राजकीय विश्लेषक
पुरुषांनी दाढी वाढवावी, तर स्त्रियांनी अंगभर बुरखे लपेटून घ्यावेत हे इस्लामचे बहिरंग आहे, सबुरी व श्रद्धा बाळगून सदाचरणाची धीमी वाटचाल पत्करणे हे इस्लामचे अंतरंग आहे. उझबेकीस्तानचे अध्यक्ष इस्लाम करीमोव्ह व अन्य शासक इस्लामी अंतरंग उलगडून सांगण्यावर भर देत आहेत.
..................
या वर्षी १७ व १८ मे रोजी उझबेकिस्तानचे अध्यक्ष इस्लाम करीमोव्ह भारतात मुक्कामाला होते. त्या दोन दिवसांत भारत आणि उझबेकिस्तान या देशांमध्ये ३४ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. केवळ उझबेकिस्तान नव्हे, तर संपूर्ण मध्य आशिया भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या भूभागाला खेटून असलेल्या अफगाणभूमीवर भारताने प्रचंड गुंतवणूक केली आहे व फरगाण दरीत दहशतवादाने मूळ धरले असल्याने ही गुंतवणूक पाण्यात जाते की काय असे भय आहे. तेव्हा या दरीतला आतंकवाद संपुष्टात यावा आणि भारताच्या व जगाच्या दृष्टीने सर्व दूर शांतता व सुबत्ता फुलावी हीच सर्वांची इच्छा आहे. उझबेकी नेत्याच्या भारतातल्या वास्तव्यात याच विषयावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. तेव्हा उझबेकी अध्यक्षांनी म्हणजे इस्लाम करीमोव्ह यांनी आपल्या देशात निश्चित केलेली व अनुसरलेली मुस्लिम नीती समजून घेतली पाहिजे.
मुळात सन १९९१ मध्ये सोव्हिएत संघ कोसळल्यावर जी पंधरा राष्ट्रे नव्याने स्वतंत्र झाली, त्यांपैकी मध्य आशियात सामाविष्ट होणाऱ्या पाच मुस्लिम राष्ट्रांमध्ये उझबेकिस्तानचे स्थान अतिशय मौलिक आहे. सन १९१७ ते सन १९९१ या काळात सोव्हिएत संघाने धर्मसंस्थेवर सातत्याने हल्ले केले; परिणामत: इस्लाम पंथाच्या प्रसारावरही प्रतिकूल परिणामच झाला. पण दुसऱ्या महायुद्धात व स्टालीनच्या निधनानंतरच्या काळात धर्मविरोधाची धार बोथट करण्यात आली. सन १९८०मध्ये सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानात कडव्या इस्लामची झळ अनुभवली, तेव्हा आपल्या घरातला मुसलमान बिथरू नये म्हणून सोव्हिएत शासकांना मार्क्सवादापासून घूमजाव करणेच श्ाेयस्कर वाटले. मग मशिदी, मदरसे, दगेर् यांच्या बांधकामांना प्रोत्साहन देण्यात आले, इस्लाम आणि सोव्हिएत युनियन यांच्यात कसे सख्य आहे हे आवर्जून सांगण्यात आले. सन १९८५ मध्ये गोर्बाचोव्ह कारकीर्द सुरू झाली. नंतर अल्पावधीत सोव्हिएत संघ भुईसपाट झाला व नवजात मुस्लिम राष्ट्रांमध्ये इस्लाम पंथाच्या पुनरुज्जीवनाचे जणू उधाण जगाने अनुभवले. सौदी अरेबिया, पाकिस्तान व आखाती देश या सर्वांनी या पुनरुज्जीवनाला खतपाणी घातले.
इस्लाम करीमोव्ह या वातावरणात उझबेकिस्तानचे अध्यक्ष म्हणून जगाला परिचित झाले. त्यांना व मध्य आशियातल्या सर्व शासकांना कळून चुकले की नव्याने जन्माला आलेल्या या राष्ट्रांची अस्मिता व इस्लाम यांचे गणगोत एकच आहे. या नवस्वतंत्र राष्ट्रांनी मग आपापल्या भूप्रदेशाचे इतिहास नव्याने लिहिण्यास सुरुवात केली. वानगीदाखल एक उदाहरण उल्लेखनीय आहे. सोव्हिएत युनियनमध्ये सात दशके सांगितले जात होते की इस्लाम पंथ हा भूतकाळाचा अवशेष आहे व काही वषेर् उलटल्यावर सोव्हिएत भूमीत इस्लाम अस्ताला जाईल आणि धर्मनिरपेक्ष वृत्तीचा नवा मानव साकार होईल. मध्य आशियातली नवस्वतंत्र मुस्लिम राष्ट्रे मात्र सांगू लागली की प्राचीन काळापासून इस्लाम जगात रुजला आहे, सन १९१७ ते सन १९९१ या काळात धूमकेतूप्रमाणे सोव्हिएत संघ चमकत राहिला. शेवटी तो अस्ताला गेला व इस्लामचा चाँदतारा नव्या जोमाने नभांगणात झळकला. भविष्यात हा चाँदताराच जगाला आनंदी करणार आहे.
