Total Pageviews

Wednesday 14 November 2018

भयंकर प्रदूषणाच्या विळख्यात दिल्ली


दिल्लीतले प्रदूषण हा दिवसेंदिवस अधिकाधिक गांभीर्याचा आणि चिंतेचा विषय बनत चालला असून सध्या या शहरातल्या प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. शक्य असेल तर घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने नागरिकांना दिला आहे. देवपूजेसाठी कापूर तर दूरच; उदबत्तीसुद्धा जाळू नये, असे आवाहन केले आहे! दिल्लीतले प्रदूषण आत्यंतिक जीवघेणे ठरल्याची ग्वाही शहराभोवती पसरलेले प्रदूषणाचे ढग देत आहेत. गेल्या वर्षी या शहरातले आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनेही काही काळ स्थगित ठेवण्याची वेळ आली होती आणि जागतिक स्तरावर भारताची चांगलीच गेली होती. परंतु त्यानंतरही वर्षभराच्या काळात प्रशासनाने तातडीने पुरेशा उपाययोजना केलेल्या नाहीत, हे यामुळे सिद्ध झाले असून त्याचा हा भयंकर परिणाम आता समोर आला आहे.
यंदाही पंजाब आणि हरयाणा इथे कापणीनंतर धान्याच्या रोपांचे राहिलेले खुंट जाळून टाकण्याच्या प्रथेमुळे हे प्रदुषणाचे ढग निर्माण झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांनाही प्रदूषणासाठी जबाबदार धरले पाहिजे. हे खुंट जमिनीत गाडले तर चांगले खत मिळू शकते; परंतु त्याऐवजी ही अनिष्ट प्रथा तशीच सुरू ठेवणार्‍या या राज्यांना देशाच्या राजधानीत प्रचंड प्रदूषण पसरवण्याबद्दल खरमरीत जाब का विचारला जात नाही आणि आर्थिक दंड ठोठावून प्रदूषण कमी करण्यास का भाग पाडले जात नाही, हा प्रश्‍न ङ्गक्त चर्चेपुरता उरला आहे. गेली अनेक वर्षं त्याबाबत कारवाई झालेली नाही. त्यामुळेच दिल्लीतल्या मुलांना खेळणेच नव्हे तर शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणे आणि प्रौढांना नोकरी-व्यवसाय करणेही मुश्किल बनले आहे. राजधानीचीच ही स्थिती असेल तर इतर ठिकाणचे गंभीर प्रश्‍न कसे हाताळले जात असतील याचा विचार न करणेच बरे!
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एन्व्हायर्न्मेंट पोल्युशन (प्रिव्हेन्शन ऍण्ड कंट्रोल) ऑथॉरिटी (ईपीसीए)ने वार्‍यांची दिशा बदलल्यामुळे या प्रदूषणात वाढ होण्याचा इशारा नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशीच दिला होता. ‘एअर क्वालिटी इंडेक्स’चा विचार करता दिल्लीची हवा आधीच अत्यंत खराब होती. परंतु प्रतिकूल वार्‍यांमुळे ती आणखी बिघडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानेही दिला होता. याशिवाय, प्रदूषकं किती झपाट्याने दूर जातील याचा अंदाज देणारा व्हेंटिलेशन इंडेक्सही घसरला आहे. 15 ऑक्टोबरपासून नॅशनल कॅपिटल रिजनअंतर्गत तातडीच्या उपाययोजना योजल्या गेल्यानंतरही ही स्थिती आहे, हे ही इथे लक्षात घेतले पाहिजे. सहसा 1 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान पिके मोठ्या प्रमाणात जाळली जातात. यंदा याच काळात दिवाळीही असून हिवाळा जवळ आला आहे. त्यामुळे प्रदूषण प्रचंड म्हणावे एवढे वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, त्याची झलक आता दिसत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दिल्लीवर प्रदूषित धुक्याचा जाड थर पसरला आहे. गेल्या वर्षी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कारण 0 ते 500 या हवेच्या दर्जाच्या निर्देशांक पट्टीवर दिल्लीचा निर्देशांक 301 ते 400 एवढा झाला होता.
