Total Pageviews

Thursday, 28 July 2011

BAD MEMORY A GREAT BOON IN INDIA

सद्यस्थिती स्मृतिभ्रंश हेच वरदान ठरण्याजोगी DESHDOOTराष्ट्रकुल क्रीडा सामन्यांच्या आयोजनात हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून गेल्या दोन महिन्यांपासून तिहार तुरुंगात असलेले खासदार सुरेश कलमाडी यांना स्मृतिभ्रंशाच्या विकाराने गाठल्याचे वृत्त निश्‍चितच चिंताजनक म्हणायला हवे. अर्थात स्मृतिभ्रंशाची काही लक्षणे त्यांच्यात आढळून आली आहेत, असे त्यांच्या प्राथमिक आरोग्य अहवालात म्हटले आहे. त्यांची पूर्ण तपासणी झाल्यानंतरच या आजाराचे निश्‍चित निदान होऊ शकेल. ६६ वर्षीय कलमाडी हे कर्तृत्ववान राजकारणी आहेत. गेल्या २५-३० वर्षात धडाडीने त्यांनी पक्षीय राजकारणात एकेक गड काबीज करत पुण्याचे अनभिषिक्त सम्राट बनण्याबरोबरच दिल्लीतील आपले वजन कमालीचे वाढविले. आंतरराष्ट्रीय स्तरावरून गौरविला जाणारा पुणे फेस्टिवल हे त्यांचे पुणेकरांना मिळालेले अपूर्व सांस्कृतिक योगदान म्हणायला हवे. पण दिवसेंदिवस वाढणार्‍या राजकीय आणि आर्थिक सामर्थ्याची नशा माणसाला त्याच्या नकळत अधःपतनाच्या वाटेकडे घेऊन जाते. राष्ट्रकुल क्रीडांच्या आयोजन समितीचे प्रमुख बनलेल्या कलमांडी यांची त्याच दिशेने वाटचाल कशी सुरू झाली हे त्यांचे त्यांनाही समजले नसेल! कॉंग्रेस पक्ष म्हणजे एक राजकीय सर्कस आहे असे वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून देणारे माजी केंद्रीय मंत्री माणिशंकर अय्यर यांनी अगदी प्रथमपासून राष्ट्रकुल क्रीडांच्या भव्य आयोजनाला कडाडून विरोध केला होता. दिल्लीत हजारो कोटी रुपये ओतून खेळांचा तमाशा करण्याऐवजी देशाच्या ग्रामीण भागात मूलभूत सोयीसुविधा उभारण्यावर हा पैसा खर्च करावा अशी त्यांची मागणी होती. कसलेही अधिकारपद नसले किंवा ते जाण्याची वेळ आली की नेते एकदम तत्त्वज्ञानी विचारवंत बनतात, हे आपण नेहमी पाहातो. पण मणिशंकर अय्यर त्यातले नाहीत. केंद्रीय मंत्री असतानाही आपले विचार सडेतोडपणे मांडण्याचे धाडस ते दाखवत असत. आता तर त्यांच्याकडे कसलेही पद नसल्याने ते विचारस्वातंत्र्य अगदी मुक्तपणे अनुभवत आहेत. अर्थात कॉंग्रेस म्हणजे एक सर्कस आहे हे अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही माहीत आहे. अय्यर यांनी नवे कांही सांगितले नाही. कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी मात्र अय्यर यांची सर्कशीतील एक विदुषक अशी संभावना करावी हे खटकणारे आहे. पक्ष प्रवक्ता बनणे म्हणजे वृत्तवाहिन्यांवरून चमकेशगिरी किंवा विदुषकी चाळे करणे नव्हे असे त्यांच्याबाबतही म्हटले जाते. पण अनेक हितसंबंधांची मोट बांधत सर्कस चालविणे हे सोपे काम नसते. रिंगमास्टरपुढे या सर्कशीतले सारेच वाघ-सिंह निमूटपणे कशी शेपटी घालतात याचे दर्शन वेळोवेळी घडत असते. अगदी अलीकडील काळापर्यंत, कलमाडी हेही या सर्कशीतले एक महत्त्वाचे खिलाडी होते आणि त्यांच्याप्रमाणेच अन्य काही लहानथोर कसरतपटूंनाही स्मृतिभ्रंशाची बाधा झाल्यास मोठा गंभीर प्रसंग उद्‌भवल्याविना राहाणार नाही. स्मृतिभ्रंश हा एक गंभीर आजार आहे पण त्याची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच सत्वर औषधोपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो. कलमाडी हेही त्यातून बरे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात काही गैर नाही. त्यांना सध्या जडलेला विकार हागझनी’ फेमशॉर्ट