Total Pageviews

Thursday 14 July 2011

mumbai blasts all to blame

बॉम्बस्फोट मुंबईला नवे नाहीत. 12 मार्च 1993 पासून सुरू झालेली स्फोटांची मालिका 18 वर्षानंतरही थांबलेली नाही. कुणीही सत्तेवर आले तरी संपणार नाही. दहशतवादी हे संपूर्ण देशाचे हितशत्रू आहेत, याचे भान सर्वानीच ठेवायला हवे.
मुंबईत पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी घातलेल्या हैदोसात 18 जणांचा बळी घेतला आहे. 1993 मध्ये मुंबईला बॉम्बस्फोटाचा पहिला धक्का बसला. त्यानंतर ठराविक काळानंतर धक्के बसत गेले. या स्फोटांचे खापर कधी गुप्तचर यंत्रणांवर तर कधी पोलिसांच्या बेफिकिरीवर फोडले गेले. पहिल्या महाभयंकर स्फोटानंतर मुंबईकरांनी अवघ्या बारा तासात स्वत:ला सावरत दैनंदिन कामकाज सुरू केले. ती मुंबईकरांची गरज होती. मात्र याचा अर्थ मुंबईकरांनी कायम अशा दुर्घटनांचाच सामना करायचा असा घेतला जाऊन त्यांना वा-यावर सोडले जाऊ नये. दिल्ली ही जरी देशाची राजधानी असली तरी मुंबई ही देशाची आर्थिक नाडी आहे. मुंबईची लोकसंख्या प्रचंड असल्याने किरकोळ घातपातातही मृतांची संख्या मोठी असते. साहजिकच मुंबईवर होणा-या हल्ल्यांना देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळते. दहशतवाद्यांच्यादृष्टीने हे आवश्यक असते. त्यामुळे मुंबईला दहशतवाद्यांकडून वारंवार लक्ष्य केले जाते. आतापर्यंत मुंबईत झालेल्या स्फोटांपैकी तीन जव्हेरी बाजारात झाले आहेत. हिरे आणि जवाहि-यांची ही बाजारपेठ असल्याने त्याला वारंवार लक्ष्य केले जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परवा झालेल्या तीन बॉम्बस्फोटांपैकी पहिला जव्हेरी बाजारातच झाला. 26-11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतल्या संवेदनक्षम भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. मात्र त्याची पूर्तता न झाल्याचा फटका जव्हेरी बाजाराला बसला आहे. परवा या भागात झालेला स्फोट सर्वाधिक क्षमतेचा होता. साहजिकच या स्फोटात मरण पावलेल्यांची संख्याही अधिक होती. मुंबईत बॉम्बस्फोटांचे हे सत्र सुरू असताना पावसानेही हजेरी लावल्याने या स्फोटांतले महत्वाचे दुवे धुतले जाऊन नाहीसे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. ती अनाठायी नाही. अशा घटनांनंतर सर्वप्रथम पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांवर टीका केली जाते. आपल्या संरक्षणाचे काम पोलिसांचे आहे अशी प्रत्येकाची भावना असल्याने तसा विचार करणे गैर म्हणता येणार नाही. मात्र सर्व भरवसा पोलिसांवर ठेवून आपण मौजमजा करायची, कायदे पाळायचे नाही,  कर्तव्यांकडे दुर्लक्ष करायचे यालाही अर्थ नाही. केवळ जनताच नाही तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवून घेणारी संपर्कमाध्यमेही अशा प्रकरणात जबाबदारीचे भान ठेवताना दिसत नाहीत. सध्या अनेक वृत्तवाहिन्या या क्षेत्रात आल्या असल्याने प्रत्येकात भयानक स्पर्धा सुरू झाली आहे. कोणतीही बातमी सर्वात आधी आपणच दिली असा दावा करता यावा यासाठी नको ते पायंडे पाडले जात आहेत. त्याचा होणारा दूरगामी परिणाम लक्षात न घेता कमी वेळात प्रसिद्धी मिळवण्यासाठी वाटेल त्या स्तरावर जाण्याची त्यांची तयारी असते. ब्रेकिंग न्यूज हा त्यातलाच एक प्रकार. कोणतीही खातरजमा न करता किंवा आपण आपल्या प्रेक्षकांना जे काही दाखवतो आहोत त्यातून नेमके काय साधले जाणार आहे याचा विचार करताना कुणीच दिसत नाही. आतापर्यंत दहशतवाद्यांनी बेस्टची बस, लोकल, सायकल, अशा विविध ठिकाणांचा वापर बॉम्ब पेरण्यासाठी केला आहे. परवाच्या दुर्घटनेत तर छत्री, टिफिनचा डबा यांतही बॉम्ब ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहे. आरडीएक्स, टीएनटी बरोबरच टायमर असलेल्या बॉम्बचाही वापर दहशतवाद्यांनी केला आहे. परवा आयईडीया इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसया अत्याधुनिक स्फोटकाचा वापर झाला. हे स्फोटक मोबाईल फोनसारख्या आकाराने लहान असलेल्या उपकरणाबरोबर वापरता येत असल्याने अधिक सुटसुटीतही असते. आठ मिनिटात झालेले तीन स्फोट अशाच उपकरणांच्या साहाय्याने करण्यात आले आहेत. दहशतवाद्यांच्या अद्ययावत उपकरणांचा छडा लावणे सोपे काम नाही. केवळ जनतेनेच नव्हे तर लोकप्रतिनिधींनीही याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. प्रत्येकवेळा गुप्तचर यंत्रणांर्कडे बोट दाखवून आपली जबाबदारी कमी होत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांनीही अशा प्रसंगांत राजकारण बाजूला ठेवून परिस्थितीला सामोरे जाण्याचे भान बाळगायला हवे.

No comments:

Post a Comment