Total Pageviews

Wednesday, 13 July 2011

CHIEF MINISTERS WIFE LOOSES PURSE INSIDE STORY

'गृह' खात्याचं समतेचं सूत्र
योगेश कुटे
Wednesday, July 13, 2011 AT 10:17 AM (IST)
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्त्वशीला यांनी गेले ख्या गुश्‍श्‍यात होत्या. मुख्यमंत्र्यांना कामाच्या गडबडीत लक्ष द्यायला वेळ नव्हता. आषाढी एकादशीची पूजा उरकून पंढरपुरातून मुख्यमंत्री "वर्षा'वर पोचले आणि घरच्या रुक्‍मिणीची नाराजी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. पत्नीला ते म्हणाले, ""अगं, तू नाराज आहेस का?''
सत्त्वशीलावहिनी काहीच बोलल्या नाहीत.
हाच प्रश्‍न चौथ्यांदा विचारल्यावर त्या म्हणाल्या, ""तुमचं माझ्याकडं लक्षच नाही मुळी.''
मुख्यमंत्री - तूदेखील असं म्हणतेस? कॉंग्रेसवाले म्हणतात, "माझं पक्षाकडं लक्ष नाही.' जनता म्हणते "माझं राज्याकडं लक्ष नाही'. फक्त राष्ट्रवादीवालेच माझं लक्ष त्यांच्यावर असल्याचं म्हणतात.
पत्नी - ते मला माहीत नाही. माझी व घराची तुम्हाला काळजी नाही, हे मात्र खरं..
मुख्यमंत्री - कशावरून?
पत्नी (चिडून) - काय घडलं ते तुम्हाला माहीतच नाही? तुमचं हे नेहमीचच...आता काय सांगू?
मुख्यमंत्री - अगं, सांग तरी... आताच पंढरपुरातून आलो..."पुढची काही वर्षे मुंबईतच ठेव,' असं साकडं विठ्ठलाला घातलंय.
पत्नी - केवळ तुमच्यापुरतंच बघा. माझा काही विचार आहे की नाही?
मुख्यमंत्री - एकदम विरोधी पक्षासारखं बोलू नकोस... काय झालं ते सांग.
पत्नी (रडवेल्या होऊन) - माझी पर्स मेल्या चोरट्यानं पळवली... चाळीस हजार रुपयांवर त्यानं डल्ला मारला...
मुख्यमंत्री (धक्का बसून) - काय सांगतेस? हे कोणीच मला सांगितलं नाही...आबा पण काही बोलले नाहीत. पोलिस अधिकाऱ्यांनी कळवलं नाही... राज्यात पोलिसांची यंत्रणा आहे की नाही?
पत्नी - पोलिस राष्ट्रवादीवाल्यांच्या ताब्यात. ते तुम्हाला कशाला सांगतील?
मुख्यमंत्री - मी राज्याचा प्रमुख. मला नको सांगायला?
पत्नी - तुमचं हे असंच असतं.... सारखं लक्ष दिल्लीतील घडामोडींवर.. राज्यात, घरात काय चालतंय याची फिकीरच नाही. पैसे गेल्यावर आता महिनाभर घरात काय खायचं? मी घर कसं चालवणार? तुम्ही मंत्रालयात काही खात नाही, अशी बाहेर चर्चा. त्यामुळं तुम्हाला कोणी काही देत नाही.
मुख्यमंत्री - तुझ्यासोबत पोलिस होते ना?
पत्नी - होते ना... तरीही चोरट्यानं डल्ला मारलाच...मला तर बाई काही समजतच नाही. या आबांचे पोलिस नक्की करतात तरी काय?
मुख्यमंत्री - चोरीचा तपास सीआयडीकडं देतो. दोन दिवसांत ते पर्स शोधून देतील.
पत्नी - काही नको...त्या सीआयडीवर आबांचाच कंट्रोल..
मुख्यमंत्री - बरं... सीबीआयकडं देतो...
पत्नी - नको. सीबीआयला "आदर्श'ची हरवलेली फाइल सापडत तर नाहीच, उलट सीबीआयकडं असलेल्या कागदपत्रांतून काही चोरीला जातात...
मुख्यमंत्री - मग करायचं काय?
पत्नी - मला तर बाई वेगळाच संशय येतोय....
मुख्यमंत्री - कसला संशय? तुझाच हलगर्जीपणा झाला असेल.
पत्नी - तुम्ही पडला साधेभोळे. तुम्हाला नाही संशय यायचा. माझ्या पर्सची चोरी "राष्ट्रवादी'नं तर घडवून आणली नाही ना?
मुख्यमंत्री - तुझ आपलं काहीतरीच! 40 हजारानं त्यांचं काय होणार?
पत्नी - तसं नाही हो...राज्यात पोलिसांवर सध्या बरीच टीका होत आहे. सर्वसामान्यांचं जीवन संकटात आहे... दरोडे, खून, चोऱ्या होत असल्यानं सर्वसामान्य माणूस हवालदिल असल्याची टीका होत आहे. आबांच्या गृह खात्याचं सर्वसामान्यांकडं लक्ष नसल्याचं पेपरवाले लिहितात...
मुख्यमंत्री - खरंय ते... ही टीका मी पण वाचतो. पण मनाला लावून घेत नाही.
पत्नी - या टीकेलाच उत्तर देण्यासाठी माझी पर्स चोरीला गेलीय!
मुख्यमंत्री - काय सांगतेस?
पत्नी - सर्वसामान्य वेठीला आणि पोलिस "व्हीआयपी'च्या बंदोबस्ताला, अशी टीका या चोरीमुळे बंद होईल.
मुख्यमंत्री - कशी काय?
पत्नी - जो न्याय सर्वसामान्यांना तोच मुख्यमंत्र्यांनाही.. असं समतेचं सूत्र "राष्ट्रवादी'नं अमलात आणलंय.
मुख्यमंत्री - "राष्ट्रवादी'चा मध्यंतरी समता मेळावा झाला होता... पण तुझ्या पर्सच्या चोरीचा अन्‌ त्याचा काय संबंध?
पत्नी - सर्वसामान्यांच्या घरी चोऱ्या होतात... तशाच मुख्यमंत्र्यांकडेही होतात... त्यामुळे पोलिसांचा सर्वांनाच समान न्याय आहे. दोघांकडेही चोरी करण्याची समान संधी पोलिसांनी चोरांना मिळवून दिली. असं हे समतेचं सूत्र आहे...
मुख्यमंत्री - अगं, खरंच की..पण अशा समानतेमुळे कॉंग्रेसला भविष्यात धोका होईल. "राष्ट्रवादी'ची ही चाल मी लगेच दिल्लीला कळवतो.
(मुख्यमंत्री तातडीनं दिल्लीला फोन लावण्याचा आदेश देतात.)

No comments:

Post a Comment