ऑस्ट्रेलियात भारताची निंदा
ऐक्य समूह
Wednesday, August 03, 2011 AT 11:45 PM (IST)
Tags: lolak
गौरवर्णीय हेच जगात सर्वश्रेष्ठ आणि बुध्दिमान आहेत, अशा मनोगंडाने पछाडलेल्या ऑस्ट्रेलियन वंशवादी गोऱ्यांकडून भारतीय जनतेची, राष्ट्राची निंदा नालस्ती होते. दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांवर याच विकृत गोऱ्यांच्या टोळ्यांनी हिंसक हल्ले केले होते. भारतीयांविरुध्द अत्यंत घाणेरडा प्रचारही केला होता. गोऱ्या गुंडांनी केलेल्या हल्ल्यात पाच विद्यार्थ्यांचे बळी गेले. वीसच्यावर विद्यार्थी जखमीही झाले होते. केंद्र सरकारने अत्यंत कडक भाषेत ऑस्ट्रेलियन सरकारला इशारा दिल्यावर, तिथल्या पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई केल्यामुळे, हल्ल्यांचे हे सत्र थांबले. ऑस्ट्रेलियाबरोबरच इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स या राष्ट्रातही हिंदू देव- देवतांची विटंबना, निंदा नालस्तीच्या घटना घडतात. तीनच महिन्यांपूर्वी श्री लक्ष्मीचे चित्र अंतर्वस्त्रावर छापायचा किळसवाणा उद्योग फ्रान्समधल्या कंपनीने केला होता. अशा प्रत्येक घटनांच्यावेळी त्या देशातल्या भारतीयांनी जोरदार आवाज उठवल्यावरच, भारतीय दैवतांची निंदा करणाऱ्या घटनांची तेथील सरकारे गंभीर नोंद घेतात. मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आणि "वसुधैव कुटुंबकम' अशी परंपरा असलेल्या भारतीयांनी मात्र अन्य धर्मांची, वंशांची अशी विटंबना कधीही केलेली नाही. पाश्चात्य देशात हिंदू अल्पसंख्य असल्याने आणि आमच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी केंद्र सरकारचा जगात धाक नसल्यानेच, ही असली विकृतीची गटारगंगा अधूनमधून वहायला लागते.
ऑस्ट्रेलियातल्या भारतीय विद्यार्थ्यांचा याच वंशवादी गोऱ्या कातडीच्या टोळक्यांनी प्रचंड छळ केला होता. आता भारतीयांच्या मानबिंदूवर आणि पारंपरिक पवित्र आदराच्या प्रतिकावरही जाहीरपणे निंदा नालस्ती करायचे साहस, ऑस्ट्रेलियातल्या काही वंशवाद्यांनी सुरू केल्याची घटना अलिकडेच चव्हाट्यावर आली. या देशातल्या स्थानिक रेडिओवरील कायिली सॅडिलॅंड या निवेदकाने, प्रक्षेपित केलेल्या कार्यक्रमात हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक असलेली पवित्र गंगा नदी ही गटारगंगा आहे तर तर भारत हे मलद्वार उकिरडा आहे, अशी अक्षम्य टिप्पणी केली. ऑस्ट्रेलियातल्या भारतीयांनी संघटितपणे त्याच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करुन तो निवेदक आणि त्याचा कार्यक्रम प्रक्षेपित करणाऱ्या रेडिओ केंद्राने माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करायचा इशारा दिला. रस्त्यावर उतरुन भारतीयांनी त्याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पण सॅडिलॅंडने अद्यापही माफी मागितलेली नाही. उलट आपण केलेले वक्तव्य योग्यच असल्याचा दावा करीत त्याने, भारतीयांच्या भावना दुखावावयाचे धाडस केले आहे.
सॅडिलॅंडच्या वक्तव्याने भारताताच अपमान-विटंबना झाली असली तरीही, केंद्रीय परराष्ट्र खात्याने अद्यापही, त्याची गंभीर दखल घेतलेली नाही. वास्तविक राजधानी दिल्लीतल्या ऑस्ट्रेलियन राजदूताला बोलावून घेऊन केंद्र सरकारने या गंभीर आणि उभय राष्ट्रांच्या संबंधावर परिणाम घडवणाऱ्या वक्तव्याचा जाब विचारायला हवा होता. पण तसे घडले नसल्याने, ऑस्ट्रेलियातल्या विकृत वंशवाद्यांच्या टोळक्यांना अधिकच चेव आला. त्याचे वक्तव्य भारतीयांच्या भावना दुखावणारे असल्याने, केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करायला हवा. अन्यथा अन्य देशातही भारत, भारतीय देवता, परंपरा, आदराच्या स्थानावर असेच शाब्दिक हल्ले होतील. भारत हा धर्मनिरपेक्षतावादी
देश असला तरीही, तो हिंदू बहुसंख्याक
आहे. हिंदूंच्या भावनांशी खेळायचा अधिकार जगातल्या कोणत्याही वंशाच्या आणि धर्माच्या लोकांना नाही, असा आक्रमक पवित्रा केंद्र सरकारने घेतला नाही तर, पाश्चात्य देेशाच्या अल्पसंख्याक हिंदूंचा जाणूनबुजून अपमान-विटंबना करायच्या घटना वाढतील, याचे
भान सरकारने ठेवायला हवे. मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या वादग्रस्त पुस्तकावर, ते भारतात यायच्या आधीच केंद्र सरकार तातडीने बंदी घालते. अल्पसंख्या- कांच्या भावनांची सत्तेचे राजकारण करणाऱ्या सरकारला काळजी वाटते. पण हिंदूंच्या भावनांची मात्र कुणीही विटंबना करावी, असे पक्षपाती धोरण स्वीकारल्याने, आंतरराष्ट्रीय जगात भारत आणि भारतीयांची अधिकच बदनामी होईल, त्याचे काय? "म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो', हे धर्मनिरपेक्षतेचा गजर करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.
- वासुदेव कुलकर्णी
No comments:
Post a Comment