Total Pageviews

Sunday 28 August 2011

LET ADMITS KILLING KASHMIRI LEADER

‘तोयबा’ला उपरती!चमत्कार झाला आहे. सूर्य पश्‍चिमेला उगवला आहे. ‘लश्कर-ए-तोयबा’ या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेला प्रथमच ‘उपरती’ झाली असून कश्मीरातील ‘एका’ हत्येची चूक तोयबाने मान्य केली आहे. २० वर्षांपासून हिंदुस्थानात दहशतवादी कारवाया घडवणार्‍या लश्कर-ए- तोयबाने आजवर हजारो निरपराधांचे प्राण घेतले. मुंबईवरील हल्ल्यांसह शेकडो हत्याकांडांमागचे ‘सत्य’ आजवर लश्कर-ए- तोयबाने कधी सांगितले नाही. त्याच तोयबाला जम्मू-कश्मीरमधील मुस्लिम विद्वान मौलाना शौकत अहमद शहा यांच्या हत्येची मात्र चुटपूट लागली आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या मौलानांच्या निर्घृण हत्येवरून कश्मीरात आगडोंब उसळला. त्यानंतर तोयबाने अंतर्गत चौकशी सुरू केली. या चौकशीत लश्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनीच मौलाना शौकत यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. तोयबाने हा चौकशी अहवाल जाहीर करताना पाकिस्तानच्या इशार्‍यावरून आमच्याच माणसांनी हे कृत्य केल्याची धडधडीत कबुली दिली आहे. विशेष म्हणजे याच लश्कर-ए-तोयबाने मौलाना शौकत यांच्या हत्येनंतर कश्मीरात हिंसाचार घडवला होता. हिंदुस्थान सरकार आणि सुरक्षा दलांनीच त्यांना ठार केल्याचा आरोपही केला होता. मौलाना हिंदुस्थानसमर्थक असणे शक्य नसले तरी त्यातल्या त्यात सुधारणावादी होते. कश्मीरातील ‘दगडफेकी’च्या घटनांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. ‘दगडफेकीचे प्रकार इस्लामविरोधी आहेत. मुसलमानांमध्ये आजकाल कोणीही उठतो आणि दगडफेकीचे फतवे जारी करतो. हे प्रकार बंद व्हायला हवेत’, अशी जाहीर भूमिका त्यांनी मांडली होती. तेव्हापासूनच ते अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आले होते. ८ एप्रिल २०११ रोजी मौलाना शौकत अहमद शहा नमाज पढण्यासाठी श्रीनगरच्या मशिदीत प्रवेश करत असतानाच शक्तिशाली स्फोट झाला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. शौकत हे ‘जमियत-ए-एहेले हदीस’ या संघटनेचे नेते होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर कश्मीरात असंतोष पसरला. मात्र हत्येच्या घटनेनंतर आठ दिवसांतच जम्मू-कश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी आठ अतिरेक्यांना अटक करून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. अटक करण्यात आलेल्या जावेद मुन्शी ऊर्फ बिल पापा आणि निसार अहमद या अतिरेक्यांनी तर मौलाना शौकत यांना ठार केल्याची कबुलीच दिली. त्यापाठोपाठ आता तोयबाच्या अंतर्गत चौकशीतही तोच निष्कर्ष निघाला आहे आणि रमजानच्या महिन्यात तो जाहीर करण्याची सद्बुद्धीही या मंडळींना झाली. शौकत यांची हत्या तर जावेद मुन्शीने केलीच, पण जेकेएलएफचा नेता यासीन मलिकलाही ठार मारण्याचा कट त्याने रचला होता, असा दावा तोयबाच्या या अहवालात केला गेला आहे. या घडामोडींमुळे कश्मीरमधील रक्तरंजित हिंसाचारामागील दहशतवादी संघटना आणि त्यांच्याआड दडलेला पाकिस्तानी हात याविषयी हिंदुस्थान आजपर्यंत करीत आलेल्या दाव्यांना पुष्टीच मिळणार आहे. अर्थात, तोयबा काही नैतिकता, प्रायश्‍चित वगैरेंची चाड बाळगणारी मंडळी नाहीत. त्यामुळे त्यांना ही उपरती का झाली, त्यामागेही काही वेगळी कारणे आहेत का, हा तपशिलाचा आणि संशोधनाचा भाग आहे. तूर्त तरी एका हत्येपुरता का होईना, हिंदुस्थानवरील खापर टळले एवढेच समजायला हवे

No comments:

Post a Comment