Total Pageviews

Saturday, 2 July 2011

INHUMAN HOSPITALS

माणुसकी सोडलेल्या परिचारिकांमुळे गेला एक जीव
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 02, 2011 AT 01:15 AM (IST)
Tags: nagpur,   hospital,   nurse,   nagpur,   vidarbha
केवल जीवनतारे
नागपूर - तो दमा, क्षयरोगाने त्रस्त. वॉर्डात खाटेवरच त्याचे दिवस जात होते. अशक्तपणामुळे उठता येत नव्हते. तहानेने व्याकूळ झालेला जीव "पाणी...पाणी..' म्हणून विव्हळत होता. "शंभर रुपये घ्या; पण मला घोटभर पाणी द्या हो,' अशी केविलवाणी विनवणी तो करीत होता; परंतु वॉर्डातील परिचारिकांची माणुसकी हरवली होती... आणि अवघ्या तासाभरातच त्याने खाटेवरूनच दोन्ही हात जोडून वॉर्डाला अखेरचा सलाम केला. त्याच्या हृदयाची धडधड थांबली. त्याक्षणी आरोग्य मंदिरातील परिचारिकांकडून "माणुसकी'चा खून झाला. रुग्णसेवेप्रति परिचारिकांच्या आत्मसर्पणाच्या भावनेला येथे तडा गेला. मातेपेक्षाही अधिक वात्सल्य परिचारिका जोपासतात, हा समज या घटनेने खोटा ठरवला. हृदय हेलावून टाकणारी ही घटना मेडिकलच्या टीबी वॉर्डात "वॉर्ड क्रमांक 43'मध्ये घडली.

या मृताचे नाव सुरेश पांडुरंग नासरे होते. वय पन्नाशीचे. बजरंगनगरात राहत होता. दमा आणि क्षयरोगाच्या वेदना झेलत जगत होता. पोटाच्या त्रासामुळे कधी-कधी खाटेवर शौच करायचा. वॉर्डातील परिचारिकांना ते किळसवाणे वाटायचे आणि येथील परिचारिकांनी सुरेशच्या जवळ जाणे टाकून दिले. अशावेळी त्याची बहीण गीता महाकाळकर त्याची सेवाशुश्रूषा करीत असे; परंतु एकटा असताना त्याला जेवण मिळत नसे. औषधही देणेही बंद झाले. परिचारिका त्याला टाकून बोलायच्या. जेवण केल्यानंतर खाटेवर शौच होत असे. यामुळे परिचारिका त्याला फटकारत. तो नैराश्‍यात गेला. त्याने जेवणही सोडून दिले. अशक्तपणा आला. "आयव्ही' लावण्यासाठी परिचारिका त्याच्या जवळ जात नसत. या वॉर्डातील परिचारिका रोहणकर-भांगे यांनी सर्वाधिक हेळसांड केल्याची तक्रार आहे. याशिवाय इन्चार्ज सिस्टर सनकाळे यांच्यावरही दोष ठेवला आहे.

अमानुषतेची हद्द
सुरेश दमाचा रुग्ण असताना, शौच केल्यानंतर अटेंडन्ट्‌च्या हाताने स्ट्रेचरवर घेऊन त्याच्या अंगावर थंड पाणी टाकले जात असे. दोनदा असा प्रकार परिचारिकांनी केल्याची माहिती खुद्द वॉर्डात भरती रुग्णांनी दिली. ओलाचिंब झाल्यानंतर निर्वस्त्र करून त्याला खाटेवर टाकून दिले जात असे. असा क्रूर जीवघेणा खेळ परिचारिकांनी जिवंत रुग्णाशी केला. थंड पाणी टाकल्याने दमा आणि क्षयग्रस्त सुरेश गॅस्पिंगमध्ये गेला. "गॅस्पिंग'मध्ये गेल्याचा कॉल डॉ. नितीन यांना परिचारिकांनी दिला नाही. अखेर सुरेशचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र साऱ्यांनी त्याच्या खाटेला वेढा घातला. कोणत्याही आजाराचा रुग्ण असो; परिचारिकांची त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी सहानुभूतीची असायला हवी. 12 मे रोजी "फ्लोरेन्स नाईटिंगेल' या महान परिचारिकेचा स्मरणसोहळा या परिचारिका दरवर्षी मोठ्या उत्सवात साजरा करतात; परंतु रोहनकर आणि इतर परिचारिकांना सुरेशसोबत कोरडी सहानुभूतीही दाखवता आली नाही. स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून रुग्णांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम परिचारिका करतात; परंतु वीस दिवस सुरेश वॉर्डात परिचारिकांकडून होणारा छळ सोसत होता. सेवाव्रती फ्लोरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेच्या आदर्शाला मूठमाती देण्याचे काम मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 43 मध्ये झाले, ही जखम भरून न निघण्यासारखीच आहे.

सोमवारी चौकशी
वॉर्ड क्रमांक 43 मध्ये परिचारिकांनी दिलेल्या हीन वृत्तीच्या वागणुकीमुळे सुरेशचा मृत्यू झाला, अशी तक्रार मृताची बहीण परिचारिका गीता यांनी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, क्षयरोग विभागप्रमुख डॉ. धमगाये यांना दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अधिष्ठात्यांनी दिले. सोमवारी (5 जुलै) या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

No comments:

Post a Comment