Total Pageviews

Friday, 5 August 2011

COASTAL SECURITY MY ARTICLE IN SAKAL

सागरी सुरक्षेच्या पोकळ गप्पा!
हेमंत महाजन
Friday, August 05, 2011 AT 12:34 PM (IST)

वर्सोवा किनाऱ्यावर अनाहूतपणे दाखल झालेल्या जहाजाने सागरी सुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचेच स्पष्ट केले आहे. अतिरेकी काय सुरक्षा संस्थांना आधी संदेश पाठवून हल्ला करणार आहेत काय?
भारतावर सागरीमार्गे हल्ला करायचा झाला तर अतिरेक्‍यांनी फक्त एकच सावधगिरी बाळगावी- आपण अमुक एका बोटीतून येतो आहोत, अशी माहिती नौदल, तटरक्षक दल अथवा पोलिसांना द्यायची नाही. तेवढी एक खबरदारी घेतली की मग त्यांना कोणीही अडवणार नाही. जुहूच्या किनाऱ्यावर येऊन रुतलेल्या "एमव्ही पॅव्हिट'च्या निमित्ताने हा संदेश जगभरातील अतिरेक्‍यांना मिळाला आहे. त्याचे कारण २६/११ च्या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचे जबाबदारी मोठ्या गाजावाजाने आणि मोठा निधी खर्च करून ज्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, त्यांच्यातर्फे पॅव्हिटप्रकरणी असा खुलासा करण्यात आला आहे, की त्या जहाजावर कोणीच नसल्याने आमचा त्याच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. याचाच अर्थ, हल्ला करण्यासाठी आलेल्या अतिरेक्‍यांनी आमच्याशी संपर्क न साधल्याने आम्हाला ते आल्याचे कळलेच नाही, असाही खुलासा या यंत्रणेतर्फे होऊ शकेल!

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या सुरक्षा संस्थांचे पितळ उघडे पाडण्याचे काम वर्सोवा किनाऱ्याला अनाहूतपणे येऊन पोचलेल्या "एमव्ही पॅव्हिट'ने केले आहे. ओमान किनाऱ्यावर रस अल मद्रकाहपासून ११० सागरी मैल अंतरावर असताना एमव्ही पॅव्हिटचे इंजिन बंद पडले आणि इंजिनरूममध्ये पाणी शिरण्यास सुरवात झाली. त्यानंतर तेथे त्यातल्या त्यात जवळून जाणारे एक जहाज शोधण्यात आले. ते भारतीय ध्वज असलेले एमटी जग पुष्पा होते. त्या जहाजाला मदतीसाठी पॅव्हिटच्या दिशेने वळवण्यात आले आणि त्यावरील १३ कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर एमव्ही पॅव्हिटचा ठाव लागला तो थेट रविवारी, ३१ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास. तटरक्षक दलाच्या मुंबईतील मुख्यालयाला जुहू पोलिसांकडून माहिती देणारा दूरध्वनी आला. त्यानंतर धावपळ सुरू झाली. हेच आणि असेच व्हायचे असेल तर सागरी सुरक्षेच्या गप्पा तरी का मारायच्या? किनाऱ्यावर आले म्हणून ठीक; पण ते लहान-मोठ्या जहाजांना धडकले असते किंवा मग थेट सागरी सेतूच्या दिशेने गेले असते तर, संकटासाठीही ते आमंत्रण ठरले असते.

१९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटांनंतर सर्वप्रथम "ऑपरेशन स्वान' हाती घेण्यात आले. त्यात भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचा समावेश होता. त्यानंतर नौदलाचेही त्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आणि मग नौदल आणि तटरक्षक दलामध्ये कुरबुरी सुरू झाल्या. ऑपरेशन "स्वान'मध्ये राज्य शासनाचाही सहभाग होता. पण मुंबई पोलिसांनी, "प्रशिक्षण आणि साधनांच्या अभावामुळे आम्ही फार काही करू शकत नाही,' अशी भूमिका त्या वेळेस घेतली होती. २६/११ च्या हल्ल्याने तर सर्वच सुरक्षा यंत्रणांना उघडे पाडले. मुंबई पोलिसांसाठी गस्ती नौका घेण्यात आल्या... पण एक एक करत घेतलेल्या गस्ती नौका आल्या त्याच क्रमाने बंदही पडत गेल्या. काही काळ नौदलासोबतचे प्रशिक्षण झाले; पण नंतर परत पुढे काहीच ठोस झाले नाही. त्यावरून दहशतवादी आले असते तर त्यांनी काय त्या सिस्टिमशी संपर्क साधला असता का?...

