Total Pageviews

Friday, 24 June 2011

AISHYARY RAIs BABY BECOMES SUPERSTAR EVEN BEFORE BIRTH

ऐश्वर्या रायनं झेंडा लावला काय? ऐक्य समूह Friday, June 24, 2011 AT 11:24 PM (IST) - वासुदेव कुलकर्णी
 
.
हिंदी चित्रपटसृष्टीतला ज्येष्ठ अभिनेता-बिग बी अमिताभ बच्चननं ट्विटरवरच्या आपल्या ब्लॉगवर, आपल्या सूनबाई ऐश्वर्या राय गर्भवती असल्याचं लिहिलं आणि या वृत्तवाहिन्यांच्या छायाचित्रकार, संपादक, वार्ताहरांना अक्षरश: हर्षवायू झाला. कुत्रं जसं हाडं चघळतं, तसं गेले दोन दिवस वृत्तवाहिन्या हाच विषय सातत्यानं अमिताभ बच्चन, जया बच्चन आजी होणार, अभिषेक बच्चन बाप होणार, ऐश्वर्या राय आई होणार याच बातम्या रंगवून रंगवून सातत्यानं प्रक्षेपित करायला लागल्या. ऐश्वर्या राय गर्भवती राहिली, यात विशेष काय? आणि हा बातमीचा विषय कसा होवू शकतो? हे सर्वसामान्याच्या सुख-दु:, व्यथा-वेदनांशी कसलंही नातं नसलेल्या उपग्रह वाहिन्यांनाच माहिती! ती गर्भवती आहे, यात तीनं कोणता झेंडा लावला? याचा विचार याच बातमीचा रतिब घालणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी केलेला नाही. सवंग लोकप्रियता मिळवायसाठी तिखट-मिठ लावून अशा भंपक बातम्या प्रक्षेपित करायला सोकाव-लेल्या या वाहिन्यांना हा विषय मिळाला इतकंच! अमिताभ बच्चनचे वडील हरिवंशराय बच्चन यांचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध होते. पण, अमिताभ बच्चनला हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हायसाठी झगडावं लागलं. आता मात्र ऐश्वर्या रायचं मूल जन्माला येईल तेव्हा ते आपोआपच सुपरस्टार असेल. ऐश्वर्या राय प्रसुत झाल्यावर ती आणि तिच्या नवजात बाळाची छायाचित्र, तिच्या-तिच्या नवऱ्याच्या अभिषेकच्या मुलाखती प्रक्षेपित करून ही प्रसारमाध्यमं त्याला जन्मत: सुपरस्टार करून टाकतील. किंबहुना हे बाळ जन्माला यायच्या आधीच सुपरस्टार पदाला पोहोचवायची कामगिरीही या वाहिन्यांनी करून टाकली. काही ज्योतिष पंडितांनी अमिताभच्या जन्माला येणाऱ्या नातवाची जन्मकुंडली बनवायला सुरुवात केली, तर काही संख्या ज्योतिषांनी, ऐश्वर्याचं बाळ कसं असेल, त्याचं भविष्य कसं असेल, हे ही सांगायचा सपाटा लावला. काहींनी तर ऐश्वर्याला जुळं होईल, असं भविष्यही वर्तवून टाकलं. अमिताभ बच्चन आजोबा होणार, यात त्यानं काही जग जिंकल्याचा पराक्रम केलेला नाही. चार वर्षांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेकचा विवाह झाला.तो होण्यापूर्वी ती दोघं गळ्यात गळा घालून बनारसपासून अमेरिकेपर्यंत मुक्तपणे हिंडत होतीच. त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा याच प्रसार माध्यमांनी तेव्हाही रंगवलेली होतीच.त्या आधी विश्वसुंदरी झालेल्या ऐश्वर्याची बिकीनीतली उन्मादक छायाचित्र जगभर झळकली होती. पुढं हिंदी चित्रपटात तिला भूमिका मिळाल्या. जगातली सुंदर स्त्री असा तिचा लौकिक झाला. प्रसिध्दीच्या झोतात राहायची सवय झालेल्या ऐश्वर्याला सलमान खाननं कसं चोपून काढलं, तिच्या मुंबईतल्या सदनिकेसमोर कसा धिंगाणा घातला होता, त्या सवंग बातम्याही वृत्तवाहिन्यांनी रंगवून रंगवून दिल्या होत्या. 31 वर्षाचा अभिषेक आणि त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी असलेल्या ऐश्वर्याचा अखेर विवाह झाला आणि तिच्या लफड्यांची चर्चा हळूहळू कमी होत गेली. मग, ऐश्वर्याला मुल कसं होत नाही, ती एकटीच फ्रान्समधल्या "कान' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला कशी गेली, मधुर भांडारकरच्या आगामी चित्रपटात ती अंग-प्रदर्शनाचं उघडं प्रदर्शन कसं करणार आहे, ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात भांडणं कशी सुरु झाली? या बातम्या वृत्त आणि मनोरंजन वाहिन्यांनी द्यायचा सपाटा लावला. आता ती आई होणार, ही बातमी त्यांना जागतिक आश्चर्याची वाटते आहे. दारिद्र्यरेषेखालच्या चाळीस टक्के कुटुंबियांच्या बालकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. आदिवासींच्या बालकांचे कुपोषणानं अपमृत्यू होतात. झोपडपट्ट्यातल्या-श्रमिक-शेतमजूर-भटक्या समाजातल्या गर्भवती महिलांना योग्य आहार मिळत नाही. त्यांना भुकेल्या पोटी श्रम करावे लागतात. त्यांच्या प्रसुतीची नीट व्यवस्थाही होत नाही. या साऱ्या व्यथा-वेदना सोसत या माता आपल्या बाळांना अपार कष्ट करीत सांभाळतात, जीवापाड जपतात, मोठं करतात. त्या उद्याच्या मातांचा, त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या आनंदाची-व्यथांची दखलही या वृत्तवाहिन्यांना घ्यावीशी वाटत नाही.

No comments:

Post a Comment