ऑपरेशन सिंदूर'
आणि देशहितावरील राजकारण
युद्ध किंवा सीमावर्ती कारवाई केवळ लष्कराच्या
सामर्थ्यावर अवलंबून नसते, तर तिची खरी ताकद जनतेचा
पाठिंबा आणि राष्ट्रभावनेने प्रभावित कृतीशील जनता असते. अशा परिस्थितीत
देशाची एकजूट टिकवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. १४० कोटी भारतीय एकमुखाने भारतीय
लष्कराच्या पाठीशी उभे असतानाही, काही विरोधकांनी पहलगाम
दहशतवादी हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "दहशतवाद्यांनी धर्म विचारून
गोळ्या झाडल्याच नाहीत," अशी भूमिका काहींनी घेतली.
भारताने नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी केले. या कारवाईत १०० हून
अधिक दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानने भारतावर डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सला
भारताने चोख प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे पाकिस्तानच्या हवाई
तळांचे आणि दारूगोळा भांडारांचे मोठे नुकसान झाले. यामुळेच पाकिस्तानने नमते घेत
भारताकडे युद्धविरामाची मागणी केली आणि ती मान्य झाली.
काही जणांना भारत-पाक युद्ध हवे होते, पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची मागणी अनेकांनी केली होती. काही जणांनी
"देश न जिंकलेल्या युद्धाचा विजय साजरा करत आहे," असे
तारे तोडले. पाकिस्तानने स्वतःच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर यादीही प्रसिद्ध
केली. भारताचा हेतू साध्य झाला, मात्र भारत-पाक युद्धाची वाट
पाहणाऱ्या विरोधकांचा हेतू साध्य न झाल्याने त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड
उठवली.
देशहितावर राजकीय टीका: काही
प्रश्न
भारत सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगभरात
पाठवण्याचा निर्णय घेतला असताना, काही राजकीय पक्ष "पुरावे
द्या, पारदर्शकता कुठे आहे" अशा मागण्या करताना दिसतात.
देशहिताच्या विषयांवर किमान सर्वपक्षीय एकजूट अपेक्षित आहे.
अनेक विचारतात की आपण किती विमाने गमावली,
पण ते कधीही विचारत नाहीत की या युद्धात भारतीय सैन्याने किती
पाकिस्तानी विमाने पाडली किंवा किती विमानतळ उद्ध्वस्त केले.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याबाबत काही म्हणाले,
"भावाभावांना आपसात लढवण्यासाठी ही घटना घडली आहे."
त्यांनी स्पष्ट करावे की कोण आणि कुणाचे भाऊ? अजून कितीवेळ
या असल्या दहशतवादी 'भाईं'चा चारा
व्हायचे आहे? दहशतवाद्यांनी केवळ हिंदू असल्याने २६ हिंदूंना
त्यांच्या पत्नी आणि लहान मुलांसमोर मारले. ते पुरुष मुस्लिम आहेत का, हे तपासण्यासाठी पॅन्टही उतरवल्या. तरीही काही नेते म्हणाले की,
"दहशतवाद्यांना इतका वेळ असतो का, की ते
कुणाचा धर्म विचारून मारतील?" याचाच अर्थ, दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंब खोटे बोलत आहेत. पीडितांना खोटे ठरवून
दहशतवादी 'धर्मांध' नव्हतेच, असे सांगण्याचा खटाटोप का केला? एका
मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानसोबत युद्ध नको असे मत व्यक्त केले. पाकिस्तानचा इतका
पुळका का?
तसेच, त्या
दहशतवाद्यांनी महिलांना हातही लावला नाही, असे काही म्हणाले.
दहशतवाद्यांनी महिलांना मारले नाही, केवळ हिंदू पुरुषांना
मारले, याबद्दल त्यांचे उपकार मानायचे का? मतांच्या लाचारीसाठी काही राजकीय नेते काहीही विधाने करू शकतात का?
या घटनेनंतर एक मात्र सिद्ध झाले की,
देशाचा शत्रू सीमेपारच नाही, तर भारताच्या
आतमध्येही दबा धरून बसला आहे. समाजकारण, राजकारण आणि
प्रसारमाध्यमात असलेल्या, देशशत्रूंचे उघड किंवा छुपे समर्थन
करणाऱ्या विषारी सापांचे काय करायचे, हाच प्रश्न आहे.
अंतर्गत शत्रू, कठोर कारवाईची गरज
सीमेबाहेर आणि अंतर्गतही गृहयुद्ध पुकारणाऱ्या या
असल्या लोकांवर आता कडक कारवाई होणे गरजेचेच आहे. या देशद्रोह्यांना ठेचायलाच हवे.
नागरिक म्हणून आपली भूमिका
भारतात चाललेल्या भारतविरोधी किंवा देशद्रोही
प्रचाराचा उपयोग पाकिस्तान आणि चीनने माहिती युद्धात (Information
Warfare) विजय मिळवण्यासाठी पुरेपूर करून घेतला आहे. पाकिस्तानी
लष्कराच्या प्रवक्त्याने एका पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर एक
व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये, भारताचे प्रसिद्ध पत्रकार
श्री. करण थापर हे काश्मीरचे माजी राज्यपाल श्री. सत्यपाल मलिक यांची मुलाखत घेत
होते. या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, पुलवामामध्ये
सीआरपीएफच्या जवानांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नाही, तर
भारतानेच मारले आणि पाकिस्तानवर खोटे आरोप केले. पुलवामा हल्ला झाला तेव्हा
सत्यपाल मलिक हे काश्मीरचे राज्यपाल असल्याने त्यांच्या विधानाला महत्त्व दिले
जाते.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर शंभरहून
अधिक भारतीयांचे व्हिडिओ दाखवले, ज्यात हे भारतीय, भारतविरोधी भाषा वापरत होते आणि पाकिस्तानची बाजू मांडत होते. थोडक्यात,
हे भारतीय आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून
काम करत होते आणि हे सिद्ध करत होते की भारताने किंवा भारतीय प्रवक्त्यांनी दिलेली
माहिती चुकीची होती आणि पाकिस्तान जे म्हणत होता ते बरोबर होते.