योग असा की १९९० ते २००० या दशकातच इस्लामी आतंकवादाने हातपाय पसरण्यास प्रारंभ केला. या दशकातच उझबेकिस्तानात 'हिजबुत तहरीर' या भूमिगत चळवळीने चांगले मूळ धरले. पाठोपाठ इस्लामिक मूव्हमेंट उदयाला आली. इस्लामचे देवबंदी भाष्य, तालिबानी भूमिका व अल् कायदाचा वहाबी विचार या सर्वांना मुस्लिम घटकांनी कडेखांदी घ्यावे व कडवा इस्लाम शिरोधार्य मानावा या दिशेने वाटचाल सुरू झाली. त्यातूनच १६ फेब्रुवारी १९९९ रोजी ताश्कंदला बॉम्बस्फोट झाले.
उझबेकी शासनासमोर यातून शंृगापत्ती पैदा झाली. इस्लामचे पुनरुज्जीवन तर आवश्यक आहे, पण यातून जीवघेणा दहशतवाद मात्र पसरता कामा नये. इस्लाम करीमोव्ह यांनी या शंृगापत्तीतून मार्ग काढण्यासाठी 'मी महात्मा गांधीजींचा अनुयायी आहे, शांततेचा व अहिंसेचा पुजारी आहे', असे सांगण्यास सुरुवात केली. उझबेकिस्तानातल्या मुसलमानांनी उझबेकिस्तानच्या इस्लामपूर्व इतिहासाचा अभिमान बाळगावा, बहुविधतेचे, सगळ्यांशी स्नेहाने, सलोख्याने वागण्याचे व्रत घ्यावे, लोकशाही, आधुनिकता वगैरे दृष्टिकोन अमलात आणावेत इत्यादी मंत्रांचा त्यामुळे जागर सुरू झाला.
इस्लाममध्ये सूफी पंथ म्हणजे मवाळ व नेमस्तमागीर् संप्रदाय असे समीकरण आहे. मध्य आशियातल्या मुस्लिम राष्ट्रांच्या सर्व शासकांनी याच पंथोपपंथांना मान्यता दिली आहे.पुरुषांनी दाढी वाढवावी, तर स्त्रियांनी अंगभर बुरखे लपेटून घ्यावेत हे इस्लामचे बहिरंग आहे, सबुरी व श्ाद्धा बाळगून सदाचरणाची धीमी वाटचाल पत्करणे हे इस्लामचे अंतरंग आहे. इस्लाम करीमोव्ह, अकाएव्ह वगैरे शासक इस्लामी अंतरंग उलगडून सांगण्यावर भर देत आहेत. आपल्याच देशातल्या सूफी पंथांच्या र्दग्यांच्या यात्रा, प्रसंगी हजयात्रेपेक्षाही अधिक फलदायी मानाव्यात ही शिकवणही उझबेकिस्तानात रुजविली जात आहे.
उझबेकी इस्लाम शासन-आयोजित आहे, म्हणूनच चीनमध्ये ज्याप्रमाणे एकेकाळी माओवचने प्रचारिली जात होती, त्याप्रमाणे उझबेकिस्तानात सध्या करीमोव्हच्या कहाण्या व आख्यायिका रंगवून सांगितल्या जात आहेत.
उझबेकिस्तान, कझाखस्तान, किरगिजस्तान वगैरे मुस्लिम राष्ट्रांची पाकिस्तानला दुखावण्याची इच्छा नाही; पण भारताशी स्नेहसंबंध वाढविण्याची तमन्ना जरूर आहे. समजा या सर्व शासकांच्या प्रयासांना मधुर फळे आली व शांततावादी, स्वागतशील, बहुविधताप्रेमी असे रूप घेऊन इस्लाम तिथे रुजला तर भारतवासी या आविष्काराचे स्वागतच करतील
No comments:
Post a Comment