Total Pageviews

Monday, 27 June 2011

SACHINS FERARI

सचिनची फेरारी ऐक्य समूह Tuesday, June 28, 2011 AT 12:01 AM (IST) माननीय प्रणव मुखर्जी
अर्थमंत्री, केंद्र सरकार, नवी दिल्ली.यांना,विषय : मास्टर-ब्लास्टर सचिन तेेंडुलकर याने विकलेल्या फेरारी मोटारीवरील कॅपिटल गेन टॅक्स माफ होण्याबाबत.महाशय,मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने गेली वीस वर्षे देश आणि परदेशात क्रिकेटचे अनेक सामने गाजवून देशाचा नावलौकिक वाढवला. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच मुंबईत झालेला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामनाही केवळ त्याच्या फलंदाजीमुळेच भारतीय संघाला जिंकता आला. त्याच्यामुळेच क्रिकेटचा विश्वचषक भारताला मिळाला, हे आपणासही माहिती असेल. आता, आपणास मुद्दाम या अर्जाद्वारे आम्हा क्रिकेट रसिकांना विनंती करण्याची वेळ आली आहे, कारण सचिनने त्याला भेट मिळालेली फेरारी मोटार त्याने अलिकडेच सुरतच्या एका व्यापाऱ्याला विकून टाकली. कोट्यवधी रुपये किंमतीची ही गाडी विकल्यामुळे त्याला कॅपिटल गेन टॅक्स भरण्याची सक्ती प्राप्तीकर खाते नक्कीच करणार, असे कळाल्याने आम्ही आपणाकडे धाव घेतली आहे. सचिनला क्रिकेटच्या खेळातून आणि जाहिरातीद्वारे शेकडो कोटी रुपये मिळाले असले तरी, त्याची आर्थिक स्थिती मात्र सतत बेताचीच राहिली आहे. कारण मिळालेले पैसे तो असे उधळून टाकत नाही. बॅंकातल्या ठेवी, बंगले, सदनिका, कंपन्यांचे शेअर्स अशा विविध मार्गाने तो मिळालेले पैसे लगेचच गुंतवून टाकतो. त्यामुळे त्याच्या हातात पैसेच राहात नाहीत. विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघातल्या अन्य खेळाडूंबरोबरच त्यालाही दोन कोटी रुपयांचे बक्षिस मिळाले. त्याआधी मानधनही मिळाले होतेच. पण, त्याच्या जवळचे पैसे संपल्याने बिचाऱ्या सचिनला आपल्या मुलासाठी पनवेलजवळ सदनिका विकत घ्यायसाठी बॅंकेतून 25 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. जागतिक किर्तीच्या खेळाडूची ही आर्थिक दैन्यवस्था लक्षात घेवून आपण उदार अंत:करणाने फेरारी गाडी विकल्या-नंतर त्याला मिळालेल्या, पैशावरचा कॅपिटल गेन टॅक्स पूर्णपणे माफ करावा.
2002
मध्ये जागतिक क्रिकेटपटू डॉन बॅ्रडमन यांच्या 29 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केल्याबद्दल फियाट या इटालियन कंपनीने सचिनला फेरारी 360 मॉडेना ही अलिशान मोटार भेट दिली होती. पण, तेंडुलकरला या मोटारीवरचा 1 कोटी 10 लाख रुपयांचा आयात आणि अन्य कर केंद्र सरकारने लावला. सचिन कंगाल असल्यामुळे त्याने हा कर माफ करावा, अशी मागणी केली तेव्हा, त्याच्यावर जळणाऱ्या दुष्टांनी प्रचंड टीका केली. केंद्रात तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे जातीयवादी सरकार सत्तेवर होते. या सरकारने कर माफीचे आश्वासन देवूनही तो कर काही माफ केला नाही. शेवटी फियाट कंपनीनेच तो कर भरून ही कोट्यवधी रुपये किंमतीची फेरारी मोटार त्याच्या मुंबईच्या घरासमोर आणून लावली.भेट मिळालेली ही मोटार महानगरी मुंबईत फिरवायचा त्याने प्रयत्न केला. पण, मुंबईतले रस्ते बोळासारखे अरुंद आणि या गाडीसाठी अयोग्य असल्याने, त्याने शेवटी ही गाडीच विकायचा निर्णय घेतला. गाडी चार-पाच कोटी रुपयांना विकून टाकली. त्याच पैशातून त्याने निसानची जी. टी. आर. सुपर कार विकत घेतली. "माझ्या धावा, घड्याळे आणि गाड्या यांची संख्या वाढतच राहिली पाहिजे', असे या गरीब पण गुणी खेळाडूने अलिकडेच मुलाखतीत सांगितले आहे. तो सत्यवचनी आणि जिद्दी असल्यामुळे त्याच्याकडे प्रचंड गाड्यांचा ताफाही आहेच. क्रिकेटच्या स्टेडियमवर तो धावाही प्रचंड काढतो. सचिन महाराष्ट्राचीच नव्हे, तर देशाचीही शान असल्यामुळे त्याला भारतरत्न सन्मान देवून गौरवले जावे, अशी इच्छा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही अलिकडेच व्यक्त केली. देश-विदेशातून त्याच्यावर सन्मानांचा-बक्षिसांचा वर्षाव झाला. पण, त्याची आर्थिक परिस्थिती मात्र आतापर्यंत सुधारली नाही. तो 200 कोटी रुपयांच्या संपत्तीचा-मालमत्तेचा धनी असल्याचा अपप्रचार काही हितसंबंधी मंडळी करीत आहेत. पण, आपण, आपली पत्नी आणि मुलगा असा तिघांचा संसार प्रचंड महागाईत चालवताना तो मेटाकुटीला येतो. महिनाअखेर पैसे कोठून आणायचे? गाड्यात पेट्रोल कसे भरायचे? या चिंतेने तो घेरलेला असतो. अशा अत्यंत गरीब पण गुणी खेळाडूने भेट (फुकटात) मिळालेली मोटार विकून चार-पाच कोटी रुपये घेतले असले तरी, त्या रकमेवरचा कॅपिटल गेन टॅक्स पूर्णपणे माफ करावा आणि यापुढे त्याच्यावर प्राप्तीकर कधीही आकारू नये, मुंबई महापालिकेने त्याचा घरफळा कायमस्वरुपी माफ करावा, रतन टाटांनी त्यांच्या ताज हॉटेलातून दररोज त्याच्या कुटुंबियांसाठी जेवणाचे डबे मोफत पाठवावेत. केंद्र सरकारने तसे आदेश संबंधितांना द्यावेत, ही विनंती. कळावे, आपले क्रिकेट रसिक
-
वासुदेव कुलकर्णी
 

No comments:

Post a Comment