जीवाशी खेळ
ऐक्य समूह
Thursday, July 21, 2011 AT 01:00 AM (IST)
Tags: editorial
गेल्या काही वर्षात आषाढाच्या धो-धो कोसळणाऱ्या पावसात निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी, पावसाळी ट्रेकिंग, सहलींचे प्रमाण खूप वाढले आणि अति उत्साहाच्या भरात बळी जाणाऱ्या युवक-युवतींची संख्याही वाढली. मुसळधार पावसात चिंब भिजत, निसर्गाचा आनंद लुटणाऱ्या युवक-युवतींच्या टोळ्या धबधबे, किल्ले पहायसाठी जातात. शहरी भागातल्या युवक-युवतींना निसर्गापासून सक्तीने दूर रहावे लागते, त्यामुळेच मौज मस्तीसाठी पावसाळी भटकंती त्यांना अनोखी आणि अपूर्व वाटते. पण या अति उत्साहाच्या भरात ही टोळकी आपल्या जीवाशी खेळ करतात. त्यातल्या काहींचे बळीही जातात. इंदौर जवळचे "पातालपानी' धबधबा हे त्या परिसरात पावसाळ्यातले प्रेक्षणीय स्थळ असले तरी, पावसाळ्यात मात्र त्या परिसरात मृत्यू घोंगावत असतो. "पातालपानी' धबधब्याच्या ओढ्याला पावसाळ्याच्या आधी फारसे पाणी नसतेच. ओढा कोरडा ठणठणीत असतो. पण या ओढ्याच्या उगमाच्या भागात पाऊस कोसळायला लागताच, ओढ्याचा प्रवाह लोंढ्यासारखा रोरावत येतो आणि पात्रातल्या लोकांना प्रवाहाबरोबर क्षणार्धात वाहून नेतो. गेल्या आठवड्यात हाच धबधबा पहायला गेलेले राठी कुटुंबातले पाच जण, पलिकडच्या काठावरुन ओढा ओलांडत असतानाच अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यात सापडले. मध्यभागी असलेल्या कातळावर परस्परांना घट्ट धरुन जीव वाचवायचा त्यांनी प्रयत्नही केला. पण पाण्याच्या प्रचंड वेगाने त्यांचे पाय निसटले आणि सारेच धबधब्याच्या अक्राळ-विक्राळ प्रवाहात गडप झाले. दैव बलवत्तर असलेले दोघे वाचले. पण तिघांचे मात्र "पातालपानी' धबधब्याने बळी गेले. ओढा ओलांडून पलिकडे जायचा आणि पाण्याच्या प्रवाहातून पुन्हा पैलतीर गाठायचा राठी कुटुंबाचा अति उत्साह असा प्राणाशी बेतला. याच धबधब्यात आतापर्यंत चाळीस जणांचे बळी गेले. त्यात आणखी तिघांची भर पडली. या धबधब्यात ज्यांचे पोटचे गोळे गेले, त्या कुटुंबियांनी त्याच परिसरात पातालपानी धबधबा हा मृत्युला निमंत्रण असल्याचा धोक्याचा इशारा देणारा फलकही लावला आहे. ओढ्यात उतरु नका अन्यथा तुमचे प्राण जातील, असा अति धोक्याचा इशारा या फलकावर दिलेला असतानाही फाजील आत्मविश्वास बाळगून युवक-युवतींच्या टोळ्या ओढ्याच्या पलिकडे जातात. धबधबा जिथे कोसळतो, त्या ओढ्याच्या पात्रातही जातात. मृत्यू अशी निसर्गाची बेताल मस्ती करणाऱ्यांच्या भोवती केव्हा फास टाकतो, हे समजतही नाही. "पातालपानी' धबधब्याच्या कोसळत्या प्रवाहाचा आनंद काठावर सुरक्षित ठिकाणी थांबून राठी कुुटुंबियांना लुटता आला असता. पण मुलगा-मुलगी आणि वडिलासह सारेच अति उत्साहाच्या भरात, धबधब्याचा प्रवाह ओलांडून पलिकडे गेले आणि राठी कुटुंबियांवर संकटाचा डोंगर कोसळला. देशातल्या विविध धबधब्यांच्या ठिकाणी आणि दऱ्या-डोंगरात, कडे-कपारीत अशा दुर्घटना दर वर्षी होतात. आपला जीव लाख मोलाचा आहे, याचे भान तरुणाईला राहत नाही. अति धाडसही अंगाशी येते. पावसाळी सहलीचा बेरंग होतो. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात. वनखाते आणि पोलिसांचा बंदोबस्त अशा सर्व धोक्याच्या ठिकाणी असावा, अशी अपेक्षा करण्यातही काही अर्थ नाही. निबिड जंगलात आणि सर्व धोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणे अशक्यप्राय बाब आहे. याची जाणीव ठेवून वर्षा ऋतुचा आनंद लुटणाऱ्या युवक-युवतींनी आणि निसर्ग प्रेमींनीही सावधानता बाळगतच, धबधबे आणि जंगल भ्रमंतीचा आनंद लुटायला हवा अन्यथा अशा दुर्घटना यापुढेही घडतच राहतील.
