा ठरतो. राजकीय पक्ष, नेते प्रभृती मंडळींसाठी उपलब्ध या मार्गाला आकलनापुरता ब्रॉडबॅंड म्हणा. या धनलाभावर एक दिडकीही कर दिला जात नसल्याने तो काळा पैसाच झाला जो परदेशी लपवून ठेवल्यामुळेच तर सध्याचे महाभारत घडत आहे. या उच्चभ्रू मंडळींना सहायक असते ती मधली फळी उच्च सनदी अधिकारी, जे वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी अथवा आर्थिक हाव भागवण्यासाठी वरील बड्या धेंडांचे हौशीने मध्यस्थ बनतात. हा झाला मीडियम बॅण्ड. बिल्डर, उद्योजक घराणी व राजकारणी मंडळी यांमधील महत्त्वाचा दुवा. आता आपल्यासारख्या- म्हणजेच आम आदमीकडे बघा. आपल्याला लोअर बॅन्डचे घटक म्हणता येईल. फरक इतकाच, की वरील दोन वर्गांतील मंडळींच्या स्वत:च्या खिशाला चुना लागत नसतो. जनसामान्यांची गोष्ट मात्र वेगळी. आपणच एकाला लाच देतो अन्‌ दुसऱ्यांकडून घेतो. "परस्परां लाच देऊ, अवघे होऊ श्रीमंत' असेच हे वर्तन असते. पासपोर्ट पोचवणारे, आरटीओ कचेरीत परवाना देणारे अधिकारी व तो घेणारे वाहनचालक, वर्गात न शिकवणारे; पण विद्यार्थ्यांना आपल्या क्‍लासमध्ये येण्यास भाग पाडणारे शिक्षक/प्राध्यापक, इस्पितळातील ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णाला आपल्या क्‍लिनिकमध्ये बोलावणारे, किंवा त्याला तपासण्या करण्यासाठी "स्पेशालिस्ट'ची चार धाम यात्रा करण्यास भाग पाडणारे (व नंतर कमिशन घेणारे) डॉक्‍टर. मंत्रालयातील, कलेक्‍टर कचेरीतील, नगरपालिकांतील वरपासून खालपर्यंतचे कर्मचारी, पावती न घेता माल खरेदी करून विक्रीकर चुकवणारे ग्राहक अशी अनेक उदाहरणे देता येतील. मध्यम व खालच्या पातळीवरील भ्रष्टाचार आर्थिक चणचण व गरजेपोटी असतो, हा युक्तिवाद केला तरी त्या पाठची मूळ वृत्ती बेइमानीचीच असते.

वरील तिन्ही गटांनी निर्माण केलेल्या काळ्या संपत्तीची तुलना नक्कीच आश्‍चर्यकारक आहे. गवगवा जरी बड्या धेंडांचा होत असला तरी त्यांच्या अनेक पट विस्तृत व संख्येने कोट्यवधी अशा मध्यम वर्गाचा सामूहिक विचार केल्यास हेच चित्र दिसेल, की त्यांनी निर्माण केलेले, रिचवलेले, पचवलेले काळे धन बरेच जास्त आहे. ते फक्त देशाबाहेर जात नाही, देशाच्या अर्थव्यवस्थेतच पचून जाते इतकेच. याउलट बड्या "तिहारी' धेंडांचा काळा पेसा देशाबाहेर जातो. हा फरक वगळला तर आपण सारे एकाच माळेचे मणी. मध्यमवर्गीयांची ही भ्रष्ट मानसिकता बदलू शकेल? हा सवाल मेणबत्ती ब्रिगेडने स्वत:ला करावा. आपले हात एकमेकांच्याच खिशात आहेत, या दारुण सत्याकडे आपण किती वेळ दुर्लक्ष करणार? एकंदरीत काय, तर एकूण एक, प्रत्येक स्तरावर "लाच मागू नका-घेऊ नका-देऊ नका, प्रचंड संख्येत मतदान करा, प्रामाणिक उमेदवारच निवडा' हे ब्रीद जनसामान्यांच्या मनात रुजवण्याकरिता अण्णांनी आपले उपोषणास्त्र वापरले, तर जनलोकपाल विधेयकाच्या अनेक पटींनी भ्रष्टाचार निर्मूलन शक्‍य होईल, हे नि:संशय. अशा उपोषणाच्या समर्थनार्थ किती मेणबत्त्या पेटतील, हे मात्र विचारू नका.

