पोपटपंची!केंद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकारचा कारभार सध्या ‘निर्लज्जम् सदा सुखी’ अशा पद्धतीने सुरू आहे. एकीकडे महागाई सतत भडकवीत ठेवायची. पुन्हा ती नियंत्रणात येणे शक्य नाही असेही जनतेला ऐकवायचे आणि एवढेही कमी म्हणून की काय, महागाईचा असह्य दबाव कमी केला पाहिजे असे मानभावी उद्गारदेखील काढायचे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी हल्ली असेच उलटे-सुलटे बोलत असतात. अर्थमंत्री तुम्ही, महागाई रोखायची तुम्ही आणि तुम्हीच म्हणता की महागाईचा असह्य दाब कमी केला पाहिजे. महागाईचा दर पाच-साडेपाच टक्क्यांपर्यंत सहन करता येतो आणि तो त्या पातळीवर येण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे अर्थमंत्री म्हणत आहेत. मागील तीन-चार वर्षांपासून त्यांचे हेच तुणतुणे सुरू आहे. मात्र महागाईचा दर कमी होण्याऐवजी वाढतच गेला. गेल्या दीड वर्षात व्याजांचे दरदेखील अकरा वेळेस वाढले. हे दर वाढूनही वाढत्या महागाईवर उपाय म्हणून जनतेला कर्जबाजारीच व्हावे लागत आहे. महागाईचा दर सुसह्य पातळीवर खाली आणण्याचे गाजर अर्थमंत्री प्रणवदांनी दाखविले आहे. त्याकडे बघत आला दिवस ढकलण्याशिवाय जनता काय करू शकते? इकडे प्रणव मुखर्जी तर तिकडे दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल. ‘राष्ट्रकुल’ आणि ‘टू जी स्पेक्ट्रम’ घोटाळ्यांमुळे देशाची प्रतिमा कलंकित झाली आहे, असा साक्षात्कार या महाशयांना झाला आहे. हा साक्षात्कार झालाच आहे तर मग त्यासाठी प्रायश्चित्तदेखील घ्या. नैतिक जबाबदारी स्वीकारत सत्तेवरून पायउतार व्हा. कारण देशाची प्रतिमा कलंकित करणारे हे घोटाळे तुमच्याच सरकारचे पाप आहे. बरं, सिब्बल महाशयच काही दिवसांपूर्वी ‘टू-जी स्पेक्ट्रम’ घोटाळा झालेलाच नाही अशी मुक्ताफळे उधळत होते. मग जो घोटाळा झालाच नाही त्यामुळे देशाची प्रतिमा कलंकित कशी झाली? अर्थात, अशी काही तरी पोपटपंची करण्याशिवाय प्रणवदा असोत, सिब्बल असोत, सोनिया-राहुल असोत की पंतप्रधान असोत दुसरा पर्याय तरी कुठे आहे? कारण ना ते महागाई कमी करू शकत आहेत, ना देशाची कलंकित प्रतिमा सुधारू शकत आहेत, ना त्यासाठी प्रायश्चित्त घेण्याची हिंमत त्यांच्यात आहे.
No comments:
Post a Comment