Total Pageviews

Saturday 27 October 2018

अपघात, सुरक्षा आणि आपण!-लोकसत्ता टीम -अशोक दातार / सोनाली केळकर



अमृतसरमधील भीषण रेल्वे दुर्घटनेने एकूणच सगळ्या वाहतूक व्यवस्थेचा लेखाजोखा मांडण्याची वेळ आली आहे.

अमृतसरमधील भीषण रेल्वे दुर्घटनेने एकूणच सगळ्या वाहतूक व्यवस्थेचा लेखाजोखा मांडण्याची वेळ आली आहे. रेल्वे, विमान, तसेच रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे.  प्रत्येक वेळी त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून आपण पुन्हा सारे काही विसरून जातो. अशा भीषण अपघातांतून खरोखरीच आपण काही ठोस धडा शिकतो काकी ते आपले अरण्यरुदन असते?
अमृतसरमधील भीषण रेल्वे दुर्घटनेने एकूण जनजीवनात आपण आपल्या हाताने ओढवून घेतलेले दुर्दैवच अधोरेखित केले आहे. परंतु ही अशी पहिलीच वेळ आहे का? आपल्याकडे अशा स्वरूपाचे आणि इतरही अनेक प्रकारे अपघात फार मोठय़ा संख्येने घडत असतात. उदा. रात्री उशिरा निघालेली बस सर्वच्या सर्व प्रवाशांना घेऊन दरीत कोसळली आणि एक जण सोडून सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले! अथवा एल्फिन्स्टन रोड रेल्वे पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीत अनेक जण मृत्युमुखी पडले, जखमी झाले तो अपघात. याखेरीज महामार्गावर रात्री उशिरा किंवा पहाटे प्रवास करत असताना वाहनचालकाच्या डोळ्यावर झापड आल्याने वाहनावरील ताबा सुटून झालेले कित्येक अपघात, रेल्वेच्या फुटबोर्डवरून माणसे पडून झालेले अपघात, विमान धावपट्टीवर असताना दरवाजा बंद करताना एअरहोस्टेस खाली पडून झालेला अपघात.. असे कितीतरी- कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारचे भीषण अपघात आपल्याला सतत पाहायला/ ऐकायला मिळतात.
अद्ययावत तंत्रज्ञान व पुरेशा भांडवलाच्या जोरावर आपला देश गेली ३० वर्षे झपाटय़ाने आर्थिक प्रगती करतो आहे. अशा परिस्थितीतदेखील वाहतुकीच्या कोणत्याही प्रकारात पदोपदी आपल्याला असुरक्षितता जाणवत असते. मग ते पदपथ वा रस्त्यांवरील पादचारी असोत, लोकल वा बसचे प्रवासी असोत, रस्त्यांवरील  मोटारी, दुचाकी वाहने, टॅक्सी, ऑटो, बसेस आणि मालवाहू वाहने, याखेरीज बोटी आणि विमाने (नागरी व हवाई दलातलीही!) या सगळ्यांत अपघातांचे प्रमाण वाजवीपेक्षा खूपच जास्त आढळते, हे मान्य करावेच लागेल. दररोज वर्तमानपत्रं तसंच इतर प्रसार माध्यमांत अपघाताची बातमी नाही असा दिवस विरळाच! हे असे का घडते? आणि तेही इतक्या मोठय़ा प्रमाणावर?
अपघात हे प्रामुख्याने तीन-चार प्रकारचे असतात. एक म्हणजे वाहनांच्या यंत्रणेतील बिघाड, दुसरे म्हणजे पायाभूत सुविधांच्या बांधकामातील वा वापरातील दोष किंवा दुर्लक्षित राहिलेली झीज, अथवा प्रामुख्याने चालकांचा हलगर्जीपणा! वेगमर्यादा अजिबात न पाळणे, तसेच सिग्नल व लेनची प्राथमिक शिस्त न पाळणे ही वस्तुस्थितीही जबाबदार आहे. काही प्रसंगी प्रवाशांची/ लोकांची बिनधास्त प्रवृत्ती हेही कारण आढळते. त्यात भरीला मोटारीच नाही, तर दुचाकी चालवतानादेखील मोबाइलचा अतिरेकी वापर.. तसंच सरतेशेवटी काही दुर्मीळ आणि अटळ अशी नैसर्गिक कारणे- उदा. वीज कोसळणे, त्सुनामी, प्रलयंकारी वादळे, इत्यादी.
या व अशा अनेक कारणांनी झालेल्या दुर्घटनांनंतर सर्वसामान्यपणे त्यावर हिरीरीने सर्व बाजूंनी चर्चा होते. त्यासंबंधात चौकशीची मागणी होऊन मुख्यमंत्री किंवा अन्य नेत्याने ती मान्य करून नुकसानभरपाई जाहीर केली जाते. या गोष्टींची आता आपल्याला सवय झाली आहे. मात्र, ती नुकसानभरपाई वेळेत आणि योग्य व्यक्तींना मिळाली का? चौकशी व्यवस्थितपणे पार पडून तिचे निष्कर्ष वेळेत जाहीर केले गेले का? त्या चौकशीतून पुढे आलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली गेली का? त्याचे परिणाम काय झाले? मूळ परिस्थितीत सुधारणा झाली का? त्या ठिकाणी व त्या प्रकारचे अपघात बंद/ कमी झाले का? अशा सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा सावधपणे व गांभीर्याने होतो का? की हे सर्व एक नाटकआहे असे समजून समाजाच्या एकंदर विस्मरणशक्तीवर विश्वास टाकून मागील पानावरून पुढे चालूही पद्धत आपण अवलंबतो? हा फार त्रासदायक विचार आहे. निदान अमृतसर, एल्फिन्स्टन रोड दुर्घटना या प्रकारच्या भीषण आणि मन सुन्न करणाऱ्या अपघातांपासून खरोखर आपण काही ठोस धडा शिकतो का, हे गांभीर्याने तपासण्याची वेळ आज आली आहे असे वाटते.
