मीरा रोडचे पोलीस उप-अधीक्षक संबुटवाड यांना लाच घेताना अटक नवघर येथील एका कंपनीच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मीरा-भाईंदरचे माजी महापौर नरेंद्र मेहता यांच्याकडून तब्बल चार लाख रुपयांची लाच घेताना मीरारोड विभागाचे पोलीस उप-अधीक्षक नागनाथ संबुटवाड याला मुंबई तसेच ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहाथ अटक केली. महापौरासारखे मोठे पद भूषविलेल्या व्यक्तीकडून लाच मागणाऱ्या संबुटवाड याच्या अटकेमुळे पोलीस विभागातील कथीत भ्रष्टाचाराचा मोठा नमुना उघड झाला असून संबुटवाड याच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवघर येथील सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीत मेहता हे भागीदार आहेत. भाईंदर पूर्व येथील गोडदेव गाव या भागात कंपनीचा मोठा भूखंड असून या भूखंडावर दोघा बिल्डरांनी अतिक्रमण केल्याची कंपनीची तक्रार आहे. यासंबंधी पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही स्थानिक पोलीस या तक्रारीची फारशी दखल घेत नसल्याचे मेहता यांचा आरोप आहे. दरम्यान, स्थानिक पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्याने मेहता यांनी संबुटवाड याच्याशी संपर्क साधला होता. या अतिक्रमणासंबंधी कारवाई करण्यासाठी संबुटवाड याने मेहता यांच्याकडून सुरुवातीस पाच लाख रुपये मागितले. संबुटवाड याची ही मागणी ऐकून अचंबित झालेल्या मेहता यांनी यासंबंधी थेट मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. ही तक्रार प्राप्त होताच मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक एस.बी.सूर्यवंशी यांनी याप्रकरणी ठाणे विभागाची मदत घेण्याचे निश्चित केले. दरम्यानच्या काळात संबुटवाड याच्याकडे मेहता यांनी रक्कम कमी करावी, यासाठी तगादा लावला होता. बऱ्याच वाटाघाटीनंतर अखेर चार लाख रुपयांवर तडजोड झाली. आज दुपारी ठरल्याप्रमाणे मेहता चार लाख रुपये घेऊन संबुटवाड बसतात त्या कार्यालयात पोहचले. तेथे संबुटवाड याच्या कार्यालयात प्रवेश करून त्यांनी चार लाख रुपयांच्या नोटां त्याच्यापुढे ठेवल्या. लाचेचे हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली, अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दीपक साकोरे यांनी पत्रकारांना दिली.दरम्यान, अंधेरी येथील मरोळ चर्चजवळ असलेल्या वूडलँड या आलिशान इमारतीतील फ्लॅटवरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. मात्र या छाप्यात पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही, असे सूत्रांनी सांगितले
No comments:
Post a Comment