ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकपालासारख्या कठोर स्वायत्त यंत्रणेसाठी दिल्लीत सु
रू केलेल्या उपोषणआंदोलनाने देशातील लक्षावधी नागरिकांना उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आणण्यात यश मिळविले. देशभरातील टीव्ही तसेच अन्य प्रसारमाध्यमांनीही एप्रिलपासूनच 'भ्रष्टाचारविरोधी आंदोलना'ला अमाप प्रसिद्धी दिली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवसापासून अण्णांचे उपोषण हा एकमेव विषय देशात चचिर्ला जात होता. त्यातून भ्रष्टाचाराच्या विरोधात समाजाच्या सर्व स्तरांत असलेल्या प्रक्षुब्धतेचे जे दर्शन घडत होते, त्यामुळे सरकारी यंत्रणांतील भ्रष्टासुरांना धडकी बसायला हवी होती. लोकमानसाचे व्यवस्थापन करण्यात मुरलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना लोकभावनेच्या या शांततामय उदेकाने घाम फुटला होता, पण या भ्रष्टासुरांवर मात्र त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही, हे सोमवारी मुंबई आणि चेन्नईत प्राप्तिकर खात्याच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकरणांत लाच घेताना झालेल्या अटकेवरून स्पष्ट होते. अण्णांनी रविवारी उपोषण सोडले, तेव्हाही भ्रष्टाचाराच्या विरोधात शपथ घेण्यास विशाल जमाव उपस्थित होता. पण सोमवारीच मुंबईचे प्राप्तिकर आयुक्त दयाशंकर यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक झाली, तर चेन्नईत अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त अंदासू रवींद यांना ५० लाखांची लाच घेताना! भ्रष्टाचारविरोधी लोकभावनेचे देशभर प्रदर्शन होत असताना, हे दोघे अधिकारी भ्रष्टाचाराच्या रकमेच्या 'वाटाघाटी' निगरगट्टपणे करीत होते. त्यांना मनाची लाज नाही हे उघडच आहे, पण जनाची लाज सोडा, भयही त्यांना वाटले नाही! आपण पकडलेच जाणार नाही, अशी खात्री गुन्हेगाराला मनोमनी वाटत असेल, तर शिक्षा किती कठोर आहे, याचा प्रभाव त्याच्यावर का पडावा? तीच वृत्ती सरकारात वरिष्ठ पदांवर असलेल्या या भ्रष्टासुरांच्या बाबतीतही दिसून येते. कठोर लोकपाल कायदा होईल तेव्हा होवो, पण केवळ कायद्यावर विसंबून या भ्रष्टासुरांत भय निर्माण करता येणार नाही. अण्णांच्या आंदोलनाने तरुणांची जी शक्ती जागी केली आहे, तिला गावोगावी संघटित स्वरूप द्यावे लागेल. ही संघटित शक्ती भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्याचे धैर्य पीडित व्यक्तींना देऊ शकेल आणि त्याचबरोबर निदर्शनांसारखे मार्ग अवलंबून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जरब निर्माण करू शकेल
No comments:
Post a Comment