Total Pageviews

Saturday 3 November 2018

भारतीय संरक्षण दलाने 'ऑपरेशन कॅक्टस' राबविले- M TIMES-MADHUBAN PINGLE


मालदीवमध्ये तत्कालीन अध्यक्ष अब्दुल गय्युम यांच्याविरोधात नोव्हेंबर १९८८मध्ये बंड झाले होते. त्यांच्या हाकेला धावत, २४ तासांमध्ये भारतीय संरक्षण दलाने 'ऑपरेशन कॅक्टस' राबविले आणि ही बंडाळी हाणून पाडली. तिन्ही दलांनी अतिशय सुसुत्रतेने ही कारवाई फत्ते केली. या कारवाईमध्ये भारतीय कमांडोंना मालदीवच्या विमानतळावर अंधारात विमान उतरवलेल्या ग्रुप कॅप्टन (निवृत्त) अनंत बेवूर आणि कमांडोंच्या तुकडीचे नेतृत्व केलेल्या कर्नल (निवृत्त) रमेश पुणेकर यांच्याशी केलेल्या संवादावर आधारित लेख… 

हिंदी महासागरामध्ये १२०० बेटांमध्ये विखुरलेल्या मालदीवमध्ये फार मोठी घडामोड होऊ शकते, असा अंदाज तीन नोव्हेंबर १९८८ पर्यंत फारसा कोणी केला नव्हता. मात्र, त्या दिवशी 'लुफ्ती' या स्थानिकाच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष अब्दुल गय्यूम यांच्याविरोधात बंड झाले. यासाठी लुफ्तीने पूर्व श्रीलंकेतील 'पीएलओटीई'च्या अतिरेक्यांचीही मदत घेतली. मोजकीच सुरक्षा यंत्रणा असणाऱ्या मालदीवसाठी हा मोठा धक्का होता आणि गय्यूम काही वेळातच भूमिगत झाले. मालदीवमध्ये बंड झाल्याची पहिली माहिती तीन नोव्हेंबरला सकाळी सात वाजता भारताला मिळाली. मालदीवसह श्रीलंका व बांगलादेशची जबाबदारी असणारे परराष्ट्र सहसचिव कुलदीप सहदेव यांना ही माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी तिन्ही संरक्षण दलांमधील कारवाईची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. अन्य देशांनी मदतीला नकार दिल्यानंतर मालदीवकडून भारताकडे मदतीसाठी याचना करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, भारताकडून मदतीसाठी गांभीर्याने विचार करण्यात येत होता. 

त्या दिवसाची आठवण सांगताना ग्रुप कॅप्टन (निवृत्त) अनंत बेवूर सांगतात, 'त्या वेळी मी आग्रा येथील हवाई तळावर ४४ स्क्वाड्रनमध्ये होतो. तीन तासांमध्ये उड्डाण करण्याच्या दृष्टीने तयारीत राहण्याचे आदेश आम्हाला मिळाले. या स्क्वाड्रनमध्ये आयएल-७६ (हे विमान 'गजराज' म्हणूनही ओळखले जाते.) हे विमान होते आणि लष्करी कारवाईमध्ये कमांडोंना एखाद्या ठिकाणी उतरविण्यासाठी त्या वेळी फक्त हेच विमान उपयुक्त होते. आग्र्यात लष्कराची पॅराशूट ब्रिगेडही होती.' भारताकडून कशी मदत करायची, यासाठी लष्कराच्या दिल्लीतील मुख्यालयामध्ये खलबते सुरू झाली. यामध्ये पंतप्रधान राजीव गांधींपासून परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, तिन्ही दलांचे प्रमुख, 'रॉ'चे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मात्र, 'आम्हाला कारवाईबाबतची नेमकी माहिती दिली नव्हती. अंदाज घेण्यासाठी आम्ही टीव्ही लावला, तर मालदीवमध्ये गडबड असल्याचे आणि त्यांनी भारताकडे मदत मागितल्याचे एक वृत्त होते. त्यावरून आम्हाला काही प्रमाणात अंदाज आला,' असे बेवूर सांगत होते. नकाशांच्या दृष्टीने अन्य अधिकाऱ्यांनी तयारी केली होती. तोपर्यंत सकाळचे दहा वाजले होते आणि हवाई तळाने एकूण पाच विमाने सज्ज केली होती. 