(लेखक इंटेलिजन्स ब्यूरोचे माजी संचालक आहेत.)
प्रतिक्रिया
On 28/08/2011 05:54 PM dombivalikar said:
मी एक डोंबिवली कर.. इकडे डोंबिवली मध्ये नगरपालिका, वीज जोडणी, तेलेफोने जोडणी, पास्स्पोर्त साठी उघड उघड लाच घेतली जाते.. पोलीस कडे गेलो तर ते त्याचे बाप.. आता बोला की करावे..?
On 28/08/2011 08:04 AM puneri said:
पदपथावर दुकानदार अतिक्रमण करतात लोक बिनदिक्कतपणे अनधिकृत बांधकामे करतात,त्यापासून फायदा मिळवतात,त्यांना राजकीय वरदहस्त आहेच,हा भ्रष्टाचार नाही का?
On 28/08/2011 12:14 AM girish said:
मध्यमवर्गीय भ्रष्टाचारी का होतात? त्यांना माहित आहे कि आपले कुठलेच काम त्याशिवाय नीटपणे पार पडणार नाही. कारण वर पासूनच हि कीड लागलेली आहे.. आणि त्यामुळे हे लोक आता निर्ढावले आहेत. मनात चीड असली तरी मध्यमवर्गीय हतबल झालेला आहे. अण्णांनी बरोबर हि दुखरी नस पकडली म्हणून त्यांना इतका भरघोस पाठींबा मिळाला. मेणबत्ती संप्रदाय म्हणून अशाना हिणवणे हेच अतिशय अश्लाघ्य आहे. विचारवंताना झोडपायला मध्यमवर्गीय हा सोयीस्कर सापडतो कारण वरचे लोक त्यांना बिलकुल भिक घालणार नाहीत.हे ते पक्के जाणून आहेत.
On 27/08/2011 11:50 PM TARUN said:
लोकजाग्रणाचा मुद्दा एकदम मान्य.पण नेमके परिणामकारक लोकजागरण कसे करायचे हाच तर प्रश्न आहे ज्याचे कोणीही उत्तर द्यावे.अजूनही विज्ञान इतके प्रगत झाले नाही कि एखादे सदाचाराचे INJECTION दिले म्हणजे कोणीही भ्रष्टाचार करणार नाही.म्हणून तर कायदे करावे लागतात म्हणजे निदान ज्याला न्याय हवाय त्याला दाद मागण्यासाठी एक हक्काचे शस्त्र तरी मिळते.लेखकाचे बोलायला काय जाते?
On 27/08/2011 07:47 PM netaji chinchulkar, nagpur said:
यथा राजा तथा प्रजा हि म्हण तेव्हा योग्य होती जेव्हा राजेशाही होती, पण आता लोकशाही आहे आता या म्हणी ऐवजी ' यथा प्रजा तथा राजा ' म्हणावे लागेल. कारण या देशातल्या लोकांच्या नसानसात भ्रष्टाचार भिनला आहे, काहीही गरज नसतांना लाच देऊ इच्छिणारे लोक मी स्वतः पाहिलेले, अनुभवलेले आहेत. मग फुकटचा पैसा भेटत असतांना नको म्हणणारे असे किती जन मिळणार ?
On 27/08/2011 07:10 PM mani said:
वैद्यासाहेब, १९९६ मध्ये माझी कार महाराष्ट्रात नोंदणी करायला मी लाच द्यायची नाही असे ठरवले होते. त्यामुळे मला ३ दिवस सुट्टी काढून दररोज अंधेरीच्या मोटार नोदणी ऑफिसमध्ये जायला लागले. शेवटी तेथे कुलकर्णी नावाचे भले गृहस्थ खिडकीवर होते त्यांच्या पाठींब्याने आणि RTO यांनी स्वत लक्ष घातले म्हणून माझी लाच वाचली. आज तुम्ही स्वत रेशन कार्ड काढायला म्हणून जा ओळख देवू नका आणि स्वत बघा काय होते ते?
On 27/08/2011 07:07 PM kaka said:
भ्रष्टाचारात अडकलेल्या बड्या धेंडांना शिक्षा होते असे दिसले की सामान्य माणूस आपोआपच लाच देण्याचे प्रकार टाळेल.यथा राजा तथा प्रजा. मात्र शिक्षा होण्यासाठी सर्व संबंधित कर्मचारी इतके intelligent नसावे की गुन्हेगार कोर्टात तांत्रिक मुद्द्यावर निर्दोष सुटतील आणि उजळ माथ्याने फिरतील. असे आजवर अनेकदा घडले आहे.