तेवीस तास गस्तीविना! आठवड्याला ६०० लिटर पेट्रोल मिळत असल्यामुळे समुद्रावर दिवसाला फक्त एक तास गस्त घातली जात असल्यामुळे उर्वरित २३ तास राज्याचा समुद्र सुरक्षेविना खुला पडला आहे आणि याचमुळे १९९३ मध्ये मुंबईवर झालेल्या बॉंबहल्ल्यासाठी कोकणातून खुलेआम आरडीएक्‍स येऊ शकले; तसेच "२६/११' ला कसाब व त्याचे सहकारी कुलाब्यावरून मुंबईत घुसले ते समुद्रमार्गेच! ठाणे ते सिंधुदुर्गापर्यंत पसरलेल्या राज्याच्या ७२० किलोमीटरच्या किनाऱ्याची सुरक्षा आजघडीला ऐरणीवर आहे. य१३/७' च्या हल्ल्यानंतर तो पुन्हा चर्चेला आला इतकेच! यामार्गे कधीही दहशतवादी समुद्रात घुसू शकतात हे वास्तव आहे. समुद्रकिनाऱ्यावरून येणाऱ्या संशयित वाहनांची, तसेच माणसांची तपासणी करण्याचीही यंत्रणा आजही उपलब्ध नाही. पोलिस चौक्‍या या फक्‍त चोरटी दारू वाहतूक पकडण्यासाठीच आहेत की काय? तेथील पोलिसांकडे दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रांऐवजी फक्त काठ्या आहेत.

ठाणे परिसरात काही ठिकाणी बोटी आहेत; पण जेटी नाहीत. मुंबईत २४ स्पीड बोटींची गरज असून, सध्या फक्त १३ बोटी उपलब्ध आहेत. यांपैकी ९ जुन्या असून, ४ नवीन आहेत. याशिवाय वांद्रे, मढ, खार, कफ परेड या ठिकाणी ४ जेटी उभारण्यासाठी २६ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. पावसात समुद्राला उधाण
असते, असे कारण देत सरकार तीन महिने गस्त बंद ठेवते, असेही पाहणीत आढळून आले आहे.

जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर रुतलेल्या "विस्डम' या जहाजापाठोपाठ पॅव्हिट हे जहाज नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलिस असे तिहेरी कवच भेदून त्या किनाऱ्यावर धडकले आहे; पण त्याचा तब्बल आठ तास कोणालाच थांगपत्ताही लागला नाही. त्यावरून किनारपट्टी ही दहशतवाद्यांसाठी सताड खुली असून, वाढीव सागरी सुरक्षेचा राज्य सरकारचा दावा फोल ठरला आहे.
(लेखक निवृत्त ब्रिगेडिअर आहेत.)
प्रतिक्रिया
On 05/08/2011 04:10 PM D.P.Godbole said:
गृहमंत्री पाकिस्तानला आपणासहव्या असलेल्या अतिरेक्यांची पाकिस्तानला चुकीची यादी देतात, परराष्ट्रमंत्री युनोत चुकीचे भाषण वाचायला सुरुवात करतात,ह्या काही फार मोठ्या चुका नाहीत असे समर्थन करतात गस्त घालायला डीझेल नसते.सुरक्षा दल पावसाळ्याचे कारण सांगेल नाही तर काय.यथा राजा तथा प्रजा आम्ही सामान्य जन "ठेविले अनंते तैसेची राहावे (अतिरेक्यांच्या गोळ्या खाऊन) एके दिवशी मरून जावे"दुसरे काय हातात आहे.
On 05/08/2011 02:10 PM अमोल, न्यू जर्सी said:
धन्य आमचे सरकार आणि धन्य ती (अ)सुरक्षा यंत्रणा. हा देश खरच रामभरोसे चालला आहे आणि कोणीतरी अजूनही पुण्यवान आहे या देशात!!!

No comments:

Post a Comment