आग्रा येथील पॅरा ब्रिगेडच्या ब्रिगेडियर बलसारा आणि कर्नल सुभाष जोशी यांनीही तयारी केली होती. त्यांना गुप्तचर संस्थांकडून माहिती मिळाली होती, त्यानुसार, २०० ते ५०० बंडखोर असून, त्यांनी माले बेट नियंत्रणात घेतले आहे. गय्यूम यांच्याविषयी कोणतीही माहिती नाही, असे कळाले होते. माले शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांचा ताबा बंडखोरांकडे आहे. त्यांच्याकडील शस्त्रास्त्रांची माहिती घेतली असता, त्यांच्याकडे खांद्यावरून मारा करता येणारी रॉकेट असल्याचेही लक्षात आले होते. मालेपासून जवळ असलेल्या हुलहुले बेटावर ही धावपट्टी होती. सुरुवातीच्या नियोजनानुसार, एक-दोन प्लाटून विमानातून उतरवायच्या आणि विमानतळ सुरक्षित करून विमान उतरवत पुढील कारवाई करायची. तोपर्यंत दुपारचे बारा वाजून गेले होते. या कारवाईमध्ये 'आयएल-७६' सारख्या तब्बल १५० टन वजनाच्या विमानाचा वापर करताना, त्यासाठी तेथील विमानतळ किंवा धावपट्टीची अजिबात माहिती उपलब्ध नव्हती. लष्कर व हवाई दलाच्या मुख्यालयातील अधिकारी दुपारी साडेतीन वाजता आग्रा येथे पोहोचले. त्यांनीही या नियोजनाला मंजुरी दिली. मात्र, त्यांनाही या विमानतळाविषयी किंवा परिसराविषयी निश्चित माहिती नव्हती. 'माझ्यासह बलसारा आणि सुभाष जोशी यांना ही कल्पना अजिबात पटली नाही,' अशी आठवण बेवूर सांगतात. 'आयएल-७६'सारख्या विमानांतून पुढील-मागील अशा चार दरवाजांमधून २१ सेकंदांमध्ये १२६ जवान उडी मारू शकतात. विमानाचा वेग पाहता, या जवानांना सुरक्षितपणे उतरता यावे, यासाठी किमान दोन हजार मीटरपर्यंतचे खुले क्षेत्र आवश्यक असते. मात्र, या प्रदेशाविषयीची कोणतीही ठोस माहिती नव्हती. त्यानंतर विमान थेट उतरवण्याचा पर्याय समोर आला. 