On 27/08/2011 05:42 PM Ramesh shinde said:
जर मजबुरी म्हणून लाच द्यावी लागली तर . . . . जर माझी महिन्याची कामेई जर ४००० रु आहे आणि मी जर चुकून नो एन्ट्री मध्ये गेलो असेल तर मला १०० रु मागत असताना मी १००० रु च्या पावती ची विनंती कसा करू ? कारण १००० रु मध्ये माझा महिन्याचा किराणा येतो .
On 27/08/2011 02:44 PM Ghansham said:
परखड लेखाबद्दल लेखकाचे आभार. या विषयावर लेख लिहिणार्यांना याच प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते. लेखकाने वाईट वाटून घेऊ नये. मिरवणुकीत सहभागी होण वेगळ आणि कार्याची सुरुवात स्वतापासून कारण वेगळ. या परस्पर विसंगत बाबी. त्यामुळेच अशा टीका होतात. लेखकाचे पुनश्च आभार.
On 27/08/2011 02:07 PM Shekhar said:
Bajirao peshava- Ek Ek phandi todnya peksha , (corruption chya) mulavarch ghala ghatala pahije
On 27/08/2011 02:04 PM Shekhar said:
yatha raja tatha Praja !!!
On 27/08/2011 11:02 AM Nitin said:
लायक उमेदवार निवडणुकीला थांबणार असतील तर मतदानाचा उपयोग, नाहीतर काय घराणे-शाही हे एकमेव पात्रता आहे आपल्याकडे उमेदवारी साठी, खरंय ना?
On 27/08/2011 10:28 AM dombivalikar said:
जर मजबुरी म्हणून लाच द्यावी लागली तर काय करावे.. मी डोंबिवली मध्ये राहतो जन्माच्या दाख्ल्याप्सून मृत्यू च्या दाखल्य साठी लाच द्यवी लगते.. त्या शिवाय आमचे डोंबिवली चे कर्मचारी हलत नाहीत , पोलीस कडे गेलो तर म्हणतात कि काय असेल ते आपापसात निपात्वून टाका.. म्हणजे पोलीस सुद्धा त्यान सामील आहेत.. आता बोला का करावे.. नगरसेवक सगळे मोठ मोठ गुंड आणि रेती सम्राट. त्यांना हप्ता द्याव लागतो तो वेगळा..
On 27/08/2011 09:29 AM monika said:
वैद्य साहेब मान्य आहे आपणच भ्रष्टाचाराला पाठींबा देतो.पण लाच घेणार्याबद्दल कोणाकडे तक्रार करावी हे जरा स्पष्ट करा.पोलिसांकडे जावे तर तेथेही पैसे मागतात.निवडणुकीबाबत म्हणाल तर सांगा हे राजकारणी अमाप पैसे भरून त्यांच्या मुलांना अन नातेवाईकांना रिंगणात उभे करतात.आम्हे मते कोणाला द्यावी?आमच्यासारख्या सामान्य नागरिकाला निवडणुकीला उभे राहण्यासाठी काय करावे?आणि चुकून उभे राहिलोच तर काय गुअरन्ती आहे निवडून येण्याची?हे भ्रष्ट राजकारणी तेथेही पैसे deun निवडून yetat.यावर kahi मार्ग असल्यास सुचवा हि विनंती
On 27/08/2011 08:53 AM pallavi said:
लेखात मांडलेले मुद्दे योग्य आहेत.. वैयक्तिक पातळीवर भ्रष्टाचार निर्मूलन व देश-पातळीवर भ्रष्टाचार निर्मूलन (कडक कायद्याद्वारे) हे दोन्हीही अत्यावश्यक आहे ! वैयक्तिक पातळीवर भ्रष्टाचार न करण्यासाठी तसे संस्कार त्या व्यक्तीवर झालेले असणे आवश्यक आहे.. घरा-घरात व प्रत्येक शाळेमध्ये प्रामाणिकपणाचे संस्कार झाले पाहिजेत.. विशेषतः स्त्रियांनी यात पुढाकार घेऊन आपली मुले सच्च्या मनाची व वर्तणुकीची होतील याची काळजी घ्यावी.. नवरा / घरातील इतर लोक भ्रष्टाचार करत असतील तर त्यांना पूर्ण ताकदीनिशी विरोध करावा !
