Total Pageviews

Thursday, 30 June 2011

GOOD JOB MUMBAI POLICE DEY MURDER

पोलीस डायरीएन्काऊंटर बंद सुपारीकिलिंग सुरू
शनिवार ११ जून रोजीमिड डेचे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांची हत्या झाल्यानंतर सार्‍या क्राइम ब्रँचची झोप उडाली होती. मुंबई क्राइम ब्रँचमध्ये डिटेक्शनची १२ पथके आहेत. त्या युनिटमधील सर्वच्या सर्व अधिकारी कर्मचारी कामाला लागले होते. प्रत्येकाला कामे वाटून नेमून देण्यात आली असतानाच एका खबर्‍याने जे. डेवर हल्ला करणार्‍या दोन संशयितांची नावे पोलिसांना जे. डे हत्येनंतर दोन दिवसांनी दिली. पोलिसांनी त्यांना उचलून पवई पोलीस ठाण्यात नेले, दरडावून, फटके देऊन चौकशी केली. त्यावेळी एका संशयिताने जे. डेवर आपणच हल्ला केल्याची कबुली पोलिसांना देऊन टाकली तेव्हा पोलिसांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कुणी पोलीस आयुक्तांना, कुणी गृहमंत्र्यांना, तर कुणी मुख्यमंत्र्यांनाही केस डिटेक्ट झाल्याचे कळवून टाकले. परंतु पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांना संशय आला. त्यांनी स्वत: पवई पोलीस ठाण्यात जाऊन संशयितांची चौकशी केली असता एक आरोपी विसंगत माहिती देऊ लागला. ज्यावेळी त्याची आस्थेवाईकपणे विचारपूस करण्यात आली तेव्हा त्याने आपण पोलिसांच्या थर्ड डिग्रीच्या भीतीने खोटी कबुली दिल्याचे आपण जे. डे हत्येप्रकरणी कोणताही संबंध नसल्याचे पोलीस आयुक्तांना सांगितले. त्यामुळे एक बोगस अटक टळली. बर्‍याच वेळेला पोलिसांचा मार वाचविण्यासाठी आरोपी केलेल्या गुन्ह्यांचीही पोलिसांना कबुली देऊन मोकळे होतात आणि खरे आरोपी नामानिराळे राहतात. जे. डे हत्येबाबतही तसेच होण्याची शक्यता वाटल्याने जे. डे हत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी न्यायालयात मागणी करण्यात आली, परंतु मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय, देवेन भारती, निसार तांबोळी यांच्या पथकाने मुंबई क्राइम ब्रँचची बूज राखली, लौकिक टिकविला आणि जे. डेवर हल्ला करणार्‍या खर्‍या आरोपींना गजाआड केले. त्यामुळे जे. डे हत्येचा तपास करणारी सारी क्राइम ब्रँच कौतुकास पात्र आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जे. डेच्या मारेकर्‍यांना अटक करणार्‍या क्राइम ब्रँचच्या पथकाला १० लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ते बक्षीस केस डिटेक्ट करणार्‍या अधिकार्‍यांना जाहीर केल्याप्रमाणे लवकर मिळाले तर त्यांचे मनोबल वाढेल. कारण जाहीर झालेली सरकारी बक्षिसे वर्षांनुवर्षे पोलिसांना मिळत नाहीत. ती लाल फितीत अडकून राहतात. जे. डेंच्या मारेकर्‍यांना अटक करणार्‍या क्राइम ब्रँचच्या अधिकार्‍यांबाबत तसे होऊ नये अशी अपेक्षा करण्यात येत आहे.जे. डेची हत्या छोटा राजनच्या इशार्‍यावरून रोहित जोसेफ ऊर्फ सतीश काल्या या खतरनाक गुंडाने केली. छोटा राजनने सतीश काल्याला पाच लाखांची सुपारी दिली. छोटा राजनला जे.डेची सुपारी कुणी दिली हे स्पष्ट झालेले नाही आणि अखेरपर्यंत होणारही नाही. छोटा राजन कुठे आहे हेच जर कुणाला माहीत नसेल तर मग जे. डे हत्येमागचा खरा हेतू तरी कसा कळणार? आणि जरी पोलिसांना कळला असला तरी मुंबई पोलीस जे. डेच्या हत्येचे खरेखोटे कारण सांगून जे. डेच्या चारित्र्यावर कशाला शिंतोडे उडवतील? त्यामुळे झाकली मूठ सवा लाखाची. जे. डे अमर रहे! गुंड हे कुणाचेच नसतात. त्यांच्याजवळ जाणे म्हणजे स्वत:वर संकट ओढून घेण्यासारखेच आहे. जे. डेनी ती चूक केली आणि त्याचे प्रायश्‍चित्त त्यांना भोगावे लागले. एक हुशार, धडपड्या पत्रकाराचा नाहक बळी गेला. मुंबईत तरी गेल्या दोन दशकांत अंडरवर्ल्डकडून पत्रकारावर असा हल्ला झाला नव्हता. छोटा राजनने इतके मोठे धाडस का केले याचे गूढ आज ना उद्या उकलेल, परंतु पत्रकारांचा छोटा राजनवर आता विश्‍वास राहिलेला नाही. छोटा राजनने एका बड्या पत्रकाराची हत्या करून अंडरवर्ल्डमध्ये एक नवा पायंडा पाडला आहे तो तरुण क्राइम रिपोर्टरना भयभीत करणारा आहे.छोटा राजनने जे.डेची हत्या करून अंडरवर्ल्डमध्ये पुन्हा एकदा आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. शूटर मुबलक झाल्यावर आणखी काय होणार? पोलीस आताएन्काऊंटर करीत नाहीत, तर पकडतात, जेलमध्ये टाकतात असे सर्वश्रुत झाल्याने संघटित टोळ्यांना आता पानाच्या गादीवरही पाच-दहा हजारांत शूटर मिळू लागले आहेत. त्यामुळे छोटा राजनसारखे व्यावसायिक गुंड सुपार्‍या घेऊन जे. डेसारख्या पत्रकारांनाही भाड्याच्या शूटरकडून मारू लागले आहेत. खुलेआम खून, रक्तपात करणार्‍यांना यापूर्वी पोलीसएन्काऊंटर करून जशास तसे उत्तर देत होते. परंतु आता त्याच गुंडांना जिवंत पकडण्याची पाळी पोलिसांवर आल्याने यापुढे या मुंबईत पुन्हा एकदा सुपारी किलिंगचे प्रकार सुरू झाले आहेत आणि ते आता कुणीही रोखू शकणार नाही, हे छोटा राजनने दाखवून दिले आहे

No comments:

Post a Comment