मंत्रालयातली भुताटकी Nashik(22-June-2011) Tags : Editorialमहाराष्ट्राच्या मंत्रालयाला सध्या भुताटकीने झपाटले आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे सत्तास्थान असलेल्या या वास्तूमध्ये अनेक कर्मचारी आहेत, मंत्री आहेत, सचिव आहेत. दिवसागणिक हजारो अभ्यागतांचा आणि कर्मचार्यांचा त्यात वावर असतो. अनेक निर्णय तिथे घेतले जातात. त्याची अंमलबजावणी सगळ्या राज्यात होते. अशा या वास्तूला भुताटकीने झपाटले आहे. तसे नसते तर ‘आदर्श’ या वादग्रस्त टॉवरबद्दलचे निर्णय कुणीच घेतले नाही, अशी स्थिती निर्माणच झाली नसती. ‘आदर्श’च्या उभारणीचा कालावधी हा नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण या चार मुख्यमंत्र्यांच्या सत्ताकाळातला आहे. ‘आदर्श’बाबतचे निर्णय या चौघांपैकी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील महसूलमंत्र्यांपैकी एकाने अथवा काहींनी घेतले असणार हे उघड आहे. असे असले तरी ‘आदर्श’ प्रकरणाची चौकशी करणार्या आयोगासमोर या चारही मुख्यमंत्र्यांनी जी शपथपत्रे सादर केली आहेत, त्यामध्ये प्रत्येकाने ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेतला. तो जर खरा मानला तर मग ‘आदर्श’बाबतचे निर्णय घेतले तरी कोणी, असा प्रश्न निर्माण होतो. आता सगळेच हात वर करीत असल्याने मंत्रालयातील भुताटकीने हे सगळे निर्णय घेतले, असेच म्हणावे लागेल. हे भूत इतके पॉवरफुल आहे की, ते केवळ निर्णयच घेते असे नाही तर हे निर्णय वादग्रस्त ठरू लागताच त्याबाबतच्या फ ायलीही गायब करून टाकते. कधी-कधी फ ाईल जागेवर ठेवते, परंतु त्यातील अडचणीची ठरणारी कागदपत्रे भानामती व्हावी तशी गायब करून टाकते. याला भुताटकी नाही तर काय म्हणणार? मंत्रालयात एकापेक्षा एक सुरक्षा यंत्रणा आहेत. टेहळणी यंत्रणा आहेत. परंतु त्यांचा काहीही उपयोग आणि परिणाम या भुताटकीवर होत नाही. कोणत्याही कॅमेर्यावर ते चित्रित होत नाहीत. पकडले जात नाहीत. कोणत्याही सुरक्षा यंत्रणेत सापडत नाहीत, अशी त्यांची करामत आहे. याच भुताटकीने केंद्रातील संरक्षण आणि पर्यावरण मंत्रालयाच्या कार्यालयांनाही असेच झपाटले होते. तिथूनही हजारो फ ायलींपैकी नेमक्या ‘आदर्श’च्याच फायली गहाळ झाल्यात. त्याच फाईलमधील कागदपत्रे बेपत्ता झालीत. आता ही ‘आदर्श’ भुताटकी उतरविण्यासाठी मांत्रिकही तेवढाच प्रभावी लागणार आहे. चिल्लर अथवा बाजारबुणग्या भगतांचे हे काम नाही. असा भगत कुठे मिळेल, हे जनतेनेच शोधावे आणि सरकारला सांगावे अशी सरकारची अपेक्षा आहे. संपूर्ण राज्याची सत्ता, लक्षावधी पोलिसांची यंत्रणा, हजारो गुप्तचरांची फ ौज हाती असतानासुद्धा ‘आदर्श’चे निर्णय कुणी घेतले, फ ायली कुणी बेपत्ता केल्या, कागदपत्रे कुणी गहाळ केली, हे जर सरकारला कळू शकत नसेल तर त्याने या भुताटकीला दाद न देता सत्तेवर मात्र ठिय्या दिलेला आहे एवढे खरे.
No comments:
Post a Comment