छत्तीसगडमध्ये नक्षल हल्ल्यात 9 ठार?
-
Thursday, July 21, 2011 AT 03:30 AM (IST)
राजपूर - छत्तीसगडचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांच्या ताफ्यावर नक्षल्यांनी बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास केलेल्या हल्ल्यात 9 जण ठार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट करून पूल उडविल्याने ताफ्यातील पाचपैकी दोन वाहनांचे नुकसान झाले. मृतांमध्ये एक कॉंग्रेस कार्यकर्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. जखमींना मैनपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात पटेल यांच्यासह जवळपास अर्धा डझन कॉंग्रेसी नेते बचावले असून, हल्ल्याच्या वेळी 25 ते 30 नक्षलवादी असल्याची माहिती आहे.
कॉंग्रेसच्या स्थानिक कमिटीतर्फे बुधवारी देवभोग येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी होण्यासाठी नंदकुमार पटेल यांच्यासोबत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष धनेंद्र साहू, सत्यनारायण शर्मा, आमदार अमितेष शुक्ल, कुलदीप जुनेजा तसेच बहुसंख्य कॉंग्रेस कार्यकर्ते रायपूरवरून जात होते. सायंकाळी पाचच्या सुमारास पाच गाड्यांचा ताफा गाझियाबादसाठी रवाना झाला. उदंतीपासून चार किलोमीटर अंतरावर एका लहान पुलावरून पटेल यांचा ताफा जात असतानाच नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट केला. ताफ्यातील मधात असलेले दोन वाहन या स्फोटात सापडले. चौथ्या वाहनाचे यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या वाहनामध्ये गरियाबंद क्षेत्राचे कार्यकर्ते होते. या स्फोटानंतर काही कळायच्या आत जवळच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार केला. यात स्कार्पियोमध्ये असलेले पाच कॉंग्रेस कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. घटनेच्या काही वेळानंतर पोचलेल्या पोलिसांनी नेत्यांसह सर्व जखमींना मैनपूर ठाण्यात आणले. मात्र, उपचारापूर्वीच एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. स्फोटात सापडलेल्या वाहनातील बहुसंख्य कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याची शंका कॉंग्रेस नेते धनेंद्र साहू यांनी व्यक्त केली आहे. नक्षलवाद्यांकडून आता केवळ पोलिसच नव्हे, तर राजकारण्यांनाही लक्ष्य केले जात असल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून नक्षली कारवायांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे नक्षलवाद्यांनी सरपंचासह तीन जणांची गोळ्या घालून हत्या केली होती. यात एका सरपंचाचा समावेश होता. गेल्या 43 दिवसांमध्ये तब्बल 15 जणांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे
No comments:
Post a Comment