आपल्याकडे क्रिकेटसारख्या खेळाच्या बाबतीत इतक्या विविध प्रकारची आकडेवारी उपलब्ध असते, निरनिराळ्या वेळी व विविध प्रकारे ती सादर केली जाते. लोकांना ती पाठ असणे हे भूषणावह वाटत असते. तसे वर उल्लेख केलेल्या सुरक्षिततेच्या व इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रगल्भ व तौलनिक माहितीचे विश्लेषण केले जाते का? हा दोष आपल्या एकूण परिस्थितीचा, व्यवहाराचा आणि मानसिकतेचा आहे. शून्य दोष’ (Zero defect) क्षमतेसाठी आज आपण पुरेपूर आग्रही नसतो. ही वस्तुस्थिती बदलायला हवी. रेल्वे, रस्ते, हवाई आणि सागरी वाहतुकीसाठी स्वतंत्र, पण सर्वंकष डेटाबेस राष्ट्रीय पातळीवर बनवायला हवा आणि तो अद्ययावत करण्यासाठी सध्याचीच यंत्रणा (नवी यंत्रणा नको!) योग्य रीतीने राबवायला हवी. हा डेटाबेस सर्व वापरकर्त्यांसाठी सुलभपणे उपलब्ध व्हायला हवा. तसेच सर्वत्र संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी स्वच्छ आणि ठसठशीत सूचना- फलक असायला हवेत. अपघात कमीत कमी कसे होतील यासाठी जास्तीत जास्त माहितीचे प्रसारण आवश्यक आहे. वाहनचालकांची क्षमता-चाचणी दर पाच ते दहा वर्षांनी कसोशीने केली जावी. त्यात हयगय व काटकसर नको. तीच गोष्ट इंजिन ड्रायव्हर्स, वैमानिक यांच्या बाबतीतदेखील लागू असावी.
अमृतसरमधील दुर्घटनेबद्दल बोलायचे झाल्यास रेल्वेचे रूळ, सिग्नल यंत्रणा, सर्व प्रकारचे पूल या पायाभूत सुविधांची देखभाल अतिशय काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. ती तशी केली जात नसल्यास रेल्वे प्रशासनास जबाबदार धरणे हे समजू शकते; परंतु ज्या रुळांवरून भरधाव वेगाने गाडय़ा जात-येत असतात हे माहीत असतानाही त्या रुळांवर उभे राहून रावणदहनाची मजा बघणे, त्याला आपल्या मोबाइलमध्ये चित्रित करण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करणे हे केवळ अक्षम्यच आहे. त्याकरता रेल्वे प्रशासनास कसे जबाबदार धरता येईल? आपण रस्त्यावर असताना, प्रवासात असताना आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी आपलीही असायला हवी ना? या सगळ्या परिस्थितीवर मात करणे शक्य आहे की नाही? की हे असंच चालायचं?
गर्व से कहो हम भारतीय हैंही किंवा या प्रकारच्या अभिमान वाढवणाऱ्या संकल्पना केवळ वल्गना न राहता त्यासाठी किमान ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यापैकी महत्त्वाची एक म्हणजे सुरक्षिततेसाठी आग्रही असणे. मग ते स्वत:साठी असो वा आजूबाजूच्या इतरांसाठीही! त्यासाठी आपली एकंदर मानसिकता सुधारण्याला सर्वानी अग्रक्रम द्यायला हवा. वाहने, रस्ते, रेल्वे व इतर पायाभूत सुविधांची शंभर टक्के काळजीपूर्वक देखभाल आणि वापर हे अतिशय आवश्यक आहे. या सगळ्याचा तंतोतंत सदोदित वापर होणं व तो तसा होतो की नाही याबाबत जागरूक असणे, याकरता प्रोटोकॉलपाळणे आवश्यक आहे. ते पाळले जातात की नाही, हे पाहण्यासाठी एक नैसर्गिक यंत्रणा राबविली जाणे आवश्यक आहे. सुरक्षितता, स्वच्छता, सामाजिक व्यवहारातील पारदर्शकता व सभ्यता या गोष्टींनी त्या समाजाची व देशाची प्रतिमा किती उज्ज्वल आहे, हे ठरत असते. तिचे जतन करणे व ती संवर्धित करणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य ठरते. केवळ अस्मितेच्या घोषणांनी हे होणारे नाही!
(लेखक मुंबई एन्व्हायर्नमेंटल सोशल नेटवर्कया संस्थेत कार्यरत आहेत.)


No comments:

Post a Comment