पाकिस्तानला मिळालेला 'मानसिक विजय'
या युद्धात पाकिस्तानने मोठा मानसिक विजय मिळवला
का?
पाकिस्तानने जगाचे लक्ष दहशतवाद/दहशतवादी हल्ल्यांपासून काढून घेतले
आणि यावर लक्ष केंद्रित केले की, भारत आपल्या नागरिकांचे
काश्मीरमध्ये रक्षण करू शकला नाही, पाकिस्तानने भारताचे खूप जास्त
लष्करी नुकसान केले आहे, युद्धात भारताचा पराभव झाला आहे आणि
पाकिस्तानच्या लष्कराने जास्त चांगली कामगिरी बजावली आहे.
याचा परिणाम असा झाला की,
वेस्टर्न मीडियाने लिहिलेले लेख किंवा संपादकीय बहुतेक वेळा
भारताच्या विरोधात होते आणि पाकिस्तानच्या बाजूने होते. खरे तर, वेस्टर्न मीडियाने भारताचे समर्थन करायला पाहिजे कारण भारत एक लोकशाही
राष्ट्र आहे, परंतु त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात
असलेल्या पाकिस्तानचे म्हणणे बरोबर आहे असे सांगितले. वेस्टर्न मीडियाने अशा
प्रकारची मते बनवण्यामध्ये भारताच्या आत भारतीयांनी केलेल्या देशविरोधी
विधानांचा पुरेपूर वापर केला.
थोडक्यात, माहिती युद्धात
किंवा मानसिक युद्धात भारत खूपच मागे पडला. पाकिस्तानला हे मानसिक युद्ध जिंकण्यात
मदत करणाऱ्यांवर देशाच्या आत काय कारवाई करायची हे भारतीय जनतेने ठरवायला पाहिजे.
देशविरोधी प्रचाराला आळा
घालण्यासाठी उपाययोजना
परदेशातील वर्तमानपत्रांचे अनेक पत्रकार जे
भारताच्या विरोधात लिहितात, त्यांची ओळख पटवून
त्यांच्याविरुद्ध देखील कारवाई करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, त्यांच्यावर भारतात बहिष्कार टाकला जाऊ शकतो. त्यांना भारतात येण्यासाठी
व्हिसा देणे थांबवले जाऊ शकते. एवढेच नव्हे, तर ते ज्या
वर्तमानपत्रात लिहितात त्या वर्तमानपत्रावर सुद्धा बहिष्कार टाकला जाऊ शकतो किंवा
त्यांना भारताच्या आत ब्लॉक केले जाऊ शकते.
'ऑपरेशन सिंदूर' संपून अनेक दिवस झाले आहेत, परंतु अजूनही हे अपप्रचार
युद्ध, दुष्ट प्रचार युद्ध किंवा मानसिक युद्ध सुरूच आहे.
नागरिक म्हणून आपली जबाबदारी:
माहिती योद्धा बना!
अशा युद्धामध्ये देशभक्त नागरिक अत्यंत
महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. परदेशातील सोशल
मीडिया, प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये
जेव्हा जेव्हा भारताच्या विरोधात काही बोलले जाते किंवा लिहिले जाते, त्याला लगेचच प्रत्युत्तर त्या त्या मीडियामध्ये देणे गरजेचे आहे.
उदाहरणार्थ, न्यूयॉर्क टाइम्सने जर एखादा भारतविरोधी लेख
लिहिला तर न्यूयॉर्क टाइम्सला ईमेल पाठवून या लेखात केलेल्या माहितीचे खंडन करायला
पाहिजे आणि न्यूयॉर्क टाइम्सला दाखवून दिले पाहिजे की त्यांनी लिहिलेले लेख
पूर्णपणे चुकीचे आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांची व्याप्ती प्रचंड आहे. म्हणून,
प्रत्येक सुशिक्षित भारतीयाने माहिती योद्धा बनून अशा
भारतविरोधी लिखाणांवर लक्ष ठेवून त्याला प्रत्युत्तर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण तयार आहोत का?
'ऑपरेशन सिंदूर':
एक निर्णायक संदेश
'ऑपरेशन सिंदूर' ही केवळ एक सैनिकी कारवाई नाही. दहशतवाद्यांना, पाकिस्तानला
आणि देशांतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रद्रोही शक्तींना दिलेला हा निर्णायक इशारा
आहे. भारत आता केवळ प्रतिक्रिया देणारे राष्ट्र राहिले नसून, ते निर्णायक निर्णय घेणारा, विश्वासार्हता कायम
ठेवणारा आणि जबाबदारीने कारवाई करणारा देश म्हणून जागतिक पातळीवर उदयास येत आहे.
हे यश एका रात्रीत मिळालेले नाही, तर दशकभराच्या दूरदृष्टीचा,
संकल्पाचा आणि सततच्या प्रयत्नांचा तो परिपाक आहे. हे यश कायम
राखायचे असेल, तर राजकीय, सामाजिक आणि
वैचारिक स्तरावर ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने एकत्र येणे हीच काळाची मागणी आहे. राष्ट्रद्रोही शक्तींना ठेचायलाच हवे
.https://epaper.mahamtb.com/article.php?mid=Mpage_2025-06-08_d2ca7e7f24a60ac09be082fb5de81ff76844efe60ec94&JSON