On 27/08/2011 06:34 AM Kishor K said:
वैद्य साहेबांचे विचार अगदी बरोबर आहेत. त्यांनी मांडलेले मुद्दे अगदी अचूक आहेत. ज्या कोट्यावधी लोकांनी अण्णांच्या आंदोलनात भाग घेतला त्यांनी फक्त एकच शपथ घ्यावी... "मी कोणाला लाच देणार नाही व कोणाकडून लाच घेणार नाही." जरका ९०% लोकाना भ्रष्ट्राचारा विरुद्ध संताप आहे, त्यांनी सगळ्यांनी जर ही शपथ घेतली तर १०% भ्रष्ट लोकांचे काही चालणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचार आपोआप कमी होईल. अण्णांच्या आंदोलनाची गरज नाही. हा विचार मी facebook वर एप्रिल मध्ये मांडला तेव्हा काही लोकांनी मलाच शिव्या दिल्या होत्या
On 27/08/2011 05:18 AM Phil said:
वेश्यांच्या बाजारात पतिव्रतेला काय किंमत? सर्व समाजच भ्रष्ट होत चालला आहे म्हणून कुणी काहीच करायचे नाही? यावर कारवाई करू शकणारे IB किंवा CBI इतकी वर्षे का गप्प आहेत? फक्त मध्यमवर्गीयांवर टीका करण्याची आजकाल निवृत्त अधिकाऱ्यांची fashion आहे!
On 27/08/2011 05:02 AM Prashant said:
मध्यम वर्गा नि निर्माण केलेले काळे धन पण परदेशी जाते. पट्टेवाल्यानी १०० रु खाल्ले तर त्याला २५ मिळत असतील. बाकी वर वर सरकत "तिहारी" लोकां पर्यंत पोचतात आणि मग परदेशी!!! तिहारी लोकांकडे जी पैशाची गंगा येते, ती ओहोळ आणि नाल्यातूनच बनते.
On 27/08/2011 04:20 AM Balu said:
अयोग्य वेळी लिहिलेला योग्य लेख, परंतु लेखकांनी मुख्य मुद्दा बाजूला ठेवला कि मेणबत्ती ब्रिगेडने सुरवात तरी केली- आपण स्वतः कुठे आहांत, आता तरी कुंपणावरून उतरून दाखवा नाहीतर जे करतात त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या उगीच टोच्या मारू नका.
On 27/08/2011 03:52 AM jay said:
वैद्य बुवा भाषणबाजी नको. तेच तेच मुद्दे खूप वेळ वाचले. आपण इंटेलिजन्स ब्यूरोचे माजी संचालक असताना काय दिवे लावले ते सांगा. तुमच्या देखरेखी खाली मुजोर राजकीय नेत्यांनी कशी लुटमार केली त्यावर जरा प्रकाश टाका.
On 27/08/2011 02:50 AM निलेश डोंगरे said:
सत्य परिस्थिती रेखाटल्याबद्दल लेखकांचे मनापासून आभार
On 27/08/2011 02:45 AM atul said:
IB च्या माजी संचालकास भ्रष्टाचार विरोधी एक कडक स्वतंत्र संस्था असावी असे वाटत नाही? आश्चर्य आहे!!! साहेब, व्यवस्था खराब आहे म्हणून एकमेकांच्या खिशात हात आहेत. एकमेकांच्या खिशात हात घातल्यास ते हात छाटले जातील याची हमखास हमी देणारी संस्था कार्यरत करा; मग बघा जादू !!!
On 27/08/2011 02:35 AM smita said:
अतिशय उत्तम परखड लेख. हि क्रांती फक्त भ्रष्टाचार नव्हे तर एकूणच भारतीय दुतोंडी विचारसरणी, नैतिकता आणि सांस्कृतिक बदलांची व्हायला हवी. भ्रष्टाचार आणि स्त्री भ्रूण हत्या यांनी बरबटलेला हा समाज कधीच प्रगत होऊ शकणार नाही. कठोर आत्मपरीक्षनाची गरज अवघ्या देशालाच आहे. फक्त राजकारण्यांनाच नव्हे!

No comments:

Post a Comment