Total Pageviews

Tuesday 19 July 2011

WHAT IS PATRIOTISM

देशभक्ती - क्रिकेट, सिनेमा आणि मेणबत्त्यांपलीकडली...
-
Tuesday, July 19, 2011 AT 02:19 PM (IST)
योगेश परळे, पुणे

देशभक्ती हा विषय खरं तर चर्चेचा नाही. कोणत्याही भारतीयास देशभक्ती शिकविण्याची गरज नाही. परंतु, आपल्या भारतामध्ये देशभक्तांचे काही प्रकार आहेत. ज्याला आपण देशभक्ती म्हणतो, त्याचा आणि आपल्या दैनंदिन आयुष्याचा संबंध असा कितीसा असतो? देशभक्ती या शब्दाचं वजन आपण कोणत्या मापात तोलतो, हे तपासून पाहण्याची गरज आहे. अनेक वेगवेगळ्या रंगीत समस्या समोर असताना आपण देशभक्ती या संकल्पनेचा अर्थ काय लावतो, हे पाहिल्याखेरीज या समस्यांच्या निराकरणासाठी अत्यंत आवश्‍यक असणारं "देशभक्तीचं टॉनिक' उपलब्ध होणार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. नक्की काय केलं म्हणजे माणूस देशभक्त होतो,हे पहाणे आवश्‍यक आहे. उदाहरणार्थ - 

भारताने पाकिस्तानला क्रिकेटच्या सामन्यात हरवले (किंवा हल्ली ऑस्ट्रेलियाला!) की आपल्या देशावरील प्रेमाला उधाण येते. या देशाच्या सर्व समस्या जणू सुटल्या आहेत, आता फारसं काही करण्याजोगंही उरलेलं नाही. तेव्हा देशावरील प्रेम दाखवायचं तरी कुठे? तर ते अशा वेळी दाखवायचं. भारत एका सामन्यात हरला, की जणू लोकांमुळे देशावर राष्ट्रीय आपत्ती कोसळली आहे, अशा थाटात चर्चा करायची किंवा कुठल्या तरी क्रिकेटपटूच्या घरावर हल्ला करायचा, वगैरे वगैरे... ही झाली सामान्य लोकांची सामान्य देशभक्ती. विजय मिळाल्यानंतर कोणीच मागे नसतो. अशा वेळी सगळेच आणि सगळ्या जणीही पुढे! रस्ते ओसंडून वाहतात, चौक फुलून जातात, आनंदाला पारावार राहत नाही, भान हरपते, उत्साहाला सीमा रहात नाही, चर्चा होते, घोषणा होतात, आरोळ्या दिल्या जातात, गाणी वाजतात, नाच होतो, देशावरील आपले प्रेम सगळ्या जगाच्या निदर्शनास येते.

भारताने अलिकडेच विश्‍वकरंडक जिंकला, तेव्हाचा काय आनंद वर्णावा? पाडुरंगाच्या भेटीला आलेल्या परब्रह्माची अवस्था संपूर्ण भारताला प्राप्त झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हासुद्धा एवढा आनंदसोहळा साजरा झाला नसेल. या क्रिकेटच्या अफूमुळे भारत काहीही विसरतो. राष्ट्रीय अपमान, देशांतर्गत बंडाळी, भ्रष्टाचार, परकीय शत्रू, विकासाचे प्रश्‍न, काहीही आणि काहीही. देशाला जोडणारा हा समान धागा आहे. भारतीयांना एकत्र आणणारा हा दुवा आहे, असलं सगळं काही मान्य करूनही या खेळापायी मोजली जाणारी किंमत मात्र भयंकर आहे. काही काळासाठी सगळचं स्तब्ध ! सरकारी कार्यालये संथ होतात (यावेळी हे कारण!). क्रिकेटशी सुतराम संबंध नसलेले खाजगी उद्योग सुस्तावतात, शाळांना अघोषित सुटी असते, जणू काही भारतालाच अघोषित सुटी असते! असो. ही आपली देशभक्ती. हा झाला आपल्या देशभक्तीचा पहिला प्रकार. या प्रकारामध्ये देशावर प्रेम करायचं म्हणजे, त्या दिवशी सुटी घ्यायची, असा अर्थ घ्यायचा असतो. एकदा "क्रिकेटवर प्रेम म्हणजे देशावर प्रेम' असं समीकरण ठरलं, की आपसुकच क्रिकेटपटू राष्ट्रीय हिरो ठरतात. त्यांनी "कव्हर ड्राईव्ह' कसा मारावा, इथपासून ते त्यांनी कार कशी घ्यावी, त्यांची बायको कोण असावी, त्यांनी लफडं कोणाबरोबर करावं, त्यांनी घर कसं सजवावं आणि त्यांनी आयुष्य कसं जगावं याबाबत त्यांना वेगवेगळे दाखले दिले जातात. त्यांची जीवनशैली चंटपणे अंमलात आणली जाते. त्यांनी कर चुकविल्यावर टीकेचा भडीमार होतो, त्यांनी घर बांधल्यावर कौतुक होते, वगैरे, वगैरे... क्रिकेट चांगलं खेळाणाऱ्या खेळाडूला कोणत्याही बाबतीत काहीही बोलण्याचा हक्क आपोआपच प्राप्त होतो. नशीब, देशाच्या नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदासाठी क्रिकेट खेळावं लागत नाही.

