Total Pageviews

Monday 26 November 2018

KHALISTAN ATTACK LOKSATTA


अमृतसरमध्ये निरंकारी भवन येथे नुकताच ग्रेनेड हल्ला झाला. त्यात तीन जण ठार झाले. यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समोर येत आहे. पंजाबमध्ये अस्थिरता तयार करण्याचे आणि खलिस्तानवादाला चालना देण्याचे मनसुबे उधळून लावले पाहिजेत. 

'
धर्म ही अफूची गोळी आहे,' असे कार्ल मार्क्सने म्हटले आहे. दहशतवाद, कट्टरतावाद पाहिल्यानंतर या वाक्याची आठवण होते. वास्तविक दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो; पण आंतरिक भेदांचा फायदा घेऊन, ब्रेनवॉश करून, धर्माचे नाव पुढे करून कट्टरतावादी त्या 'वादा'चे पुरस्कर्ते तयार करण्याचा प्रयत्न करतात. देशाच्या एकसंधतेला त्याचा अंतिमत: धोका असतो. दहशतवाद आणि रक्तरंजित हिंसाचाराने होरपळलेल्या पंजाबने याचा सारा अनुभव ७०च्या दशकाच्या शेवटापासून जवळपास ८०चे पूर्ण दशक घेतला आहे. या काळात पंजाब कसा होता, याचे विदारक चित्र आत्तापर्यंत अनेकांनी मांडले आहे. अमृतसरमधील निरंकारी भवन येथे सत्संगासाठी जमलेल्या दोनशे ते अडीचशे भाविकांवर नुकताच ग्रेनेड हल्ला झाला. असा हल्ला करून तीस ते चाळीस वर्षांपूर्वीच्या काळाची पुनरावृत्ती करण्याचा मानस ग्रेनेड हल्ला करणाऱ्यांचा नव्हता ना, असा प्रश्न सध्याच्या परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर पडतो. 

शीख समुदायामध्ये निरंकारी नावाचा पंथ आहे. या पंथामध्ये गुरू परंपरा सुरू ठेवण्यात आली आहे. इतर शीख बांधवांमध्ये ही परंपरा नाही. शीख आणि निरंकारी यांच्यामध्ये हा फरक आहे. निरंकारी पंथाची स्थापना १९२९मध्ये झाली. निरंकारींच्या विविध देशांत शाखा असून भक्तांची संख्याही मोठी आहे. 'शीख-निरंकारी' संघर्षाची झळ या पंथाला मोठ्या प्रमाणात बसली आहे. ७०, ८०च्या दशकामधील संघर्षाला शीख-निरंकारी संघर्ष, हिंदू-शीख संघर्षाची किनार होती. भाषा, प्रांत आणि इतर राजकीय कारणेही होती. 'ब्लीड इंडिया विथ थाउजंट्स कट' हे धोरण असणारा पाकिस्तान भारतामध्ये कायमच कारवाया करीत आला आहे. पंजाबसारख्या प्रांतात खलिस्तानवादी चळवळीला चालना देण्याचा या देशाचा सतत प्रयत्न असतो. अमृतसरमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामागेही पाकिस्तानचा हात होता, हे आता स्पष्ट झाले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीने पाकिस्तानचा दुवा उघड केला आहे. पाकिस्तानच्या मनसुब्यांना भारतातील हा आरोपी कसा आणि का बळी पडला, याचे उत्तर शोधून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

