Total Pageviews

Saturday 13 October 2018

ड्रगनची कोंडी -TARUN BHARAT

नच्या अमेरिकेतील व्यापार विस्तारावर निर्बंध आल्यामुळे कोंडीत सापडलेल्या चिनी ड्रगनला आता शेजारील भारताची आठवण झाली आहे.  अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून कमालीचे ताणले असून, अमेरिकेच्या नव्या व्यापार धोरणाविरोधात लढण्यासाठी चीनने आपल्या जुन्या शेजारी मित्राकडे मदतीचा हात मागितला आहे. आजपर्यंतचा भारत-चीन संबंधाचा इतिहास चाळला असता चीनची अजिबात विश्वासार्हता नाही, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. याउलट भारताला बेसावध गाठून चिनी ड्रगनने अनेकवेळा दंशच केला आहे. पण दोन बडय़ा आर्थिक महासत्तांच्या भांडणात भारत आपला व्यापारी फायदा कसा उठवतो हे आपल्यासमोर आव्हान असणार आहे. जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता बनण्याची क्षमता असणाऱया भारताकडे चीन नेहमीच तुच्छतेने पहात आला आहे. किंबहुना भारत आर्थिकदृष्टय़ा बलवान न होता आपल्यासमोर कमकुवत राहावा, अशीच चीनची रणनीती राहिली आहे. आता स्वतः आर्थिक  अरिष्टाच्या चक्रव्यूहात अडकण्याच्या भीतीने चीनने भारताकडे मदतीची याचना केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्यापार नीतीमुळे भविष्यात व्यापारयुद्ध भडकण्याची चिन्हे असून, जागतिक अर्थव्यवस्था यानिमित्ताने ढवळून निघाली आहे. गरज म्हणून एखाद्या उंटाला तंबूत घेतले आणि उंट तंबूच उचलून निघाला, असे ट्रम्प यांना वाटते. अमेरिकेच्या बाजारपेठेत कुणीही येते. हवा तसा माल खपवते. या बाजारपेठेच्या जिवावर, त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था गब्बर  होते.  पण अमेरिकेची व्यापारी तूट दिवसेंदिवस वाढत आहे. विदेशी व्यापार आक्रमणामुळे  अमेरिकेतील उत्पादक आणि कंपन्या डबघाईला जात असून, भविष्यात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका होऊ शकतो, अशी भीती त्यांना वाटते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नवा व्यापार संरक्षणवाद आणला आहे. देशी बाजारपेठेला संरक्षण देण्यासाठी चीन, युरोपियन संघातील राष्ट्रांवर जबर आयात शुल्क लागू करीत त्यांना अमेरिकन बाजारपेठेपासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे चीनमधून आयात होणाऱया वस्तूंवर 200 अब्ज डॉलर आयातशुल्क लादले आहे. चीनच्या अमेरिकेतील बाजारपेठेला वेसण घालण्याचा हा प्रयत्न आहे. सुक्याबरोबर थोडे ओलेही जळते, त्याप्रमाणे भारतावरही निर्बंध घातले आहेत. पण जागतिक परिस्थिती पाहता भारत-अमेरिका संबंधातील तणावापेक्षा चीन-अमेरिका दरम्यान तणाव अधिक आहे. व्यापार धोरणात कुरघोडी करत जगातल्या या दोन बलाढय़ बाजारपेठा जबर आयात शुल्क लादण्याच्या मुद्यावरून आता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. चिनी वस्तूंवर अमेरिकेने 200 अब्ज डॉलर्स आयात कर आकारल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेहून आयात होणाऱया मालावर चीनने 60 अब्ज डॉलर्स कर आकारला. चीन अमेरिकेला तब्बल 523 अब्ज डॉलर्सची निर्यात करते. त्या तुलनेने अमेरिका चीनला 187 डॉलर्सची निर्यात करते. चीनने अमेरिकेच्या बाजारपेठेवर मिळवलेल्या वर्चस्वामुळे अमेरिकेचे डोळे खाडकन् उघडले. चीनचे आयात-निर्यात धोरण लवचिक आहे. जगातील कोणत्याही बाजारपेठेत त्यांची घुसखोरी लक्षणीय असते. अमेरिकेची व्यापारी तूट वाढण्यास चीनसारख्या राष्ट्रांचे आक्रमण कारणीभूत ठरत असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. चीन आपले अतिरिक्त स्टील उत्पादन अक्षरशः जगाच्या बाजारपेठेत ओतत आहे. याचा विपरीत परिणाम अमेरिकेच्या स्टील उत्पादन आणि कामगारांवर होत आहे. गेल्या वीस वर्षात चीनने आपल्या देशात महाकाय स्टील उद्योग उभे केले. सध्या अमेरिकेपेक्षा दहापट स्टील उत्पादन ते करतात. चिनी उंट आता तंबूच घेऊन चालला असून, आर्थिक कण्याला धक्का पोहोचत असल्याचे लक्षात येताच, 1 मार्चपासून  स्टील आयातीवर 25 टक्के आणि ऍल्युमिनियमवर 10 टक्के शुल्क आकारण्यास अमेरिकन प्रशासनाने सुरूवात केली आहे. अमेरिकेशी व्यापार मैत्री असणाऱया कॅनडा तसेच युरोपियन संघातील मित्रराष्ट्रांना त्यांनी हा कर लागू केला आहे. अखेर जागतिक व्यापार न्याय तत्त्वांशी अमेरिकेचे नवे व्यापारी धोरण कितपत सुसंगत आहे, हा संशोधनाचा मुद्दा आहे. याबाबत जगभरातील बहुतांश अर्थतज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. शिवाय व्यापारयुद्धाची झळ अन्य देशांना लागण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.  अमेरिकेच्या व्यापार आणि एकाधिकारशाहीच्या धोरणाविरोधात लढा देण्यासाठी भारत आणि चीनने एकत्र येण्याची गरज चीनने व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला तूर्तास तर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. गेल्या 35-40 वर्षात चीनने देखील अत्यंत नियोजनबद्धरित्या व्यावसायिक प्रगती केली आहे. धूर्तपणे आपल्याही बाजारपेठेचा त्यांनी ताबा घेतला आहे. गणेशोत्सवात लाईटच्या माळा व दीपावलीसाठी आकाशकंदिलाच्या माध्यमातून चिनी वस्तूंनी आपल्या घरात कशी घुसखोरी केली, हे कधी समजले नाही.  चीनमध्ये 10.08 डॉलर्सची भारत निर्यात करतो. त्या मानाने चीनची भारतात 44 अब्ज डॉलर्सची आयात आहे. सन 2020 पर्यंत उभय देशांदरम्यान 100 अब्ज डॉलर्सचे व्यापाराचे लक्ष्य आहे. काही भारतीय उत्पादनाना चीनचे दरवाजे बंद आहेत, हे वास्तव आहे. माहिती तंत्रज्ञान, औषधे व कृषी उत्पादनासाठी भारताला चिनी बाजारपेठेची गरज आहे.  भारतीय वस्तूंना भविष्यात गुंतवणुकीसाठी मोठी संधी आहे. कारण ही बाजारपेठ दिवसेंदिवस मोठी बनत चालली असून, तेथे मध्यमवर्गात वाढ होत आहे. अर्थव्यवस्था मजबुतीच्या समान उद्दिष्टांवर भारत आणि चीनने एकत्र येण्यास हरकत नाही. पण पूर्वानुभव लक्षात घेता, सावधरित्याच चीनशी बोलणी आणि व्यवहार करावा लागेल, कारण चिनी ड्रगन अतिशय धूर्त आणि चलाख आहे

No comments:

Post a Comment