Total Pageviews

Sunday 28 August 2011

person PAYING BRIBE IS EQUALLY RESPONSIBLE

रविवार, २१ ऑगस्टच्या ‘रविवार विशेष’ मध्ये अण्ण हजारे यांच्या आंदोलनासंबंधी विविध मान्यवरांचे लेखन प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यांच्या लेखांवर आलेल्या निवडक प्रतिक्रियांचे संकलन..गेल्या आठवडय़ातील संपादकीय लेखांच्या अनुषंगाने विचारावेसे वाटते की भ्रष्टाचाराच्या प्रक्रियेत दररोज प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्यांनी मेणबत्त्या जाळण्यापेक्षा स्वत:स भ्रष्टाचारापासून दूर ठेवून आगळा आत्मक्लेश करावा. भ्रष्टाचारी व्यक्तीबरोबरच भ्रष्टाचारास खतपाणी घालणारा, लाच देणाराही अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचारीच असतोच, याचे, सर्वानी भान ठेवणे आवश्यक आहे !
विवेक
तरुणांनी एकत्र यावे

अण्णांच्या उपोषणामुळे काही प्रश्न अनुत्तारित असले तरी तरुणवर्ग भ्रष्टाचाराविरोधात एकत्र येणार असेल तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. ही गोष्ट अतिशय चांगली असून तरुणांनी मजबूत संघटना बांधून भ्रष्टाचाराविरोधात आघाडी उघडावी. त्यासाठी स्वच्छ चारित्र्याचा नेता निवडावा आणि त्यायोगे स्वत:चेही चारित्र्य सुधारावे.
अमित पाटील
अण्णांना ‘त्यांचा’ विरोध !

कोणताही दोष नसताना लाच देणे ज्या सामान्यांना भाग पडते, त्या लाचेची रक्कम नेमकी कोठे आणि कोणाच्या हाती जाते ?, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष भ्रष्टाचारामुळे ज्यांना काही  ‘लाभ’ मिळतात, ते नेमके कोण आहेत ?, पहिल्या वर्गातील लोक निश्चितपणे अण्णांना पाठिंबा देत आहेत तर दुसऱ्या वर्गाच्या लोकांचा अण्णांच्या आंदोलनास विरोध आहे. आपण उघडे पडू नये, आपली कृष्णकृत्ये जगासमोर येऊ नयेत म्हणूनच अण्णांच्या आंदोलनासंबंधी शंका व्यक्त करीत आहेत.
श्रीराम बापट
अभिनंदन!
प्रथम लोकसत्ताने घेतलेल्या भूमिकेचे अभिनंदन. गेले काही दिवस खांडेकर म्हणतात तसा प्रकाशझोत व कलकलाट चालू असताना सातत्याने एक भूमिका मांडणे ही आमरण उपोषणाइतकीच किंबहुना थोडी अधिक कठीण गोष्ट आहे. खांडेकरांचा लेख नेहमीप्रमाणेच नितांतसुंदर, संग्रही ठेवावा व केव्हाही पुन्हा वाचावा असा आहे. त्यांचा व्यासंग अफाट व भाषा बहुप्रसवी आहे. त्यांची वाक्ये मेंदूत घुसतात व हृदयात ठसतात. अत्यंत परिणामकारक पद्धतीने व तत्त्वज्ञानाचे अवकाश सांभाळत ते विषय उलगडत जातात व मोजक्या शब्दात सारे सारच समोर ठेवतात. माहिती होते, पण कधी जाणले नव्हते, अशी अवस्था वाचून होते. अभिनंदन.
स्नेहा
 समतोल लेख
अतिशय योग्य वेळी आलेला आणि समतोल लेख वाटला. हा लेख अण्णासमर्थकांच्या वाचनात आला तर फार बरं होईल. भ्रष्टाचारानं आपण सगळेच पोळलो आहोत. ज्यांना खरोखर त्या विषयी काही म्हणायचं ते त्यांनी यापूर्वी आपापल्या पातळीवर का नाही म्हटलं हा प्रश्न मनात येतो. विशेषत: युवा वर्गाच्या (ज्याचं मी प्रतिनिधित्व करते) मोठय़ा सहभागाविषयी फार अस्वस्थ वाटतं. आमच्या पिढीनं (चे गवेराचे टीशर्टस् घालत मोठी झालेली) कोणत्याही चळवळी, आंदोलनं जवळून पाहिलेली, अनुभवलेली नसल्यानं त्याविषयी एक सुप्त आकर्षण असलेली (मध्यमवर्गीय, सुखवस्तू विचारांत-वातावरणात वाढलेली) पिढी आहे. त्यामुळे या निमित्तानं चालून आलेली आयती संधी कोण सोडेल? खांडेकर यांनी या लेखात मांडलेल्या गोष्टींवर सर्वानीच विचार करायला हवा.
अमृता मोरे
प्रकाशाकडे वाटचाल
गेल्या आठवडय़ात ‘लोकसत्ता’ मध्ये तुम्ही लिहिलेल्या लेखासंबंधी मी मत मांडू इच्छिते. तुमचे लेख ज्याप्रमाणे वाचत गेले त्यानंतर लेखाची भाषा, त्याची भूमिका आणि एकंदरीतच सध्याचे वातावरण यासंबंधी तुमच्या या लेखाबद्दल तुमचे अभिनंदन. सध्याचे एकूण अंध:कारमय वातावरण बघितल्यानंतर तुमच्या लेखनामधून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा निश्चित मिळते.
जाई आपटे

No comments:

Post a Comment