पंजाबमधील जुने दाखले या ठिकाणी पुन्हा देण्याचा उद्देश म्हणजे ७०च्या दशकाच्या शेवटी निरंकारींवर हल्ला करूनच पंजाब पेटायला सुरुवात झाली, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पंजाबच्या पटलावर भिंद्रनवालेचा उदय, १९७८मध्ये शीख-निरंकारी संघर्षात १३ जणांचा मृत्यू, १९८०मध्ये निरंकारी पंथाचे गुरू बाबा गुरबचनसिंग यांची हत्या, १९८१मध्ये हिंदी भाषेचा पुरस्कार करणारे संपादक लाला जगत नारायण यांची हत्या, १९८२चा धर्मयुद्ध मोर्चा, १९८३मध्ये डीआयजी ए. एस. अटवाल यांची सुवर्णमंदिरात हत्या, भिंद्रनवालेचा सुवर्णमंदिरात आसरा आदी बाबी पंजाबमधील हिंसाचाराची साक्ष देतात. या मोठ्या हिंसाचारामागे तत्कालीन राजकीय घडामोडीही महत्त्वाची भूमिका बजावतात. नियंत्रणाबाहेर चाललेली स्फोटक परिस्थिती, भिंद्रनवालेचा भस्मासूर संपविण्यासाठी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारला अखेर लष्कराला पाचारण करावे लागले. लष्कराचे विख्यात असे ऑपरेशन ब्लू-स्टार राबविण्यात आले आणि भिंद्रनवालेचा खात्मा करण्यात आला. या कारवाईमध्ये शिखांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या सुवर्णमंदिराचे, अकाल तख्तचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ऑपरेशन ब्लू-स्टारदरम्यान रणगाड्यांचाही वापर करण्यात आला. त्यामुळे भिंद्रनवालेला नष्ट केले, तरी शीख धर्मियांच्या भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या. त्याचे गंभीर पडसाद नंतर उमटले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षारक्षकांकडून झालेली हत्या, १९८५मध्ये एअर इंडिया विमानामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात झालेला ३२९ प्रवाशांचा मृत्यू, १९८५मध्ये संत लोंगोवाल यांची हत्या, १९८६मध्ये ब्लू-स्टारच्या कारवाईच्या दरम्यान लष्करप्रमुख असलेले जनरल वैद्य यांची पुण्यात हत्या, १९९५मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची हत्या अशी हत्यांची लांबलचक मालिकाच पाहायला मिळते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शिखविरोधी दंगलींचाही या रक्तरंजित इतिहासात समावेश करावा लागेल. ऑपरेशन ब्लू स्टार ज्यांच्या नेतृत्वाखाली झाले, ते तत्कालीन मेजर जनरल आणि आताचे लेफ्टनंट जनरल (नि.) ब्रार यांच्यावर २०१२मध्ये हल्ला करण्यात आला. त्यात सुदैवाने ते बचावले; पण असंख्य धमक्यांचा सामना १९८४पासून ते करीत आहेत. यादरम्यान, ऑपरेशन ब्लॅक थंडर, ऑपरेशन वुडरोजदेखील राबविण्यात आले. आयपीएस अधिकारी केपीएस गिल यांच्या नेतृत्वाचे कसब त्या वेळी सर्वांना दिसले. 

पाकिस्तानला लागून असलेल्या पंजाबमधील समस्यांचे मूळ फाळणीपर्यंत जाते. बहुतांश लोकांचे झालेले विस्थापन, त्या वेळी झालेल्या दंगली, नंतरच्या काळात भाषावर प्रांतरचनेनुसार तयार झालेला राज्याची भाषा कोणती, राज्याची सीमा कोणती असे मुद्दे आणि राजकीय पातळीवर परिपक्वतेने पंजाबमधील समस्या हाताळल्या असत्या, तर पंजाबमधील स्थिती चिघळली नसती, असे म्हणण्यास जागा आहे. पंजाबमध्ये इतिहासात ज्या घटना घडून गेल्या, ज्या रक्तरंजित संघर्षामध्ये जनता होरपळून निघाली. तशी स्थिती पुन्हा निर्माण करण्याचा काही समाजकंटकांचा डाव असेल, त्याला पाकिस्तानसारख्या बाह्य शक्तींची साथ असेल, तर तो वेळीच मोडून काढला पाहिजे. देशामध्ये फुटिरतावाद, दहशतवाद याला अजिबात थारा असता कामा नये. हे करताना राजकीय आरोप-प्रत्यारोप टाळून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राजकीय नेतृत्वाने अधिक परिपक्वता दाखवणे गरजेचे आहे. 