मौज-मस्ती आणि धिंगाणा नको
सातारा जिल्ह्यातल्या ठोसेघरच्या धबधब्यातही गेल्या नऊ वर्षात दहा युवक-युवतींचे बळी केवळ अति धिंगाणा आणि मस्तवालपणामुळेच गेले आहेत. हा धबधबा जिथे कोसळतो, त्या ओढ्याचा प्रवाह अति वेगवान असल्यामुळे, प्रवाहात उतरु नये, असा फलक वनखात्याने लावलेला असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करीत काही युवक-युवतींची टोळकी ओढ्याच्या प्रवाहात उतरतात आणि क्षणार्धात पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातात. वनखात्याने हे धोके टाळायसाठी काही वर्षांपूर्वी त्या परिसरात, निसर्गाचा-या धबधब्याचा आनंद लुटायसाठी भक्कम प्रेक्षा गॅलरीही बांधली. तेथून ठोसेघरचा धबधबा, त्याचा वेगवान प्रवाह पाहता येतो. पण धबधब्याखाली भिजायचा आनंद लुटायसाठी काही टोळकी खाली उतरतात आणि जीवाशी खेळतात. कोणत्याही स्थितीत हे असे अति धाडस आणि मौज- मस्तीच्या नावाखाली, आपलेच प्राण संकटात घालणे योग्य नाही, याचे भान निसर्गाचा आनंद लुटायच्या गोंडस नावाखाली ट्रेकिंग, जंगल भ्रमंती करणाऱ्यांनी सतत ठेवायलाच हवे. गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या वाढली. धबधबे आणि ऐतिहासिक गड-किल्ल्यांपर्यंत पोहोचायसाठी रस्तेही झाल्याने, शहरी भागातल्या युवक-युवतींना जंगल भ्रमंती अधिक सोपी झाली. श्रीमंत घरातल्या युवक-युवतींच्या काही टोळ्या निसर्गाचा आनंद लुटण्यापेक्षा दारु पिऊन धिंगाणा घालण्यात आणि अन्य निसर्गप्रेमींना त्रास देण्याचाही उद्योग करतात. गडकिल्ले हे आपल्या इतिहासाचा वारसा आहेत. त्यांची जपणूक करायला हवी. याच्याशी या असल्या टोळ्यांचे काही देणे-घेणे नसते. मौज-मस्ती म्हणजे पावसात भिजत वाट्टेल तसे नाचा, धिंगाणा घाला, दारु प्या आणि त्या दारुच्या रिकाम्या बाटल्या परिसरातच फोडून टाकून निसर्गाचे, सौंदर्यस्थळाचे विद्रूपीकरण करा, असा अत्यंत अनिष्ट पायंडा महाराष्ट्रात पडला, याची शरम संबंधितांना वाटायला हवी. सातारा शहराजवळच्या निसर्ग सुंदर कास तलावाचा परिसर या असल्या नादान टोळक्यांनी फोडलेल्या काचांच्यामुळेच धोकादायक झाला. कास तलावाचे रुपांतर काच तलावात झाले. कास पठारावर दरवर्षी फुलणारे पुष्पवैभव पहायसाठी देश-विदेशातून हजारो पर्यटकांची झुंबड त्या परिसरात उडते. त्यातही अशी काही गुलछबू टोळकी घुसायला लागली आहेत. फुलांच्या ताटव्यांची तुडवातुडवी करणे, रोपटी उपटून नासधूस करणे, ताटव्यात उभे राहून छायाचित्रे काढून घेणे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि खाद्य पदार्थांच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकून देणे, मोटारी फुलांच्या ताटव्यातच फिरवणे, उभे करणे असे प्रकार गेल्या तीन वर्षात पाडल्यामुळे कास पठाराचे सौंदर्य आणि वैभवही धोक्यात आल्याचा इशारा निसर्गप्रेमी संघटनांनी सरकार आणि वनखात्यालाही दिला. आपण निसर्गसौंदर्य पहायसाठी आलो आहोत, झाडे, फुलझाडे तोडून मोडून उद्ध्वस्त करायसाठी नाही आणि नैसर्गिक सौंदर्यस्थळे दारु पिऊन धिंगाणा घालायचे स्थळ नाही, असे या भंपक टोळ्यांना वाटत नाही. वनखाते, पोलीस आणि निसर्गप्रेमी संघटनांनीच असल्या धिंगाणेखोर टोळ्यांवर दहशत बसवायला हवी. गेल्याच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणाच्या परिसरात प्रचंड वेगाने मोटरसायकलीवरुन जाणाऱ्या काही उडाणटप्पूंनी त्या भागातल्या महिलांची टिंगलटवाळी करताच, ग्रामस्थांनी त्यांना पकडून बेदम चोप दिल्याची घटनाही घडली आहे. वर्षा सहलीच्या गोंडस नावाखाली असा धिंगाणा घालणाऱ्यांना असा प्रसादही खावा लागेल, याचे भानही या निसर्ग शत्रूंनी ठेवायला हवे
No comments:
Post a Comment