टर्म मेमरी लॉस’ नसेल आणि या विकाराच्या तावडीतून ते ठणठणीत बरे झाल्यास त्यांनाही माजी दूरसंचारमंत्री . राजा यांच्याप्रमाणे नजिकच्या भूतकाळातील सारा घटनाक्रम अगदी स्पष्टपणे आठवू लागेल. राष्ट्रकुल क्रीडा सामन्यांतील भ्रष्टाचाराला आणि गैरव्यवहाराला आपण एकटेच जबाबदार नाही, आपल्या अपरोक्ष आणखी किती तरी जणांनी उखळ पांढरे करून घेतले आहे, कोणाकोणाच्या उपस्थितीत, कोणाकोणाच्या संमतीने आपण निर्णय घेतले होते हे ते (कोर्टात) जगजाहीर करू शकतील. स्मृतिभ्रंशांच्या प्राथमिक आघातातून बरे होणे ही कलमाडी यांची तातडीची गरज आहे. पण स्मृतिभ्रंशाच्या पातळीपर्यंत जाणार्‍या विस्मरण शक्तीचे आपणाला वरदान लाभावे अशी प्रार्थना या देशातील सर्वसामान्य लोक आता करू लागले आहेत. आपणाला अडचणीच्या वाटणार्‍या गोष्टी सर्वपक्षीय राजकीय नेते किती सहजपणे मेंदूतील विस्मरणाच्या कप्प्यात ढकलून देतात याची अनेक उदाहरणे तल्लख स्मरणशक्तीचा शाप लाभलेल्यांना आठवत असतील. माजी संरक्षणमंत्री बाबू जगजीवनराम आठ लाख रुपयांचा प्राप्तिकर भरण्यास विसरले होते म्हणे! काही गोष्टींचे स्मरण होणे अत्यंत तापदायक असते. गेल्या दोन वर्षात पेट्रोलचे भाव किती वेळा वाढले, हे लक्षात ठेवून सर्वसामान्यांनी करायचे काय? ३१ महिन्यात देशात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही हे चिदम्बरम यांनी पक्के लक्षात ठेवले होते आणि अतिरेक्यांनीही त्याची चांगली आठवण ठेवूनइतके महिने काहीही करणे बरे नव्हे’ अशा भावनेतून ३१ महिने पूर्ण होताच १३ जुलै रोजी बॉम्बस्फोट मालिकेने मुंबई रक्तबंबाळ करून टाकली! वर्षा दीड वर्षापूर्वी मुंबईत दुधाचा भाव काय होता हे आठवून आज लिटरभर दुधासाठी चाळीस रुपये मोजताना, पिठात पाणी घालून अश्वत्थाम्याला तेदूध’ म्हणून पाजणार्‍या मातेच्या आठवणीने काळीज कळवळून जाते! पावकिलो भाजीसाठी २० रुपये आणि किलोभर तुकडा बासमतीसाठी ४० रुपये मोजताना, ‘देशात यंदा विक्रमी धान्योत्पादन झाल्याचे’ पंतप्रधानांचे वक्तव्य आठवून स्वतःला हर्षवायू होण्यापासून वाचविताना सर्वसामान्यांची कोण तारांबळ उडत असते! झाले गेले विसरून जाऊ, गुण्यागोविंदाने उद्याच्या आव्हानाना सामोरे जाऊ अशी नवी प्रतिज्ञा करण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेस म्हणजे सर्कस आहे असे मणिशंकर अय्यर म्हणतात. तर भारतीय जनता पार्टी म्हणजे नेत्यांच्या मुलाबाळांचेपरिवार तंत्र’ आहे असे त्याच पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांताकुमार म्हणतात. माजी दूरसंचारमंत्री . राजा यांनी टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात पंतप्रधानांचे आणि गृहमंत्र्यांचे नाव गोवल्याने या दोघानी ताबडतोब राजीनामे द्यावेत अशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची मागणी आहे, मात्र १४ महिन्यांत १८०० कोटींचा भ्रष्टाचार खणणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री येड्डीयुरप्पा यांच्या विरोधात कारवाई करण्याचा विचारयोग्य वेळी’ करू असे ते सांगतात... हे सारे आपण कशासाठी लक्षात ठेवायचे? बरे हे सर्वसामान्यांनी पक्के लक्षात ठेवले तरी नेतेमंडळी आम्ही असे बोललोच नाही म्हणायला सदैव तयार! तेव्हा, तात्पर्य असे की महागाई, टंचाई, भ्रष्टाचार, लूटमार, दहशतवाद अशा अनेक संकटांनी गांजलेल्या जनतेने परमेश्वराकडेविस्मरणाचे’ वरदान मागणे केव्हाही चांगले!

No comments:

Post a Comment