‘भारतरत्न’साठी सचिनप्रमाणेच इतर काही असामान्य क्रीडापटूंचा विचार व्हायला हवा. कारण ध्यानचंद, खाशाबा जाधव, सुनील गावस्कर, कपिलदेव, विश्वनाथन आनंद, अभिनव बिंद्रा हेही या बहुमानासाठी पात्र ठरतात.
सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी बहुमान मिळण्याच्या मार्गातील बहुतेक अडथळे दूर झाल्यामुळे त्याच्या असंख्य चाहत्यांना नक्कीच समाधान वाटले असेल. त्याच्या शंभराव्या शतकाची प्रतीक्षा अख्ख्या क्रिकेटजगताला आहे. ते शतक केवळ सचिनसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी ‘सेलिब्रेशन’ असेल. सचिनचा गौरव केवळ एखाद्या व्यक्तीचा गौरव ठरणार नाही. तो गौरव असेल 22 वर्षाच्या अथक तपश्चर्येचा, निष्ठेचा, त्यागाचा. सचिनला ‘भारतरत्न’ मिळावे, यासाठी क्रीडा खात्याकडून गृह खात्याकडे आणि तेथून पंतप्रधान कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. याचे कारण म्हणजे क्रीडाक्षेत्रातील कर्तृत्वासाठी ‘भारतरत्न’ दिले जाण्याची तरतूदच नाही. राजकारण, समाजकारण, विविध कला, विज्ञान, देशसेवा यांमधील प्रदीर्घ आणि कालातीत नैपुण्याला आजवर ‘भारतरत्न’ देऊन अनेकदा गौरवले गेले होते. मग क्रीडाक्षेत्रच या बहुमानापासून वंचित का राहावे, असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत होतेच. त्यांना सचिनच्या रूपात एक अव्वल दर्जाचा ‘ब्रँड अँबॅसॅडर’ मिळाला. अर्थात सचिनच्या आधीही भारताच्या काही क्रीडापटूंनी तपश्चर्या, निष्ठा दाखवून देशाची दखल घ्यायला आंतरराष्ट्रीय समुदायाला भाग पाडले आहे. सचिनचा गौरव होत असताना, त्यांचे विस्मरण होणे हा खुद्द सचिनचाही अवमान ठरू शकतो. हॉकी आणि भारत असे समीकरण गेल्या शतकाच्या पूर्वार्धात ज्यांच्यामुळे रूढ झाले, ते ध्यानचंद हे भारताचे आद्य क्रीडारत्न होते. अॅमस्टरडॅम 1928, लॉस एंजलिस 1932 आणि बर्लिन 1936 या ऑलिंपिक स्पर्धामध्ये भारताने हॉकीत जिंकलेल्या सुवर्णपदकांत ध्यानचंद यांच्या खेळाचा मोलाचा वाटा होता. ब्रिटिश वसाहतीतला एक देश यापलीकडे क्रीडाजगतात भारताला एक अभिमानास्पद ओळख आणि अस्तित्व ध्यानचंद यांनी एकटय़ाच्या बळावर मिळून दिले होते. 1952मध्ये हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारताला हॉकीच्या बाहेर आणि एकूणच पहिले वैयक्तिक पदक मराठमोळे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले. त्यानंतर वैयक्तिक ऑलिंपिक पदकासाठी भारताला तब्बल 44 वर्षे वाट पाहावी लागली, यातूनच खाशाबांच्या पदकाचे मोल समजते. हेलसिंकीतल्या थंडीत खाशाबांना त्यांच्या कुस्तीची वर्दी ऐन वेळी मिळाली होती आणि तरीही त्यांनी ब्राँझ पदकापर्यंत मजल मारली होती. ध्यानचंद आणि खाशाबा हे दोघेही त्यामुळे ‘भारतरत्न’चे मानकरी ठरायला हवेत. क्रिकेट हा भारताचा एक धर्म बनून गेला आहे आणि क्रिकेटपटू म्हणजे जणू देवच. पण सुरुवातीच्या काळातले भारतीय क्रिकेटपटू म्हणजे ‘जंटलमन लूझर्स’ होते. खेळातला आनंद मनमुराद लुटायचे आणि इतरांनाही तो भरभरून द्यायचे. पण जिंकणे आणि त्यासाठी क्रिकेट गंभीरपणे खेळणे त्यांना माहित नव्हते. हा अॅप्रोच ज्यांनी बदलायला लावला अशी दोन ठसठशीत नावे म्हणजे सुनील गावस्कर आणि कपिलदेव निखंज! कारकीर्दीतल्या सुरुवातीच्या दौऱ्यात, तेही वेस्ट इंडिजविरुद्ध 774 धावा काढून सुनील गावस्कर यांनी क्रिकेट जगतात कायमस्वरूपी ठसा उमटवला. त्यांच्या 34 शतकांपैकी 13 वेस्ट इंडिजच्या तोफखान्याविरुद्ध होती. भारतीय क्रिकेट म्हणजे थट्टेचा विषय नाही, हे त्यांनी सडेतोड वागणुकीतून दाखवून दिले. कपिलदेव यांनी ‘फलंदाजांच्या आणि फिरकीपटूंच्या भारतात’ मध्यमगती गोलंदाजीमध्ये करिष्मा दाखवतानाच, पहिला वर्ल्डकप भारताला जिंकून दिला. भारतात दुसरी क्रिकेट क्रांती झाली, त्याचे श्रेय अशा रीतीने कपिलना जाते. सचिन तेंडुलकरचा उदय झाला, त्याला समांतर जगात विश्वनाथन आनंद या असामान्य भारतीय बुद्धिबळपटूची कीर्ती पसरली. चार वेळा जगज्जेतेपद पटकावल्यानंतर विश्वनाथन आनंद आज भारताचा सर्वोत्तम क्रीडापटू ठरतो. ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देण्याची करामत अभिनव बिंद्राने तीन वर्षापूर्वी बीजिंगमध्ये केली. या सर्वानी सचिनप्रमाणेच आपापल्या क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करून देशाचे नाव उज्ज्वल केले. ‘भारतरत्न’ क्रीडापटूंच्या टीममध्ये सचिनप्रमाणेच त्यांचाही सहभाग व्हावा
No comments:
Post a Comment