अमृतसरमध्ये निरंकारी भवन येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्याला इतरही काही आयाम आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने अत्यंत खंबीर भूमिका घेतली आहे. फुटिरतावाद्यांशी चर्चा पूर्ण बंद केली आहे आणि लष्कराला ठोस प्रत्युत्तर देण्यासही सांगितले आहे. गेल्या चार वर्षांत दहशतवादी घटना, कारवाया यांना सीमावर्ती क्षेत्रातच बऱ्यापैकी सीमित राखण्यास यश आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान आणि दहशतवाद हा मुद्दा भारत सातत्याने मांडत आहे. भारतद्वेषाशिवाय दुसरे काही दिसत नसलेला पाकिस्तान त्यामुळे बेचैन झाला नसेल, तरच नवल! पंजाबमध्ये खलिस्तानवादाला चालना देऊन पुन्हा अस्थिरता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असू शकतो, असे अमृतसरमधील ग्रेनेड हल्ल्याने दिसते. एखाद्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचेही वृत्त आहे. लष्करप्रमुख जनलर बिपिन रावत यांनी पंजाबमधील बिघडलेल्या स्थितीबाबत काही दिवसांपूर्वीच वक्तव्य केले होते. झाकीर मुसा हा दहशतवादी अमृतसरमध्ये दिसला होता. एकूण पाहता स्थिती सामान्य नसल्याचे चित्र आहे. 

दहशतवाद ही एक मोठी समस्या असून दहशतवादी घटना म्हणजे देशाविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे. हे युद्ध केवळ लष्कर, पोलिस, निमलष्करी दल अशा सुरक्षा दलांपुरते मर्यादित नसून, ते देशातील प्रत्येक नागरिकाला लढायचे आहे. त्यासाठी एकोपा, परस्परांबद्दल विश्वासाचे वातावरण, सौहार्दाचे वातावरण असणे नितांत गरजेचे आहे. भाषा, प्रांत, धर्मातील विविधतेला सांस्कृतिक समृद्धी म्हणायचे, की अस्मितेच्या जाणीवा टोकदार करून, प्रसंगी त्याचे राजकारण करून द्वेषपूर्ण वातावरण तयार करायचे, हे येथील जनतेने ठरवणे गरजेचे आहे. दहशतवादाचा पराभव त्याच्या विचारसरणीच्या पराभवात आहे. सुरक्षा दलांची कारवाई ही तात्पुरती मलमपट्टी आहे. स्थानिक मदतीशिवाय दहशतवाद्यांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करता येतेच, असे नाही. दहशतवाद्यांची ही स्थानिक रसद, घरभेद्यांना रोखणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांच्या विचारसरणीतील फोलपणा त्यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे. भारताला वायव्येकडून दीर्घ काळ आक्रमणांचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानसारखा देश आज भारताच्या वायव्येला असून पाकच्या निर्मितीपासून सीमेवर शांतता क्वचितच आहे. दुसरीकडे चीनचेही आव्हान तयार झाले असून त्याची पाकिस्तानला फूस आहे. अशा स्थितीत देशातील जनतेने दक्ष राहणे गरजेचे आहे. 

ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल (नि.) ब्रार यांच्यावर २०१२मध्ये हल्ला करण्यात आला. त्यात ते बचावले. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्याचा संपादित अंश काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. स्वतः शीख असूनही ब्लू स्टार मोहिमेचे त्यांनी केलेले नेतृत्व आणि सैनिकांना दिलेला संदेश प्रत्येकाने पाहावा असा आहे. ते म्हणतात, 'भारतामध्ये ज्या पद्धतीचा दहशतवाद सातत्याने दिसत आहे. देशामध्ये अस्थिरता वाढविण्याचा प्रयत्न शेजारी करीत आहे. मग ती अस्थिरता काश्मीर, ईशान्येकडील भाग अथवा देशातील इतर भागांत कुठेही असू शकते. अशा पद्धतीच्या मोहिमेसाठी (ब्लू स्टारसारख्या) तुम्हाला बोलावले जाऊ शकते. तुम्ही आसामी, ख्रिश्चन, शीख, हिंदू, मुस्लिम, पारशी कुणीही असलात, तरी धर्म, वंश, जात, पंथ सर्व काही बाजूला ठेवा. देशासाठी लढण्याची आणि त्याच्या सुरक्षेची तुम्ही प्रतिज्ञा घेतली आहे. एका सैनिकाच्या परंपरेला शोभेल अशा रीतीने दिलेले काम तुम्ही बजावले पाहिजे.' सैनिकांना दिलेल्या संदेशातून सामान्यांनीही काही बोध घेणे गरजेचे आहे. 

No comments:

Post a Comment