पोलिस पिसाळले; चिचोंडी पाटीलवर तुटून पडले! मध्यरात्री गावात घुसून घातला धुडगूस अहमदनगर, दि. ५ (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील पोलिसी खबर्या बाळू लाटे यांच्या चंदनतस्करांकडून झालेल्या हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी सोमवारी रास्तारोको आंदोलन केले; परंतु सर्व सामसूम झाल्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास दरोडेखोरांना लाजवेल असा पवित्रा पोलिसांनी घेऊन गावात अक्षरश: धुडगूस घातला. पिसाळलेल्या पोलिसांनी झोपलेल्या ग्रामस्थांना गुरासारखे बदडून काढले. आपल्याला कशासाठी मारले जात आहे, याची पुसटशी कल्पनाही गावकर्यांना आली नाही. यामध्ये अनेक गावकरी जखमी झाले. दिल्लीतील रामलीला मैदानावर सुमारे एक महिन्यापूर्वी झालेल्या पोलिसी अत्याचाराची आठवण ताजी करून देणारी पोलिसांची ही कारवाई होती. यामुळे चिचोंडी पाटील येथील ग्रामस्थ प्रक्षुब्ध झाले आहेत. रास्ता रोकोसंदर्भात पोलिसांनी ५२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून १५ जणांना अटक केली आहे. चिचोंडी पाटील येथे लाटे हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी सोमवारी दिवसा रास्तारोको आंदोलन केले; परंतु पोलिसांनी मध्यरात्री एकच्या सुमारास गावात घुसून अक्षरशः हैदोस घातला. झोपेत असलेल्या ग्रामस्थांना गुरांसारखे बडवून काढले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थ गोंधळून गेले. ५२ जणांविरुद्ध प्रक्षुब्ध भाषण व बेकायदा जमाव जमविणे आदी कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला असून, १५ जणांना अटक करण्यात आली. या १५ जणांना सहदिवाणी न्यायाधीश एस.एन.शहा यांनी मंगळवारी जामिनावर मुक्त केले आहे. लाटे हत्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याच्या निषेधार्थ सरपंच अमोल कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली नगर-जामखेड रस्त्यावर हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. साहाय्यक पोलिस अधीक्षिका ज्योतिप्रिया सिंग यांच्याबरोबर चर्चा केल्यावर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यासंदर्भात पोलिसांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात सुधीर भद्रे, बाळासाहेब कदम, अमोल कोकाटे, सचिन नागवडे, सूर्यकांत पवार, लहानू वाडेकर, राजू बनकर, गणेश कांबळे, सुरेश गाडे, अनिल कोकाटे, किशोर पवार, शहाजी भद्रे, काशिनाथ जपकर, मच्छिंद्र खडके यांच्यासह ५२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर मध्यरात्री पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात घुसला. त्यांनी झोपलेल्यांना बाहेर काढून बेदम मारहाण सुरू केली. अचानक झालेल्या या मारहाणीमुळे ग्रामस्थ भयभीत झाले. पोलिसांनी यावेळी १५ जणांना अटक केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ मंगळवारी चिचोंडी पाटील गाव बंद ठेवण्यात आले. दरम्यान, अटक केलेल्या या १५ जणांना जिल्हा न्यायालयात सहदिवाणी न्यायाधीश एस. एन. शहा यांच्यासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. पत्रकारांवरही दडपशाही! दरम्यान, चिचोंडी पाटील येथील रास्ता रोको आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले वार्ताहर राजू मणियार यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल करून पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आहे. नगर तालुका पत्रकार संघाच्यावतीने पोलिसांच्या या कार्यपद्धतीचा निषेध करण्यात आला. या संदर्भात तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र निकम हे बुधवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असून, वार्ताहराचे नाव वगळण्याची मागणी करणार आहेत
-
-
No comments:
Post a Comment