अवास्तव अपेक्षा आणि बेगडी भावना यांच्या कचाट्यात सापडलेल्या या खेळाला असल्या देशभक्‍तांच्या तावडीतून सोडविणे अत्यंत आवश्‍यक आहे! क्रिकेट हा एक सामान्य खेळ नाही. भारताच्या इच्छा-आकांक्षांचे क्रिकेट हे मूर्त रूप आहे. जगातील महासत्ता होण्यापेक्षा क्रिकेटमधील महासत्ता होण्यात भारताला जास्त रस आहे, हे वास्तव आहे.

एक दुसरी जागा आहे. जिथे तमाम देशभक्तांची मांदियाळी जमते. जिथे केवळ आनंद किंवा जल्लोष नसतो. हा प्रकार जरा विशेष आहे. या प्रकारामध्ये माणसं भारावून जातात. लगेच देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा येते (आणि लगेच जाते पण!). देश, व्यवस्था, तरुणाई, राजकारण अशी यादी क्रमवार लावली जाते. अशा वेळी बोलण्यासाठी कोणतेही ठिकाण "व्यासपीठ' असते! अर्थातच, हा प्रकार म्हणजे आपले बॉलिवुड. भारतामध्ये चित्रपटामधून देशभक्ती शिकविण्याची एक पद्धत आहे. "बॉर्डर' पाहिला, की आपण सैनिक होतो, "रंग दे बसंती' पाहिला की व्यवस्थेवर बोलायला आपण पात्र ठरतो, "तारे जमींपर' किंवा "थ्री इडियटस्‌' पाहिला, की शिक्षण व्यवस्था किंवा असचं काहीतरी आपण बालू शकतो. अनेक चित्रपट असे काढता येतील. मुद्दा असा, की या देशाची मानसिकता घडविण्यासाठी बॉलिवूड बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. किंबहुना, ते आपल्याला प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी नालायक ठरविणारं एक माध्यम आहे. भाबडी स्वप्नं दाखविणाऱ्या आणि वस्तुस्थितीपासून दूर नेणाऱ्या या माध्यमामुळं विचारशक्ती नष्ट होते, संवेदना बधिर होतात. माणसं आपणहून एखाद्या प्रश्‍नाचं उत्तर शोधण्याऐवजी मग सुपरमॅनची वाट पाहू लागतात. इथं सापडणारे देशभक्त जरा धोकादायक असतात. कारण त्यांना सिनेमा ही प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यासाठीची किल्ली वाटत असते. बऱ्याच वेळा त्यांच्या लेखी आयुष्य सिनेमाच असतो. भारताला प्रगतीपासून रोखणारा देशभक्‍तांचा हा दुसरा प्रकार.

देशात सध्या अजून एक नवीन प्रकार आला आहे. त्यांना "उत्साही कार्यकर्ते' म्हणायला हरकत नाही. हा देशभक्तांचा प्रकार मेणबत्त्या लावण्यापासून ट्‌वीटर आणि फेसबुक वापरण्यापर्यंत वेगवेगळी देशभक्तीची कर्तव्ये बजावताना दृष्टीस पडतो आहे. कुठे "ग्लोबल वॉर्मिंग'साठी मेणबत्त्या लावा, कुठे लोकपाल आंदोलनासाठी मेणबत्त्या लावा, कुठे मुक्‍या प्राण्यांसाठी मेणबत्त्या लावा, कुठे शहिदांसाठी मेणबत्त्या लावा, कुठे अजून काही. मेणबत्त्या मात्र पेटल्या पाहिजेत, भाषणे झाली पाहिजेत. ही मेणबत्त्यांची भानगड काय आहे? हा जरा खास प्रकार आहे. आत्यंतिक अहंगंड किंवा कमालीचा न्यूनगंड यामधून जन्माला आलेला "देशभक्तांचा' हा नवीन प्रकार आहे. या देशभक्तांना इन्स्टंट उत्तर पाहिजे. "जाहिरातीतल्या आईसारखं - बस बेटा, दोन मिनट'. देशाच्या समस्या सोडविणारे असे विविधरंगी, बहुढंगी देशभक्त उदयाला आल्यानंतर आता काही काळजी करण्याचं कारण नाही.

