अजय देवगणचा ‘सिंघम’ सध्या फारच गाजत आहे. अजय देवगणने या चित्रपटात एका प्रामाणिक व धाडसी पोलीस अधिकार्याची भूमिका बजावली आहे. चित्रपटात दुष्टांना धडा शिकवून त्याने सामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीदवाक्य खरेच असल्याचे अजय देवगणने चित्रपटात आपल्या कसबी अभिनयाने दाखवून दिले आहे. पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी असावा तर सिंघमसारखा असे चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटते, इतका हा चित्रपट लोकांना भावला आणि प्रभावी झाला आहे. पुण्यात ज्यांनी सिंघम पाहिला त्यांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्या रूपातही सिंघम दिसला. अजय देवगणसारखी तीच धडाडी, तोच आवेश पाहून पुणेकर नव्या दमाच्या संदीप कर्णिक यांच्या प्रेमात पडले. मोबाईलवर २४ तास उपलब्ध होणार्या संदीप कर्णिक यांना दारू, मटका आदी गैरधंद्यांची, गुंडांची लोक माहिती देऊ लागले. त्याप्रमाणे संदीप कर्णिक कारवाई करू लागले. तीन महिन्यांपूर्वी पुणे ग्रामीणची सूत्रं हाती घेणारे संदीप कर्णिक हे बाजीराव सिंघमप्रमाणे लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यामुळे भ्रष्ट अधिकारी व पोलीस कर्मचार्यांची दुकानं बंद झाली. हस्तक्षेप करणार्या राजकारण्यांचे वांधे झाले. संदीप कर्णिक यांना हटविण्याची संधी ते शोधू लागले आणि गेल्या आठवड्यात घात झाला. मराठमोळ्या बाजीराव सिंघमला अखेर दृष्ट लागली. पुण्यात कधी घडले नाही असे घडले.मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाइपलाइनद्वारा पाणी देण्यास विरोध करण्यासाठी (राष्ट्रवादी कॉंग्रेस वगळता) सर्व पक्षांनी पुकारलेल्या मावळ बंदला हिंसक वळण लागले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका महिलेसह तीन शेतकरी ठार झाले. यापूर्वीची पुण्यातील आंदोलने पोलिसांनी लाठीमार करून चिरडून टाकली होती. मग यावेळीच पोलिसांना गोळीबार का करावा लागला, असा प्रश्न घटनास्थळी उपस्थित असलेल्या संदीप कर्णिक यांना विचारला असता ते म्हणाले, ‘‘आंदोलकांनी कायदा हातात घेतला होता. आंदोलक डोंगरावर चढून हायवेवरून शंभरच्या वरच्या स्पीडने पळणार्या वाहनांवर दगडफेक करून वाहने अडवत होते. हायवे तसा बंद करता येत नाही, तरीही रास्ता रोको करून गाड्या अडविल्या जात होत्या. पोलिसांवर हल्ले केले जात होते. जमिनीवर पडलेल्या इंगोले या पोलीस निरीक्षकाला दगड टाकून मारण्याचा प्रयत्न सुरू होता. दुसरा एक मोठा दगड त्यांच्या डोक्यात हाणणार इतक्यात आपण हवेत गोळीबार करून इंगोलेना वाचविले. नाहीतर इंगोलेंना प्राण गमवावे लागले असते. त्यानंतरच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि मावळ येथे अभूतपूर्व असा प्रकार घडला, असेही संदीप कर्णिक यांनी सांगितले.मावळ येथील गोळीबारप्रकरणी एक पोलीस निरीक्षक, एक फौजदार व चार पोलीस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले, तर संदीप कर्णिक आपल्या पुण्याईवर तूर्त तरी बचावले आहेत. परंतु बदलीची टांगती तलवार त्यांच्या मानेवर आहे. आज आपल्या देशात आंदोलन व रास्ता रोको करण्याचे कोणते नियम नाहीत. पोलिसांनी कसा गोळीबार करावा, आंदोलन कसे हाताळावे याचे मात्र कागदोपत्री नियम आहेत, परंतु ते कधीही पाळले जात नाहीत. वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहताही कधी कधी पोलीस आपला जीव वाचविण्यासाठी गोळीबार करतात. परंतु मावळ येथे शेतकर्यांच्या मागे लागून गोळीबार करणारे पोलीस पाहून सर्वांना धक्काच बसला. आंदोलकांनी किती जरी दगडफेक केली असली तरी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. संदीप कर्णिक यांनी इंगोलेना वाचविण्यासाठी हवेत गोळीबार केला म्हणून अन्य पोलिसांनी आपल्या बंदुका नि:शस्त्र शेतकर्यांवर रोखण्याची गरज नव्हती. तेव्हा हिंसक आंदोलकांप्रमाणे खाकी वर्दीतही बिनडोक्याचे सैतान आहेत. त्या सैतानांना कोण कसे रोखणार?हिंसक जमावाला जसे हाताळणे कठीण असते तसेच पोलिसांमधील सैतानांनाही आता रोखणे कुणाच्या हाती राहिलेले नाही हे मावळ येथील प्रकारावरून दिसून येते. आज या देशात कुणीच सुरक्षित नाही. कधी कोण कुठे उठाव करील, जाळपोळ करील, रास्ता रोको करून सामान्यांचे जीवन वेठीस धरील याचा नेम राहिलेला नाही. लोक दिवसेंदिवस बेशिस्त होत चालले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात अनेकांना आज सर्वत्र भूषण वाटत आहे. लोकशाही मार्गाने संताप, क्रोध व्यक्त करण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु कुणावर हल्ला करण्याचा, त्याचा जीव घेण्याचा नाही. कोणतीही हिंसा ही माणुसकीला काळीमा फासणारीच आहे. संदीप कर्णिक यांनी हवेत गोळीबार करून पोलीस निरीक्षक इंगोलेंना वाचविले, तर निलंबित झालेल्या पोलिसांनी नेम धरून तीन शेतकर्यांना संपविले. माणसा-माणसामधील हाच तो फरक आहे. कोण देव म्हणून धावून येतो, तर कुणी यमदूत होऊन घाला घालतो. खाकी वर्दीत देवही आहेत आणि सैतानही आहेत. त्यासाठी सार्या पोलीस दलाला दोष देऊन काय उपयोग? पोलिसांसारखा असुरक्षित प्राणी या जगात नाही हे आजचं शेंबडं पोरही सांगेल.
No comments:
Post a Comment