Total Pageviews

Thursday 14 July 2011

MUMBAI BLASTS SACK POLICE LEADERSHIP

‘‘चला..चला..चला..कॅन्डल तयार करा.. जेथे स्फोट घडला तेथे जमू या! आता मनमोहनसिंग आतंकवाद्यांना रागवणार.. गृहमंत्री आबा पाटील वाकडी नजर करणार्‍यांचे कंबरडे मोडण्याची घोषणा करणार.. सगळे घाबरणार..!’’
प्रसाद पुरंदरे यांच्याकडून आलेला हा एक उद्विग्न करणारा प्रातिनिधिक एसएमएस. तो या सगळ्या परिस्थितीवर भाष्य करण्यास पुरेसा आहे. सामान्य जनांची सहनशीलता आता टोकाला आली आहे. दरवेळी हल्ले झाले की त्याच त्या भेटी, तीच ती आश्‍वासने, तेच ते आंदोलन.. ज्यांचे जीव गेले, ज्यांना आयुष्यभराचे अपंगत्व आले त्यांच्याशी, त्यांच्या परिवाराशी ना कोणाला घेणे-देणे, ना कोणाला साधे सोयरसुतक. /११ नंतर अमेरिकेत पुन्हा तशी घटना कधीही घडली नाही. आपल्याकडे मात्र स्फोटांची मालिका संपत नाही हेदेखील प्रत्येक वेळी सांगून झाले. मात्र आमची मानसिकता आहे तशीच आहे. आम्हाला आमच्याच भांडणातून अजून तरी वेळ मिळालेला नाही. मुंबई पोलीस दलात उभी फूट पडली आहे हे पंतप्रधानांनीच सांगितले आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील पोलिसांवरील होणारी प्रत्येक टीका स्वत:वर झालेली टीका समजू लागले आहेत. त्यामुळे अधिकारी मात्र मोकाट वागू लागले आहेत. साहजिकच त्यांचा उरलासुरला धाकही संपला आहे. प्रत्येकाला मलाईदार पोस्टिंग हवी आहे, आबा बदल्यांमध्ये पैसे घेत नाहीत हे आता छोटे मूलही सांगेल. पण ते ज्यांच्या बदल्या करतात ती मंडळी आपापल्या हद्दीत मॉल’ उघडून बसली आहेत. कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही, प्रत्येक अधिकार्‍याची बदली कोणत्या ना कोणत्या आमदाराच्या शिफारशीशिवाय होत नाही. एसआयडी, एटीएस काय करतात याचा कोणी कधी जाब विचारत नाही. विचारला गेला तरी तो कधी समोर येत नाही. एसआयडीने कधी मोठी खळबळजनक माहिती समोर आणली आणि त्यातून मोठी दुर्घटना टाळता आली असे एकही उदाहरण गेल्या दहा वर्षांत समोर आलेले नाही. एसआयडी किंवा सीआयडीमध्ये नोकरी मिळाली तर पेढे वाटले जायचे असा सन्मान या पदाला त्या वेळचे प्रमुख बी.एन. देशमुख यांनी मिळवून दिला होता. आज या जागेवर बदली म्हणजे शिक्षा असे चित्र तयार झाले. कोणालाही इंटेलिजन्समध्ये काम करण्यात रस नाही; कारण त्या जागी अपेक्षित कमाई नाही. बाकी अधिकार्‍यांचा वेग’ पाहून सगळ्यांनाच तसे होण्याची इच्छा बळावू लागली आहे. जगात कोणत्याही देशात जा, तेथे पोलीस ठाण्यात मिळणारी बदली म्हणजे कमीपणा समजला जातो. आपल्याकडे मात्र प्रत्येकाला मनासारखे पोलीस ठाणे हवे आहे. ते मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जातोय.
मुंबईचाच विचार केला तर या शहरातील १२ झोनपैकी किती झोनचे डीसीपी अनोळखी नंबरवरून आलेला फोन उचलतात? सामान्यांना सहजपणे उपलब्ध होतात? किती वेळा ते रात्रीच्या गस्तीच्या वेळी स्वत: हजर असतात? मुंबईत २६ अँडिशनल डीजी आहेत त्यातल्या किमान दहा जणांकडचे फारसे कामच नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त अरूप पटनायक स्वत:च जर सहा फूट उंचीचे दोन बॉडीगार्ड घेऊन फिरत असतील तर मुंबईकरांनी स्वत:ला कशाच्या भरवशावर सुरक्षित समजायचे? दहा लाखांची रॉबरी किंवा चार हत्यारे पकडली की गुन्हे शाखा लगेच मीडियाला बोलावून फोटो काढून घेण्यात स्वत:ला धन्यता मानते.
५५ हजार लोकांची पोलिसात भरती झाली, त्यासाठी कोणाला एक पैसाही द्यावा लागला नाही, मेरिटवर त्या पोस्टिंग झाल्या. दरवर्षी होणार्‍या घाऊक बदल्या-बढत्यादेखील छदाम खर्च न होता होऊ लागल्या. त्याबद्दल गृहमंत्र्यांचे कौतुक आहे; पण अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी या खात्याकडे असताना, २६/११ नंतर जे जे ठरले ते का झाले नाही, त्यासाठी कोण कमी पडले, ज्ॉकेट असोत की अन्य कशाची खरेदी असो, त्यात का विलंब झाला याचीही कारणे काय याचीही उत्तरे कोणाला नको आहेत. लोकांना मुंबई सुरक्षित कशी राहणार या एकाच प्रश्नाचे उत्तर हवे आहे आणि ते पोलीस दलातील दुफळीत दडलेले आहे. प्रत्येक अधिकारी एकमेकाला जर पाण्यात पाहू लागला तर शिस्तप्रिय दल म्हणून ओळखले जाणारे हे दल एकेदिवशी राज्यालाच घेऊन बुडेल अशी विदारक स्थिती आज निर्माण झाली आहे.
लोकांचे रोजचे जगण्यामरण्याचे प्रश्न अतिशय बिकट बनलेले असताना, नाइलाज म्हणून लोक अशा घटनेनंतरही घराबाहेर पडतात, ती त्यांची मजबुरी असते. त्याला मुंबईकरांची दिलेरी म्हणून पाठ थोपटून घेऊ नका. सतत सगळे नियम धाब्यावर बसवून, दिव्याच्या गाड्या लावून, सायरन वाजवत फिरणार्‍यांवर हे पिचलेले लोक हात टाकू लागले तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. तो दिवस आता फार दूर नाही. बेदरकार राजकारण्यांनी आणि मुजोर पोलीस अधिकार्‍यांनी ही वेळ स्वत:हून आपल्यासमोर ओढवून घेतली आहे.

No comments:

Post a Comment