तापमानातली घट, कमी गतीचे वारे आणि ढगाळ आकाश यामुळे प्रदूषकं हवेतच तरंगत राहतात. यंदा या निर्देशांकात काहीशी सुधारणा झाली असली तरी ती कायमस्वरूपी नाही. 4 नोव्हेंबरला 231 असलेला हा निर्देशांक पाच नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता 365 झाला होता. यावरून निर्देशांकात सुधारणा झाली असे म्हणता येत नाही हेच स्पष्ट होते. प्रदूषकं पुरेशा प्रमाणात गतीने पुढे वाहून नेली जात नाहीत. याचा ङ्गटका सध्या दिल्लीला बसत आहे. त्यामुळे दिल्लीतील संपूर्ण सजीवसृष्टी धोक्यात आली आहे. दिल्ली हे जगातले सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे, असे म्हटले जाते. मात्र, 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने दिल्लीला जगातले सर्वाधिक प्रदूषित शहर घोषित केले होते. पाण्याचे आणि पाणीसाठ्यांचे प्रदूषण आणि त्याचबरोबर घनकचर्‍यावर प्रक्रिया केली न जाणे हे दोन आत्यंतिक महत्त्वाचे मुद्दे आहेत. यामुळे यमुनेचे मोठे प्रदूषण झाले असून दिल्ली यमुनेच्या काठावरच वसली आहे. अतिरेकी लोकसंख्या आणि पाण्यासारख्या तुटपुंज्या स्रोतांचा अतिवापर यामुळे शहराच्या यंत्रणांप्रमाणेच पर्यावरणावरही मोठा ताण आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेले प्रदूषण रोखण्याचे निकष दिल्लीने तातडीने पाळले नाहीत, तर या शहरात दहा हजारहून अधिक लोक दर वर्षी निव्वळ वायू प्रदूषणामुळे अकाली मरण पावतील असा अंदाजही या संघटनेने व्यक्त केला आहे. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी जागतिक स्तरावर दावा करताना शहराच्या अधिकार्‍यांनी असा दावा केला होता की, त्यांना शहराचे प्रदूषण काही प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे. मेट्रो आणि सीएनजीच्या वापराच्या सक्तीमुळे शहरातल्या वायूप्रदूषणाची पातळी चांगलीच घटल्याचेही म्हटले गेले होते. परंतु 2016 पासून दिसत असलेले चित्र याच्या अगदी विरुद्ध आहे. एके काळी थंड हवामानासाठी ओळखल्या जाणार्‍या या राजधानीवर आणि पर्यायाने देशावरही आज प्रदूषणाचे दुर्दैवी संकट ओढवले आहे. चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यांवर धावणार्‍या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रस्त्यावरून अतिरेकी संख्येने धावणार्‍या वाहनांमुळे उडणारी धूळ आणि वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या वाहनांची अस्वच्छ इंजिने यामुळे यात रोजच भर पडत आहे. विशेषतः डिझेलवर चालणार्‍या बसगाड्या, ट्रक आणि टू स्ट्रोक इंजिनवर धावणार्‍या दुचाक्या आणि तीनचाकी वाहने यात भयावह भूमिका बजावत आहेत. सतत तुंबणार्‍या वाहतुकीमुळे धुराचे लोटच्या लोट हवेत पसरतात आणि त्यावेळी वाजणार्‍या हॉर्नमुळे मोठे ध्वनिप्रदूषण होत आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
शहरात झाडंझुडपं लावून ‘हरित शहर’ करण्याचा प्रकल्पही असाच रेंगाळला आहे. दिल्लीला या प्रकल्पासाठी 44,777 हेक्टर जागा देण्यात येणार होती. परंतु दिल्ली विकास प्राधिकरणाने तुटपुंजी जागा उपलब्ध करून दिली. जैवकचर्‍याची समस्याही अशीच प्राणघातक ठरत आहे. दिल्ली प्रशासनाने बांधकाम बंद करणे, दगड ङ्गोडण्याची आणि हॉट मिक्स प्रकल्प कामे बंद करण्यासारख्या उपाययोजना हाती घेतल्या असल्या तरी त्यांनाही अपेक्षित यश प्राप्त झालेले नाही. अशा अनेक उपाययोजना ङ्गसल्याचे दिसत असल्यामुळेच हा प्रश्‍न अधिक काळजीचा बनत चालला आहे.

No comments:

Post a Comment