राज्यात वृद्ध महिलांवर अत्याचार होतात आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाच शर्विलकांचा प्रसाद मिळतो. कायदा -सुव्यवस्थेचे यापेक्षा धिंडवडे ते कोणते?
या चोरट्यांना काय म्हणावे?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ. सत्त्वशीला चव्हाण यांची पर्स चोरट्यांनी मारली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी प्रवासाला निघतात तेव्हा त्यांच्याबरोबर पोलिसी फौजफाटा असतो. सुरक्षेचा पुरता इंतजाम असतो तरीही सौ. मुख्यमंत्र्यांची पर्स मारली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच या राज्यात सुरक्षित नसतील तर सामान्य महिलांचे काय हाल होत असतील? त्यांनी कुणाच्या भरवशावर बाहेर पडायचे? दोनच दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील वीरगाव येथे दरोडेखोर घरात घुसले व त्यांनी वृद्ध महिलांनाही सोडले नाही. महाराष्ट्रात जागोजाग कोठेवाडीची पुनरावृत्ती होत आहे. अबलांवर आणि सबलांवरही अत्याचार होत आहेत. महिलांचे खून आणि बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. त्या किती टक्क्यांनी वाढल्या किंवा घटल्या या आकडेमोडीत आम्हाला पडायचे नाही, पण शाहू, फुले यांच्या महाराष्ट्रात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्याच्या राज्यात महिला-मुली सुरक्षित नाहीत. मात्र त्याबद्दल आमच्या राज्यकर्त्यांना लाजा वाटत नाहीत. स्त्रीभ्रृण हत्येचे प्रमाण महाराष्ट्रात वाढले आहे. मुलींना गर्भातच मारून उकिरड्यावर फेकण्याचे अमानुष प्रकार या पुरोगामी महाराष्ट्रातच व्हावेत यासारखे दुर्दैव ते कोणते? ‘पहिली बेटी धनाची पेटी’ असे पूर्वी प्रेमाने म्हटले जात होते, पण ग्रामीण महाराष्ट्रात या धनाच्या पेट्या नष्ट केल्या जात आहेत. धनाच्या पेट्या मंदिरांच्या तळघरात सापडत आहेत व त्या धनपेट्यांची मोजदाद करताना दमछाक होत आहे, पण महाराष्ट्रातील जित्याजागत्या धनाच्या कळ्या गर्भातच खुडून मारल्या जात असतील तर या राज्याला व राज्यकर्त्यांना स्वत:स पुरोगामी म्हणून टेंभा मिरविण्याचा अधिकार नाही. गर्भात मुली मारल्या जात आहेत व ज्या जिवंत आहेत त्यांच्यावरील अत्याचार वाढले आहेत. स्त्री ही माता आहे, बहीण आहे, कन्या आहे व क्षणाची पत्नीही आहे. त्या नात्याचे संरक्षण आपण करू शकत नसू तर मर्दानगीचे शौर्यपदक लटकवून खुर्च्या उबविण्यातही तसा अर्थ नाही. महिलांना राजकीय आरक्षण देण्यापेक्षा त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे. या राज्यात महिला सुरक्षित नसतील तर नुसत्याच आरक्षणाने काय साध्य होणार? काही राजकीय पक्षांनी आता ‘बेटी बचाव’ आंदोलन व पदयात्रा सुरू केल्या आहेत, पण राजकारणी ‘स्वत:च्या बेट्या’ वाचविण्यासाठीच या आंदोलनाचा पुकारा करतात. महिलांचे आरक्षण त्यांना स्वत:च्या घरातच हवे आहे व संपत्तीही घरातच ठेवायची आहे आणि स्वत:च्याच मुलींचे रक्षण करायचे आहे. खरे तर मुलींना गर्भातच मारणार्यांना देहदंडाचीच शिक्षा ठोठावायला हवी. पण आज जित्याजागत्या मुलींना रोज मरावे लागते व जगण्यासाठी यातना सहन कराव्या लागतात. लैंगिक अत्याचारास तोंड द्यावे लागते व अनेकदा पोटाची खळगी भरण्यासाठी मन मारून शरीराचा सौदा करावा लागतो. हे चांगल्या राज्याचे लक्षण नाही. राजकारण्यांच्या व धनिकांच्या ‘बेट्या’ मजेत व सुरक्षित असतीलही, पण सामान्य घरातल्या मुलींचे काय? याचे उत्तर महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी द्यायला हवे. बेटी बचाव पदयात्रेत काही पावले चालून व मंत्रालयात घोषणा करून महिलाराज येणार नाही. मुंबईसारखी शहरे महिलांसाठी असुरक्षित बनलीच आहेत, पण जळगाव, पुणे, अकोला, बीड, परभणीसारख्या गावातही महिलांच्या बाबतीत जी झुंडशाही सध्या सुरू आहे ती फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकवणारी आहे. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे व जिजामाता ही राज्याच्या वीरमातृत्वाची ओळख आहे. महाराष्ट्राची एक कन्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदावर विराजमान झालेली असतानाच या राज्यात वृद्ध महिलांवर अत्याचार होतात आणि खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाच शर्विलकांचा प्रसाद मिळतो. कायदा आणि सुव्यवस्थेचे यापेक्षा धिंडवडे ते कोणते? पोलीस आता सांगतील की आम्ही सौ. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत होतो. त्यांच्या निर्जीव पर्सची सुरक्षा करणे ही आमची ‘ड्युटी’ नाही! खरे आहे या कायद्याच्या रक्षकांचे. सध्या फक्त मुडदे मोजण्याचे आणि उचलण्याचेच काम ते इमानेइतबारे करीत आहेत. कॉंग्रेसच्या लोकशाहीत चोरांचेच ‘आदर्श’ राज्य निर्माण झाले आहेे. लष्कराचे भूखंड चोरून टॉवर्स बांधणारे शिरजोर राज्यकर्ते बनतात. मग एक क्षुल्लकशी पर्स चोरणार्या शर्विलकांच्या नावाने का टाहो फोडता? मुख्यमंत्री त्यांच्या राजसिंहासनावर बसून आता आदेश देतील ‘कोण आहे रे तिकडे? राणीसाहेबांची पर्स चोरीस गेली. नवी कोरी पर्स आणून द्यायची व्यवस्था करा. पर्समधल्या मुद्देमालाचे नंतर बघू!
No comments:
Post a Comment