भारत सध्या एका स्थित्यंतरामधून जात आहे. काळाचा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भारताला महासत्ता बनविणारा किंवा मांडलिकत्वाच्या अंधारात ढकलण्यासाठी हा काळ जबाबदार असणार आहे. यावेळी देशातील कुठल्याही व्यवस्थेनं, कोणत्याही संस्थेनं, कोणत्याही व्यक्तीनं सावध, सजग आणि जबाबदार असणं आवश्‍यक आहे. अशावेळी मेणबत्त्या लावून देश सुधारणार नाही, चित्रपट पाहून देश सुधारणार नाही, क्रिकेट पाहून तर आशाच नको. भारत आपण सुधारु शकतो, या विश्‍वासाने पावले टाकायला हवीत. अशा वेळी हा देश कधीच सुधारणार नाही हा न्यूनगंड नको आणि माझ्याशिवाय देशाला पर्याय नाही हा अहंगंड नको. या देशाला गरज आहे, ती सकारात्मक विचारांची आणि चारित्र्यवान नेतृत्वाची. देशभक्ती या शब्दानं देव्हारा सजविण्याची गरज नाही.

रस्त्यावरील सिग्नल पाळणं ही देशभक्ती आहे, रस्त्यावर न थुंकणं ही देशभक्ती आहे, स्त्रियांचा आदर करणं ही देशभक्ती आहे, दिलेला शब्द पाळणं ही देशभक्ती आहे, दिलेली वेळ पाळणं ही देशभक्ती आहे, भ्रष्टाचारास उत्तेजन न देणं ही देशभक्ती आहे, लाच न देणं ही देशभक्ती आहे, सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं ही देशभक्ती आहे, आपल्याआधी लोकांचा विचार, ही देशभक्ती आहे, रस्त्यावरील वाहतूक अडवून लग्नाच्या मिरवणुकीत न नाचणं ही देशभक्ती आहे, चूक मान्य करणं ही देशभक्ती आहे, जात आणि प्रांतीयवादाचा पुरस्कार न करणं ही देशभक्ती आहे, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं ही देशभक्ती आहे, मतदान करणं ही देशभक्ती आहे, योग्य उमेदवार निवडणं ही देशभक्ती आहे, स्वत:च्या क्षेत्रामध्ये वैध मार्गानं यशस्वी होणं, ही देशभक्ती आहे, वाद न घालता काम करणं ही देशभक्ती आहे, जागा मिळेल तिथं मलमूत्र विसर्जन न करणं ही देशभक्ती आहे, इतिहासापासून शिकणं ही देशभक्ती आहे, गतकालातील गोष्टींवर वाद न घालणं ही देशभक्ती आहे, स्वत:च्या कर्तव्यांप्रती जागरूक असणं ही देशभक्ती आहे, महाराज-बाबा-नेते-अभिनेते-कार्यकर्ते-पक्ष-धर्म-विचारसरणी अशा कोणाचेही स्तोम न माजवणं ही देशभक्ती आहे, चांगल्या कामात कोलदांडा न घालणं ही देशभक्ती आहे, स्वत:पलीकडे पाहणं ही देशभक्ती आहे आणि खरं सांगायचं तर "सुजाण नागरिक' बनण्याचा प्रयत्न करणं ही देशभक्तीच आहे. ज्या देशामधील नागरिक देशाचे नागरिक म्हणून घेण्यास पात्र असतात, त्या देशाला प्रगती करण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नसते.

देशभक्ती या संकल्पनेनं आयुष्यातील प्रत्येक कृती जेव्हा प्रभावित असेल, दैनंदिन कृती जेव्हा देशासाठी म्हणून घडायला लागेल, तेव्हा हा देश खऱ्या अर्थानं महासत्ता होईल. देशभक्ती म्हणजे सीमेवर लढायला जाणं नव्हे, देशभक्ती म्हणजे व्यवस्था बदलण्याच्या गोष्टी करणं नव्हे, देशभक्ती म्हणजे भारतानं कोणाला क्रिकेटच्या मॅचमध्ये हरवणं नव्हे. देशभक्ती हा एक भावात्म आविष्कार आहे. तो जेव्हा कोट्यवधी भारतीयांचा हुंकार होईल, तेव्हाच भारत महान देशांच्या पंगतीत जाऊन बसेल

No comments:

Post a Comment