भारताचे मालदीवमधील तत्कालीन उच्चायुक्त बॅनर्जी त्या वेळी दिल्लीतच होते आणि त्यांनी एक पर्यटन पुस्तक आणले. त्यावर पहिल्यांदा धावपट्टी व बेटांचा फोटो पाहिला. यानंतर नियोजन व कारवाईच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली. कारवाईतील गोपनीयता सर्वांत मोठी होती. मात्र, आग्रा ते माले हा प्रवास कसा करायचा हा प्रश्न होता. या कारवाईमध्ये दोन 'आयएल-७६' जाणार होते. यातील एका विमानात २१०, तर दुसऱ्या विमानात १८५ पॅरा कमांडो होते. या विमानांना नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या क्षेत्रातून जावे लागणार होते आणि दिल्ली, भोपाळ, नागपूर, हैदराबाद, बेंगळुरू आणि तिरुअनंतपुरम येथील हवाई नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधावा लागणार होता. या प्रवासाची आठवण सांगताना बेवूर म्हणाले, 'ठरल्याप्रमाणे सायंकाळी ६.३० वाजता माझ्या विमानाने उड्डाण घेतले, तर पाच मिनिटांनी सहकारी स्क्वाड्रन लीडर अमरदीप गिलच्या विमानाने झेप घेतली. ठरल्याप्रमाणे, 'एटीसी'शी संपर्क साधताना फक्त एकच विमान आहे आणि दैनंदिन प्रवासासाठी ते तिरुअनंतपुरमला जात असल्याचे सांगायचे होते. प्रत्यक्षात गिलचे विमान माझ्या विमानाच्या एक किलोमीटर मागे होते. त्याचे सर्व दिवे बंद होते आणि संपूर्ण प्रवासामध्ये तो कोणाशीही संपर्क साधणार नव्हता. फक्त आम्ही दोघे गोपनीय फ्रिक्वेन्सीवर संवाद साधणार होतो.' तिरुअनंतपुरमपर्यंतच्या प्रवासामध्ये काही अडचण आली नाही. तिरुअनंतपुरमजवळ आल्यानंतर, तेथील 'एटीसी'मधून बेवूर यांना विमान उतरवण्यासाठी उंची कमी करण्याच्या सूचना मिळू लागल्या. त्यावर, बेवूर यांनी 'एटीसी'मध्ये उपस्थित असणाऱ्या ग्रुप कॅप्टन एस. डी. पण्णिकर यांच्याशी संवाद करण्याची विनंती केली. या दोघांनी इराकमध्ये एकत्रित काम केले होते आणि थोडी अरबी भाषा येत होती. बेवूर यांनी त्यांना अरबीमध्ये विचारले, 'मला जायचे आहे, जाऊ का?' त्यावर पण्णिकरांनी 'जा' एवढेच सांगितले आणि दोन्ही विमाने मालेच्या दिशेने वळाली. 

हुलहुलेच्या धावपट्टीपासून ९० किलोमीटर अंतरावर येईपर्यंत त्यांच्याशी कोणताच संपर्क केला नव्हता. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला, मात्र धावपट्टी कोणाच्या ताब्यात आहे, याचा अंदाज येत नव्हता. त्यावर बेवूर यांनी 'एटीसी'शी संपर्क केला, 'धिस इज फ्रेंडली वन' असा संदेश पाठवला. त्यावर 'गो अहेड' एवढेच प्रत्युत्तर आले. प्रत्यक्षात 'हदिया' हा सांकेतिक शब्द अपेक्षित होता. तरीही, बेवूर यांनी 'डू यू हॅव एनी मेसेज फॉर मी' असा प्रतिप्रश्न केला आणि 'एटीसी'तील अधिकाऱ्याने 'हदिया.. हदिया.. हदिया' असे उत्तर दिले. त्यामुळे निर्धास्त होईपर्यंत पुढे आणखी एक मोठे आव्हान उभे होते, ते म्हणजे बंडखोरांच्या भीतीमुळे धावपट्टीवरील दिवेच बंद करण्यात आले होते. विमानातील रडार तपासले, तर धावपट्टीबरोबरच समुद्रातील उथळ प्रवाळांमुळेही बेटांची लांबी मोठी वाटत होती. अखेरीस ५-७ सेकंदांसाठी दिवे लावण्यात आले आणि तेवढ्यात धावपट्टी पाहिली. विमानाची दिशा निश्चित केली. 'मला विमान एकाच प्रयत्नात उतरवायचे होते, दुसरा प्रयत्न करणे म्हणजे बंडखोरांना आमंत्रण देण्यासारखे होते. मनामध्ये देश, हवाई दल आणि आमच्या स्क्वाड्रनच्या इज्जतीचा विचार होता. त्यामुळे यशस्वी व्हायचेच, असे ठरवले होते,' त्या काही मिनिटांमधील मनस्थिती बेवूर सांगत होते. अखेरीस त्यांनी सर्वस्व पणास लावून ब्रेक दाबले, विमानाचे रिव्हर्स सुरू केले आणि विमान थांबविले. तोपर्यंत बेटाचे शेवटचे टोक काही मीटरच उरले होते. विमान उतरण्यापूर्वी मागे बसलेल्या गनरने दरवाजे खुले करण्यास सांगितले होते. तर, मागील बाजूला इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या हवेचा वेग असल्यामुळे कमांडोंना विमानासमोरून बाहेर पडण्याची सूचना केली होती. सर्व कमांडोंनी अवघ्या १०-१२ मिनिटांमध्ये सर्व जवान आणि सामान बाहेर काढले होते आणि पाठोपाठ मागील विमानही धावपट्टीवर उतरले. हे विमान उतरत असताना, गिलला त्याच्या विमानासमोरून काही कमांडो पळत जाताना दिसले. विमान थांबविल्यानंतर, तो अतिशय दु:खी अवस्थेत म्हणाला, 'बेवूरसाहेब, बहुतेक काही कमांडो माझ्या विमानाखाली आले असतील.…' पण सुदैवाने असे काहीच घडले नव्हते. त्यानंतर ३० मिनिटांमध्ये सर्व काम संपवून आमची दोन्ही विमाने तिरुअनंतपुरमला परतली. 

