हकनाक हत्या मुंबईतील ख्यातनाम पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले. डे यांची हत्या छोटा राजनने करविली हे तर तपासात उघड झाले आहे, परंतु ही हत्या का झाली याचा उलगडा मात्र अद्याप व्हायचा आहे. वास्तविक डे यांची हत्या झाली तेव्हा पहिला संशय दाऊद इब्राहिम आणि त्याचा हस्तक छोटा शकील यांच्यावर घेतला गेला होता. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरवर मुंबईत प्राणघातक हल्ला झाला त्यासंदर्भात डे यांनी केलेल्या वार्तांकनामुळे खवळलेल्या दाऊदनेच त्यांची हत्या करविली असा वहीम प्रारंभी घेतला गेला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने डे यांना धमकी दिल्याचे प्रकरणही समोर आले होते. परंतु मुंबई पोलिसांनी चिकाटीने केलेल्या तपासात नवीच बाजू समोर आली. मात्र, दाऊदचा हाडवैरी असलेल्या छोटा राजनचा यात हात असल्याचा जो निष्कर्ष निघाला, त्यातून नवी प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत. छोटा राजन डे यांच्या जिवावर का उठला? त्याने वैयक्तिक कारणांसाठी हा सूड उगवला की कोणा उच्चपदस्थाच्या सांगण्यावरून डे यांचा काटा काढला हे अजून समोर यायचे आहे. छोटा राजन आणि त्याचा एकेकाळचा साथीदार आणि आताचा वैरी संतोष शेट्टी यांच्या संघर्षात डे यांचा बळी गेला असा एक तर्क पुढे आला आहे. छोटा राजन हा एकेकाळी दाऊदचा उजवा हात होता. पुढे त्यांचे बिनसले आणि दोघे एकमेकांचे पक्के वैरी बनले. त्यावेळी दाऊदच्या जबड्यातून म्हणजे दुबईहून पलायन करण्यासाठी छोटा राजनला संतोष शेट्टीने मदत केली होती. पुढे राजनने बँकॉकला आपला अड्डा बनवला तेव्हाही शेट्टी त्याच्या साथीला होता. २००० साली छोटा शकीलने दाऊदच्या सांगण्यावरून राजनच्या हत्येचा प्रयत्न केला, तेव्हाही शेट्टीच त्याच्या मदतीला धावून गेला होता. परंतु राजकारणाप्रमाणेच गुन्हेगारी जगतातही कोणी कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो. त्यामुळेच संतोष शेट्टीचे पुढे छोटा राजनशी आर्थिक बाबींवरून बिनसले. दोघांमध्येही संघर्ष गेली काही वर्षे सुरू होता. मध्यंतरी दत्ता सामंत यांचा मारेकरी भरत नेपाळी याची हत्या झाली. या गुन्हेगारी सम्राटांचे एक असते. आपली दहशत आणि वर्चस्व अबाधित रहावे यासाठी त्यांची कायम धडपड असते. त्यामुळे भरत नेपाळी जेव्हा मारला गेला, तेव्हा आपणच त्याला ठार केल्याचे दावे छोटा राजन आणि संतोष शेट्टी या दोघांनी केले होते. त्यासंदर्भातील डे यांच्या वार्तांकनातून छोटा राजन डे यांच्यावर उलटला असावा असा एक तर्क आहे. ज्योतिर्मय डे अलीकडे ‘मिड डे’ च्या सेवेत होते, पण त्यांची खरी कारकीर्द फुलली होती ती ‘इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये. गुन्हेगारी जगताची खडान्खडा माहिती पुरवणार्या त्यांच्या बातम्या विशेषत्वाने ‘संडे एक्स्प्रेस’मध्ये सातत्याने वाचायला मिळत असत. अशा मुरब्बी पत्रकाराच्या शब्दाला साहजिकच एक वजन प्राप्त होत असते. त्यामुळे मुंबईमधील आपल्या गुन्हेगारी साम्राज्याला अबाधित राखण्यासाठी डे यांचा वापर करण्याचा प्रयत्न या टोळीवाल्यांनी केला तर नवल नाही. डे यांचे काही विदेश दौरेही झाले होते असे सांगतात. ते नेमके कशासाठी होते, ते कोणाच्या संपर्कात होते या सार्या बाबी पुढे उघड होतीलच. पत्रकार कितीही निष्णात असो, कितीही मोठा असो, आपल्याला कोणी वापरून तर घेत नाही ना याबाबत त्याची विवेकबुद्धी सदैव जागृत असावी लागते. ती नसेल तर असे पत्रकार इतरांच्या हातचे बाहुले बनतात. जे असे बाहुले बनायला नकार देतात, त्यांना त्याची किंमत चुकवावी लागते. डे यांना ही किंमत स्वतःचे प्राण त्यागून चुकवावी लागली. लेखणी हेच शस्त्र असलेला एक कसलेला पत्रकार अत्याधुनिक पिस्तुलाच्या गोळ्यांचा सामना करू शकला नाही. अवघ्या दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात सातजणांनी त्यांना ठार मारले. म्हणजे प्रत्येक हल्लेखोराच्या वाट्याला आले फक्त पन्नास हजार. नंतर छोटा राजनने आणखी तीन लाख त्यांच्यात वाटले हा भाग वेगळा. परंतु इतक्या कमी रकमेसाठी कोणाच्याही जिवावर उठायला माणसे तयार होतात हे वास्तव भयानक आहे. गरिबी, बेकारी, वाढती महागाई या सामाजिक समस्यांमध्ये या परिस्थितीचे मूळ आहे. त्यातूनच गुन्हेगारी मूळ धरते, फैलावते आणि निष्पापांचे मुडदे पाडते
No comments:
Post a Comment