तोपर्यंत रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते. विमानात बसेपर्यंत कमांडोंना कोठे जात आहोत, याची कल्पना नव्हती. त्यांना सर्व नियोजन विमानातच सांगण्यात आल्याचे रमेश पुणेकर यांनी सांगितले. पुणेकर यांनी या कारवाईमध्ये कमांडोंच्या एका तुकडीचे नेतृत्व केले होते. या कारवाईतील पहिल्या नियोजनानुसार, 'एटीसी' ताब्यात घ्यायची होती आणि ते काम काही मिनिटांमध्येच फत्ते झाले. तर, जोशी यांनी स्थानिकांच्या मदतीने काही नौका मिळविल्या. आता कमांडोंची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. भारतीय कमांडो नेमके कोणत्या दिशेने येताहेत, हे कळू न देण्याची जबाबदारी पुणेकर यांच्या गटाकडे होती. मात्र, ते ज्या दिशेने गेले, त्या ठिकाणी त्यांना २०-३० बंडखोर सापडले. त्यांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले. बेटावरून पुढे जात असताना, त्यांना कमांडोंचा दुसरा गटही मिळाला. ते सर्व जण बरोबरील खबऱ्याच्या सोबतीने गय्यूम यांच्या दिशेने जात होते. गय्यूम यांच्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील सैनिकांनी यातील कोणालाही प्रवेश दिला नाही. त्यांना भारतीय सैनिक आणि बंडखोर यांमध्ये फरक करता येत नव्हता. कमांडोंमध्ये काही शीख होते आणि शीख जवान बंडखोर असू शकत नाहीत, यावर त्यांचा विश्वास बसत गेला. पहाटे साडेतीन वाजता गय्यूम यांना सुरक्षित करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आले. त्यानंतर एका तासाने म्हणजे साडेचार वाजता गय्यूम यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांना फोन करत भारताचे आभार मानले. 

अध्यक्षांना सुरक्षित केल्यानंतर मोहिमेचे पहिल्या क्रमांकाचे ध्येय साध्य झाले असले, तर भारतीय सैन्य पोहोचताच लुफ्तीसह बंडखोरांनी 'एमव्ही प्रोग्रेस लाइट' या व्यापारी जहाजातून पळ काढला होता. त्यांनी सोबत काही ओलिसांनाही नेले होते. या कारवाईसाठी बाहेर पडलेल्या 'आयएनएस बेतवा'कडे या जहाजाचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात आली. तत्कालीन कमोडोर हरी गोखले 'बेतवा'चे नेतृत्व करीत होते. काही वेळानंतर ऑस्ट्रेलियाहून परतणाऱ्या 'आयएनएस गोदावरी'लाही त्यांच्या मदतीसाठी पाठविण्यात आले. या दोन्ही युद्धनौकांनी कारवाई करून ओलिस व बंडखोरांना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये रात्रीतून विमान उतरवण्याचा 'सरप्राइज इलिमेंट' सर्वांत महत्त्वाचा ठरल्याचे पुणेकर सांगतात. 

No comments:

Post a Comment